lkp17आपल्याकडे देशभर वेगवेगळ्या ठिकाणी विविध प्रकारचे किल्ले पहायला मिळतात. शिवाजी महाराजांनी मोठय़ा प्रमाणावर किल्ले बांधले असा आपला मराठी माणसांचा समज असला तरी महाभारत, कौटिल्यीय अर्थशास्त्र, मनुस्मृती या सगळ्या ग्रंथांमध्ये किल्ले कसे असावेत याचे वर्णन आहे. याचाच अर्थ किल्ले प्राचीन काळापासून वापरात होते.

देशभरात दिवाळी हा सण दिव्याची आरास करून, फटाके वाजवून व मिठाई, फराळ वाटून खाऊन साजरा केला जातो. पण महाराष्ट्राच्या दिवाळीचे वेगळेपण म्हणजे वरील सर्व गोष्टींबरोबर इथे अंगणा-अंगणात किल्ले बांधले जातात. छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ल्यांच्या मदतीने त्याकाळच्या दुष्ट सत्ता उलथवून टाकून शिवराज्य स्थापन केले त्याबद्दलची कृतज्ञता म्हणून हे किल्ले बांधले जात असावेत. शिवाजी महाराजांवरील या प्रेमाखातर अनेक जण पहिल्यांदा किल्ला पाहायला जातात. त्यातील काही जणांना आवड निर्माण होते. मग ते एका मागोमाग एक असे किल्ले पाहात जातात, जरी किल्ले पाहिले असले तरी समजून घेण्याचा प्रयत्न कमी पडतो. किल्ल्याचे भौगोलिक स्थान, त्याचा प्रकार, त्याची रचना या गोष्टी किल्ल्याबद्दल बरंच काही सांगत असतात. ते जाणून, समजून घेतलं तर किल्ला बांधण्याचंही एक शास्त्र आहे, ज्यास दुर्ग स्थापत्यशास्त्र असे म्हणतात. या शास्त्राची जसजशी माहिती होईल तसतसा किल्ला पाहाण्यास व समजून घेण्यास नवीन परिमाण लाभेल. किल्ल्यांप्रतीची दृष्टी अधिक सजग होईल.

भारतात हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या टेकडय़ांपासून ते दक्षिण टोकापर्यंत किल्ले बांधलेले पाहायला मिळतात. या किल्ल्यांचा उपयोग युद्धकाळात शत्रूच्या हल्ल्यापासून सनिकांचे आणि आजूबाजूच्या प्रदेशाचे रक्षण करण्यासाठी होत असे. शांततेच्या काळात व्यापारी मार्गाचे रक्षण करण्यासाठी, मुलकी व्यवस्था सांभाळण्यासाठी किल्ल्यांचा उपयोग होत असे. सरकारी दप्तर, खजिना, सन्य यांना सुरक्षित ठेवण्यासाठीही किल्ल्याचा उपयोग होत असे.

आपल्या प्राचीन ग्रंथांमधून आपल्याला या दुर्गाबद्दल माहिती आढळते.

एक: शतं दुर्गस्थोऽस्त्रधरो यदि।

शतं दशसहस्त्राणि तस्माद् दरुग समाश्रयेत्

याचा अर्थ असा की किल्ल्यांच्या सहाय्याने एक सशस्त्र योद्धा शंभर योद्धय़ांशी लढू शकतो, शंभर योद्धे दहा हजार योद्धय़ांशी लढू शकतात त्यासाठी दुर्गाचा आश्रय घ्यावा.

ऋग्वेदात, मनुस्मृतीत, महाभारतात तसंच कौटिल्याच्या अर्थशास्त्रात किल्ला कसा असावा, त्याच्या संरक्षणासाठी किल्ल्यात कोणकोणत्या गोष्टी असाव्यात आणि त्या कुठे असाव्यात इथपर्यंत माहिती दिलेली आहे. अर्थात ही माहिती ओवीबद्ध असल्याने त्रोटकही आहे. मनुस्मृतीत किल्ल्याचे वर्गीकरण खालील प्रकारे सांगितले आहे.

lkp18

धनदरुग महीदुर्गमब्दरुग वाक्र्षमेव वा।

नृदरुग गिरिदरुग वा समाश्रित्य वसेत्पुरम्

सर्वेण तु प्रयत्नेन गिरिदरुग समाश्रयेत्।

एषां हि बाहुगुण्येन गिरिदरुग विशिष्यते

धनदुर्ग : सर्व दिशांना २० कोसापर्यंत पाणी नसलेला.,

महीदुर्ग : वरून फिरता येईल अशी १२ हात उंचीची तटबंदी असलेला किल्ला,

अब्दुर्ग : पाण्याने वेढलेला किल्ला (जलदुर्ग),

वाक्र्षदुर्ग : तटाबाहेर चार कोसापर्यंत मोठे वृक्ष, काटेरी झाडे, झुडपे असलेला किल्ला (वनदुर्ग),

नृदुर्ग : हत्ती, घोडे यांनी संरक्षित किल्ला.

गिरिदुर्ग : डोंगरावर बांधलेला किल्ला. ज्यावर जाण्यासाठी एकच वाट आहे, पाणी, धनधान्य यांनी युक्त असलेला असा किल्ला. या सर्व दुर्गात बहुगुणी असा ‘गिरिदुर्ग’ सर्वश्रेष्ठ आहे.

महाभारतात यादव आणि मगध यांच्यात अठरा युद्धं झाली त्याच्ां वर्णन आहे. त्यातील शेवटच्या युद्धात मथुरेची तटबंदी ढासळली, खंदक बुजून गेला, अन्नधान्य लाकूडफाटय़ाचा तुटवडा जाणवू लागला. त्यामुळे कृष्णाने सन्यानिशी गोमंत पर्वताचा आसरा घेतला, असा उल्लेख आढळतो. या वर्णनावरून मथुरा हा नगर कोट म्हणजेच शहराभोवती तटबंदी असलेला किल्ला आणि गोमंत पर्वत हा गिरिदुर्ग असावा असा अंदाज करता येतो. श्रीकृष्णाने बांधलेल्या द्वारकेचे हरिवंशात आणि विष्णूपुराणात जे वर्णन येतं तेही एका किल्ल्याचं वर्णन आहे. हरिवंशात गरुड सांगतो, तट खंदकांनी युक्त असलेली द्वारका नगरी समुद्रामध्ये आहे. अनेक खाणींनी युक्त असलेली ही नगरी तिच्यातील किल्ल्यामुळे शोभून दिसते. गोमती नदीमुळे तिला अखंड गोडय़ा पाण्याचा पुरवठा आहे. हे वर्णन एखाद्या जलदुर्गाच्या वर्णनाशी मिळतंजुळतं आहे. १९९० साली बेट द्वारकाजवळ समुद्र तळाशी किल्ल्याचे बुरुज आणि अवशेष सापडले. महाभारतातील शांती पर्वात युधिष्ठिराने विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना भिष्मांनी वर सांगितलेल्या मनुस्मृतीतील सहा किल्ल्यांचे वर्णन केलेले आहे. त्याशिवाय नगर किल्ल्यांची रचना, संरक्षण याबद्दल माहिती दिलेली आहे. महाभारतकालीन हस्तिनापूर, इंद्रप्रस्थ ही राजधानीची शहरे म्हणजे नगरकोट असावेत असा अंदाज बांधता येतो.

lkp24

कौटिल्यीय अर्थशास्त्रातील २४व्या अध्यायात किल्ल्यांचे आठ प्रकार सांगितलेले आहेत. मनुस्मृतीत सांगितलेल्या सहा प्रकारांव्यतिरिक्त क्षारयुक्त जमिनीत बांधलेला म्हणजेच किनारी दुर्ग आणि दलदलीत बांधलेला म्हणजेच कर्दम दुर्ग असे दोन किल्ल्यांचे जास्तीचे प्रकार सांगितले आहेत. किल्ला कुठे आणि कसा वसवावा हे सांगताना कौटिल्य म्हणतो, ‘नद्यांच्या संगमावर, कधीही कोरडे न पडणाऱ्या सरोवराच्या काठावर वर्तुळाकार, चौरस स्थानीय वसवावे. त्यात बाजारपेठा, रस्ते असावेत. किल्ल्या भोवती एक एक दंड (सुमारे १८ फूट) अंतरावर तीन खंदक प्रत्येकी १४, १२, १० दंड रुंदीचे असावेत. खंदकाची खोली  साधारणपणे रुंदीच्या पाऊणपट असावी. हे खंदक दगडांनी आतून बांधून काढावेत. त्या खंदकात झरे असल्यास उत्तम, नसल्यास बाहेरून पाणी वळवून खंदक भरावेत.

lkp19

खंदक खोदताना जी माती निघेल ती वापरून खंदकापासून चार दंडावर सहा दंड उंच आणि १२ दंड रुंद तट बांधावा. तटावर बाहेरच्या बाजूने विषारी वेली आणि काटे असलेली झुडुपे लावावीत. तटावर विटांची किंवा दगडांची िभत बांधावी. लाकडाचा वापर करू नये. तटबंदीत दर ३० दंडांवर एखाद्या इमारतीसारखे रुंद बुरुज बांधावेत. दोन बुरुजांमध्ये देवडी बांधावी. देवडी आणि बुरुज यांमध्ये इंद्रकोश असावा. इंद्रकोश म्हणजे जंग्या म्हणजे भोक असलेल्या लाकडी फळ्या. या भोकांतून तीन धनुर्धारी शत्रूंवर बाणांचा वर्षांव करू शकतील. तटबंदी, बुरुजात गुप्त जिने, भुयार आणि चोर दरवाजे असावेत. किल्ल्याच्या बाहेरील बाजूस सूळ, काटय़ांनी भरलेले, झाकलेले खड्डे, घाणेरडय़ा पाण्याची डबकी असावीत. जेणे करून शत्रूला किल्ल्यापर्यंत येण्यास अडथळे येतील अशी रचना असावी.

lkp23

महाभारतात किंवा कौटिल्यीय अर्थशास्त्रातील किल्ल्याची जी वर्णने येतात ती प्रामुख्याने भुईकोट किंवा नगरकोटांची आहेत. या सर्व सत्ता मदानी प्रदेशात किंवा नद्यांच्या दुभागात वसलेल्या होत्या. त्यामुळे जलदुर्ग आणि गिरिदुर्गाची वर्णने अभावानेच आढळतात. या मदानी मुलुखापेक्षा महाराष्ट्राची भौगोलिक रचना पूर्णपणे वेगळी आहे. पश्चिमेला अरबी समुद्र त्याला मिळणाऱ्या असंख्य नद्यांची मुखं, खाडय़ा, दलदलीचा प्रदेश, कोकणातली घनदाट जंगलं, त्यापुढे खडा सह्यद्री, घाटमाथा आणि मदान अशी साधारणपणे रचना आहे. त्यामुळे महाराष्ट्रात जलदुर्ग, किनारीदुर्ग, गिरिदुर्ग, भुईकोट, वनदुर्ग, गढय़ा असे किल्ल्यांचे विविध प्रकार पाहायला मिळतात.

या विशिष्ट भौगोलिक रचनेमुळे महाराष्ट्रातल्या स्थानिक राज्यकर्त्यांच्या राजधान्याही गिरिदुर्गावर पाहायला मिळतात. राष्ट्रकुटांची चांदुर, चालुक्यांची बदामी, यादवांची देवगिरी, शिलाहारांची पन्हाळा आणि शिवाजी महाराजांची राजगड आणि रायगड. या उलट उत्तरेकडून आलेल्या सत्तांनी इथे स्थापन केलेल्या राजधान्या मात्र मदानावर आढळतात. बिदरची बरीदशाही, विजापूरची आदिलशाही, नगरची निजामशाही इत्यादी.

lkp20

महाराष्ट्राच्या सातवाहनांच्या काळात नाणेघाटासारखा घाट बांधून झाला. अनेक लेणी खोदली गेली. त्यातील काही लेण्यांच्या परिसरातच नंतर दुर्ग बांधले गेलेले पाहायला मिळतात. सातवाहनांनंतर चालुक्य, राष्ट्रकुट, कदम्ब इत्यादी घराणी महाराष्ट्रात नांदून गेली, पण त्यांनी बांधलेल्या किल्ल्यांची नोंद आढळत नाही. त्यांनतर आलेल्या शिलाहार कुळातल्या राजा भोज याने पन्हाळा, पावनगड, केंजळ, पांडवगड, गगनगड, भुदरगड, रांगणा, वसंतगड, वैराटगड इत्यादी किल्ले निर्मिती केल्याचे उल्लेख आढळतात. यादवांच्या काळातही देवगिरी वैतर किल्ल्यांची निर्मिती झाली होती. त्यानंतर आलेल्या निजामशाही, आदिलशाही इत्यादी शासकांनीही काही किल्ल्यांची निर्मिती केल्याचे उल्लेख आढळतात.

lkp21

शिवाजी महाराजांच्या काळापर्यंत शस्त्रास्त्र, युद्धतंत्र यात बरेच बदल झाले होते. लेणी (डोंगर) कोरण्याची कला लुप्त झाली होती. त्यामुळे शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राच्या भौगोलिक रचनेचा, सह्याद्रीतील प्रचलित घाटवाटा, किल्ल्याचं स्थान, त्याचा उपयोग, आवश्यकता याचा सूक्ष्म अभ्यास करून एक दुर्गरचना शास्त्र तयार केले. ‘संपूर्ण राज्यांचे सार ते दुर्ग. दुर्ग नसता मोकळा देश परचक्र येता, प्रजाभग्न होऊन देश उद्ध्वस्त होतो.’ रामचंद्रपंत अमात्यांनी लिहिलेल्या आज्ञापत्रातील ही वाक्ये शिवाजी महाराजांची दूरदृष्टी आणि गडांचे महत्त्व अधोरेखित करतात. आपल्या याच तत्त्वाला अनुसरून महाराजांनी अनेक नवीन किल्ले बांधले. जुन्या किल्ल्यांची पुनर्बाधणी केली. हे कार्य त्यांनी एवढय़ा मोठय़ा प्रमाणात केले की, महाराष्ट्रातले सर्व किल्ले शिवाजी महाराजांनी बांधले असा सर्वसामान्यांचा ठाम समज झालेला आहे.

lkp22

(संदर्भ : महाराष्ट्र स्तोत्र- सह्यद्री, स. आ. जोगळेकर; कौटिलीय अर्थशास्त्राचा परिचय, वसुंधरा पेंडसे नाईक)
अमित सामंत – response.lokprabha@expressindia.com