01 April 2020

News Flash

टाचणी आणि टोचणी : धर्म-सत्तेचा खेळ

‘घरवापसी’च्या मुद्दय़ाचं वादळ शमतंय न शमतंय तोच संघपरिवारातून मदर तेरेसा यांच्या कामावर टीका झाली आणि वादाचं एक नवीन वादळ घोंघावायला लागलं. हे वाद खरेच आहेत

| March 6, 2015 01:27 am

‘घरवापसी’च्या मुद्दय़ाचं वादळ शमतंय न शमतंय तोच संघपरिवारातून मदर तेरेसा यांच्या कामावर टीका झाली आणि वादाचं एक नवीन वादळ घोंघावायला लागलं. हे वाद खरेच आहेत की हा सगळा सत्तेच्याच खेळाचा भाग आहे?

गेल्या काही महिन्यांत देशामध्ये अशा काही गोष्टी घडत आहेत, की त्यांची ‘टोटल’च लागत नाही असे वाटते. म्हणजे उदाहरणार्थ, हिंदुत्ववादी संघटनांचे धर्मातराचे प्रयोग.
निवडणूक झाली. नरेंद्र मोदी यांचे सरकार सत्तेवर आले. त्याला मिळालेले बहुमत हे कोणाचेही डोके फिरवणारेच होते. त्यामुळे अनेकांना मोदी सरकार ‘परित्राणाय साधुनाम् विनाशायच च काँग्रेसम्’ आले आहे असेच वाटले. शिवाय त्याचा संभव ‘धर्मसंस्थापनार्थाय’ झाल्याचेही अनेकांना वाटले. मग त्यांनी काय केले, तर पोट जाळण्यासाठी दुसऱ्याच्या घरात गेलेल्या आपल्या बांधवांना पुन्हा हाका मारण्यास सुरुवात केली. त्याला नाव दिले घरवापसी. ठिकठिकाणी हे धर्मातराचे कार्यक्रम आयोजित करण्यात येऊ लागले. त्यातही सूत्र एकच. कार्यक्रम छोटा, गाजावाजा मोठा.
आपले ग्राहक दुसरा दुकानदार खेचून नेत आहे म्हटल्यावर कोणताही दुकानदार आरडाओरडा करणारच. तसेच या प्रकरणातही झाले. ख्रिश्चन आणि मुस्लिम मंडळी आरडाओरडा करू लागली. हे लोक अल्पसंख्याक. तेव्हा त्यांची कड घेणारे पक्षही अस्वस्थ झाले. धर्मनिरपेक्ष मंडळी लागलीच चित्रवाणी वाहिन्या आणि समाजमाध्यमांवर गेली. तेथे नमोजयाने मदमस्त झालेली जल्पकांची फौज होतीच. मग त्यांच्यात वाक्युद्ध रंगले. ते दुसऱ्या महायुद्धाहून कमी नव्हते. या सगळ्या गदारोळामध्ये मोदींना आपणच दिलेल्या विकासाच्या विविध घोषणा आणि तयार केलेली लघुरूपे (उदाहरणार्थ थ्री-डी वगैरे) विसरायला झाले असावे. संसदेचे एक अधिवेशन तर त्या वादंगातच वाहून गेले. तेव्हा मग मोदी कडाडलेच. त्यांनी आपल्या पद्धतीने या घरवापसिक मंडळींना समज दिली. सारे काही काळ शांत झाले. चला, देश आता पुन्हा विकासाच्या गोष्टी करण्यास मोकळा झाला असे आता वाटू लागले असतानाच संघ परिवाराचे पितामह, सरसंघचालक मोहनराव भागवत उठले आणि त्यांनी माता तेरेसांवर टीका केली. त्यावरून पुन्हा वादाचे मोहोळ उठले.
तेव्हा मोदींना अत्यंत स्पष्टपणे बजावावे लागले, की आपल्या सरकारचा धर्म हिंदू नाही. झेंडा भगवा नाही. धर्मग्रंथ गीता वा वेद नाही. संघ परिवाराला कोणे एके काळी तिरंग्याचा तिटकारा होता. राज्यघटना ही तर पाश्चात्य कल्पनांची उसनवारी असल्याने ती आपणांस मान्य नाही, असे संघातील ढुढ्ढाचार्य आजही सांगतात. मोदींनी मात्र भारत प्रथम हाच आपला धर्म आणि राज्यघटना हाच धर्मग्रंथ असल्याचे सांगून प्रामुख्याने संघपरिवारातील अनेकांना सणसणीत चपराकच दिली.
अनेकांना असे वाटते की हीसुद्धा संघाची रणनीतीच आहे. आपल्या राष्ट्रवंदनेमध्ये कोटीकोटी कंठ कलकल निनाद कराले अशी एक पंक्ती येते. संघपरिवारात अनेक कंठ एकाच वेळी वेगवेगळे निनाद करीत असतात. त्यामुळे हे खरे की ते खरे हा कायमचाच प्रश्न बनून जातो. त्यातून हवा तो कार्यभाग सहजी साधतो. सध्या हेच सुरू असल्याचे ही टीकाकार मंडळी म्हणतात. पण त्यामुळे आपल्यासारख्या जनसामान्यांना कशाची टोटलच लागेनाशी होते. म्हणजे आपल्याला मनापासून असा प्रश्न पडतो, की माता तेरेसा यांच्यावर भागवतांनी जी टीका केली त्यात चूक काय होते?
माता तेरेसा धर्मातर करीत नव्हत्या का?
उत्तर स्वच्छ आहे, करीत होत्या.
जगी जे हीन अतिपतित आणि दीन पददलित असतात त्यांना जाऊन उठवावे, हाच खरा धर्म आहे असे त्या मानीत नव्हत्या का?
मानीत होत्या.
त्यांची सेवा करता करता त्यांचा बाप्तिस्मा करीत नव्हत्या का?
करीत होत्या.
तोच त्यांचा उद्देश होता का?
याचे उत्तर मात्र संदिग्ध आहे.
कोणाच्या मनात काय चालते हे कसे कळणार? त्याचा शोध व्यक्तीच्या कृतीमध्येच घ्यायला हवा. माता तेरेसांच्या सेवाभावनेत धर्मदीक्षा देण्याची कृती अंतर्भूत होती म्हटल्यावर त्यांच्यावर तो उद्देश आरोपित केला तर त्यात चूक काहीच नाही असेच म्हणावे लागेल. मग भागवत वेगळे काय म्हणाले?
माता तेरेसा यांच्यावर टीका करणारे भागवत हे काही पहिले नाहीत, अखेरचे तर नाहीतच नाहीत. या आधीही अनेकांनी तेरेसांच्या कामावर, मतांवर टीका केली आहे. त्यावर पुस्तके लिहिली आहेत. त्यातील ख्रिस्तोफर हिचेन्स यांच्या पुस्तकाचे नाव जरा विचित्र आहे. ‘द मिशनरी पोझिशन’. त्यात माताजींच्या सेवाकार्यावरच प्रहार केले आहेत. त्यासाठी गोळा करण्यात येणाऱ्या देणग्यांबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. चार्ल्स किटिंग, रॉबर्ट मॅक्सवेल यांच्यासारखे भ्रष्ट उद्योजक तेरेसांचे निकटवर्ती होते. यातील किटिंग हे खूप धार्मिक गृहस्थ. पोनरेग्राफीविरोधात त्यांनी युद्धच छेडले होते. फसवणूक, कटकारस्थाने करून सर्वसामान्यांना आर्थिक गंडा घालण्याच्या आरोपाखाली तुरुंगात गेलेला हा माणूस तेरेसांना देणग्या देत होता. अमलीपदार्थ आणि मृतदेहांचे अवयव यांचा व्यापारी म्हणून कुप्रसिद्ध असलेला हैतीचा सैतानी हुकूमशहा ‘बेबी डॉक’ शॉन क्लॉड डय़ुवेलियर हासुद्धा तेरेसांचा असाच एक साह्य़कर्ता. काम कितीही चांगले असो, त्यासाठी अशा व्यक्तींकडून पैसे घेणे हे नैतिकदृष्टय़ा चूकच. किटिंग, डय़ुवेलियर यांच्याकडून जे पैसे मिळत होते ते आले होते सामान्यांच्या, गरिबांच्या शोषणातून. तेच पैसे गरिबांसाठी घ्यायचे आणि त्यातून त्या देणगीदात्यांना पुण्यकर्म केल्याचे समाधान मिळवून द्यायचे हे अनैतिकच आहे. हिचेन्स यांनी यावर आपल्या पुस्तकातून झोड उठवली होती. तेरेसा या धार्मिक मूलतत्त्ववादी होत्याच. गर्भपातामुळे कोणत्याही देशाची शांतता धोक्यात येते असे त्या मानत. तेव्हा कोणत्याही उदारमतवादी समाजात या गोष्टींवर टीका ही होणारच होती. (मराठीतही माताजींचे आरतीसंग्रहच आहेत, असे नाही. यापूर्वी ज्येष्ठ संपादक गोविंदराव तळवलकरांनी तेरेसांवर टीकालेख लिहिल्याचे स्मरतेय. तेव्हा महाराष्ट्रातही विवेकवाद किलकिला जागृत आहे असे म्हणावयास हरकत नाही.)
हे एवढे सगळे पाहिल्यानंतर मनात एक प्रश्न येतोच, की मग माताजींना नोबेल पुरस्कार दिला ती मंडळी काय वेडी होती काय? हा पुरस्कार मोठा. तेव्हा तो मिळणारी व्यक्तीही मोठी हे साधेच समीकरण झाले. ते कसे नाकारणार? बरे केवळ शांततेचे नोबेलच नव्हे, त्यांना मानवतेच्या श्रेष्ठ सेवेसाठी ‘भारतरत्न’ आणि ब्रिटनच्या ‘ऑर्डर ऑफ मेरिट’सह ४३ राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. तर या प्रश्नांचे उत्तर मॉंट्रियल विद्यापीठातील प्रो. सर्जे लॅरिव्ही आणि जेनव्हीव शेनार्ड आणि ओटावा विद्यापीठातील कॅरोल सेनेशल यांच्या ‘द डार्क साइड ऑफ मदर तेरेसा’ या संशोधनलेखात मिळते. हा लेख गतवर्षीच्या मार्चमधील ‘स्टडीज इन रिलिजन’ या संशोधनपत्रिकेत प्रसिद्ध झाला आहे. त्यात या संशोधकत्रयीने म्हटले आहे, की माता तेरेसा ही संत वगैरे अजिबात नव्हती. ती अत्यंत परिणामकारक अशा माध्यममोहिमेची निर्मिती होती. गरिबांच्या वेदनांमध्ये आपणांस सौंदर्य दिसते, असे माताजी म्हणत. त्या गरीब, मरणासन्न, अनाथ व्यक्तींची सेवा करण्यासाठी त्यांनी संस्थांची उभारणी केली. तेथे त्यांच्यावर ज्या पद्धतीने उपचार केले जात, ते सर्वच शंकास्पद होते. लोकांच्या वेदना दूर करण्याऐवजी वेदनांच्या उदात्तीकरणातच माताजींना अधिक रस होता, असे या संशोधकांचे म्हणणे आहे.
पण अशा सेवाभावी एकटय़ा माताजीच आहेत का? अशा अनेक माताजी आणि बाबाजी आपल्या आजूबाजूला आहेत. त्यातील आसारामांसारखे काही सध्या कारावासात आहेत. परंतु त्यांच्या प्रभूच्या कृपेने आणि खटल्यातील साक्षीदार प्रभुचरणी पाठविण्यात येत असल्याने ते लवकरच आपल्यात येतील यात शंका नाही. ही सगळी मंडळी स्वत:ला दरिद्रीनारायणाचे भक्त म्हणवतात. भक्तांच्या वेदना दूर करण्याचा दावा करतात. खरे तर हे सर्व जण लोकांचे दु:ख, वेदना, चिंता, गंड यांवरच जगत असतात. त्यावर त्यांची साम्राज्ये आणि संस्थाने उभी राहिलेली असतात. आपणांस दिसतात ते त्यांचे सेवाभावी प्रकल्प. रुग्णालये, अनाथाश्रम, बालगृहे. पण हा सर्व अत्यंत सुंदर असा सोनेरी मुलामा असतो. एका अर्थी ही व्यावसायिक गुंतवणूकही असते. त्या भांडवलातूनच पुढे तहहयात देणग्या मिळण्याचा मार्ग खुला होत असतो. यातील अनेक जण आपणांस पैशांचा मोह नाही असे सांगताना सगळे ऐश्वर्य आणि सत्ता उपभोगत असतात. मौज अशी की त्यात कोणालाच काही गैर वाटत नसते. कारण त्यांच्या प्रत्येक कृतीला धर्माचे आवरण असते. माताजींनी तेच केले. तुम्हांला वेदना होताहेत याचा अर्थ प्रभू येशू तुमचे चुंबन घेत आहे असे सांगण्यातून त्या वेदना कमी करण्याच्या कामापासून त्या सुटकाच तर मिळवत होत्या. एकदा ती नैतिक सुटका मिळाली की मग बाकी काय उरतो? धर्माच्या अवगुंठनातील एक व्यवहार. त्याची उत्तम सजावट करा, नाव मिळवा.
राहता राहिला मुद्दा धर्मातराचा. तर पहिल्यांदा त्याचे नीट प्रयोजन समजावून घेतले पाहिजे. तो अंतिमत: मूठभरांच्या सत्तेचाच खेळ आहे. आपण धर्मातर म्हणतो तेव्हा तेथे एखाद्या व्यक्तीने समजून-उमजून केलेला अन्य धर्माचा स्वीकार अभिप्रेत नसतो. दाम वा दंड यायोगे करविण्यात आलेले धर्मातर येथे अपेक्षित असते. इस्लाम आणि ख्रिश्चन यांसारखे किताबी धर्म शतकानुशतके असे धर्मातर करीत आहेत. माता तेरेसांची धर्मनिष्ठा पाहता त्यांच्या सेवाभावामागे हा हेतू नव्हता, असे म्हणताच येणार नाही. किंबहुना मिशनरी पोझिशन हीच तर असते. आता हिंदूंना वाटते की आपल्याकडून तिकडे गेलेली मेंढरे परत आपल्या वाडय़ात आणावीत. गेल्या कित्येक वर्षांपासून हिंदू धर्माच्या रेजिमेन्टीकरणाचे पद्धतशीर प्रयत्न सुरू आहेत. धर्मातर हा त्या योजनेतीलच एक भाग.
प्रश्न असा की, समजा एखाद्या परधर्मीय व्यक्तीने घरवापसी केली तर त्यात तिचे काय भले होणार? त्यातून त्या व्यक्तीला रेशनकार्ड वगैरे आयते मिळेल, चार पैसे मिळेल याला कोणी भले म्हणत असेल तर भाग वेगळा. पण वेगळे काही घडत नसते. हिंदूंतील अस्पृश्यतेला कंटाळून अनेक लोक मुसलमान झाले. काहींनी चर्चचा आसरा घेतला. काही जाती बौद्ध झाल्या. पण देव्हारे बदलले म्हणून भूषा, भोजन आणि भुवन यांत बदल झाल्याचे दिसत नाही. मग या साऱ्याचा उपयोग काय?
धर्मानुयायांची वाढ, सामाजिक आणि राजकीय सत्ता यांची प्राप्ती यासाठी त्याचा उपयोग असतो.
हा सारा अंतिमत: सत्तेचा खेळ असतो.
रवि आमले

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 6, 2015 1:27 am

Web Title: religion and politics
टॅग Politics,Religion
Next Stories
1 अखेरचा नोकिया, पण चांगला! लुमिआ ७३० डय़ुएल सिम
2 पुस्तकाचं पान
3 रुचकर : बीन्स एंचीलाडा
Just Now!
X