पर्यटन : रिओ दी जानेरो

सध्या ब्राझीलमध्ये फुटबॉलोत्सव सुरू आहे. त्यासाठी जगभरातले फुटबॉलप्रेमी तिथे जमले असले तरी एरवीही ब्राझीलला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी असते. थिल्याच कमालीच्या चैतन्यमयी शहराचा फेरफटका-

सध्या ब्राझीलमध्ये फुटबॉलोत्सव सुरू आहे. त्यासाठी जगभरातले फुटबॉलप्रेमी तिथे जमले असले तरी एरवीही ब्राझीलला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी असते. थिल्याच कमालीच्या चैतन्यमयी शहराचा फेरफटका-

सध्या फुटबॉलसारख्या कमालीच्या रसरशीत खेळाने वेडावलेला देश म्हणजे ब्राझील. पण एरवी तो पर्यटकांचाही लाडका देश आहे. रिओ डी जेनेरोचा कोपा कबाना बीच, अॅमेझॉन नदीचा परिसर, अवाढव्य पसरलेले अॅमेझॉनचे रेन फॉरेस्ट, जग्वारसाठीचे प्रसिद्ध जंगल पांतेनाल व तायामा, या नैसर्गिक रचनेमुळे वेगवेगळे पक्षी, प्राणी यांनी परिपूर्ण असा हा परिसर आहे. साहजिकच हा जगभरातील पर्यटकांचा अत्यंत प्रिय इलाखा. अटलांटिक महासागरावर साडेसात हजार कि. मी. एवढा किनारा असलेल्या ब्राझीलच्या आसपास व्हेनेझुएला, कोलंबिया, अर्जेटिना, पेरुग्वे, उरुग्वे व पेरू असे देश आहेत. ब्राझील हा लॅटिन अमेरिकन कंट्रीजमध्ये मोडणारा प्रांत आहे. पंधरा, सोळाव्या शतकात दक्षिण अमेरिकेत प्रामुख्याने स्पॅनिश, पोर्तुगीज राजवटी होत्या. त्यामुळे हे स्पॅनिश व पोर्तुगीज भाषा बोलणारे प्रांत आहेत. या दोन्ही भाषांचा उगम लॅटिन भाषेतून झालेला असल्याने हे देश लॅटिन अमेरिकन कंट्रीज म्हणून ओळखले जातात. ब्राझील येथे पोर्तुगीज भाषेतूनच सर्व व्यवहार चालतात.
फार पूर्वी ब्राझीलच्या किनाऱ्यावर लाल रंगाची झाडे होती. त्यांच्यापासून लाल रंगाचा डाय बनवला जात असे. त्याला युरोपमध्ये फार मागणी होती. त्या वेळच्या जमातीतील लोकांनी त्याची जोरदार लागवड केली. पोर्तुगीज भाषेत लाल रंगाला ब्राझील म्हटले जात असे. त्यामुळे पोर्तुगीज सत्ता आल्यावर या भागाला त्यांनी ब्राझील हे नाव दिले. ब्राझीलची मुख्य नदी अॅमेझॉन. नेग्रो सेओ फ्रान्सिस्को, शिंगु, मदिरा, पेरेना आणखीन अशा नदीच्या एकूण आठ शाखा वेगवेगळ्या भागांतून येऊन अटलांटिक महासागराला मिळतात. पेरेना ही अॅमेझॉन नदीची एक शाखा. ह्य नदीवर ईग्वाजु हा जगातील सर्वात मोठा धबधबा आहे. ईग्वाजु धबधबा ब्राझील तसेच अर्जेटिना या दोन देशांतून पाहिल्यास आपल्याला त्याची भव्यता कळते.
देशात भौगोलिक रचनेमुळे हा टेकडय़ा, पठारे, डोंगर तसेच खुरटय़ा झुडपांचाही प्रांत आहे. शिवाय काही ठिकाणी समुद्र आत आल्यामुळे झालेल्या खाडींमुळे कोपाकबाना, बोटोफोगा, फ्लेमिंगो असे बीचेस तयार झाले आहेत. यामुळे प्रत्येक ठिकाणी तापमानही वेगळे. पृथ्वीच्या गोलावर ब्राझीलचे स्थान दक्षिण गोलार्धात आहे. तर आपण त्यांच्या बरोबर विरुद्ध दिशेला उत्तर गोलार्धात आहोत. त्यामुळे तिथले ऋतुमान बरोब्बर आपल्या विरुद्ध असते. तिथे नोव्हेंबर ते एप्रिल उन्हाळा असतो तर एप्रिल ते ऑक्टोबर थंडीचा मोसम असतो. डिसेंबर ते फेब्रुवारी हे त्यांचे पावसाचे दिवस. साहजिकच नोव्हेंबर ते एप्रिल हा पर्यटकांचा आवडता मोसम आहे. शिवाय विषुववृत्ताच्या जवळ असल्याने तपमान उष्ण कटिबंधीय. डिसेंबरमध्ये पारा ५० अंश सेल्सिअल्सपर्यंत चढतो, तर एप्रिलमध्ये तीन-चार अंशांपर्यंत उतरतो. त्यामुळे वर्षभर पर्यटकांचा ओघ असतोच.
ब्राझीलला गेल्यावर बघितलीच पाहिजेत अशी दोन ठिकाणं म्हणजे रिओ डी जेनेरो हे शहर आणि जग्वार हा प्राणी. अर्थात तो जिथे असतो ते पांतेनाल जंगल. रिओ डी जेनेरो एवढं मोठं नाव घेण्यापेक्षा तिथे सर्रास रिओ असंच म्हटलं जातं. पोर्तुगीज राजवटीत पोर्तुगालमधील लिस्बन येथे ब्राझीलची राजधानी होती, पण पुढे अठराव्या शतकात नेपोलियनच्या आक्रमणाअगोदर रिओ येथे स्थापली गेली. राजा असेपर्यंत राजधानी रिओलाच होती, पण स्वतंत्र झाल्यापासून ती ब्रासिलिया येथे आहे. मागे आम्ही पेरू या देशात गेलो असताना टेकडीवर जीझस् ख्राईस्टचा पुतळा पाहिला होता. पण त्याहीपेक्षा मोठा ब्राझीलमध्ये आहे असे सांगण्यात आले होते. तेव्हापासून इथे येण्याची संधी मिळण्याची वाट पाहत होतो. साहजिकच रिओ येथे आल्यावर पहिली भेट दिली ती ख्रिस्तो रेडोंतोरला. हा पुतळा लोकप्रिय असला तरीही क्रमवारीत पोलंड, पेरू, पोर्तुगालनंतर चौथ्या क्रमांकावर ब्राझील क्राईस्टचा नंबर आहे. ब्राझील येथे सामुद्रधुनीत भूगर्भातील रचनेमुळे लहानमोठय़ा टेकडय़ा, डोंगर झाले आहेत. किनाऱ्यालगत अशाच एका टेकडीवर, काकरेवादो येथे व्हाईट ख्राईस्ट आहे. काकरेवादो हे तिथल्या तिजुका फॉरेस्टमध्ये आहे.
पोर्तुगीज भाषेत मानेवरील किंवा पाठीवरील कुबडाला काकरेवादो म्हणतात. त्यामुळे हा पुतळा अशाच एका टेकडीवर असल्याने काकरेवादो ख्रिस्तो रेडोंतोर म्हटले जाते. अठराव्या शतकात येथील धर्मगुरू मारिया बॉस याने राणी इसाबेलाकडे भव्य धार्मिक निशाणी उभारण्याची इच्छा व्यक्त केली. परंतु तिने काही लक्ष दिले नाही पुढे तिथल्या कॅथलिक लोकांनी निधी गोळा करायचे ठरवले, त्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम आखले व निधी गोळा केला. पण शहरात एवढी जागा नव्हती, त्यामुळे शहराऐवजी काकरेवादो, समुद्रसपाटीपासून ७२१० फूट उंचीवरील ठिकाण ठरले. आठ मी. उंचीच्या चौथऱ्यावर ३० मी. उंच, २८ मी. पसरलेल्या बाहूंची रुंदी, ६५० टन वजनाचा पुतळा आहे. हा एकसंध नसून तो तुकडे तुकडे जोडून बनवला आहे. एवढा मोठा, वजनदार पुतळा तुकडय़ातुकडय़ांनी रेल्वेने वर आणला गेला. ही रेल्वे म्हणजे आपल्या माथेरानसारखी मीटर गेजची होती. कालांतराने या लाइनवर अपघात झाल्याने ती बंद केली गेली, पण अजूनही त्याचे रुळ आहेतच.
काकरेवादोच्या पायथ्याशी पोहोचल्यावर लिफ्टने वर पुतळ्याकडे जाण्याची व्यवस्था आहे. कुणाला झुकझुक गाडीतून जायचे असल्यास तीही सोय आहेच. पण वेळ जरा जास्त लागतो. पण उतरताना मात्र वृद्ध, गरोदर स्त्रिया, अपंग व लहान मुलेच लिफ्टने येऊ शकतात. पोर्तुगीजांनी आपल्याकडचा फणस तिथे नेला. तिजुका येथे वर चढताना अगदी मुळापासून झाडाला लगडलेले फणस पाहून खाण्याचा फार मोह झाला. त्यात तो मोठय़ा गऱ्यांचा कापा फणस होता. पण आपल्यासारखे आवडीने खाणारे असावेत असे वाटले नाही. कारण बाजारात मिळतो का पाहण्यासाठी गेलो तर खास असे काही नजरेला पडले नाही.
वर ख्राईस्टचा पुतळा असलेल्या काकरेवादो येथून रिओचा चौफेर नजारा न्याहाळता येतो. अटलांटिक समुद्र रिओ येथे थोडा आत आल्याने तेथे बे झाले आहेत. त्यामुळे कोपा कबाना, बोतो फोगा, फ्लेमिंगोसारखे बीच तयार झाले आहेत. काकरेवादो येथून हे बीचेस नजरेच्या टप्प्यात येतात. पैकी कोपा कबाना हा पर्यटकांचा अत्यंत आवडता बीच आहे. टीव्हीवर दिसणाऱ्या ब्राझीलच्या जाहिरातीमध्ये नेहमी कोपा कबाना बीच दाखवला जातो. पण तुलना केल्यास आपले दादर, गिरगाव चौपाटी, जुहू, मरीन ड्राईव्ह हे किनारे फार मोठे आहेत. पण इथली स्वच्छता, पर्यटकांच्या सोयी, वॉटर स्पोर्ट्स या गोष्टी वाखाणण्यासारख्या आहेत. कोपा कबाना येथे संध्याकाळी किनाऱ्यावरील लुकलुकणारे दिवे आपल्याकडल्या क्वीन्स नेकलेसची आठवण करून देतात.
ब्राझीलमध्ये मका, साखर, वेगवेगळे बटाटे, काही यंत्रसामग्रीचे उत्पादन होते. पोर्तुगीजांच्या काळात साखरेचे उत्पादन फार प्रमाणात होत असे. साठवण व निर्यातीस योग्य म्हणून साखर शंखाकृती कोनात साठवली जात असे. त्याला ते शुगर लोफ म्हणत. भौगोलिक रचनेमुळे समुद्रातून वर आलेल्या टेकडय़ांपैकी एकाचा आकार शंखाकृती आहे. त्यालाही तेच नाव पडले आहे. काकरेवादो येथून चौफेर नजाऱ्यात आपल्याला समुद्र परिसरात लहानमोठे उंच डोंगर दिसतात. ते सर्वच ग्रॅनाईटचे एकसंध दगड आहेत. शुगरलोफ येथे जाण्यासाठी चेअर लिफ्टची सोय आहे. पण सरळ तेथे जाता येत नाही. पहिला थांबा आहे उकरा नावाच्या डोंगरावर. तो समुद्रसपाटीपासून २९० फूट उंचीवर आहे, तर शुगर लोफचा थांबा ३९० फूट उंचीवर आहे. येथे चेअर लिफ्टची सोय १९१३ पासून आहे. सुरुवातीच्या काळात फक्त वीस लोकांना जाता येत असे. १९६७ मध्ये त्यात सुधारणा होऊन ५० जण तर २००६ पासून एका वेळी ८० लोक जाऊ शकतात. उकरा या डोंगरावर पहिल्या दोन वेळचे लिफ्टचे डबे ठेवलेले आहेत. वरून आसमंत न्याहाळताना समोर रन वेवरून विमान उडत असेल तर शुगर लोफ अगोदर ते वळण घेत असतानाचे दृश्य मस्त दिसते.
इथे मार्मोसेट नावाचे लहानशा माकडासारखे, कानावर पांढऱ्या केसांचा झुपका असलेले, अंगावर पट्टे आणि गुबगुबीत शेपटी असलेले प्राणी होते. त्याला मांजर म्हणावे की माकड हेच कळत नव्हते. हा प्राणी होता मात्र महाहुशार. कुणाच्या हातात खाण्याची वस्तू दिसली तर लगेच तुरुतुरु धावत येऊन खाऊ मिळेल या आशेने समोर उभा रहायचा. हातातील खाण्याचे पाकीट पुढे आल्यावर हिसकावण्यात उस्ताद. देणाऱ्याचा जरा जरी अंदाज चुकला तर ओरबडायला तयार. आम्ही लांबूनच मजा पाहत होतो.
व्हाईट क्राईस्टप्रमाणे फेब्रुवारी महिन्यात रिओ येथे होणारे कार्निव्हल फेस्टिव्हल पाहण्यासाठी जगभरातून लाखांनी लोक येतात. पूर्वी रस्त्यातून जाणाऱ्या कार्निव्हल मिरवणुकीमुळे वाहतुकीचा खोळंबा होत असे. १९८२ मध्ये ऑस्कर नीमायर या बडय़ा असामीने संबोजो, म्हणून ७०० मी. लांब व ४० मी. रुंद अशी स्टेडियमसारखी कायमस्वरुपी व्यवस्था केली आहे. आपल्या श्रावण महिन्याप्रमाणे ख्रिश्चन लोक ईस्टर- अगोदर लेंट पीरियड पाळतात. या वेळी साधी राहणी असते. आपल्या गटारी अमावास्येप्रमाणे सर्व खाऊनपिऊन मजा करतात. तशीच मजा लेंटच्या अगोदर दोन-तीन दिवस चालते. त्यात स्त्री-पुरुष लहानमोठे फॅन्सी ड्रेस करून नाचत-गाजत मिरवणूक काढतात. तेच कार्निव्हल फेस्टिव्हल. हा कार्यक्रम सकाळी अकरा वाजल्यापासून मध्यरात्रीपर्यंत चालू असतो. पूर्वी हा कार्यक्रम दोन-तीन दिवसांचा असे. पण आता तो आठवडाभर चालतो. त्यासाठी अमाप गर्दी असते.
रिओमध्ये एक नवीन प्रकारचे चर्च पाहायला मिळाले. चर्चचे नाव आहे अलुशिया कथ्रिडल. ते नेहमीच्या साचेबंद चर्चसारखे म्हणजे घुमटाकार मनोऱ्यांचे नसून ९६ मी. उंच व ११६ मी. रुंद अशा इजिप्तच्या पिरॅमिडप्रमाणे त्याची रचना आहे. त्याला काचेच्या तावदानाचे छत असून बाजूच्या भिंतींवरही लहानलहान खिडक्या आहेत. त्यामुळे आत उजेड चांगला असतो. भिंतींवर वेगवेगळ्या धर्मगुरूंचे पुतळे किंवा येशूची चित्रे नसून आल्टरच्या तीन बाजूंना येशू व मदर मेरीच्या पुतळ्यांची लहान आवृत्ती आहे. मध्यभागी असलेल्या आल्टरवर सुळावरचा येशू ठेवलेला आहे. बाहेरच्या बाजूचा बेल टॉवरही वेगळ्याच धर्तीचा आहे.
फुटबॉल हा इथला अत्यंत लोकप्रिय खेळ. १९५० मधील हा फुटबॉल जगज्जेता देश २०१४ च्या फुटबॉल विश्वचषक सामन्यापाठोपाठ २०१६ च्या ऑलिम्पिकसाठी सज्ज झाला आहे. १९६५ मध्ये उरुग्वे या देशाने ब्राझीलला हरवले होते. अजूनही तो डंख कमी झालेला नाही. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या फुटबॉल विश्वचषकामध्ये खास उरुग्वेला हरवून, बाकी सर्वावर मात करून जगज्जेता बनण्याची जोरदार इच्छा ब्राझीलवासीयांच्या मनात आहे. त्यामुळे प्रत्येक पर्यटकाला ते ‘प्रे फॉर अस’ अशी विनंती करतात.
एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीला मारकाना येथे नव्याने बांधण्यात आलेल्या स्टेडियमची दीड ते दोन लाख प्रेक्षक मावतील एवढी क्षमता आहे. खेळाव्यतिरिक्त तिथे संगीत जलसे, फॅशन शोज् होतात. अलीकडेच फ्रँक सिनात्राचा शो झाला होता. रिओ येथे अगदी वेगळीच गोष्ट पाहायला मिळाली आणि ती म्हणजे रस्त्यावर बऱ्याचशा बगिच्यांत ठेवलेली ट्रेड मिल, क्रॉस ट्रेनर, शोल्डर व्हील, वॉकर वगैरेंसारखी जीममधील उपकरण. बरेच तरुण, तसंच प्रौढ स्त्री-पुरुष या उपकरणांचा वापर करून व्यायाम करताना दिसले. त्यांच्या वापरण्यातही एक शिस्त होती, आपल्यासारखे नव्हते.
शुगर लोफ, ख्रिस्तो रेडोंतोर येथून फ्लेमिंगो, बोटाफोगा या किनाऱ्यांचे विहंगम दृश्य दिसते. तिथे बडय़ा असामींची निवासस्थाने असल्याने कोपा कबानाएवढी वर्दळ दिसली नाही. कोपा कबाना येथे संध्याकाळी फिरताना ताज्या मासळीचे खाण्याचे विविध प्रकार पाहून तोंडाला पाणी सुटले नाही तरच नवल. बीचवर फेरफटका झाल्यानंतर बीअरसोबत मासळी, किंवा रेस्टॉरंटमध्ये सांबा डान्स पाहत ब्राझिलिअन बार्बे क्यू म्हणजेच चुरास्कारिया खाण्याची गंमत वेगळीच. नकळत आपली पावलेही त्या लयीबरोबर थिरकायला लागतात. ही आगळीवेगळी मजा अनुभवण्यासाठी ब्राझीलला भेट द्याच.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Rio de janeiro

ताज्या बातम्या