lp09त्यांच्या धडपडीला सलाम

‘लोकप्रभा’ने वर्धापन दिन विशेषांकात (२७. मार्च) ‘केल्याने होत आहे रे’ आणि ‘देण्यातला आनंद’ या सदरांखाली निष्काम कर्मयोग जगणाऱ्या समाजोपयोगी काम करणाऱ्यांचा जो औचित्यपूर्ण परिचय करून दिला आहे त्याबद्दल धन्यवाद.
भारतातल्या प्राचीन शिल्पकृतींच्या तस्करीचा छडा लावण्याच्या कार्यपद्धतीसाठी आणि चिकाटीसाठी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या कौतुकाला पात्र होणारे प्रा. डॉ. किरीट मनकोडी आणि ग्रामीण भागातून पुढे येऊन रुग्णआप्त होता होता शहरातल्या डॉक्टर लोकांचेही दखलपात्र मित्र होणारे बबनराव दरोडे यांच्या तसेच अंकात वर्णन केलेल्या इतर कर्मयोग्यांच्या कार्याला सलाम ठोकलाच पाहिजे. आनंदाची गोष्ट म्हणजे पुण्यातील ‘सजग नागरिक मंच’चे विवेक वेलणकर, ‘पीएमपी प्रवासी मंच’चे जुगल राठी आणि ‘मराठी काका’ अनिल श्रीपाद गोरे यांचाही या कर्मयोग्यांच्या मांदियाळीत यथास्थित परिचय करून दिला गेला. त्यांच्या त्या त्या क्षेत्रातील शासकीय व्यवस्थापनाशी केलेल्या लढय़ाच्या वर्णनातून एक गोष्ट कळली की, आपण कितीही बरोबर असलो तरी लढय़ाच्या संबंधित विषयाची अभ्यासपूर्ण मांडणी आणि संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांशी सौहार्दपूर्ण पण खंबीर बोलणी काम फत्ते करू शकतात.
कारण बरेच वेळा अन्याय होतोय असा ओरडा करत गेलो तरी अपुऱ्या माहितीमुळे किंवा केवळ दुसऱ्याचं काम झालं, माझं का नाही अशी स्पर्धा करून त्याचं परिमार्जन होऊ शकत नाही. कारण प्रत्येक केस वेगळी असू शकते.
माझा वैयक्तिक अनुभव सांगतो, की पुणे महापालिकेच्या मिळकत करापोटी २००३ सालासाठी दोन वेळा भरली गेलेली रक्कम त्यांच्या ऑडिटेड खतावणीमधून शोधून दिल्यावर तसेच पुढील वर्षी पुन्हा देयक जास्त रकमेचं आल्यावर तिथल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्याच संगणकावर नम्रपणे चूक लक्षात आणून दिल्यावर तिथल्या तडफदार कर्मचाऱ्यानं जराही खळखळ न करता माझं देयक बरोबर करून दिलं, केवळ १५ मिनिटांत. तीच गोष्ट शिधापत्रिकेमधील बदलांबाबत. योग्य ती कागदपत्रं घेऊन गेल्यावर केवळ दहा मिनिटांत मला हवे असलेले बदल करून मला शिधापत्रिका परत दिली गेली. बाहेर स्वागताला उभ्या असलेल्या एजंटकडे मला ढुंकूनही बघावं लागलं नाही.
सांगायचा मुद्दा हा आहे की वर उल्लेख केलेल्या या अंकाच्या मान्यवरांनी केवळ वैयक्तिक नाही तर सामाजिक पातळीवर आपल्या ज्ञानाच्या आणि वागणुकीच्या आधारावर योग्य ती पावलं उचलून सरकारी यंत्रणा रुळावर आणण्याचा खटाटोप केला आणि त्यात यशस्वी झाले. जुगल राठी यांनी सनदी लेखापाल असण्याचा पुरेपूर लाभ उठवून आकडेवारी मांडून आपलं म्हणणं योग्य अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवलं. मग संबंधित खात्यातल्या अधिकाऱ्यांना दखल घेणं अवघडही नसतंच, उलट भाग पडतं. म्हणून थोडं का होईना त्या विषयातलं सामान्यज्ञान आणि विषय अन् अधिकारी यांना हाताळण्याची कुशल कार्यपद्धती आवश्यक आहे हे कुणीही मान्य करेल.
‘मराठी काकां’नी तर आपल्या मातृभाषेवरचा अन्याय दूर करण्याचा ध्यास घेतला आणि त्यात यशस्वी होण्यासाठी तरुणाईलाही मराठीचा जिव्हाळा लावत आहेत. त्यासाठी नित्य वापरातल्या इंग्रजी शब्दांना मराठी पर्यायी शब्द शोधून रुळवण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना ‘लोकप्रभा’ही मदत करत राहील असा विश्वास वाटतो.
श्रीपाद पु. कुलकर्णी, बिबवेवाडी, पुणे

lp10विवेकबुद्धी महत्त्वाची
‘लोकप्रभा’ (२० मार्च)मधील ‘विवेक विरुद्ध भावना!’ हा विनायक परब यांचा मथितार्थ वाचला. या घटनेवरील प्रतिक्रिया विवेकाने देणे महत्त्वाचे आहे, कारण विवेकाचा संबंध बुद्धीशी, विचारांशी असतो तर भावनेचा संबंध मनाशी, हृदयाशी असतो त्यामुळे प्रत्येकाने विवेक बाळगणे महत्त्वाचे आहे. ब्रिटनमधील महिलांवर व मुलांवर लैंगिक व शारीरिक अत्याचार होत असतात व तिकडील महिलादेखील असे घरगुती अत्याचार सहनच करतात. या गोष्टी कधीही उजेडात येत नाहीत व आपल्या निर्भयावर तयार झालेला माहितीपट मात्र बीबीसी दाखवून मोकळी झाली व या माहितीपटाचा अमेरिकेतदेखील प्रीमियर होतो म्हणजे पाश्चिमात्य राष्ट्रांना स्वत:च्या पायाखाली काहीही जळत असले तरी चालते, परंतु दुसरीकडील घटना मात्र जगाला दाखवावयास हे मोकळे हीच तर त्यांची आधुनिक प्रगतिशील संस्कृती आहे असे म्हणावयास हवे?
भारतातील प्रशासकीय व्यवस्थेबाबत काय म्हणावयाचे, जेवढे बोलू तेवढे थोडेच आहे. हा माहितीपट तयार होऊन काही महिन्यांचा काळ लोटल्यानंतर ऐन प्रसारणाच्या वेळी आपल्याकडील शासकीय यंत्रणेला समजले की असा माहितीपट बनवला गेलेला आहे. मग सगळी धावाधाव व बंदीची भाषा, परंतु अजूनही इंटरनेटवर हा माहितीपट पाहता येतो, हीच तर आपल्या यंत्रणेतील महत्त्वाची त्रुटी आहे. आता कुठे आठ वाहिन्यांना या माहितीपटाच्या प्रसारणाचे हक्क दिल्याचे समजले आहे, परंतु त्यातून किती कोटी रुपयांचा गल्ला जमवला ही गोष्ट सध्या तरी बंद मुठीसारखी आहे.
शुभदा गोवर्धन, ठाणे.

विवेकबुद्धीच नष्ट होतेय?
‘लोकप्रभा’च्या २० मार्चच्या अंकात विवेक विरुद्ध भावना हा विनायक परब यांचा लेख वाचून मन सुन्न झाले. त्यात मुलाखत घेतलेल्या गुन्हेगाराला मोबदला म्हणून मोठी रक्कम दिली गेली असेही वाचले होते. वकील इतक्या नीच पातळीवर जातात हे सर्वच धक्कादायक आहे. हा माहितीपट म्हणजे भयानक यातना भोगून मृत्यू पावलेल्या मुलीची अणि तिच्या कुटुंबाची क्रूर चेष्टा आहे. पैसा, प्रसिद्धी याच्या मागे लागून माणुसकी अणि संवेदना हरवत आहेत. विवेकबुद्धीच नष्ट होते की काय अशी भीती वाटते. हा लेख लिहून समाजाच्या जाणिवा जागवल्याबद्दल धन्यवाद.
मेधा जोशी, नाशिक.

रिअल इस्टेट विशेषांक आवडला
‘लोकप्रभा’चा रिअल इस्टेट विशेषांक सुंदर व घर आणि निवाऱ्याची कल्पना सर्व बाजूने सामोरे आणणारा आहे. ‘स्वप्न सेकंड होमचे’ हा लेख प्रत्येकाच्या मनातील स्वप्न शब्दांकित करणारा आहे. सध्या घरोघरी दोन पगार येत असल्याने घराची मूलभूत गरज पूर्ण झाल्यावर मनात कुठे तरी दुसऱ्या घराचे, वीकएंड होमचे विचार घोळू लागतात आणि निरनिराळ्या जाहिराती भुरळ घालू लागतात. आणि ते स्वप्न सत्यात येतेही, पण कालांतराने लक्षात येते की प्रत्येक वीक एण्डला तिथे जाणे शक्य होत नाही त्यामुळे आपले पैसे चुकीच्या ठिकाणी अडकले की काय, अशी भावना निर्माण व्हायला लागते. उच्च वर्गाला सहज वाटणारा खर्च मध्यमवर्गीयांना जिवावर येतो हे वास्तव आहे. त्यामुळेच मध्यमवर्गीय आजही वीकेण्ड होमपेक्षा आपल्या अपत्यासाठी घरात पैसे गुंतवू इच्छितो. आणि त्यामुळेच की काय अशाच एका गृहप्रकल्पाची जाहिरात करणाऱ्या दाक्षिणात्य अभिनेत्रीला ग्राहकांनी त्यांना दिलेली आश्वासने बिल्डरने न पाळल्याने कोर्टात खेचले. घरबांधणीचा कारभार सर्वत: बिल्डर माफियाच्या हाती गेल्याचा त्रास सामान्य माणसाला पदोपदी जाणवत आहे.
‘विवेक विरुद्ध भावना’ या मर्मभेदक ‘मथितार्थ’मधून बलात्कारसारखा संवेदनशील विषय चव्हाटय़ावर ज्या प्रकारे चघळला जात आहे त्याचा यथास्थित समाचार घेतलेले वाचून अतिशय बरे वाटले. बलात्कारासारख्या अत्याचाराचे मूळ हे स्त्रिला दुय्यम समजणे, तिला फक्त भोगवस्तू समजणे, तिला राब राब राबविणे आणि तो स्वत:चा हक्क समजणे आणि तिच्या मताला शून्य किंमत देणे हे भारतीय पुरुषांच्या नव्हे भारतीयांच्या मानसिकतेत भिनले आहे आणि म्हणूनच अशिक्षित पुरुष बलात्कार सिद्ध होऊनही ती चूक बलात्कारितेची आहे असे तोंड वर करून बोलू शकतो आणि त्याचे शिकलेले वकीलसुद्धा त्याचीच री ओढतात. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वत:च्या अधिकारांबाबत अत्यंत जागृत असलेले ब्रिटिश आजही भारताला स्वत:चा गुलाम समजतात का? की इथल्या लोकशाही मूल्यांची आणि दिलेल्या हमीची पर्वा करावीशी वाटत नाही?
माया हेमंत भाटकर, चारकोप गाव.

lp11अच्छे दिन बहोत दूर
आपले पर्यटन अंक चांगले असतात आणि त्यातून अनेक नव्या स्थळाबद्दल माहिती मिळते. आपल्या १३ मार्चच्या अंकातील अर्थसंकल्प या विषयावरील लेखांमधील माहिती लोकसत्तात प्रसिद्ध झालेली आहे. त्याऐवजी काही नवीन विचार व मने छापली असती तर ते सर्वसमावेशक झाले असते. सामान्य माणसाचे दृष्टीने दोन्ही अंदाजपत्रके निराशाजनक आहेत आणि त्यामुळे अच्छे दिन बहोत दूर आहेत याचीच प्रचीती आली आहे.
टाचणी व टोचणी सदराखालील गेल्या दोन्ही अंकातील लेख म्हणजे मेलेले मढे उकरून काढण्याचा खटाटोप दिसतो. महात्मा गांधी व मदर टेरेसा या आंतरराष्ट्रीय पातळीवरील विभूति (जगन्मान्य) असून त्यांच्या काही मतावर व कृतीवर बोट ठेवून जनतेची दिशाभूल करणे योग्य नाही. अशा लिखाणामुळे जाती व धर्मात विनाकारण तेढ पसरविण्याचा प्रकार आहे, जगात सर्वगुणसंपन्न माणूस जन्मास आला नाही. आपले लोक इतके शहाणे व हिरवट आहेत की ते देवांच्या चरित्रातील पण दोष परखडपणे मांडणारे आहेत. ज्या दोन व्यक्तीबाबत हे लेख आहेत, त्या ९५ टक्के चांगल्या आहेत. त्यांच्या वागण्यात व मतात ५ टक्के दोष असू शकतील, पण असे वाद माजविणारे विषय आपण छापू नयेत असे वाटते. आपल्या साप्ताहिकाने समाज जोडण्याचे काम करावे, फूट पाडण्याचे नव्हे. खडीवाले वैद्यांचे लेख खरोखरच सामान्य माणसास बरीच माहिती देणारे आहेत. त्यापासून बरेच काही शिकायला मिळते आणि ते आरोग्य सुधारण्यास मदत करू शकतील.
वि.श्री. काशीकर

बेलिन्दाला मदत गरजेची
मथितार्थ वाचला. पाठ बेलिन्दाचीच थोपटायला हवी. ह्य लेखातील वस्तुस्थिती समोर आल्यावर आता सगळे जण उठतील आणि तिचे कौतुक करू लागतील. मदत किती जण करतील हे सांगणे कठीण आहे. या सन्मानापेक्षा तिची सक्रिय मदतीची अपेक्षा असणार आहे.
निदानपक्षी वाघांची (आणि इतर वन्य प्राण्यांची) शिकार होणे थांबले तरी बेलिन्दाला तिचे जीवन सार्थकी लागल्याचे समाधान मिळेल. याच अंकात सुहास जोशींनी पुढे आणलेल्या प्रश्नांवर पण गंभीरपणे विचार व्हायला हवा
सुरेश देवळालकर, हैदराबाद

Gionee  की Xiaomi? 
मी ‘लोकप्रभा’चा नियमित वाचक आहे, खासकरून ‘टेक फंडा’चा. त्यात नेहमीच सोप्या भाषेत माहिती दिलेली असते, परंतु ६ मार्चच्या अंकात Gionee आणि Xiaomi ह्यंच्यात गोंधळ झाला आहे. त्यामुळे सामान्य वाचकाची दिशाभूल होऊ शकते. Gionee चा उच्चार हा ‘जिओनि’ असा आहे व Xiaomi हे चिनी भाषेत ‘शाओमि’ असे उचारले जाते. तसेच xiaomi चे फोन्स फक्त फ्लिपकार्टवर मिळतात, परंतु gionee चे फोन्स स्थानिक दुकानांमध्ये देखील विकत घेता येऊ शकतात.
– रोहित दातार, (ई-मेलवरून)

‘ते तीन अवतारी पुरुष’ हे लिखाण खूप आवडले. चिनार जोशी यांनी वास्तविकता अगदी हळुवारपणे लक्षात आणली. वाचताना खूप हसू आले.
– मेघराज चुडे (अकोला)