भीमराव पांचाळे – response.lokprabha@expressindia.com

है और भी दुनियां में सुखनवर बहोत अच्छे

कहते है के गालिब का हैं अंदाजे-बयां और..

कशाला सांगायला हवं कुणी..? आहेच तुमचा अंदाजे-बयां और, अनोखा, अफलातून! हरेक कलाकार वा साहित्यकाराचा असतो, असायलाच हवा! ‘अंदाजे-बयां’.. व्यक्त होण्याची कला. ही कलाच त्या कलावंताची-साहित्यिकांची पहचान असते. गज़्‍ाल ही भावनांच्या अभिव्यक्तीचे एक सशक्त माध्यम आहे, पण प्रत्येकाचा व्यक्त होण्याचा लहजा भिन्न भिन्न वाटतो तो या कलेमुळेच आणि म्हणूनच असदुल्लाखां गालिब ‘गालिब’ आहेत, मीर तकी मीर ‘मीर’ आहेत, फैज अहमद फैज ‘फैज’ आहेत, राहत इंदोरी ‘राहत’ आहेत.

मृत्यूनंतर केवळ दो गज जमीन आपल्या मालकीची असते. ती मिळाली नाही म्हणून हळहळणारे बहादुरशाह ‘जफर’ म्हणतात की,

कितना है बदनसीब ‘जफर’, दफन के लिए

दो गज जमीन भी ना मिली कू-ए-यार में..

आणि इकडे ‘राहत’  इंदोरी, ही दो गज जमीन लाभली म्हणून जेव्हा मृत्यूचा शुक्रिया अदा करतात, स्वत:ला जमीनदार म्हणवून घेतात तेव्हा तनामनावर शहारा उठतो.. रुह कांप जाती है!

दो गज सही, ये मेरी मिलकियत तो है

ऐ मौत, तूने मुझे जमींदार कर दिया..

राहत नावाचे असे श्रीमंत जमीनदार शायर ज्यांनी आपल्या कलामची दौलत गज़्‍ाल रसिकांवर मुक्तहस्ते उधळली, नुकतेच आपल्याला सोडून गेले. गज़्‍ालची कोख आणि मुशायऱ्यांचा अवकाश सुना-सुना झाला. आपल्या शायरीने कोटय़वधी गज़्‍ाल रसिकांचा कंठमणी झालेले राहत आपल्याला तनहा करून गेले. आजारपण आलं काय आणि राहत साहेबांना बरोबर घेऊन गेलं काय, सगळंच अकस्मात..अकल्पित! आजारपणातसुद्धा सडेतोड मिश्किलपणा बरकरार ठेवणं एखाद्या राहत इंदोरीलाच जमतं..

अफवाह थी की मेरी तबीयत खराब है

लोगों ने पूछ पूछ के बीमार कर दिया..

आपला तरोताजा कलाम आणि प्रस्तुतीकरणाच्या जबरदस्त आणि बेधडक-निडर शैलीने मुशायऱ्याचा अवघा मंच राहत इंदोरींच्या ताब्यात यायचा. रसिकांची भरभरून मिळणारी दाद व ‘मुकर्रर’च्या आरोळ्यांनी अवघा आसमंत व्यापून जायचा. मुशायरा लुटणारा, स्टेज आणि प्रेक्षागार दोन्हीवर आपली छाप सोडणारा हा शायर आपली रचना नेहमी ‘तहत’ (शब्दरूप सादरीकरण) शैलीतच पेश करायचा. खरे तर ‘तरन्नुम’चा (स्वररूप सादरीकरण-रचना गाऊन पेश करणे) बोलबाला होता. शब्द-सूर एकत्र आल्यामुळे दादसुद्धा चांगली मिळायची. तहतवाले शायर कमी असरदार ठरतात की काय असे वाटायचे. ही भीती दूर करून राहत या शैलीचे बादशाह ठरले. असे म्हणू या की, तहत प्रस्तुतीकरणाला त्यांनी ऊर्जा बहाल केली. उर्दू साहित्यात एम.ए., पीएच. डी. करून अध्यापनाचे कार्य केलेल्या राहतसाहेबांचे शायरी आणि पेंटिंग हे दोन अहम शौक होते. हिंदी सिनेमांसाठी गाणीसुद्धा त्यांनी लिहिली पण तिथे मन रमलं नाही. मन रमलं ते शायरीतच!

माझी शायरी लोकांचा आवाज व्हावी, सामाजिक वेदनेचा हुंकार व्हावी या तळमळीने ते गज़्‍ालमधून व्यक्त होत राहिले. आक्रमक आणि काहीशा नाटकीय शैलीने मंचावरून पेश होत राहिले. सामाजिक आणि राजकीय विसंगतींवर लिहिण्यासाठी ही आक्रमकता-नाटकीयता कदाचित त्यांना साह्य़भूत ठरत असावी. अशाच आविर्भावात ते साक्षात सूर्याला ललकारतात आणि सरळ धमकी देतात..

पसीने बांटता फिरता है हर तरफ सूरज

कभी जो हाथ लगा तो निचोड दूंगा उसे..

लोकशाही मूल्यांचा पुरजोर समर्थक आणि विद्रोही परंपरेचा आजच्या काळाचा वारसदार, त्याच्या प्रश्नाचे उत्तर आणि हिशेबही मिळत नाहीत म्हणून कासावीस होऊन विचारतो..

जुबां तो खोल, नजर तो मिला, जवाब तो दे

मै कितनी बार लुटा हूं, मुझे हिसाब तो दे..

राहत इंदोरींना प्रचंड दाद व प्रेम गज़्‍ाल-रसिकांनी दिले. डोक्यावर घेऊन मिरवले, तेवढाच द्वेष आणि टीकासुद्धा त्यांच्या वाटय़ाला आली. असो! हे प्रेम, ही दाद, हा द्वेष, ही टीका लक्षात राहील अथवा जाईल विस्मरणात, मात्र

मैं जब मर जाऊं तो मेरी अलग पहचान लिख देना

लहूसे मेरी पेशानी पे हिंदुस्तान लिख देना..

हे नक्की स्मरणात राहील.

अलविदा..राहत साहब !