दि. २३ मेचा लहान मुलांसाठी असलेला सुट्टी विशेषांक वाचनात आला. ‘लोकप्रभा टीम’चे हार्दिक अभिनंदन! माझ्या मुली लहान असताना अंकल पै यांचे टिंकल आमच्याकडे येत असे. ते वाचण्यासाठी मुलींबरोबर आमचीसुद्धा चढाओढ चालायची. काल लोकप्रभाचा अंक हातात पडला. लहान मुलांचा सुट्टी विशेषांक आहे हे पाहून मी तो न चाळता बाजूला ठेवला. नुकतेच अमेरिकेहून परतले आहे. जेटलॅग प्रकरणामुळे रात्री झोप लागत नसल्याने हाती येईल ते वाचत राहते. तो अंक परत हाती पडला आणि आश्चर्य म्हणजे मी तो खाली ठेवलाच नाही. संपूर्ण वाचून काढला!
अंकातील प्रत्येक कथा, गोष्ट अतिशय सुंदररीत्या मांडली आहे. प्रत्येक गोष्ट मनोरंजनाबरोबर मुलांना काहीतरी शिकवून जाते. संपूर्ण अंकात वापरली गेलेली भाषा ही सहज, सोपी, रोजच्या वापरातली तर आहेच, पण लहान मुलांचे आवडते सुपरमॅन, स्पायडरमॅनसारखे कॅरॅक्टर्स यांचा खुबीने वापर केल्यामुळे, गोष्टी मुलांना जवळच्या वाटतील.
मुलांच्या भावविश्वातील प्रत्येक गोष्टीवर उजेड टाकणाऱ्या कथा खूप आखीव-रेखीवरीत्या मांडल्या आहेत. त्यांचे प्राण्यांविषयीचे प्रेम, भुतांविषयीची भीती, स्वप्नात परीराणीचा मुक्त संचार, रोजच्या रुटीनचा कंटाळा, जेवणाविषयीची अनास्था, कोल्ड्रिंक्सचे आकर्षण या सगळय़ा घराघरात दिसणाऱ्या गोष्टींचा वापर करून लिहिलेल्या या कथा अफलातून आहेत. लहानांबरोबर मोठय़ांनासुद्धा गुंगवून टाकण्याची ताकद या अंकात आहे. ‘लोकप्रभा’चा बाल विशेषांक संग्रा आहे. माझी नात आठच महिन्यांची आहे, पण मी हा अंक तिच्यासाठी जपून ठेवणार आहे. या आगळय़ावेगळय़ा देखण्या अंकासाठी धन्यवाद!
अंजली गुजर, पुणे.

आता जुन्यानव्याचा संगमच
‘खान्देशातील दिवाळी – आखाजी’ हा १६ मे च्या ‘लोकप्रभा’तील खान्देशातील परंपरा मांडणारा लेख आवडला. या लेखाच्या माध्यमातून आपण एका अनोख्या स्थानिक परंपरेची ओळख करून दिली आहे. लेखाच्या शेवटी लेखकाने आखाजीच्या सद्य:स्थितीवर भाष्य केलं आहे. त्यातून काहीसा नकारात्मक सूर आढळून येतो. पण यापुढच्या काळात आपले सण, उत्सव हे असेच साजरे होणार हे आता अपरिहार्य आहे. काळानुरूप सगळ्या प्रथा-परंपरा जशाच्या तशा पूर्वीप्रमाणे पाळणे शक्य होणार नाही आणि ते उचितदेखील ठरणार नाही. आजच्या धावत्या युगात जे काही करणे शक्य असेल. अर्थात आपल्या प्रथा-परंपरांमध्ये काही गोष्टी जाणीवपूर्वक केल्या जायच्या त्यामागचे हेतू अनेक असायचे. जसे झाडाला झोपाळा बांधणे. त्यानिमित्ताने झाडांची जोपासना व्हायची. आता झाडंच राहिली नाहीत त्यामुळे सामायिक झोपाळा बांधवा लागत आहे.
अनिल कोळी, वसई.

नंदा उपेक्षित राहिली
दि. ९ मे. च्या लोकप्रभात अभिनेत्री नंदाविषयी लेख वाचला. खरं तर नंदा एके काळची लोकप्रिय व अत्यंत गुणी अभिनेत्री, पण तिचा मृत्यू निवडणुकीच्या धामधुमीत झाल्याने प्रसिद्धीमाध्यमांनी फारशी दखल घेतली नाही व खरं म्हणजे लोकप्रभात आलेला हा लेख पण उशिराच. नंदा जेव्हा काम करीत होती त्या वेळी मीनाकुमारी, नूतन, वहिदा रहमान या अभिनयासाठी नेहमीच चर्चेत राहिल्या व त्याच वेळी साधना, माला सिन्हा, आशा पारेख, सायरा बानू या ग्लॅमरस भूमिकेत पुढे राहिल्या. त्यामुळे नंदाने नेहमी चांगला अभिनय करूनही तिला हवे तेवढे नाव किंवा अवार्डस् मिळाले नाहीत किंवा समकालीन शम्मी कपूर, राजेंद्रकुमार, देव आनंद, राज कपूर, दिलीपकुमार या आघाडीच्या नायकांसोबत तिला फारसे चित्रपट मिळाले नाहीत. ती चांगली अभिनेत्री होती, तरी तिला नर्गिस, मीनाकुमारी, नूतन यांच्यासारखी लाइफटाइम भूमिका मिळाली नाही. पण तरीही ज्या काही भूमिका नंदाला मिळाल्या त्या तिने मनापासून केल्या व शशी कपूर, मनोजकुमार यांना पण तारून नेले.
डॉ. अनिल पी. सोहोनी, धुळे.

पद्मश्री आणि बरेच काही..!
अगदी परवा भारत सरकारने स्व. नरेंद्र दाभोलकरांना पद्मश्री पुरस्कार जाहीर केला आणि दिलासुद्धा! स्व. नरेंद्र दाभोलकरांची अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ महाराष्ट्राच्या सीमारेषा ओलांडून पुढे गेली होती. दाभोलकरांच्या एकखांबी तंबूत आलेले असंख्य तरुण त्यांचे कार्य मोठय़ा निष्ठेने चालवत आहेत.
पद्मश्रीमुळे महाराष्ट्रातील अंनिसचे कार्यकत्रे आनंदले असतील किंवा नसतील, संवेदना संपलेल्या समाजाबद्दल किंवा चेहरा बदलणाऱ्या संत्र्या-मंत्र्याबद्दल किंवा सरकारबद्दल त्या कार्यकर्त्यांच्या मनात राग धुमसतो आहे. गांधी विचारधारेत काम करणाऱ्या या असंख्य कार्यकर्त्यांनी आपल्या भावनांना दाबून टाकले आहे किंवा मारून टाकले आहे. डॉ. दाभोलकरांच्या हत्येनंतर सरभर झालेले कार्यकत्रे दु:खी झाले. मग त्यांनी मारेकऱ्यांचा सरकारने शोध लावावा म्हणून शहरातून शांततामय मार्गाने आंदोलने केली. हजारो निवेदने, शेकडो उपोषणे, पुन्हा शेकडो मोच्रे निघाले. अर्थात ते मूक मोच्रेच होते.
अशा मोर्चामुळे शासनाची साधी झोपमोडसुद्धा झाली नाही आणि झालेही तसेच. कुणी दखल घेतली नाही, परंतु आम्ही दाभोलकरांच्या हत्येसंदर्भात प्रचंड म्हणजे प्रचंड गंभीर आहोत. दूरचित्रवाहिन्यांवर केंद्रीय आणि महाराष्ट्र सरकारच्या बहुचíचत गृहमंत्र्यांचे चेहरे सांगत असत. त्या लोकांनी चेहऱ्यावर चिंता दाखवली की बघणारे मुक्त व्हायचे.
मध्यमवर्गीय मानसिकता असणाऱ्या या समाजाला वाटते, खरेच सरकार किती दखल घेतेय! म्हणजे हेसुद्धा चच्रेसाठी बरे ठरत असते. संवेदना संपलेल्या राजकारणाला किंवा नेत्यांना अशा खुनाबिनाची फारशी दखल घ्यावीशी वाटत नाही. त्यांचे इंटरेस्ट वेगळेच असतात. समाज झोपलेला आहे तोपर्यंत करा एखादे वॉटरगेट. साध्या सामान्य माणसाला महात्मा गांधीजींबद्दल आदर आहे. महात्मा गांधीजींचे नाव चलनी नाणे होऊ नये असे सामान्यांना वाटते. नेत्यांसाठी राजकारणात अशा नावांच्या कॉइन्स निर्माण केल्या आहेत, हे समाजाचे दु:ख आहे.
डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी गांधीजींच्या अिहसक मार्गाने आयुष्यभर चळवळ चालविली. अंधश्रद्धेच्या जोखडातून किंवा विचित्र मानसिकतेतून समाजाला बाहेर काढण्याचे अफलातून आव्हान त्यांनी स्वीकारले होते. प्रदीर्घ काळ अंधश्रद्धा निर्मूलन बिल संमत होण्यासाठी त्यांना मोठा लढा उभारावा लागला. शासनदरबारी चर्चा सुरू झाली आणि कुण्या माथेफिरूने दाभोलकरांवर गोळ्या झाडल्या. सबंध महाराष्ट्र हादरला. सरकारने मारेकरी शोधण्याचे आश्वासन दिले. अजूनही काहीही घडलेले नाही.
अशोक अर्धापूरकर, अंतुले नगर, िहगोली

सर्वाचीच जबाबदारी
‘विक्रांत’चा विषय सध्या चर्चेत आहे. मी ‘विक्रांत’वर जाऊन आलो आहे. ही युद्धनौका पाहताना ऊर आभिमानाने भरून येतो. आपल्या सैन्याने गाजविलेल्या पराक्रमाच्या आठवणी मनात रुंजी घालू लागतात. महाराष्ट्र सरकारकडे विक्रांत वाचविण्यासाठी १२५ कोटी रुपये नाहीत म्हणून विक्रांत मोडीत निघणार आहे व यासाठी महाराष्ट्र सरकारवर चौफेर टीका होत आहे. ही युद्धनौका युती सरकारने संग्रहालयासाठी संरक्षण मंत्रालयाकडून घेतली होती. आता ती आघाडी सरकारच्या ताब्यात आहे. एकेकाळी भारतीय सैन्याची ताकद, शान असलेली विक्रांत मोडीत निघणार याचे दु:ख आहेच, परंतु त्याचबरोबर विक्रांत वाचवू शकत नाही म्हणून काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंतचे सर्वजण फक्त महाराष्ट्र सरकारलाच दोष देत आहेत तो कशासाठी? हा प्रश्नही पडतो. ‘विक्रांत’ने फक्त महाराष्ट्राचेच शत्रूपासून संरक्षण केले आहे काय? विक्रांतमुळे संपूर्ण देश सुरक्षित राहिला. विक्रांत हे देशाचे अभेद्य कवच होते. मग देशातील सर्व राज्यांची एकत्र येऊन ‘विक्रांत’ वाचविण्याची जबाबदारी नाही काय? ‘आदर्श’ला, आर्थिक घोटाळे करणाऱ्या धनदांडग्यांना, भ्रष्टाचाऱ्यांना वाचविण्यासाठी कमरेचे फिटेपर्यंत धावपळ करणारे महाराष्ट्रातील नालायक सरकार प्रेरणादायी ठरणारे हे युद्धस्मारक वाचवू इच्छित नाही, हे जरी खरे असले तरी विक्रांत वाचविण्याची, देशाची अस्मिता असलेली ही विजयनौका जपण्याची जबाबदारी सर्व राज्यांची, केंद्र सरकारची व तमाम देशवासीयांची आहे.
संजय क्षीरसागर, पुणे.

गुलजार विशेषांकासाठी धन्यवाद
एके काळी विणलेला एकुलता रिश्ता फार पूर्वी जागविलेली उम्मीद, अश्रूंमध्ये बुडालेले लोक. मनात पसरलेला तो सन्नाटा. खोटय़ा शपथा घेणारी ती, तर आयुष्यभर सब्र करणारा तो. रोज नवीन गोष्ट छेडणारा पाऊस. फुलांच्या हातून पाठविलेल्या दुवा. अजनबी शहरातल्या लोकांचे दर्द के रिश्ते. पहाडावरचा बर्फ पिघळल्यानंतर आपले आळसलेले डोळे उघडणाऱ्या बिया, कुण्या शायरचं वर्णन व शेवटी त्यांनी केलेली आत्महत्या, शहतूतच्या झाडावरील रेशमी किडय़ांची गोष्ट. सायंकाळपासून केलेली चंद्राची प्रतीक्षा हे सर्व होतं गुलजारसाहेबांनी लिहिलेल्या ‘यार जुला हे..’ या कवितासंग्रहात जो काही दिवसांपूर्वी मी वाचला. विणकरांनी विणायला घेतलेल्या धाग्यांप्रमाणे असलेले हे नाते मनावर खोल रुजते. सर्वप्रथम त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाल्याबद्दल शत शत अभिनंदन. लोकप्रभाचा गुलजार अंक वाचताना त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे व न जाणलेले पैलू समोर आले. हा अंक संग्रह करून ठेवण्यासारखा आहे. असा अप्रतिम अंक काढल्याबद्दल अनेक धन्यवाद!
– मीरा िरगे, नवी मुंबई.