30 May 2020

News Flash

निमित्त : चिंटू आणि मी

बॉलीवूडच्या ‘ए लिस्टर्स’ दाम्पत्यांपैकी एक सदाबहार दाम्पत्य म्हणजे एव्हरग्रीन ऋषी कपूर आणि त्यांची अभिनेत्री पत्नी नीतू सिंग-कपूर!

ऋषी कपूर आणि नीतू सिंग

नीतू सिंग – response.lokprabha@expressindia.com

३० एप्रिल २०२०! भारतीय सिनेसृष्टीतील एक अप्रतिम अभिनेते ऋषी कपूर काळाच्या पडद्याआड गेले! गेल्या दोन वर्षांपासून ते कर्करोगावर उपचार घेत होते, पण त्यांच्या गोलमटोल, लालबुंद, हसऱ्या चेहऱ्याची आभा टिकून असल्याने ते अचानक एक्झिट घेतील असं कोणालाही वाटलं नव्हतं. बॉलीवूडच्या ‘ए लिस्टर्स’ दाम्पत्यांपैकी एक सदाबहार दाम्पत्य म्हणजे एव्हरग्रीन ऋषी कपूर आणि त्यांची अभिनेत्री पत्नी नीतू सिंग-कपूर! काहीशा लहरी, तात्त्विक वाद घालत बसणाऱ्या स्टार साथीदाराची ४५ वर्षांपेक्षा अधिक काळ सावलीसारखी साथ देणाऱ्या नीतू कपूर आणि ऋषी कपूर यांचं वैवाहिक जीवन कसं होतं, चॉकलेट बॉय हे विशेषण लाभलेला आपला नवरा पती, पिता आणि अभिनेता म्हणून प्रत्यक्षात कसा होता, याचा नीतू कपूर यांनी केलेला हा उलगडा, त्यांच्याच शब्दांत. २०१९ च्या उत्तरार्धात पूजा सामंत यांनी घेतलेली ही नीतू कपूर यांची अप्रकाशित मुलाखत..

आमच्या लग्नाला ४० र्वष पूर्ण झाली आहेत. त्यापूर्वी किमान सहा-सात र्वष आम्ही १२ पेक्षा अधिक फिल्म्स एकत्र केल्या. माझे सासरे- (राज कपूर) यांनी १९७० मध्ये त्यांचा महत्त्वाकांक्षी चित्रपट ‘मेरा नाम जोकर’ रिलीज केला. दुर्दैवाने या चित्रपटाच्या निर्मितीत त्यांचं खूप आर्थिक नुकसान झालं; पण त्यांच्यातील सर्जनशील लेखक-निर्माता आणि मातब्बर दिग्दर्शक स्वस्थ बसेना. नुकसान भरून काढण्यासाठी जानेवारी १९७१ मध्ये त्यांनी किशोरवयीनांच्या प्रेमकथेवर आधारित चित्रपट काढण्याचा निर्धार केला. लेखक ख्वाजा अहमद अब्बास यांनी सांगितलेल्या कथेने ते भारावून गेले. ती कथा त्या काळाशी सुसंगत नव्हती. त्यांनी तिला राज कपूर टच दिला आणि तीन वर्षांनी म्हणजे १९७३ मध्ये ‘बॉबी’ रिलीज झाला. चिंटूने रुपेरी पडद्यावर नायक म्हणून पदार्पण केलं.

यामागचा किस्सा म्हणजे, राज कपूर षोडशवर्षीय नायिकेच्या शोधात आहेत हे कळल्यावर अनेकांनी  आर. के. फिल्म्समध्ये रांग लावली. डिम्पल कपाडियाची निवड झाली आणि चित्रीकरणही सुरू झालं. ते वर्ष होतं १९७२! मीदेखील स्क्रीन टेस्ट (हल्लीच्या भाषेत ऑडिशन) देण्यासाठी आई राजी सिंगबरोबर आर. के.मध्ये गेले, पण मला उशीर झाला होता! राज कपूर हळहळून म्हणाले, मी बॉबी सुरू केला आहे, नाही तर चिंटूची नायिका आणि बॉबी म्हणून तुला नक्कीच लाँच केलं असतं! माझी बालकलाकार म्हणून कारकीर्द राज कपूर यांना ठाऊक होती.

‘बॉबी’ हा अजरामर चित्रपट माझ्या हातून निसटला. मी स्वत: या सिनेमातली बॉबी होऊ शकले नाही, पण चिंटूच्या वास्तव जीवनातली नायिका होण्याचं भाग्य मला लाभलं, याचा आनंद कित्येक पटींनी अधिक आहे! रशिया, भारत आणि जगभर कपूर कुटुंबीयांचे अनेक चाहते आहेत. बॉलीवूड्स फर्स्ट फॅमिली’ असा जागतिक लौकिक असलेल्या कपूर कुटुंबातला चाìमग प्रिन्स असलेल्या चिंटूच्या आगे-पिछे अनेक मुली िपगा घालत. त्यात काही नामवंतदेखील होत्या. पण वाहे गुरूंनी आमची जोडी पक्की केली होती. नंतर आम्ही दोघांनी बरेच सिनेमे एकत्र केले. कभी-कभी, दुनिया मेरी जेब में, रफूचक्कर, खेल खेल में, जहरिला इन्सान, दुसरा आदमी, अमर अकबर अँथनी.. त्या काळात आमची प्रणयी जोडी गाजली. चिंटू आरंभीच्या काळात माझ्याबाबत फार गंभीर नव्हता! फिल्म सेट्सवर आणि नंतरही त्याची छेडछाड, मस्ती सुरूच असे. मी मात्र त्याला मनोमन वरलं होतं. त्याच्या त्या काळातील तथाकथित गर्लफ्रेंड्स आणि चिंटूच्या फ्लर्टिगचे अनेक किस्से इतरांप्रमाणे मीही ऐकत होतेच; पण तरीही मला मिसेस कपूर व्हायचं होतं.

गम्मत म्हणजे चिंटूला त्याच्या एका गर्लफ्रेंडने ठेंगा दाखवला होता, त्यामुळे चिंटूचा मूड ऑफ असे. त्याने माझा सल्ला मागितला, ‘कुछ ऐसा लेटर लिख नीतू मेरी गर्लफ्रेंड को, की वो दौडी चली आए मेरे पास!’ मी जड अंतकरणाने त्याच्या प्रेयसीसाठी चिठ्ठी लिहिली! पण चिंटू आणि त्याच्या मत्रिणीत सलोखा झाला नाहीच. आम्ही नेहमीप्रमाणे एकत्र काम करत राहिलो.

पुढे एकदा चित्रीकरणासाठी चिंटू परदेशात गेला आणि त्याने मला ट्रंककॉल करण्याचा सपाटा लावला. ‘नीतू, माझं इथं लक्ष लागत नाही! एक सिखणी बड्डी याद आ रही है!’ मी अनेक र्वष त्याच्याबरोबर चित्रीकरण करता करता मनाने त्याच्यात गुंतले होते, पण त्याने थेट लग्नाची मागणी कधी घातली नव्हती. त्यामुळे चिंटूने प्रेमाची अप्रत्यक्ष कबुली दिल्यावर मी हरखून गेले आणि सर्वप्रथम हे गोड गुपित यशजींना (यश चोप्रा) सांगितलं. इतर कुणाहीबरोबर फ्लर्टिग केलं, तरी सात फेरे तो तुझ्याबरोबरच घेईल, हे नक्की, असा दिलासा यशजींनी मला दिला आणि माझ्या मनावर मोरपीस फिरलं.

वयाच्या सहाव्या वर्षांपासून मी बालकलाकार होते. त्यामुळे चित्रपटांत काम करणं मला नकोसं झालं होतं. चिंटूवर जीव जडला होता. त्याच्याबरोबर संसार मांडावासा वाटत होता. पण ते स्वप्नच राहील की काय असं वाटत असतानाच चिंटूने प्रतिसाद दिला आणि पुढच्या टप्प्यावर पापाजींनी (राज कपूर) आमचं लग्न ठरवलं! सुरुवातीला दोन्ही कुटुंबांचा लग्नाला विरोध होता. माझी मॉम राजी सिंग माझ्याबरोबर असे. एकदा घाबरत चिंटूने मॉमला विचारलं, ‘क्या मैं आपकी बेटी नीतू को डेट पर ले जा सकता हूं?’ मॉमने नाइलाजाने होकार दिला; पण माझ्या चुलत भावालाही बरोबर पाठवलं.

बॉक्स ऑफिसवरची आमची हिट जोडी ऑफ स्क्रीनही हिट ठरेल अशी चर्चा होती. पुढे पापाजींनी फोनवर माझ्या मॉमकडे आमच्या लग्नाचा विषय काढला. मॉमचा होकार मिळाला. २२ एप्रिल १९७९ रोजी साखरपुडा झाला आणि २२ जानेवारी १९८० रोजी चेंबूरच्या गोल्फ कोर्समध्ये मोठय़ा थाटामाटात आमचं शुभमंगल झालं.

सौ. चिंटू म्हणजेच मिसेस ऋषी कपूर होण्याचं माझं स्वप्न पूर्णत्वाला गेलं. एक परीकथा वास्तवात आली होती. पापाजींनी आम्हाला हनिमूनला वर्ल्ड टूरला पाठवलं. बहुतेक देशांमध्ये आम्ही खुल्लम-खुल्ला प्यार करत फिरलो.. अधिकृतरीत्या! आणि हो, चिंटूने अलीकडेच लिहिलेल्या आत्मचरित्रपर पुस्तकाचं नावही ‘खुल्लम-खुल्ला’च ठेवलं.

होय.. असाच आहे चिंटू! बेफाम, बेधडक आणि बोलघेवडा! फिल्म्स, फूड, फॅमिली हे त्याचे जिव्हाळ्याचे मुद्दे! आणि हो, जवळपास रोजच त्याला मद्य हवं असतं. जगातली अर्धीअधिक लोकसंख्या मद्यपान करते, पण चिंटूचं वागणं न्यारं आहे. आपल्या आवडी-निवडींविषयी तो बेधडक बोलतो. हल्ली ट्वीट करतो. अशा थेट ट्वीट्समुळे त्याची प्रतिमा डागाळेल असं मी त्याला सुचवलं, विश्वासात घेऊन परावृत्त करण्याचा प्रयत्न केला, पण तो कुणाचं ऐकणारा नाहीच! त्याला योग्य वाटेल तेच तो करतो. दोन वर्षांपूवी अभिनेते विनोद खन्ना यांचं निधन झाले तेव्हा त्यांच्या अंत्यविधीला चिंटू गेला होता, पण तिथे अनेक जण अनुपस्थित असल्याचं पाहून चिंटूला वाईट वाटलं. त्याने नव्या पिढीच्या असहिष्णू, तटस्थ वृत्तीबद्दल ट्वीट केलं.

त्याला त्याच्या सहकारी कलाकारांबद्दल खूप आदर, आत्मीयता आहे. हे गुण हल्ली विरळ होत चालले आहेत. अनेक अप्रिय घटना आपल्यासमोर घडतात. जो-तो त्या िनदनीय घटनांचा मूक साक्षीदार होण्याची सोयीस्कर भूमिका घेतो. पण चिंटूने अशा अयोग्य गोष्टींचा समाचार त्याच्या खोचक ट्वीट्समधून नेहमीच घेतला आहे. जो प्रामाणिकपणा त्याच्या अभिनयात आहे तोच स्वभावातही आहे. त्याच्या तत्त्वांना मुरड घालण्याचा प्रयत्न मी कधीही केला नाही. कदाचित हेच आमच्या ४० वर्षांच्या सुखी संसाराचं रहस्य असावं.

आमच्या लग्नानंतर मी माझे अर्धवट राहिलेले चित्रपट पूर्ण केले आणि स्वेच्छेनं गृहिणी, पत्नी आणि आई अशा जबाबदाऱ्यांत गुंतले. चिंटूची कारकीर्द उत्तम बहरली ती आमच्या लग्नानंतरच! मी २१ वर्षांची होते, तर चिंटू २९ वर्षांचा. चिंटू जरी चॉकलेट बॉय, लव्हर बॉय इमेजमध्ये अधिक नावारूपाला आला असला, तरी त्याला लव्हर बॉय म्हणणं फारच अन्यायकारक ठरेल. माझ्या चिंटूला कपूर घराण्याचं तेजस्वी रूप मिळालं आहे. त्याच्या अभिनयात एक विलक्षण आत्मविश्वास आणि सच्चाई आहे, त्यामुळे तो लव्हर बॉय अधिक ‘रिलेटेबल’ वाटला. त्याने किमान ४५ नायिकांच्या पहिल्याच चित्रपटांत अभिनय केला. तरीही त्या प्रत्येकीशी त्याचं युगायुगांचं नातं आहे, असं वाटावं एवढा त्याचा अभिनय, रोमांस चपखल होता.

त्याने अलीकडच्या काळात ‘अग्निपथ’मध्ये नकारात्मक भूमिकाही विलक्षण ताकदीने रंगवली. ‘स्टुडण्ट ऑफ द इयर’मधली त्याची (समलिंगी प्राध्यापकाची) व्यक्तिरेखा मला फार मुश्कील वाटली. हबीब फैसल दिग्दर्शित ‘दो दुनी चार’ या चित्रपटात आम्ही एकत्र काम केलं, त्यालाही आता १० र्वष झाली. अनेक वर्षांनंतर अभिनयाला वाव देणारी भूमिका करण्याची संधी दिल्याबद्दल आम्ही हबीबचे आभारी आहोत. या चित्रपटात पती-पत्नी म्हणून एकत्र काम केल्याच्या अनेक आठवणी आहेत. तो माझा ठेवा आहे.

चिंटूने त्याच्या दोन्ही मुलांवर मनापासून प्रेम केलं. रिद्धिमा आणि रणबीर! रिद्धिमाला अभिनयात स्वारस्य नव्हतं. पण रणबीर मात्र लहानपणापासून अभिनेता होण्याची महत्त्वाकांक्षा बाळगून होता. ऋषीने आपण त्याला कधीही लाँच करणार नाही हे सांगितलं होतंच, शिवाय त्याने अभ्यासावर लक्ष केंद्रित करावं, अशा कानपिचक्याही दिल्या होत्या. कपूरांना शिक्षणात गती नाही हे तो जाणून होता. पण रणबीरने नूयॉर्कला जाऊन अभिनय आणि दिग्दर्शनाचा अभ्यासक्रम पूर्ण केला आणि मुंबईत येऊन संजय भन्साली यांचा सहायक दिग्दर्शक झाला. पुढे त्याला भन्सालींनीच ‘सावरिया’ या चित्रपटातून लाँच केलं. तरीही चिंटूने रणबीरचं भरभरून कौतुक केलं नाहीच! आपल्या पित्याबद्दल एक सूक्ष्मशी अढी रणबीरच्या मनात निर्माण झाली होती. ‘संजू’ या बायोपिकनंतर बाप-बेटय़ाचं मनोमीलन झालं. या चित्रपटाच्या प्रीव्ह्य़ूसाठी राजकुमार हिरानी यांनी चिंटू आणि मला आमंत्रित केलं होतं. अंधारात चिंटूचे डोळे अश्रूंनी डबडबले होते. ‘रणबीर एक परिपूर्ण अभिनेता झालाय, पिता म्हणून माझ्यासाठी हा अभिमानाचा एक सर्वोच्च िबदू आहे,’ असं चिंटू माझ्या कानात कुजबुजला. गहिवरलेल्या चिंटूने माझ्या खांद्यावर हलकेच डोकं ठेवलं. त्या दिवशी चिंटू आणि रणबीरने एकमेकांना कडकडून आिलगन दिलं. मनसोक्त बोलले, रडले. माझ्याही मनावरचं ओझं उतरलं.

चिंटूने जगाची पर्वा कधीही केली नाही. कर्करोगाचा सामना करतानाही तो राजासारखा जगला, वागला. त्याची पत्नी आणि प्रिय सहकलाकार म्हणून मी समाधानी, तृप्त आहे. एका जन्मात त्याच्या साथीने मी अनेक जन्म जगले. उच्च अभिरुची असलेल्या चिंटूने कायमच रसिकांचं प्रेम मिळवलं आहे. रणबीरने त्याच्या आयुष्यात विवाह करून स्थिरस्थावर व्हावं असं त्याला नेहमी वाटतं. एका वत्सल पित्याची ही इच्छा रणबीर फलद्रूप करेलच! चिंटूच्या सहवासातील आठवणी हे माझ्या आयुष्याचं संचित आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 8, 2020 12:56 am

Web Title: rishi kapoor and nitu singh nimitta dd70
Next Stories
1 पावसाळ्यानंतरच परत येणार!
2 महाराष्ट्राच्या कोंडीचा प्रयत्न!
3 निमित्त : राजकारण ‘आयएफएससी’चं!
Just Now!
X