भारतीय जनता पार्टीचे नेते व नवनिर्वाचित केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती मृत्यूमुळे रस्त्यावरील वाहतूक आणि त्यातली असुरक्षितता हा मुद्दा पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवणं, बेपर्वाईने वाहन चालवणं, सार्वजनिक ठिकाणी इतरांच्या सुरक्षेचा विचार न करणं ही सगळी आपल्याकडच्या वाहनचालकांची व्यवच्छेदक लक्षणं झाली आहेत. रस्ते अपघात कमी होण्यासाठी सरकारनं काय काय केलं आणि काय काय होण्याची आवश्यकता आहे, याबाबत वाहतुकीच्या क्षेत्रातले अधिकारी काय सांगतात?

भारतीय जनता पार्टीचे नेते व नवनिर्वाचित केंद्रीय ग्रामविकासमंत्री गोपीनाथ मुंडे यांचे अपघाती निधन झाले आणि भारतातील अपघातांचा विषय पुन्हा एकदा चर्चेला आला. आतापर्यंत रस्ते अपघातात मरण पावणारे मुंडे हे चौथे राजकीय नेते आहेत. या निमित्ताने का होईना पुन्हा एकदा या जागतिक पातळीवरील विषयाकडे लक्ष वेधले गेले आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने हा धोका ओळखून २०१० मध्येच २०११ ते २०२० हे रस्ता सुरक्षेसाठी ठोस कृती करण्याचे दशक म्हणून घोषित केले आहे. (आपल्याकडे त्या दिशेने अद्यापही ठोस कृती झालेली नाही, ही बाब अलाहिदा.) तरीही मुंडे यांच्यासारख्या एका कर्तबगार राजकीय नेत्याला अपघातात जीव गमवावा लागला आहे. त्यानंतरही आपण सुधारणार आहोत का, हा प्रश्न कायम राहणार आहेत. आम्ही फक्त आमची अपघातातील मृतांची आकडेवारी गेल्या वर्षीपेक्षा कशी कमी झाली यातच कायम धन्यता मानत आलो आहोत. आम्ही रस्ते सुरक्षा सप्ताह-पंधरवडे पाळतो, परंतु सुरक्षेचे नियम मात्र पाळत नाही, अशी परिस्थिती आहे.
मुंडे यांच्या गाडीला झालेला अपघात हा तसा साधा होता. अशा अपघातांमध्ये व्यक्तीचा मृत्यू क्वचितच होतो, परंतु त्याबाबत मुंडे दुर्दैवी ठरले. मुंडे यांचे चालक आणि स्वीय सहायक यांना खरचटलेही नाही आणि मुंडे यांना जीव गमवावा लागला. मुंडे यांच्या गाडीला ठोकर देणाऱ्याने रस्ते नियमांची पायमल्ली केली होती, हे खरेच आहे. परंतु मुंडे यांनीही एक साधासुधा रस्ते सुरक्षेचा नियम पाळला असता तर आज कदाचित ते जिवंत असते. कदाचित असे म्हणणे सोपे असते. परंतु जे. पी. रिसर्च या एका नामांकित संस्थेने केलेले संशोधन, महामार्ग वा रस्ते अपघातात मरण पावलेले अनेकजण हे केवळ सीट बेल्ट वापरला असता तरी वाचू शकले असते, असे निदान करते. अशा वेळी ही क्षुल्लक सुरक्षेची बाब मुंडे यांना जीवनदान देऊन गेली असती. नियम पाळला नाही म्हणून वाहतूक पोलीस चलन फाडण्यात धन्यता मानतात. मात्र संबंधित चालकाने नियम मोडल्याची कुठलीही नोंद कुठेही होत नसल्यामुळे तोच नियमभंग पुन:पुन्हा केला जातो आणि त्यातूनच चालकांचा बेदरकारपणा वाढत चालला आहे, असे म्हटले तर वावगे ठरू नये.
वाहतूक क्षेत्रातील तज्ज्ञांनुसार, केवळ गाडीचालक आणि त्याच्या शेजारी बसणाऱ्या नव्हे तर गाडीतील प्रत्येक प्रवाशाने सीट बेल्ट लावणे आवश्यक आहे. त्यामुळे गाडीला अपघात झाला तर तुम्ही जोरदार धक्क्याने वाचू शकता. सध्या बाजारात आलेल्या आणि असलेल्या गाडय़ांमध्ये प्रत्येक सीटला बेल्ट देण्यात आला आहे. परंतु तो वापरतो कोण? मुंडे यांनी सीट बेल्ट घातला असता तर ते समोरच्या सीटवर धडकले नसते आणि त्यांच्या मणक्याला तसेच यकृताला इजा होऊ शकली नसती. हे सर्व जर-तर असले तरी आजही सीट बेल्ट बांधणे हे गाडी चालविणाऱ्या आणि त्यातून प्रवास करणाऱ्या अनेकांना कमीपणाचे लक्षण वाटते. वाहतूक पोलिसाकडे दंड भरण्याची त्यांची तयारी असते, परंतु स्वत:च्या सुरक्षेसाठी आवश्यक असलेला नियम पाळण्यात त्यांना रस नसतो. टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेते आनंद अभ्यंकर यांच्या गाडीला जेव्हा अपघात झाला तेव्हा त्यांनीही सीट बेल्ट घातलेला नव्हता. कदाचित सीट बेल्ट असता तर ते त्यातून वाचू शकले असते, असे मत महामार्ग पोलीस विभागाच्या माजी अधीक्षक डॉ. रश्मी करंदीकर यांनी व्यक्त केले आहे. सीट बेल्ट वापरणे हा वरकरणी क्षुल्लक वाटणारा सुरक्षेचा नियम हा जीव वाचण्यासाठी खूपच आवश्यक असल्याचेही त्या सांगतात. महामार्ग पोलीस विभागाच्या मुख्यालय अधीक्षक म्हणून रस्ता सुरक्षेबाबत त्यांना अनेक उपक्रम राबविता आले. अनेक खासगी संस्थांनी सर्वेक्षण करून दिलेल्या अहवालातूनही हीच बाब प्रामुख्याने समोर आली आहे. जे. पी. रिसर्च या संस्थेने केलेल्या संशोधनातूनही, मुंबई-पुणे महामार्गावर झालेल्या विविध अपघातांमध्ये जसे वेगाची नशा हे एक प्रमुख कारण असले तरी सीट बेल्ट न वापरणे हेही अपघातानंतर मरणाला आमंत्रण देण्यासारखे ठरले आहे.

After the Kanker encounter in Chhattisgarh the police claim that the Naxalites supply system has been hit
नक्षलवाद्यांच्या पुरवठा यंत्रणेला धक्का; छत्तीसगडमधील कांकेर चकमकीनंतर पोलिसांचा दावा 
Nagpur became the center point of mahayuti 15 leaders met
नागपूर ठरले महायुतीचे केंद्रबिंदू, १५ नेत्यांनी घेतली भेट
Congress election manifesto published Caste wise census
जातनिहाय जनगणना, आरक्षण मर्यादावाढ; काँग्रेसच्या जाहीरनाम्याच्या केंद्रस्थानी उपेक्षित, महिला 
Why did Nitin Gadkari say that blockade the forest officials in Gadchiroli
“वनविभाग ‘झारीतील शुक्राचार्य’; त्यांच्या अधिकाऱ्यांना घेराव घाला”, नितीन गडकरी गडचिरोलीत असे का म्हणाले…

अपघातांसाठी चालकच जबाबदार…
महामार्ग वा रस्त्यांवर होणाऱ्या अपघातांची जबाबदारी ही शेवटी चालकाचीच असते. चालकच चुका करतात आणि अपघात होतात. मग तो चालक दुसऱ्या गाडीचा असो वा कुणीही. तांत्रिक बिघाडामुळे अपघात होण्याचे प्रमाण खूपच कमी आहे. आपल्याकडे कोणीही उठतो आणि चालक होतो. महामार्गावर गाडी चालविण्याचे विशेष प्रशिक्षण देण्याची आवश्यकता आहे, परंतु फारच थोडय़ा कंपन्या अशा प्रकारचे प्रशिक्षण देतात. ९० टक्के चालक हे प्रशिक्षणाविनाच गाडी महामार्गावर आणतात आणि मृत्यूच्या सापळ्यात अडकतात. आपण राज्य महामार्ग पोलीस विभागाचे महासंचालक असताना या चालकांनाच प्रशिक्षण मिळाले पाहिजे यावर जोर दिला. याशिवाय महामार्गावरील धोक्याची वळणे, ठिकाणे, गाडी चालविताना येणाऱ्या अडचणी आदींचा बारकाईने अभ्यास करावयास सांगून त्यात बदल करण्याचा प्रयत्न केला. महामार्गावरही अतिवेगात गाडी चालविणाऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाई सुरू केली. दंडापेक्षाही वेगाची नशा कमी व्हावी, हा हेतू होता. मद्यपी चालकांविरुद्ध कारवाई यालाही महत्त्व दिले. त्याचा परिणाम म्हणजे राज्यातील महामार्गावरील अपघातांच्या संख्येत घट झाली 
– विजय कांबळे, माजी अतिरिक्त महासंचालक, महामार्ग पोलीस (आता ठाणे पोलीस आयुक्त)

हेल्मेटबाबतही तेच आहे. महामार्गावरच फक्त हेल्मेट बंधनकारक करावे. शहरातील रस्त्यांवर हेल्मेटची सक्ती नको, असाही एक सूर आहे. परंतु अपघात हे काय फक्त महामार्गावरच होतात. शहरातल्या रस्त्यांवरही हेल्मेट नसल्यामुळे अनेकांचे बळी गेले आहेत. तरीही कोणीही सुधारायला तयार नाही. वाहतूक पोलिसांनीही केवळ दंड आकारण्यापेक्षा परवाने निलंबित करण्यासारखी कारवाई केली तरच हेल्मेट सक्तीचे होऊन अपघात टळतील, असे मत व्यक्त केले जात आहे.
राज्यात १८ राष्ट्रीय, २९१ राज्य असे सुमारे ३३ हजार ७०० किलोमीटरचे महामार्ग आहेत. महाराष्ट्राचा विचार करावयाचा झाला तर या महामार्गावर गेल्या वर्षी म्हणजे २०१३ मध्ये ६१ हजार ८९० अपघात झाले. (२०१२ मध्ये ही संख्या ६६ हजार ३१६ होती.) यामध्ये १२ हजार १९४ व्यक्तींचा मृत्यू झाला. २२ हजार ७८३ जण गंभीररीत्या जखमी झाले तर १८ हजार ३२३ व्यक्तींना किरकोळ दुखापती झाल्या. २६ हजार ५३० अपघातांमध्ये कोणालाही दुखापत झाली नाही. राज्यात गेल्या वर्षांत अपघातात ठार झालेल्यांचा विचार केला तर प्रत्येक दिवशी किमान चार लोक अपघातात मरण पावल्याचे आढळते. देशभरात ही संख्या प्रत्येक दिवशी चारशे ते पाचशे इतकी आहे. (२०१२ मध्ये ही संख्या ४६१ इतकी नोंदली गेली होती.) याचा अर्थ प्रत्येक दोन ते तीन मिनिटाला एका व्यक्तीचा मृत्यू रस्ते अपघातात होतो. लोकसंख्येच्या बाबतीत आपल्याप्रमाणेच आघाडीवर असलेल्या चीनने गेल्या काही वर्षांत रस्ते अपघातातील बळींची संख्या रोखण्यात यश मिळविले आहे. मात्र आपल्याकडील परिस्थिती फारच चिंताजनक आहे. आजही तब्बल दोन ते अडीच लाख व्यक्ती दरवर्षी अपघातात मरण पावत आहेत. (मालदीवची लोकसंख्या इतकीच आहे) जागतिक आरोग्य संघटनेने आपल्या अहवालात जगभरातील अपघातातील मृत्यूची सरासरी दिली आहे. एक लाख व्यक्तींमागे १८ व्यक्ती अपघातात मरण पावतात. भारताचे प्रमाण त्यानुसार कमी म्हणजे १८.९ टक्के आहे, ही ती समाधानाची बाब. अपघातातील मृत्यूंचे सर्वाधिक प्रमाण आफ्रिकेत (२४.१) आणि कमी प्रमाण युरोपमध्ये (१०.३) आहे. भारतापेक्षाही अधिक प्रमाण राखणारे देश आहेत. त्यामध्ये थायलंड, ओमान, मलेशिया, इराण, इराक, नायजेरिया, व्हेनेझुएला, सौदी आदींचा क्रमांक लागतो. मात्र भारताच्या शेजारील देशांत हे प्रमाण भारतापेक्षा बऱ्यापैकी कमी आहे, याचा तरी विचार व्हायला हवा. बांगलादेश (११.६), मॉरिशस (१२.२), भूतान (१३.२), श्रीलंका (१३.७), म्यानमार (१५), नेपाळ (१६) आणि पाकिस्तान (१७.४). या देशांतील लोकसंख्या आणि आपली लोकसंख्या ही तुलना होऊ शकत नाही, ही बाब नजरेआड करता येणार नाही.

आपल्याकडे चालक या ‘स्किल्ड’ कामगाराला विचारातच घेतले जात नाही. परदेशात चालकाच्या कामाचे तास ठरलेले असतात. त्यावर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा गाडीमध्येच असते. 
– डॉ. रश्मी करंदीकर, माजी अधीक्षक, महामार्ग पोलीस

फक्त २८ देश (४१ कोटी लोकसंख्या) वाहतुकीच्या नियमनांचे काटेकोर पालन करतात. भारतात तर आर्थिक आणि सामाजिक प्रगतीपेक्षाही वाहनांची लोकसंख्या अधिक आहे. परंतु त्या तुलनेत वाहतुकीच्या नियमांचे पालन केले जात नाही. अगदी उच्चशिक्षित व्यक्तीही वाहतुकीच्या नियमांचे सर्रास उल्लंघन करतात आणि अपघाताला आयते आमंत्रण देतात.
महामार्गावर झालेल्या एकूण अपघातापैकी ७५ टक्के अपघात हे मानवी चुकीमुळेच झाल्याचे निष्पन्न झाले आहे. काही प्रवासी वाहनांना झालेल्या अपघातामागेही चालकावर असलेला अतिताण हेच कारण पुढे आले आहे. चालकाला अजिबात विश्रांती न मिळणे हे अनेक अपघातांमधील एक प्रमुख कारण आहे. काही वेळा चालकालाही आपल्याबद्दल फुका आत्मविश्वास असतो. मी सलग २० तास गाडी चालविली हे तो मोठय़ा अभिमानाने सांगत असतो वा मालकालाही आपला चालक न थकता कितीही तास गाडी चालवितो, असे सांगण्यात मोठेपणा वाटत असतो. मात्र त्यातूनच अपघाताला आमंत्रण मिळते. डॉ. करंदीकर यांच्या मते, आपल्याकडे चालक या ‘स्किल्ड’ कामगाराला विचारातच घेतले जात नाही. परदेशाचा विचार केला तर तेथे चालकाच्या कामाचे तास ठरलेले असतात. किंबहुना तेथे गाडय़ांमध्येच तशी सोय असते. त्याला एक कार्ड दिलेले असते. त्यात त्याच्या कामाची सुरुवात आणि शेवट ही वेळ नोंदलेली असते. त्यामुळे तो जेव्हा गाडी चालविण्यास सुरुवात करतो तेव्हा त्याला ते कार्ड स्वाइप करावे लागते आणि त्याची कामाची वेळ संपते तेव्हा गाडी आपोआप बंद होते. त्यामुळे अशा चालकावर ताण राहत नाही आणि अपघात टळतात.

महामार्गावर रस्ता सुरक्षेच्या नियमांचे नीट पालन केले गेले तर अपघात टळू शकतात. आमच्या पोलिसांकडून कोटय़वधी रुपयांचा दंड वसूल केला जातो. तरीही दररोज दंड भरावा लागला तरी चालेल मग वेगाची मर्यादा पाळली जात नाही. ओव्हरटेकिंग, लेन कटिंगही वाट्टेल तसे केले जाते. याबाबत आम्ही वेळोवेळी जागरूकता अभियान राबविण्याचे ठरविले आहे. अवजड वाहनांनी डाव्या बाजूनेच जावे, असेही बंधनकारक करण्यात आले आहे. याबाबतही जागरूकता अभियान राबविण्यात आले असून या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे. त्यामुळेही अपघात टळू शकतात. मात्र आजही काही महामार्गावर या नियमांचे पालन केले जात नाही, याची आम्हाला कल्पना आहे. अपुऱ्या मनुष्यबळामुळे अशा वाहनांवर कारवाई करण्यात अडचणी येतात. बऱ्याच वेळा बांधकामासाठी लागणाऱ्या सळया घेऊन जाणाऱ्या ट्रकमुळेही अपघात झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे अशा वाहनांवरही र्निबध आणण्यात आले आहेत. सळया लोंबकळत असता कामा नये, असे त्यांना बजावण्यात आले आहे. महामार्गावर होणारे अपघात कमी करण्यासाठी आम्ही सुरक्षा अभियानही राबवीत आहोत. लोकांकडूनही सहकार्याची अपेक्षा आहे. आमचे पोलीस चिरीमिरी घेत असल्याचा आरोप होतो. परंतु आपल्याच लोकांमध्ये नियम पाळण्याची शिस्त नाही. हीच मंडळी परदेशांत गेली की, तेथील नियम बरोबर पाळतात. भारतात आल्यानंतर लगाम नसलेल्या घोडय़ासारखे वागत असतात. हे जेव्हा बदलेल तेव्हाच अपघातांना आळा बसेल. 
– सुरेंद्र पाण्डेय, विद्यमान अतिरिक्त महासंचालक, महामार्ग पोलीस.

आपल्याकडे मात्र उलट पद्धत आहे. इन्सेन्टिव्ह मिळविण्यापोटी सलग १६ तासही गाडी चालविणारे असतात आणि अतिताणामुळे ते अपघातांना आयते आमंत्रण देत असतात. विजय कांबळे हे महामार्ग विभागाचे अतिरिक्त महासंचालक असताना आपल्याकडे व्हॉल्वो या गाडीत अशा पद्धतीचा अंतर्भाव करण्याची सूचना त्यांनी केली होती. परंतु फायद्याचे गणित चुकत असल्यामुळे अनेक मोठे वाहतूकदारही त्याकडे गांभीर्याने पाहत नसल्याची बाब वेळोवेळी उघड झाली आहे. आपल्याकडे खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या चालकांवर असलेला ताण लक्षात घेता त्या तुलनेत अपघात होत नाहीत, हे सुदैव म्हणायला हवे. आपल्याकडे सर्वाधिक असंघटित वर्ग हा या चालकांचा आहे. त्यांना वेतनही निश्चित मिळत नाही. शिवाय नोकरीचीही शाश्वती नसते. दूध-भाज्या आदींसारख्या जीवनाश्यक वस्तू वेळेत पोहोचविण्यासाठी त्यांनी इन्सेन्टिव्हचे आमिष दाखविले जाते. मग काय यापोटी पहाटेच्या वेळी मोकळ्या रस्त्यांवर कशीही गाडी हाणायची आणि अपघाताला निमंत्रण देण्याचे प्रकार घडत असतात, याकडेही एका अधिकाऱ्याने लक्ष वेधले.
आपल्या वाहतूक मंत्रालयाकडे चालकांचा तपशीलही आढळत नाही. किंबहुना चालक हा वर्गच दुय्यम असल्याचे गणले जाते. याबाबत विजय कांबळे यांनी वाहतूक विभागाला पत्र लिहून अशा चालकांसाठी खास प्रशिक्षण देण्याची तयारी दाखविली होती. परंतु त्यात कोणीही रस घेतला नाही. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचा या संदर्भात एक स्वतंत्र अभ्यासक्रम आहे. काही कंपन्यांनीही असे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे, परंतु तेवढी जागरूकता वाहतूकदार वा त्यांच्या चालकांमध्ये नसल्याचे आढळून येते. संबंधित मंत्रालयही कधी त्यासाठी पुढाकार घेत नाही. एखादा अपघात झाला की, घोषणा करण्यापुरतेच ते मर्यादित राहते. चालकांचा आर्थिक स्तर सुधारण्याची आवश्यकता आहे. त्यालाही आपल्या जिवाची काळजी असते, परंतु अशा काही बाबी असतात की, तो त्या यंत्रणेचे बळी पडत असतो. आठ तासांच्या वर गाडी चालवू न देणे, असा नियमच केला पाहिजे.
तात्काळ वैद्यकीय मदत न मिळणे, हेदेखील अपघातांमधील मृत्यू वाढण्याचे आणखी एक कारण सांगितले जात आहे. २००९ मध्ये अरूप पटनाईक हे महामार्ग पोलीस विभागाचे अतिरिक्त महासंचालक असताना, केंद्र सरकारच्या तात्काळ वैद्यकीय मदत योजनेंतर्गत १०८ क्रमांकावरील रुग्णवाहिका सेवा लागू करण्याची मागणी त्यांनी केली होती. ती आता कुठे अंशत: पूर्ण झाली आहे. अपघात झाल्यानंतरची २० मिनिटे महत्त्वाची असतात. या काळात तात्काळ वैद्यकीय मदत मिळाली तर गंभीर रुग्णाचाही जीव वाचू शकतो. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे डोक्याला दुखापत झालेली असतानाही त्यावर उपचार करण्यासाठी ग्रामीण रुग्णालयात न्यूरो सर्जनची अनुपलब्धता. बऱ्याच वेळा ग्रामीण रुग्णालयात न्यूरो सर्जनच नसतो. असलाच तर तो व्हिजिटिंग असतो. त्यामुळे तो येईपर्यंत रुग्ण अत्यंत गंभीर झालेला असतो.

अपघाताची कारणे…
अ) मानवी चुका 
१. अतिवेगाची नशा.
२. धोकादायक ओव्हरटेकिंग/लेन कटिंग.
३. मद्यपान करून गाडी चालविणे.
४. गाडीत अनेक प्रवासी कोंबणे वा क्षमतेपेक्षा अधिक वजन वाहून नेणे.
५. गाडी चालविण्याचे नीट प्रशिक्षण न घेणे वा वाहतूक नियमांचे अपुरे ज्ञान.
६. चालकांवरील अतिताण, थकवा.
७. कुठेही गाडी उभी करणे.
८. हेल्मेट, सीट बेल्ट न वापरणे.
ब) हवामान 
१. धुके किंवा मुसळधार पाऊस
२. प्रचंड उष्णता निर्माण झाल्याने टायर फुटणे.
क) इतर
१. जनावर रस्त्यात आडवे येणे.
२. पादचाऱ्यांची चूक.
३. दरड कोसळणे.
४. वाहतुकीची कोंडी.
ड) अंमलबजावणी
१. वाहतूक पोलिसांची कमतरता असल्यामुळे महत्त्वाच्या ठिकाणी पर्यवेक्षण न होणे तसेच मोटर वाहन कायद्यानुसार कारवाई न होणे.
हे करा –
१. लेनची शिस्त नेहमी पाळा.
२. आखून दिलेली वेगमर्यादा पाळा. 
३. महामार्गावर मदतीसाठी उभ्या असलेल्या वाहनाची मदत करा.
४. नेहमी सीट बेल्ट वापरा. त्यात कमीपणा मानू नका.
५. गाडी चालविताना नेहमी सतर्क राहा.
६. रात्रीच्या वेळी गाडी चालविताना पुढील व मागील दिवे, पार्किंग लाइट सुरू आहेत का याची तपासणी करा.
७. वाहतूक नियम पाळा.
हे करू नका – 
१. मद्यपान करून गाडी चालवू नका.
२. धोकादायक पद्धतीने ओव्हरटेक करू नका. 
३. कुठेही गाडी उभी करू नका.
४. गाडीच्या क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी भरू नका.

वेगावर नियंत्रण, धोकादायक ओव्हरटेकिंग टाळणे, सुरक्षा नियमांची नीट अंमलबजावणी ही त्रिसूत्री राबविली तरी महामार्गावर अपघात टळू शकतात. परंतु चालक नावाच्या जमातीत ही संवेदनक्षमताच नसल्यामुळे अपघात घडतात. संवेदनक्षम चालक घडवायचे असतील तर १४ ते २५ वर्षे वयोगटातील तरुण-तरुणींवर ते बिंबवले पाहिजे. त्यामुळेच महामार्ग पोलिसांनी शाळा, महाविद्यालये ही लक्ष्य ठेवली होती. यातील प्रत्येक तरुण-तरुणीला वाहतूक नियमांविषयी सतर्क करायचे आणि त्यांना अपघातांपासून परावृत्त करण्याचे ठरविण्यात आले. महामार्ग पोलिसांनी रस्ते सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने फक्त कार्यक्रम न राबविता वर्षभर राज्य पातळीवर वेगवेगळ्या पद्धतीने या तरुण-तरुणींना उद्युक्त केले. याचा परिणाम असा झाला की, शाळेत निघालेली मुलगी जेव्हा बाबांबरोबर मोटरसायकलवर बसायला लागली, तेव्हाच ती त्यांना हेल्मेटची आठवण करून द्ययला लागली. तिच्याकडून भविष्यात वाहतूक नियमांचे उल्लंघन होण्याची सुतराम शक्यता नाही. अपघात खरोखरच टाळायचे असतील तर याला पर्याय नाही, असे डॉ. करंदीकर सांगतात.

ओव्हरटेक करताना…
* डाव्या बाजूने ओव्हरटेक करणे टाळा. 
* काही गाडी चालक त्यांच्या गाडीचा उजवीकडील ब्लिंकर अनवधानाने सुरू ठेवतात की, जेणेकरून तुम्हाला ओव्हरटेक करणे सोपे आहे असे वाटावे; परंतु त्यावर विश्वास ठेवणे हे अपघाताला आमंत्रण असते. तुम्ही स्वत:च ओव्हरटेकबाबतचा निर्णय घेतला पाहिजे.
* एका वेळी एकपेक्षा अधिक वाहनांना ओव्हरटेक करू नका. त्यामुळे तुम्हाला तुमच्या लेनमध्ये पुन्हा येणे शक्य होत नाही.
* ओव्हरटेक करताना तुमच्या उजवीकडील आरशात पाहणे आवश्यक आहे. बऱ्याच वेळा आणखी एक गाडी तुम्हाला ओव्हरटेक करू इच्छित असेल.
* आत्मविश्वास नसेल तर ओव्हरटेक करू नका.
* आपल्या पुढे ओव्हरटेक करीत असलेल्या वाहनासोबत समांतर ओव्हरटेक करू नका. अपघाताचे हे एक कारण आहे.
* पुढील वाहनापासून सुरक्षित अंतर ठेवा.
* वेग नियंत्रणात ठेवा. अधिक वेग म्हणजे गाडी तात्काळ थांबविण्यासाठी अधिक काळजी व परिश्रम आवश्यक 
* अवजड वाहनांच्या मागे राहून गाडी चालवू नका. ट्रकसारख्या वाहनांना मागचे दिसत नसते. त्यामुळे तुमची गाडी मागे आहे याची त्याला माहिती होत नाही आणि त्यामुळे तो सुरक्षेची काळजी घेईल अशी अपेक्षा नसते.
* महामार्गावर गाडी चालविताना तिची तांत्रिक स्थिती दर्जेदार हवी. ब्रेक्स हे महत्त्वाचे असून कधी अचानक गाडी थांबवावी लागेल, याचा नेम नसतो.
* आपल्यावर वेगाची मर्यादा घाला. 
* जी गाडी हाताळलेली नाही, त्याची नीट माहिती करून घ्या आणि मगच चालवा.
* गाडीच्या वैशिष्टय़ांविषयी माहिती करून घ्या. उदा. गाडीचा वेग वाढण्याची मर्यादा, तिची रस्ता धरून राहण्याची क्षमता, स्टिअरिंगची संवेदनक्षमता, ब्रेक्सची स्थिती आदी.
* महामार्गावर गाडी चालविताना गाण्यांचा आवाज कमी ठेवा. 
* १०० टक्के एकाग्रता आणि वचनबद्धता राखूनच गाडी चालवा. झोप येत असेल तर स्टिअरिंग हातात घेऊ नका.

देशांत अपघातांमध्ये महाराष्ट्रापेक्षाही उत्तर प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, राजस्थान, मध्य प्रदेश आघाडीवर आहेत. त्यातल्या त्यात महाराष्ट्रात थोडी तरी शिस्त आहे. परंतु उर्वरित राज्यात सुरक्षा नियमांची सर्रास पायमल्ली होताना दिसते. नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोची आकडेवारी पाहिली तर फारच भयानक स्थिती असल्याचे जाणवते. ‘अपघातमुक्त भारत’ अशी मोहीम राबविण्याची वेळ येऊन ठेपली आहे.
शेवटी काय, अपघात हा अपघात असतो. तो अपघातानेच होतो, असे म्हणण्याची प्रथा आहे. त्यामुळे अपघात झाल्यानंतर एखाद्याचा मृत्यू झाला तरी तो ज्या गाडी चालकामुळे झाला त्याला जामीन मिळतो. मृताच्या कुटुंबीयांचे न भरून येणारे नुकसान झालेले असते. तरीही त्यास जो जबाबदार असतो तो सहिसलामत बाहेर पडलेला असतो. अशा वेळी वाहतूक नियमांचे उल्लंघन आणि मानवी चुकीमुळे झालेला अपघात याबाबतच्या कायद्यात फेरविचार करण्याची आवश्यकता आहे. मद्यधुंद होऊन गाडी चालविणाऱ्या अभिनेता सलमान खानने एकाला चिरडल्यानंतरही तो तुरुंगात जाऊ नये, यासारखे दुर्दैव नाही. कदाचित त्यामुळेच बेदरकार चालकांचे फावते आहे. कुठे तरी याचा विचार व्हायला हवा. मानवी चुकांमुळे होणारे अपघात टाळायलाच हवेत. महामार्ग हे त्यामुळेच मृत्यूचे सापळे बनले आहेत.