दि. १८ जुलैच्या ‘लोकप्रभा’मध्ये वासुदेव कामत सर आणि सुहास जोशी यांची कव्हरस्टोरी वाचली. चित्र आणि चित्रकारांच्या बाबतीत ही शोकांतिकाच आहे. यापुढे चित्रकारांच्या बाबतीत असंच घडत जाणार. नवीन तंत्रामुळे प्रिंट काढणं सोपं झालंय आणि चित्रकार व चित्र यापेक्षा ‘पैसा मोठा झालाय’. सरकारची चित्रकार आणि चित्रकला याबाबतची अनास्था हेच यावरून स्पष्ट होतंय. बाळासाहेब ठाकरे यांनी मान्यता दिलेल्या चित्राचा असा बाजार मांडला असताना कुठलाही शिवप्रेमी पेटून उठत नाही. राजकारण्यांना त्यांना ‘मतदार आणि खुर्ची’ हेच दिसते. आरक्षण, पॅकेज, सबसिडी, करसवलत हेच प्रत्येक बजेटमध्ये दिसते, पण चित्रकाराला चित्रकलेच्या साहित्याला, चित्राच्या प्रदर्शनाला अजूनपर्यंत सबसिडी किंवा पॅकेज नाही. उलट प्रदर्शनात विकल्या गेलेल्या चित्राला टॅक्स लागतो. शासनाच्या दृष्टीने चित्रकला विषय गौण, दुय्यम आहे. नेते मंडळी स्वत:ची चित्रं काढून घेतात, विषयात कधी रस घेतलेला पाहिलं नाही. प्रसिद्ध चित्रावर आपल्या नावाची लेबलं लावून प्रसिद्धी मिळविण्यात राजकारणी पटाईत आहेत. विजय खिलारेही तसेच. त्यांनी ‘म्हाडा’मधले चित्र पाहिल्यावर ते किती चांगलं आहे त्यापेक्षा त्याचे प्रिंट काढून पैसे कमावता येतील हाच विचार प्रथम आला असेल. कारण म्हाडा स्वत:च या चित्राबद्दल उदासीन आहे, हे विजय खिलारे यांनी ओळखलं असणार. काही अधिकाऱ्यांचे लागेबंध असण्याची शक्यता आहे. परदेशी कलाकाराचं नाव सांगितलं की लोक जास्त खरेदी करतात ही भारतीय संस्कृती आहे, हेही त्यांनी ओळखलं. याप्रकरणी दिलीप नेरुरकर आणि सुभाष देसाई यांनी लक्ष घालावयास पाहिजे. आता म्हाडाने चित्राच्या जागी सिंहासनाधिष्ठित नवीन पुतळा बसवणे म्हणजे कहरच आहे. तर चित्र चौथ्या मजल्यावर हलवले, काही वर्षांनी चित्र चोरीला गेलं म्हणूनदेखील जाहीर होईल. सव्वातीन लाख प्रिंट काढेपर्यंत त्याचा पत्ता नाही, तसेच हे होईल. सदर चित्र म्हाडाची मालमत्ता आहे आणि कोणीतरी आपल्या चित्राची छायाचित्रे विकत आहे, हे जसे म्हाडाच्या गावी नाही, तसंच काहीसं चित्र विक्री झाल्यावर होईल किंवा ‘डमी’ मेघडंबरीसारखं अडगळीत पडेल. कारण सध्या बाजारात महापुरुषांच्या चित्राला किंमत आहे.
प्रदीप महाडिक, बोरिवली.

वारी – रोगराई?
‘लोकप्रभा’चा दि. ११ जुलै २०१४ चा अंक वाचला. अतिशय परखड आणि विषयाला अनुकूल लिखाण. वारकरी म्हणजे एक शिस्तबद्ध, नियमाला धरून चालणारे असा सगळ्यांचा समज. आपण त्याला वाचा फोडली आणि त्यांचे नवे रूप लेखातून प्रकाशित केले. पूर्वी वारीला जाणे म्हणजे माऊलीला डोळे भरून पाहणे, सुख दु:खांच्या गोष्टी सांगणे, मोहपाशापासून दूर राहणे असे मागणे होते. संतसमागम आणि शेतकामापासून काही काळ दूर गमन होते. आता तर वारी म्हणजे व्यवसाय, पर्यटन, फॅड अशा गोष्टींची रुजवात होते असे दिसू लागले आहे. खरे पाहता या दिवसात पंढरपुरात महासागर लोटत आहे, मूलभूत गरजा या वेळी रौद्र रूपात समोर येतात. वारकऱ्यांचा मुक्काम असणारी ठिकाणे यांची प्रशासनाने केलेली व्यवस्था अपुरी पडते, कारण दर वेळी गर्दी ही वाढत जाते. वारकरीवर्गाने नियम पाळून सहकार्य करणे गरजेचे असते पण ते सर्रास दुर्लक्ष करतात. पूर्वी एक म्हण होती- ‘खाऊन माता, टाकून मातू नका.’ पण असे न करता वारकरी मुक्कामाच्या ठिकाणीच उरलेले अन्न (अन्न हे परब्रह्म) टाकून पुढे निघतात. खरे पाहता प्रत्येक वारकरी आणि त्यांच्या फडाने ही जबाबदारी घेऊन अन्नाची नासाडी होणार नाही, प्लास्टिक कचरा सोडणार नाही अशी ताकीद स्वत:ला दिली आणि अमलात आणली पाहिजे. ही जबाबदारी पाळण्यास आणि पुढे प्रवास करण्यापूर्वी याचे नियोजन फडाने केलेच पाहिजे, नाही तर वारी म्हणजे रोगराई अशी समजूत होण्यास वेळ लागणार नाही.
सुरेश कुलकर्णी, इंदूर, मध्य प्रदेश (ई-मेलवरून)

‘करिअर’ विशेषांकाने युवकांच्या आशा पल्लवित!
‘लोकप्रभा’ (४ जुलै)चा करिअर विशेषांक व त्यातील संघलोक सेवा आयोग/ महाराष्ट्र लोकसेवा आयोग व इतर परीक्षांबाबत माहिती देऊन आपण महाराष्ट्रीय युवकांच्या आशा पल्लवित केलेल्या आहेत.
लोकप्रभा वाचणारे सर्व उच्च विद्याविभूषित, महत्त्वाकांक्षी व होतकरू तरुणच आहेत. बऱ्याच जणांना या माहितीचे मार्गदर्शन नसते. मात्र आपण ध्येय, उद्दिष्ट गाठण्याची गुरुकिल्ली दिल्याबद्दल आपणाला लाख लाख धन्यवाद! ‘लोकप्रभा’ एक विश्वासदर्शक दिशा देणारे साप्ताहिक आहे. स्पर्धा परीक्षांसाठी ‘लोकप्रभा’ वाचणारे हजारो विद्यार्थी आहेत. प्रशासनात जाणे व राष्ट्रसेवा, समाजसेवा करणे हे तरुणांचे उच्च ध्येय असते. हा संग्रहणीय अंक आहे. याच अंकातील ‘किलर इन्स्टिंक्ट’ अंतर्गत सीईओ केशव मुरुगेश यांची यशोगाथा म्हणजे प्रेरणा व प्रोत्साहनचे सर्वाग सुंदर मार्गदर्शन होय.
धोंडीरामसिंह ध. राजपूत, वैजापूर, जि. औरंगाबाद.

शासनाने दखल घ्यावी
वेगळय़ा वाटेचा ‘वरद’हस्त (लोकप्रभा, ४ जुलै) हा शास्त्रज्ञ वरद गिरी यांच्यावरील चांगला लेख वाचनात आला. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत आपले कार्य चिकाटीने करणाऱ्या वरद गिरी यांचा महाराष्ट्राला अभिमान आहे. महाराष्ट्रातील पश्चिम घाट हा सरिपृस आणि उभयचर वर्गातील प्राण्यांसाठी प्रसिद्ध आहे. त्यातील अनेक जातींची फक्त नोंद आहे, पण त्याबद्दलची फारशी माहिती उपलब्ध नाही. वरद गिरी अशा सजीवांसाठी वरदानच म्हणावे लागतील. कारण केवळ कोणत्याही सजीवाची नवीन जात शोधणे आणि त्याची माहिती गोळा करणे एवढय़ावरच त्यांचे संशोधन थांबले नाही तर त्या सजीवांच्या जाती नैसर्गिक अधिवासामध्ये जतन केल्या पाहिजेत, त्या नष्ट होण्यापासून वाचविल्या पाहिजेत यासाठी वरद गिरी मनापासून प्रयत्न करत आहेत ही एक चांगली बाब आहे. निसर्गातील अन्नसाखळीत प्रत्येक सजीवांचे महत्त्वाचे कार्य असते. मनुष्यप्राण्याचा अपवाद वगळता निसर्ग चक्रातील जीवसृष्टी अमूल्य आहे. लहान मुंगीपासून मोठय़ा हत्तीपर्यंत सर्वाचे कार्य परस्परांवर अवलंबून आहे. त्यातील एखाद्या घटकाला जरी धोका निर्माण झाला तरी त्याचा विपरीत परिणाम पर्यावरणाला होतो. आज अशा संकटग्रस्त जाती शोधून त्यांचे संवर्धन करणे गरजेचे आहे. वरद गिरी यांचे देवगांडुळांवरील संशोधन म्हणूनच मोलाचे ठरते. साप आणि देवगांडूळ यातील मूलभूत फरक त्यांनी लोकांपुढे आणले. त्यामुळे आज अनेक देवगांडुळांना अभय मिळाले आहे. त्यामुळे अशा असामान्य संशोधकाचा आणि त्याच्या कार्याचा योग्य असा सन्मान महाराष्ट्र शासनाने करावा.
सुहास बसणकर, दादर

माहिती अनावश्यक
‘लोकप्रभा’चा (४ जुलै) ‘उद्याच्या प्रकाशवाटा’ करिअर विशेषांक वाचला. त्यात पान क्र. ५४ व ५५ पानावर प्रकाशित झालेल्या ‘आयटीआयचे कौशल्य प्रशिक्षणक्रम’ हा लेख वाचला. त्यात नमूद करण्यात आलेली सेंटर ऑफ एक्सलन्सबाबत अनावश्यक माहिती प्रकाशित करण्यात आली आहे. कारण सेंटर ऑफ एक्सलन्स प्रशिक्षण केंद्र सरकारद्वारा बंद करण्यात आले आहे.
चंद्रकांत भोसले, प्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पारनेर (अहमदनगर)

‘लोकप्रभा’चा करिअर विशेषांक उत्तम होता, सर्व लेख आवडले. विशेषत: चंद्रशेखर ठाकूर यांचा लेख जास्त आवडला. शेअर्सच्या व्यवहारांवर आणखी लेख वाचायला आवडतील
– एच. व्ही कोळवलकर (ई-मेलवरून)

एक होता राजकुमार हा दिलीप ठाकूर यांनी लिहिलेला अप्रतिम लेख वाचला. राजकुमारसारख्या चांगल्या कलाकाराचे वेगळेपण मांडणाऱ्या गोष्टी कळल्या त्याबद्दल लेखकास धन्यवाद.
– सुमीत डांगी (ई-मेलवरून)

वारी आणि वारीमार्गावरील अस्वच्छतेवर ‘लोकप्रभा’ने चांगलाच प्रकाश टाकला आहे. ‘लोकप्रभा’चे हे प्रयत्न कौतुकास्पद आहेत.
– डॉ. गजानन झायदे, नागपूर</strong>

सायकलवरून अरुणाचल प्रदेश हे सुंदर प्रवासवर्णन वाचले. अशा प्रकारचे लेख वाचायला मजा येते आणि छानही वाटतात. जे अनुभव येथे शेअर केले आहेत ते वाचून मजा आली. अशा लेखांबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद.
– अमेय यशवंत साठे
(ई-मेलवरून)

येरे येरे पावसा.. रेन वॉटर स्कीम
येरे येरे पावसा तुला देतो पैसा, पैसा निघाला खोटा. हे झाले लहान मुलांचे बडबडगीत. मोठय़ा नेत्यांचे गाणे असे ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग करा’ हे गीत दरवर्षी मान्सून येण्याच्या अगोदर गायचे असते. ते गाणे १० मे २०१० पासून सुरू आहे, पण २०१२ पासून याचा जोरदार प्रचार चालू आहे. १० मे २०१० ला लक्ष्मीनगर झोनमध्ये अधिकारी, कर्मचारी व माझ्यासारखे फालतू सामान्य लोक जमा झाले होते. विषय होता पाणी वाचवा ‘टेरेस वॉटर हार्वेस्टिंग स्कीम.’ खूप मान्यवर लोक बोलले, पाण्याचे महत्त्व सांगितले पण हे कोण कसे करून देईल हे सांगण्यात आले नाही. तसेच कसे करता येईल, खर्च किती येईल वगैरे सांगितले नाही. नंतर लक्ष्मीनगर झोनमध्ये चौकशी केल्यावर तेथील अधिकारी यांनी सौम्य, प्रेमळ शब्दांत सांगितले की प्लंबर बोलवा, खड्डा खोदा त्यातून पाइप लावा व विहिरीत सोडा. यावरून काहीही बोध झाला नाही. पॉकेटमध्ये किती रक्कम, खड्डय़ाचा साइज, पाइपचा साइज वगैरे. नागपुरांत लहान बंगले आहेत त्यांना टेरेस आहे ते या स्कीममध्ये भाग घ्यावयास तयार आहेत. पण या लहान कामाकरिता प्लंबर कुठून आणायचा? किती सिमेंट, किती रेती याचा काहीच हिशोब समजला नाही. मोठय़ा बिल्डरबद्दल मी बोलत नाही. ही सर्व भाषणबाजी, घोषणा बंद करून कापरेरेशनतर्फे ही स्कीम तयार करून राबविली तर काय हरकत आहे. पब्लिक खर्च द्यावयास तयार होतील. हे सर्व आठवण्याचे कारण म्हणजे पावसाळा सुरू झाला म्हणजेच विद्वान नेते, विचारवंत व्यक्ती यांचा पाण्याचा विनियोग जलसंपदा, पाण्याच वसा यावर रोज वर्तमानपत्रात भाषणे, विचार वाचावयास मिळतात. परंतु ही स्कीम कशी अमलात आणायची हे कोणी सांगत नाही. याचा अर्थ हाच- बोलाचा भात, बोलाचीच कढी याचा मनसोक्त आनंद घ्या.
-डॉ. जयंत जुननकर, नागपूर