लता मंगेशकर आणि आशा भोसले.. एक स्वयंभू तर एकीने जाणीवपूर्वक स्वत:ला घडवलंय. त्या दोघींचं एकमेकींशी नातं नेमकं कसं असेल? ८ सप्टेंबर हा आशा भोसलेंचा जन्मदिवस तर २८ सप्टेंबर हा लता मंगेशकरांचा. त्यानिमित्त-

त्या दोघी म्हणजे लता आणि आशा. त्या दोघींना अर्धशतकाहून अधिक काळ ओळखणारे, अगदी तानसेन जरी नसले तरी आपल्यासारखे ‘कानसेन’ निश्चित असतात. त्यामुळे लावलेल्या ‘सा’वरून, स्वरांचं रंगरूप कळेल, पण पूर्ण ‘राग’ कसा कळावा? त्या ‘रागा’पलीकडचे प्रेम, लोभ, माया कसे कळावेत? हे सारं त्या दोघींनाही असणार ना तुमच्या-आमच्यासारखे? त्या दोघींविषयी या विषयावर भरपूर लिहिलं गेलं आहे आजवर.. पण ते सारं आख्यायिका, वावडय़ा, गॉसिप्स या स्वरूपांत. ‘आंधळे आणि हत्ती’ या गोष्टीसारखं.
त्यावर ‘आम्ही दोघी कुणा इतर बहिणींसारख्याच आहोत. आम्ही एकत्र असलो की लोकच वेगळे वागतात.. ते आठवून नंतर आम्ही खळाळून हसतो!’ ही दोघींची धमाल प्रतिक्रिया.
म्हणूनच त्या दोघींविषयी काही- म्हटले तर व्यक्तिगतदेखील- प्रश्न पडतात. ज्यांची उत्तरं मिळणं कठीण. (पेडर रोडवरचा फ्लायओव्हर होत नाही तोपर्यंत त्या दोघींच्या घरांत डोकावणंदेखील कठीण) पण म्हणून प्रश्नांचं महत्त्व काही कमी होत नाही.
लता नाटय़गीतं कधी का नाही गायली? त्या दोघी घरी तरी कधी एकमेकींची गाणी गुणगुणत असतील का? हृदयनाथ या दोघी सख्ख्या बहिणींमधून गाण्यासाठी निवड कशी करत असतील? आशा ‘भोसले’ झाली नसती, तर इतकी उंची गाठली असती का? परिपूर्ण लता घरात असताना आशा कशी निर्माण झाली? मुळात लता कशी निर्माण झाली?
या प्रश्नावर मात्र लता एके ठिकाणी म्हणाली होती, ‘‘विभूतिपूजनाची प्रवृत्ती प्रत्येकाच्या ठिकाणी असते. मी त्या काळीं नूरजहानची भक्ती करायचे. नंतर रोशन आराचा माझ्यावर इतका परिणाम झाला की, रियाझ करताना नकळत तिच्या गाण्याचा ढंग उमटू लागला, तेव्हा माझे गुरू अमानत अली खांसाहेबांनी चांगलाच दम दिला.. रोशन आराचीच काय, कुणाचीच नक्कल तू करू नकोस, त्यामुळे स्वत:च्या आवाजाचं वैशिष्टय़ तू गमावून बसशील, स्वत:चं गाणं बिघडवून घेशील!’’.. लता अशी ‘निर्माण’ झाली.
अमानत अली खांसाहेबांचा तो ‘दम’ आशानंदेखील ऐकला असावा, कारण आशादेखील अशीच ‘निर्माण’ झाली, दीदीची ‘नक्कल’ न करता ती गातच होती. हिमालयाशी टक्कर देण्याचा सवालच नव्हता. टेकडय़ांचं अस्तित्व कुणी नाकारत नाही; पण तुलना कायम हिमालयाशी अन् हिमालय तर स्वयंभू. मग स्वत:चं वेगळं स्थान कसं निर्माण करायचं?
धडपड चालूच राहिली.. अन् ताजमहाल आकारास आला!
हिमालय अन् ताजमहाल. एक धीरगंभीर, दुसरा चिरतरुण.
एक स्वयंभू. दुसरा घडवलेला. एक असीम उंचीचं प्रतीक तर दुसरा अमर्याद सौंदर्याचं प्रतीक.
एकाची भव्यता डोळे विस्फारायला लावणारी तर दुसऱ्याचं सौंदर्य डोळे दिपवणारं. दोघं वेड लावणारे.. तुलना अशक्य. तरीही दोन्ही आपापल्या परीने श्रेष्ठच.
तरीही ताजमहालाला घडण्यासाठी टाकीचे घाव सोसावे लागले आहेत. आशारुपी ताजमहालदेखील काही एका रात्रीत निर्माण झाला नाही. तो घडविण्यात सुरुवातीला ओ.पी. नय्यरची कारागिरी महत्त्वाची होती. आज आशा हे मान्य करीत नसेलही.. कारण ‘नया दौर’च्या (१९५७) ब्रेकसाठी आज ती बी.आर. चोप्रांचं नाव घेते, पण ओ.पी.चं नाव टाळते. आयुष्याच्या प्रवासात ओ.पी.ची साथ सुटण्याच्या वळणावर तिला ‘पंचम’- आर.डी. बर्मन भेटला, ज्यानं ताजमहाल परिपूर्ण केला. त्यामुळे एक ‘माणूस’ म्हणून तिला आपणदेखील समजून घेतो. आशा दुरावल्यावर ओ.पी. देखील संपलाच की. तरी वयाच्या ७६व्या वर्षी त्यानं मान्य केलं, ‘माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची व्यक्ती ‘आशा’च होती!’ त्याच्यासाठी आशानं गायलेलं अखेरचं गाणं होतं, ‘चन से हमको कभी, आपने जीने ना दिया..’ (प्राण जाये पर वचन न जायें), हा देखील काव्यगत न्यायच.
पण आशा साकारताना, लता नाकारणारा ओ.पी. एकमेव होता, हे विसरता येत नाही. म्हणूनच त्या दोघींविषयी लिहिताना ओ.पी. नय्यर वगळता येत नाही..
गुलजारच्या ‘मीरा’साठी गायला लतानं नम्र नकार दिल्यावर- कारण हृदयनाथनं त्याआधीच मीरेची भजनं लताच्या आवाजात अजरामर करून ठेवली होती- रवी शंकरलादेखील ‘अनुराधा’ची जादू लताशिवाय जमली नव्हती.. म्हणून लताशिवाय काही काळ चित्रपटसृष्टीत राज्य करणाऱ्या ओ.पी.ला मानलंच पाहिजे. तसं लताशिवाय सिनेसंगीत आजही आहेच, पण आज राज्य कुणाचं आहे?
तसं तर लताशी बिनसल्यावर शांतारामबापूंचा ‘नवरंग’ (१९५९) सी. रामचंद्रने आशाला हाताशी धरून लताशिवाय गाजवून दाखविलाच; पण नंतरच्या ‘स्त्री’ (१९६१) मध्ये पुन्हा लता होतीच आशाबरोबर अन् १९६२-६३ सालच्या त्यांच्या ‘ऐ मेरे वतन के लोगों,’ या लताच्या चित्रपटबाह्य़ गाण्यानं तर इतिहास घडविला. अन् तिथूनच त्या दोघींच्या संदर्भात वावडय़ाही पुन्हा सुरू झाल्या; इतक्या की सई परांजपेसारख्या दिग्दíशकेलादेखील त्या घटनांचा मोह पडला अन् त्यांनी चित्रपट निर्माण केला ‘साज’! ‘नरो वा कुंजरो वा’ या धर्तीचा हा सिनेमा तसा रंगीत, पण प्रमुख रंग दोनच. काळा आणि पांढरा. शबाना आझमी आणि अरुणा इराणी यांच्यामध्ये एक नायिका, दुसरी खलनायिका. थोडक्यात, विविध कंगोरे असलेल्या त्या तथाकथित घटनांतील संबंधित प्रत्येकाचं ‘सत्य’ वेगळं आहे! ‘खरं सत्य’(!) आजदेखील कुणाला माहीत नाही. त्याने काही फरकदेखील पडत नाही, कारण ईर्षां-इगो, दुरावा-बिनसणं, यांतून तर तुमची-आमची कुणाचीच सुटका नाही, एवढं सत्य मान्य व्हावं.
त्या सिनेमावर लताची प्रतिक्रिया म्हणजे, स्वाभाविक मौन. तर, ‘वेस्ट ऑफ टाइम.. बकवास!’ ही आशाची रोखठोक स्वाभाविक प्रतिक्रिया.
वयाच्या सोळाव्या वर्षी घर सोडून, घरची जबाबदारी एकटय़ा लतावर टाकून, लताचे पर्सनल सेक्रेटरी गणपतराव भोसले यांच्याबरोबर लग्न केल्याबद्दल, लताच्या मनात आशाविषयी दुरावा निर्माण होणं स्वाभाविकच होतं. त्यासाठी ‘माणूस’ म्हणून लतालादेखील आपण समजून घेतो. आशानंदेखील कालांतरानं हे मान्य केलं. हीच या नात्यांची गुंतागुंत असते.
पण ‘भोसले’ झाली नसती, तर आशा ‘मंगेशकर’ वृक्षाच्या सांवलींत बहरली असती का? हा तसा ‘अनतिहासिक’ अन निर्थक प्रश्न.
लता एके ठिकाणी म्हणते, ‘आशाच्या गाण्याबद्दल बोलायचं झालं तर तिच्यासारखी व्हर्सटाइल आर्टिस्ट आपल्याकडे कुणीच नाही. आपल्याला अमुक एक करायला येत नाही, हे ती मान्यच करायला तयार नसते. जे करेल ते ती उत्तमच करते. तिची स्मरणशक्ती अफाट आहे. आई म्हणून ती परिपूर्ण आहे. ती अतिशय हट्टी आहे. मूडी आहे. तिच्या रागाचा पारा जितक्या लवकर वर जातो, तितक्या लवकर तो खाली येतो. खरं म्हणजे आम्ही बहिणी असल्यामुळे तिचं कौतुक करणं कुणाला खोटं वाटेल, पण मला जे जाणवतं ते अगदी प्रामाणिकपणे सांगते. खरंच!’
गेल्या वर्षी झालेल्या एका पुरस्कार समारंभात ‘नक्षत्रांचं देणं’ देताना लतानं पुन्हा तिची भावना बोलून दाखवलीच, ‘संसाराची कसरत सांभाळताना, आम्हां भावंडाकडून काही एक न मागता ती यशस्वी झाली, त्यामुळे तिला ‘हृदयनाथ पुरस्कार’ देण्याचा आनंद काही वेगळाच आहे.’ लताच्या या भावनेला उत्तर देताना आशा म्हणाली होती, ‘आजचा कार्यक्रम मोठा अजबच आहे. मंगेशकर भावंडांबद्दल नेहमीच काही ना काही अफवा पसरविल्या जातात. मात्र कुणीही काहीही बोललं तरी हाताची पाचही बोटं एकत्र येतात.. एकेकाळी मी दीदीच्या कौतुकासाठी आसुसलेली असायचे. अन् आज तिच्या हातून हा पुरस्कार मिळतोय..!’ या आशाच्या उत्तरांत ‘तो एके काळ’, अन मुळांत ‘मंगेशकर’ असल्याची जाणीव उघड होते.
तर अशा या दोघी सख्ख्या बहिणी, पण स्वभाव दोन विरुद्ध टोकांचे. एक सौम्य-गंभीर-मौन, पण महत्त्वाकांक्षी. दुसरी बंडखोर-जिद्दी- रोखठोक, पण मनमोकळी.
तरीही या दोघींची द्वंद्वगीतं निवडकच पण अविस्मरणीय. तरीही वावडय़ा उठायच्याच..‘रेकॉर्डिग’ला दोघीही दोन दिशांना ध्वनिक्षेपक धरून, एकमेकींना पाठ करून गातात!’ वगरे. त्यावरून हल्लीच एका स्टेजवरच्या मुलाखतींत आशानं हसतच सांगितलं, ‘मन क्यूं बहेका रे बहेकाच्या वेळेस आम्ही तशाच उभ्या राहून गात होतो. तिनं तिची पहिली ओळ तिच्या पद्धतीनं म्हटली. माझी दुसरी ओळ मी जरा वेगळ्या, माझ्या पद्धतीनं म्हटली. तेव्हा तिनं वळून चष्मा खाली करून वरनं माझ्याकडे पाहिलं अन म्हणाली..वा! मला तिची तेवढी दाददेखील पुरेशी होती.. देवानं तिचा गळा निर्माण केला अन् तो विसरून गेला कसा निर्माण केला ते. एरवी तिला काय अशक्य आहे? तिनं मनावर घेतलं असतं तर नाटय़गीतंदेखील गायली असती माझ्यासारखी!’
मनावर घेण्यापेक्षा, पूर्णत: व्यावसायिक असल्यानं, स्पर्धा टाळण्यासाठी या दोघींनी आपापले परीघ आखून घेतले असावेत. ‘मी ऐकलेलं पहिलं गाणं अर्थात वडिलांचंच आणि हुबेहूब त्यांच्यासारखंच गातां यावं, ही माझी त्या वयातली महत्त्वाकांक्षा होती.’ असं म्हणणाऱ्या लताला एरवी काय अशक्य होतं? नाटय़पदं लताच्या आवाजात कशी वाटली असती, त्यासाठी पुन्हा कल्पनेच्या राज्यातच शिरणं, एव्हढंच आपल्या हाती उरतं. वास्तविक ‘पाकिज्मा’ अन् ‘उमराव जान’ या दोन्ही चित्रपटांतील मुख्य स्त्रीव्यक्तिरेखा एकाच प्रकारच्या. पण गुलाम महम्मदने ‘पाकिजम’ साठी लताची निवड केली, तर खय्यामनं ‘उमराव जान’साठी आशाची.. म्हणजे या दोघींची ही एक प्रकारची जुगलबंदीच. तरीदेखील दोघींच्या गाण्यांची क्षेत्रं वेगळी समजली जातात!
मग प्रश्न पडतो की, आपापल्या घरी तरी या दोघी एकमेकांची गाणी गुणगुणत असतील का? कितीतरी लताने गायलेली गाणी तर आर.डी.चीच. आशाची तक्रार असायची, की सचिनदांनी सगळी मधुर गाणी लतालाच दिली! पण ‘ताज’ पूर्णत्वास नेणाऱ्या आर.डी.नं तरी वेगळं काय केलं? आपण तर तसेही समृद्धच झालो!
हृदयनाथ तर घरचाच. दोघींना जोडणारा समान दुवा. त्यांच्या संगीतात लतानं ‘मीरेची भजनं- ज्ञानेश्वरी’ तर सोन्यानं मढवली. तर लखलखीत भावगीतं आशानं दिली. त्याविषयी आशा म्हणते, ‘गाण्यांत मी साऱ्या रंगांची-छटांची गाणी गाऊ लागले, पण हृदयनाथांनी, ज्ञानेश्वरांचं ‘पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती.’ हे भजन, अन ‘दिनू तशी रजनी ये.’ ही विराणी मला दिल्यानं जास्त समाधान वाटलं!’ पूर्ण ज्ञानेश्वरी लताला दिल्यानंतर या दोन्ही रचना आशाला देताना हृदयनाथांचा काय विचार असेल?.. खरं तर सख्ख्या भावाला या दोन्ही बहिणींबद्दल पडलेला संभ्रमदेखील विलोभनीयच!
स्वतंत्र अस्तित्व असलेली दोन चक्र एकत्र आल्यावर थोडंफार घर्षण तर होणारच. त्यात उडणाऱ्या ठिणग्यातून काही चमकदार निर्मिती व्हावी, तसं खुद्द लताच्या संगीत दिग्दर्शनात आशा भन्नाट गाऊन गेली.. ‘रेशमांच्या रेघांनी, लाल काळ्या धाग्यांनी.’! मग मोजक्याच चित्रपटांना संगीत देणारा लताचा ‘आनंदघन’ इतरत्र का नाही बरसला? वयोमानानुसार आवाजात फरक पडल्यावर, लतानं संगीत का नाही दिलं?
लतानं काही वर्षांपूर्वी पुरुष गायकांना ‘श्रद्धांजली’ म्हणून सगलपासून किशोरकुमापर्यंत, त्यांची गाणी गाऊन अल्बम काढला होता. काही ‘प्रतीलतांनी’ देखील लताचीच गाणी गाऊन अल्बम्स काढले होते. लता आणि आशाने एकमेकींचं कौतुक करण्यासाठी, एकमेकींची गाणी गाऊन असे अल्बम्स का नाही कधी काढले? की यामध्यें देखील ‘तुलना नको’ ही व्यावसायिक भावना असेल? प्रश्नांना तर अंत नाही. हे सगळे अनुत्तरित प्रश्न, ही सगळी रुखरुख आपल्यापुरती.
त्या दोघींचं द्वंद्वगीत असंच चालू राहणार आहे. आपलं आयुष्य स्वरांनी समृद्ध करणाऱ्या ‘त्या दोघींना’ आज ८५ अन ८१ ही वयाची र्वष ओलांडताना त्यांच्या शतकाच्या प्रवासासाठी मनापासून शुभेच्छा..