27 September 2020

News Flash

ऑलिम्पिक पदक मृगजळच !

आशियाई क्रीडा स्पर्धेतील सोनेरी यशाबरोबर भारताने रिओ ऑलिम्पिकमधील पुरुष गटात आपला प्रवेश निश्चित केला असला तरी भारतीय संघ पदक मिळविण्याच्या दर्जापासून खूपच दूर आहे हे

| July 10, 2015 01:27 am

आशियाई क्रीडा स्पर्धेतील सोनेरी यशाबरोबर भारताने रिओ ऑलिम्पिकमधील पुरुष गटात आपला प्रवेश निश्चित केला असला तरी भारतीय संघ पदक मिळविण्याच्या दर्जापासून खूपच दूर आहे हे बेल्जियममधील जागतिक हॉकी लीगवरून स्पष्ट झाले आहे.

भारतीय पुरुष संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेतील विजेतेपदाने मोठय़ा अपेक्षा उंचावल्या होत्या. जागतिक हॉकी लीगमध्ये ते चांगली कामगिरी करतील अशी अपेक्षा होती. मात्र पेनल्टी कॉर्नरवर गोल करण्याबाबत आवश्यक असणाऱ्या अचूकतेचा अभाव, सांघिक कौशल्याचा अभाव, विस्कळीत चाली व बचावफळीतील दुबळेपणा यामुळे भारतीय संघाबाबत चाहत्यांमध्ये नैराशाची भावना निर्माण होत आहे. भारतीय संघात काही युवा खेळाडूंना संधी दिली होती व त्यामुळे त्यांना अपेक्षेइतकी चांगली कामगिरी करता आली नाही हे काही भारताच्या पराभवाचे कारण होऊ शकत नाही. युवा खेळाडूंकडूनही खेळाबाबत प्राथमिक चुकाच होत असतील तर यापेक्षा आणखी दुर्दैव कोणते असू शकते. पुरुष गटात उपांत्य फेरी गाठली हीच भारतासाठी समाधानकारक कामगिरी आहे. महिलांमध्ये भारतीय खेळाडूंनी ऑलिम्पिक प्रवेशाच्या आशा निर्माण करीत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. मात्र पुरुष संघाप्रमाणेच त्यांनीही या स्पर्धेत खूप खराब खेळ केला. गोल करण्याच्या हुकमी संधी वाया घालविल्या तर तुम्हाला कोणीही माफ करू शकणार नाही. ऑलिम्पिक प्रवेश झाला तर भारतीय महिलांना खूपच मेहनत करावी लागणार आहे.
बेल्जियममधील स्पर्धेत भारताकडून पदकाची अपेक्षा होती. मात्र सातत्यपूर्ण कामगिरीच्या अभावाचा फटका भारताला बसला. साखळी गटात त्यांनी ऑस्ट्रेलियाकडून सपाटून मार खाल्ला मात्र नंतरच्या सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली. फ्रान्स, पोलंड, मलेशियाविरुद्ध विजय मिळविताना त्यांची आघाडी फळी जोरदार कार्यरत होती. पाकिस्तानसारख्या तुल्यबळ व पारंपरिक संघाविरुद्ध बरोबरी स्वीकारताना त्यांनी समाधानकारक खेळ केला. उपांत्य फेरीत बेल्जियमविरुद्धच्या उपांत्य फेरीत त्यांनी सपशेल निराशाजनक खेळ केला. इंग्लंडविरुद्ध कांस्यपदकाच्या लढतीतही त्याचीच पुनरावृत्ती घडली. बेभरवशीपणा हा भारतीय क्रीडा क्षेत्राचाच अविभाज्य घटक मानला जातो. भारतीय खेळाडू कधी यशाचे उत्तुंग शिखर गाठतील तर कधी एकदम रसातळाला असल्याचा प्रत्यय घडवून देणारा खेळ करतील. जे सामने भारताने गमावले, त्यामध्ये प्रतिस्पर्धी संघांच्या खेळाडूंच्या कौशल्याबरोबरच आपल्या खेळाडूंनी केलेल्या चुकांचाही मोठा वाटा होता. चेंडूवर नियंत्रण न ठेवणे, चुकीच्या पद्धतीने पास देणे, कमकुवत बचावात्मक फळी, सुरुवातीच्या सातआठ मिनिटांमधील व शेवटच्या सातआठ मिनिटांमधील गाफीलपणा, विनाकारण दडपण घेणे आदी अनेक गोष्टी भारताच्या पराभवास कारणीभूत ठरल्या. डीसर्कलमध्ये प्रतिस्पर्धी संघातील खेळाडू भारतीय खेळाडूंच्या पायावर किंवा अंगावर चेंडू मारून त्याद्वारे पेनल्टी कॉर्नर कसा पदरात पडेल याचा विचार करतात. मात्र आपल्या खेळाडूंकडे अशा तंत्राचा अभावच दिसून येतो. डीसर्कलमध्ये आपले फाऊल होणार नाही याची काळजी भारतीय खेळाडूंकडून अपेक्षेइतकी घेतली जात नाही. गोलात चेंडू तटविताना गोलरक्षकाच्या खांद्याच्या उंचीवर किंवा त्याच्या बाजूला कसा मारला जाईल याचा सहसा विचार आपले खेळाडू करीत नाहीत. अनेक वेळा थेट गोलरक्षकाकडेच चेंडू मारण्यात ते धन्यता मानतात असे दिसून आले आहे.
ड्रॅगफ्लिकरची समस्या!
या स्पर्धेत भारतास ड्रॅगफ्लिकरबाबत समस्या अनेक वेळा जाणवली. भारतास या स्पर्धेत वीस वेळा पेनल्टी कॉर्नरची संधी मिळाली. त्यापैकी केवळ पाच वेळा त्यांना गोल करता आला आहे. गोल करण्यासाठी खरं तर पेनल्टी कॉर्नरसारखी सोनेरी संधी नसते. घोडय़ाला पाण्यापाशी तुम्ही नेले तरी पाणी प्यायचे की नाही हे त्याच्या मनावर असते. भारताबाबत असेच काहीसे पाहावयास मिळत आहे. पेनल्टी कॉर्नरसारखी संधी मिळत असली तरी त्याचा उपयोग करायचा की नाही हे भारतीय खेळाडूंनी ठरवायचे असते. या स्पर्धेत रूपींदरपालसिंग हा ड्रॅगफ्लिकर सुरुवातीचे सामने दुखापतीमुळे खेळू शकला नाही. केवळ एकाच खेळाडूवर पेनल्टी कॉर्नरवरील गोलाबाबत अवलंबून राहणे चुकीचे आहे. पेनल्टी कॉर्नरबाबत संघातील सर्वच खेळाडूंनी हे गोल करण्याचे कौशल्य आत्मसात करण्याची आवश्यकता आहे. ऑस्ट्रेलिया, बेल्जियमचे खेळाडू पेनल्टी कॉर्नरबाबत कसे तंत्र वापरतात याचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला पाहिजे. पेनल्टी कॉर्नरचा फटका मारल्यानंतर गोलपोस्टजवळ प्रतिस्पर्धी खेळाडूंना घेरून त्यांना संभ्रमात टाकले तर गोल करण्याच्या संधी वाढतात हे आपल्या खेळाडूंना लक्षातच येत नाही.
जी स्थिती पुरुष संघाबाबत पाहावयास मिळते, तशीच स्थिती महिला संघाबाबतही पाहावयास मिळत आहे. १९८० मध्ये भारतीय महिलांना ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळाले होते. त्यानंतर एकदाही भारतीय महिला संघ ऑलिम्पिकसारख्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत प्रवेश करू शकलेला नाही. यावरून त्यांचा दर्जा किती खालावला आहे हे लक्षात येते. गतवर्षी आशियाई क्रीडा स्पर्धेत त्यांनी कांस्यपदक मिळवत अपेक्षा उंचावल्या आहेत. मात्र अद्यापही ऑलिम्पिक प्रवेशाबाबतची टांगती तलवार त्यांच्यावर आहे.
हॉकी हा आपला राष्ट्रीय खेळ मानला जातो असे असूनही गेल्या ३१ वर्षांमध्ये ऑलिम्पिक पदक खेचून आणण्याची क्षमता असलेले खेळाडू आपल्याला घडविता आलेले नाहीत. आता खेळाडूंना भरपूर सवलती व सुविधा मिळू लागल्या आहेत. परदेशातील स्पर्धामध्ये वाढता सहभाग, परदेशी प्रशिक्षकांद्वारे मार्गदर्शन, इंडियन हॉकी लीगसारख्या स्पर्धेद्वारे आर्थिक कमाई करण्याच्या हुकमी संधी, या स्पर्धेद्वारे परदेशी खेळाडूंबरोबर स्पर्धात्मक अनुभव आदी अनेक गोष्टी त्यांच्या पायाशी लोळण घालत असूनही भारतीय हॉकीपटूंमध्ये सातत्यपूर्ण कामगिरीचा अभावच दिसून येतो. परदेशी प्रशिक्षक हा खरं तर स्वतंत्र चर्चेचा विषय आहे. परदेशी प्रशिक्षक नसतानाही मेजर ध्यानचंद यांच्या युगात आपला संघ अनेक वर्षे ऑलिम्पिकमध्ये विजेता होता. त्या वेळी त्या खेळाडूंना कोणत्याच सुविधा व सवलती नव्हत्या. केवळ देशाभिमान व विजेतेपद मिळविण्यासाठी असलेली दांडगी इच्छाशक्ती याच्या जोरावर भारतीय हॉकीपटूंनी एकेकाळी साऱ्या जगात दरारा निर्माण केला होता. भारतीय संघास त्या वेळी अनेक संघ घाबरत असत. आता भारतीय संघाची फारशी कोणी दखल घेत नाही. परदेशी प्रशिक्षकांनी गेल्या वीस वर्षांमध्ये भारतीय हॉकी क्षेत्राचा दर्जा उंचावला आहे काय, हाच खरा प्रश्न पडतो. उच्च कामगिरी संचालक, फिजिओ, ट्रेनर आदी विविध जबाबदाऱ्या परदेशी व्यक्तींकडे दिल्या असल्या तरी भारतीय हॉकीचा दर्जा फारसा समाधानकारक नाही. एवढेच की जागतिक दर्जाच्या अनेक स्पर्धा आपल्याकडे आयोजित केल्या जाऊ लागल्या आहेत. आपले संघटक केवळ संयोजनात शूर आहेत.
भारतीय हॉकी क्षेत्र अंतर्गत कलहाने पोखरले गेले आहे. महाराष्ट्रातच राज्य स्तरावर चार ते पाच संघटना कार्यरत आहेत. आपण नेमके कोणत्या संघटनेचे सदस्यत्व घ्यायचे असा प्रश्न खेळाडूंना पडत असतो. हॉकीचा दर्जा खरोखरीच उंचवायचा असेल तर सर्वप्रथम
एक राज्य एक संघटना हे तत्त्व अमलात आणले पाहिजे. गोलरक्षक, ड्रॅगफ्लिकर आदी महत्त्वाच्या स्थानांकरिता केवळ एक-दोन खेळाडूंवर अवलंबून न राहता प्रत्येक स्थानासाठी तीन-चार सक्षम खेळाडूंचा पर्याय असला पाहिजे. गुणवान खेळांडूंचे तीन-चार संघ तयार केले की आपोआप ऑलिम्पिक व विश्वचषक यासारख्या प्रतिष्ठेच्या स्पर्धाकरिता एक सर्वोत्तम संघ तयार होऊ शकेल. तसे झाले तरच ऑलिम्पिक पदक मिळविण्याची आशा भारतीय संघास दिसू शकेल.
श्रीजेशकडून निराशाच !
गोलरक्षक हा नेहमीच संघाचा आधारस्तंभ असतो. भारतीय संघाचा उपकर्णधार पी. आर. श्रीजेश हा संघाचा महत्त्वाचा शिलेदार मानला जातो. त्याने जरी चांगले गोलरक्षण केले असले तरी त्याने जे गोल स्वीकारले, त्यापैकी काही गोल त्याला सहज अडविता आले असते. काही वेळा त्याच्या दोन पायांमधून चेंडू गोलात गेला तर काही वेळा चेंडू गोलात गेल्यानंतर त्याने सूर मारला. ऑलिम्पिकमध्ये अशा चुका त्याने टाळण्याची नितांत आवश्यकता आहे. आपल्याखेरीज संघाचे पान हालत नाही अशी त्याने वृत्ती ठेवली तर त्याला पर्याय आहेत हे संघव्यवस्थापनाने दाखवून दिले पाहिजे. एक दोन स्पर्धामध्ये त्याच्याऐवजी दुसऱ्या गोलरक्षकास संधी दिली तर निश्चितपणे श्रीजेशच्या कामगिरीत सुधारणा होईल.
प्रेक्षकांचा अल्प प्रतिसाद
ही स्पर्धा जागतिक स्तरावर असल्यामुळे ऑस्ट्रेलिया, बेल्जियम, इंग्लंड, पाकिस्तान व भारत आदी नामवंत संघांचा सहभाग होता. हे लक्षात घेता प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा होती मात्र अनेक सामन्यांचे वेळी प्रेक्षकांची गॅलरी फारशी भरलेली नव्हती. यजमान बेल्जियमच्या सामन्यांनाही प्रेक्षकांचा मर्यादितच प्रतिसाद मिळाला होता. हॉकीपासून प्रेक्षक दुरावत चालला आहे की काय अशी भीती निर्माण झाली आहे. हॉकी संघटकांनी याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे.
मिलिंद ढमढेरे response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 10, 2015 1:27 am

Web Title: rio olympic 2016 a reality check for india hockey
टॅग Hockey,Indian Hockey
Next Stories
1 मुलाखत : सशक्त मराठी सिनेमा करायचाय!
2 मान्सून डायरी : ‘नीरी’ आणि पुढे…
3 सुरण
Just Now!
X