‘कल्टार संस्कृतीचा बळी’ (लोकप्रभा,१६ मे ) हा लेख वाचला. युरोपियन संघाच्या वनस्पती आरोग्य समितीने हापूस आंब्यावर युरोपात घातलेली बंदी ही आंबा व्यापाऱ्यांसाठी सणसणीत चपराक आहे. महत्वाचे म्हणजे आपण काय बोध घेतला आहे का? ‘दैव देते आणि कर्म नेते’ अशी अवस्था झाली आहे. आंब्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठ टिकवण्यासाठी आपण अपयशी ठरलो. जागतिक स्तरावर एकदा नाव खराब झाले की पुन्हा तो लौकिक मिळवण्यासाठी पुष्कळ यातायात करावी लागते. पण आपण झटपट धन लाभासाठी बहुतांश हापूस आंब्याचे बागायतदार रासायनिक खतांचा अतिवापर करतात. फळ पिकण्याची नैसर्गिक प्रक्रिया वाट न पाहता थेट त्या प्रक्रियेलाच फरफटत पुढे नेले जाते. परिणामी बाहेरून दिसायला केशरी—पिवळे दिसणारे हापूस आतून मात्र आंबट लागतात. खतांच्या बेसुमार अतिरेकामुळे हापूसची खरी चवच भुईसपाट झाली आहे. परिणामी त्या हापूस आंब्याच्या फळावर नाक रगडले तरी कुठेच हापूस आंब्याचा म्हणून वास काही त्या फळाला येत नाही.१५—२० वर्षांपूर्वी जे हापूसचे मोठे फळ होते ते आज पाहायला मिळणेही दुर्मीळ झाले आहे. मोठे, रसभरीत फळ त्यांच्याकडेच आढळेल जे या कल्टारच्या वाटेला गेले नाहीत. पण असे बागायतदार अत्यंत विरळाच. या कल्टारची दाहकता इतकी भीषण आहे की त्याचे दुष्परिणाम काही किलोमीटर अंतरावरील अन्य झाडांवरही जाणवतात. पण तरीही कोणाचे डोळे काही उघडत नाहीत. आधीच आपल्या निर्यातीचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यातच आंब्याच्या नगदी व्यवसायावरच संRोंत आली ओढावून घेतली आहे. थोडक्यात ‘आंबाही गेला, व्यापारही गेला, हाती राहिले धुपाटणे’ अशी अवस्था झाली आहे.
— जयेश राणे, भांडुप, मुंबई (ई-मेलवरून)

नंदाच्या अभिनयाचा सुगंध
‘चल उड जा रे पंछी’ हा ९ मेच्या लोकप्रभातील प्रभाकर बोकील यांचा अभिनेत्री नंदा यांच्याविषयीचा चांगला लेख वाचनात आला. बालतारका ते नायिका असा सिनेप्रवास बघितला तर खरोखरच थक्क व्हायला होते. ती आघाडीची नायिका बनली तरी चाहत्यांसाठी ती बेबी नंदा म्हणूनच परिचित राहिली. रेणुका कर्नाटकी हे त्यांचे मूळ नाव, पण चित्रपटात बालकलाकार म्हणून काम करताना त्यांनी बेबी नंदा हे नाव स्वीकारले आणि शेवटपर्यंत तेच बिरुद त्यांना चिकटून राहिले, त्याबद्दल त्यांनी कधीही नाराजी व्यक्त केली नाही. सहनायिका, नायिका म्हणून त्यांनी आपला स्वतंत्र ठसा उमटविला आणि आपल्या समर्थ अभिनयाने त्या व्यक्तिरेखा अजरामर केल्या. त्यांच्या अभिनयाबरोबर त्यांचा पेहराव हादेखील त्यांच्या सौंदर्याचा एक भाग होता. साडी, पंजाबी ड्रेस, पाश्चिमात्य पोशाख या सर्वामध्ये खुलून दिसत. ‘जब जब फूल खिले’ मधील काश्मिरी वेशातील छबी आजही रसिकांच्या स्मरणात आहे. तर याच चित्रपटातील ‘ये समा, समा है प्यार का..’ या गाण्यात ती मूर्तिमंत पाश्चिमात्य सौंदर्यदेवता वाटते. हिंदी चित्रपटांबरोबरच त्यांनी ‘कुलदैवत’, ‘शेवग्याच्या शेंगा’, ‘देवघर’, ‘झालं गेलं विसरून जा’, ‘देव जागा आहे’, ‘मातेविना बाळ’ अशा मराठी चित्रपटांमध्येही अभिनय केला. ‘शेवग्याच्या शेंगा’ चित्रपटातील बहिणीच्या भूमिकेसाठी तिला जवाहरलाल नेहरूंच्या हस्ते गौरविण्यात आले होते, तर ‘आचल’ चित्रपटासाठी त्यांना सवरेत्कृष्ट सहायक अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. त्यांना उंची अत्तरांचा शौक होता. त्या ज्या ज्या ठिकाणी असत तेथे त्यांच्या अस्तित्वाचा सुगंध दरवळायचा. आजही नंदा आपल्यात नसली तरी तिच्या अभिनयाचा सुगंध असाच दरवळत राहील.
– सुहास बसणकर, दादर

गुलजारांचे स्थान महत्वाचे
आजकाल कुठलाही अर्थ नसणारी अगम्य वाक्ये लिहून त्यालाच ‘कविता’ म्हणणे फॅशनेबल झाले आहे. दुसरीकडे, निव्वळ यमक जुळवून अर्थहीन गीतांचा चित्रपटांमध्ये मारा केलेला दिसतो. म्हणूनच साधी सुंदर कविता / गीते लिहिणारे गुलजार यांचे स्थान महत्त्वाचे ठरते. कित्येक लोकप्रिय गाण्यांचे कवि / गीतकार प्रकाशझोतापासून दूरच असतात. अशा गाण्यांचे जनक असणाऱ्यांना, त्यांच्या निर्मितीचे उचित श्रेय दिले जावे असे वाटते.
– केतन र. मेहेर, विरार (पूर्व) (ई-मेलवरून)

पीअर प्रेशरवरचा लेख आवडला
लोकप्रभाच्या ११ एप्रिलच्या अंकातील पीअर प्रेशरवरचा लेख खूप अभ्यासपूर्ण आहे. हल्ली मुलांचा बाइकचा वापर वाढला आहे. वेगाने बाइक चालवणे हे प्रतिष्ठेचे लक्षण मानून मुले बाइक चालवतात त्यातून अपघात घडतात. स्वत:चा जीव तर जातोच, पण आई-वडिलांना दु:खाच्या सागरात लोटून जातात. त्यांच्यावर संस्कारच झालेले नसतात असे वाटते. अगदी लहान वयापासून समाजात कसे वावरावे याचे शिक्षण शाळांमधूनच झाले. याबाबत मला एक जाणवले की महिलांकरता राखीव जागेत बसमध्ये तरुण मुले बसलेली असतात व हे एखाद्या स्त्रीने निदर्शनास आणून दिले तर मुले वाद घालतात. तसेच रस्त्यावर खेळताना आपल्या चेंडूमुळे कोणाच्या काचा फुटल्या तर साधे सॉरी म्हणण्याचे सौजन्य मुले तर सोडाच त्यांच्या घरचे मोठेही दाखवत नाही.
– अंजली पेशवे, अमरावती.

खरी जबाबदारी
जागतिक आरोग्य संघटनेने भारतातून पोलिओचे निर्मूलन झाल्याचे २७ मार्च २०१४ रोजी घोषित केले, त्यावर आधारित ९ मेच्या अंकातील लेख वाचनात आला. देशाच्या आरोग्याच्या दृष्टीने ही चांगली बाब आहे. मात्र भविष्यात देश असाच पोलिओमुक्त ठेवायचा असेल तर मात्र सर्वच स्तरांवर र्सवकष काळजी घेत राहणे गरजेचे आहे. अर्थातच ही जबाबदारी प्रत्येक नागरिकावर येते. स्वच्छता, टापटीपपणा, शेजारील राष्ट्रांतून पोलिओग्रस्त येत नाहीत ना याबाबत जागरूकता, बाळगली पाहिजे. सीमेवरील लसीकरण हा उपक्रम महत्त्वाचा आहे. देवी रोगाच्या उच्चाटनानंतर पोलिओचे उच्चाटन ही सांघिक प्रयत्नांची यशोगाथा आहे.
– धोंडिरामसिंह ध. राजपूत, वैजापूर

देण्यातला आनंद!
वर्धापन दिनाच्या विशेषांकातील देण्यातला आनंद हा लेख अप्रतिम आहे. सर्व सेवाव्रतीना सलाम, नव्हे आदरपूर्वक वंदन!! आणि ‘लोकप्रभा’ परिवारास शतश: धन्यवाद!! कृपया सर्व सेवावृतींचे संपर्क, पत्ता आणि क्रमांक पाठवा आणि प्रकाशित करावेत. समाजाला जागरूक ठेवून त्यांच्यावर संस्कार करण्याचे महत्कार्य तुम्ही करत आहात. अन्य वृतपत्रे, साप्ताहिके हिडीसपणा अथवा अंधश्रद्धा यांतून आपला खप टिकवून ठेवण्याचा आटापिटा करताना तुम्ही मात्र जे काम केले आहे, ते वर्णन करण्यास शब्द नाहीत. ‘लोकप्रभा’ साप्ताहिकाचा सदैव उत्कर्ष होवो. स्वत: उच्च मूल्याकडे जाताना समाजालाही पथदर्शक बनो, सर्वाना मन:पूर्वक शुभेच्छा!!
– वैभव प्र. महाबोले, कोलोरॅडो स्प्रिंग्ज, अमेरिका (ई-मेलवरून)