‘गांधी’ या सिनेमातली ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांची कस्तुरबा गाजली. सिनेमा, मालिका, नाटकं या तिन्ही क्षेत्रांत त्यांनी अभिनयाची छाप पाडली. सिनेमांचे वैविध्यपूर्ण प्रयोग, मालिकांचं चित्रं, नाटकांची सद्य:स्थिती यावर त्यांच्याशी केलेली बातचीत.

मनोरंजनसृष्टीत इतकी र्वष वैविध्यपूर्ण काम केल्यानंतर या संपूर्ण प्रवासाकडे बघून नेमक्या काय भावना मनात येतात.
– इतकी र्वष काम करतेय आणि पुढे अजूनही करायची इच्छा आहे. निश्चितच खूप समाधान आहे. या क्षेत्रात काम करताना मीही संघर्ष केला आहे. पण, मला तो त्रासदायक कधीच वाटला नाही. मला स्टार व्हायचंय, स्टारडम मिळवायचंय, अशा अपेक्षा ठेवून मी या क्षेत्रात आले नव्हते. मी फक्त अभिनय करायला आले होते; म्हणूनच कदाचित मला त्या संघर्षांचा त्रास झाला नसावा. सिनेमांमध्ये काम मिळालं नाही की थिएटर किंवा टीव्हीमध्ये काम करतात अशी त्या वेळी एक समजूत होती. मला मात्र असं कधीच वाटलं नाही. मी एनएसडीची विद्यार्थिनी. रंगभूमीची शिस्त, नियोजन याचं प्रशिक्षण मी घेतलं होतं. मी नाटक करतच होते. एनएसडीमधून १९७४-७५ साली आले. तिथून आल्यानंतर काही वर्षांनी मला ‘गांधी’ हा सिनेमा मिळाला. त्याच दरम्यान माझं ‘चांगुणा’ हे नाटक सुरू होतं. मुंबईतलं माझं पहिलं नाटक ते. त्याला राज्य नाटय़स्पर्धेत पहिलं बक्षीस मिळालं होतं. त्यानंतर चार र्वष थिएटरच करत होते. ‘कस्तुरीमृग’, ‘लपंडाव’ अशी नाटकं केली. ‘रथचक्र’ सुरू असताना १९८१-८२ मध्ये ‘गांधी’ सिनेमात काम केलं. या सिनेमामुळे हिंदी सिनेमांमध्ये माझी दखल घेतली गेली. कस्तुरबाची भूमिका केली तेव्हा मी फक्त २७ वर्षांची होते. त्यामुळे मला त्या वयात हिंदी सिनेमांमध्ये आईची भूमिका मिळत गेली. तेव्हा थोडंसं वेगळं वाटायचं. याच वेळी माझी काही नाटकंही चालू होती. काही वर्षांनी सिनेमातल्या गुडी गुडी मदर इमेजला मी कंटाळलेही होते. आता काही तरी नवीन करायला मिळायला हवं असं वाटू लागलं. पण, जे काम येईल त्यामध्ये मी चांगलं काही शोधायचा प्रयत्न करत होते. हे करायचंच नाही, ते नको, असं नको, तसं नको असं कधी काही झालं नाही. पैशांसाठी करूया असा दृष्टिकोन असला तरी त्यातही मला ‘प्रतिघात’, ‘सारांश’ असे सिनेमे मिळत गेले. मी दहा व्यावसायिक सिनेमे केल्यानंतर एखादा आशयघन सिनेमा मिळाल्यानंतर काम केल्याचं समाधान मिळत होतं. दरम्यान मराठी नाटकं थांबली. पण, गुजराती थिएटर सुरू झालं. दुसरीकडे आविष्कार सुरू होतंच. तिथेही अनेक नाटकं केली. ‘हम लोग’, ‘बुनियाद’ ‘खानदान’ दूरदर्शनच्या या पहिल्या मालिका. त्यापैकी मी ‘खानदान’मध्ये होते. या मालिकेसाठी विचारलं तेव्हा अभिनय करायला मिळतोय म्हणून मी ते कामंही स्वीकारलं. त्यामुळे एकाच वेळी नाटक, मालिका आणि सिनेमा अशा तिन्ही माध्यमात माझं काम सुरू होतं. माझ्याकडे काम नाही म्हणून मी दुसऱ्या माध्यमात काम करतेय असं माझं कधीच झालं नाही. याच दरम्यान एका जाहिरातीतही काम केलं. त्यामुळे चौफेर असा अनुभव येत गेला. मग ही साखळी सुरूच राहिली. या संपूर्ण प्रवासाकडे मी अतिशय समाधानाने आणि आनंदाने बघते.
‘चार दिवस सासूचे’मधली आशालता आणि आता ‘होणार सून मी ह्य़ा घरची’मधली आईआजी लोकप्रिय झाली. या दोन्ही व्यक्तिरेखांचं तुमच्याशी जडलेलं नातं कसं आहे?
– ‘चार दिवस सासूचे’ इतकी र्वष चालू राहील असं सुरुवातीला वाटलंही नव्हतं. मुंबईपेक्षा ग्रामीण भागात या मालिकेने जास्त लोकप्रियता मिळवली. त्या मालिकेचं यश त्याच्या विषयात आहे. एकत्र कुटुंब पद्धत हा विषयच मालिकेचा नायक आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कुटुंबातल्या लोकांना, नात्यांना बांधून ठेवायला काय करावं लागतं; हे सांगणारी मालिका म्हणून त्या मालिकेकडे बघितलं गेलं. आशालताबाई या व्यक्तिरेखेकडे बघून प्रेक्षक वेगवेगळ्या गोष्टी शिकतोय असं झालं होतं. त्यामुळे ही व्यक्तिरेखा मी जगले. आपण साकारत असलेली व्यक्तिरेखा प्रेक्षकांसाठी खूप महत्त्वाची आहे हे कळल्यावर आनंदच व्हायचा. ‘चार दिवस..’ संपल्यानंतर लगेचच चारेक महिन्यांनी ‘होणार सून..’ ही मालिका सुरू झाली. सगळ्यांना सांभाळून घेणारी, कुटुंबाला जोडून घेणारी आणि कर्तृत्ववान अशी आईआजी प्रेक्षकांना भावली. ‘आईआजी’ हा शब्दसुद्धा खूप लोकप्रिय झाला. समोरच्याला बरं वाटेल म्हणून खोटं वागणं आईआजीला जमत नाही. सगळ्यांना समजून घेणारी असली तरी तितकीच ती कठोरही आहे. विशिष्ट गोष्टीचा विचार करून वागणारी आणि एकदम निकषांवर न येणारी अशी आईआजी ही व्यक्तिरेखा साकारताना मी खूप काही शिकले.
या दोन्ही मालिका मधल्या काळात खूप ताणल्या गेल्या. कलाकाराला अशा वेळी किती कंटाळा येतो?
– सुदैवाने ‘चार दिवस सासूचे’ या मालिकेच्या वेळी मला रोज शूट करावं लागायचं नाही. तसंच ‘होणार सून..’साठीही मला रोज शूट करावं लागत नाही. महिन्याभरात सरासरी १० ते १२ दिवस शूट करावं लागतं. त्यामुळे रोज तेच काम करायचंय असा दृष्टिकोन बाजूला राहतो. हिंदीमध्ये मात्र तसा कंटाळा येऊ शकतो. ऐन वेळी एपिसोड्स लिहून येतात. असं होत असल्यामुळे त्याचा कामावर परिणाम व्हायचा. ही स्थिती काही वर्षांपूर्वीची आहे. आताच्या स्थितीबद्दल अंदाज नाही. ‘होणार सून..’ करताना मला सुट्टी मिळते. पूर्वी मला माझे एपिसोड कधी पाहायलाच मिळायचे नाहीत. आता मात्र थोडेफार एपिसोड बघायला मिळतात. हे एपिसोड बघताना आम्हा कलाकारांना काही खटकलं तर आम्ही मालिकेच्या टीमला सांगतो. काय करता येऊ शकेल याबाबत काही नव्या गोष्टी सुचवतो. विशिष्ट एपिसोडबाबत प्रेक्षकांच्या आम्हाला आलेल्या प्रतिक्रिया आणि आम्हाला वाटत असलेल्या गोष्टी आम्ही दिग्दर्शकापर्यंत पोहोचवतो. मग त्याप्रमाणे बदल केले जातात. विचारांची आणि मतांची देवाणघेवाण होत असल्यामुळे कंटाळा येत नाही.
आताच्या मालिकांच्या आशयाबद्दल तुम्हाला काय वाटतं?
– मालिकांचा प्रेक्षक महिलावर्ग असतो. हा प्रेक्षकवर्ग लक्षात घेत तशा प्रकारच्या मालिका बनवल्या जात असतील. सध्याच्या कामाच्या व्यग्र वेळापत्रकामुळे हिंदी मालिका बघायला मला जमत नाही. मला माझीही मालिका फार कमी वेळा बघायला मिळते. पण, या मालिका सासू-सुनेच्या कथेच्या फारशा पुढे गेल्या नसतील. सध्या सुरू असलेल्या मालिकांनी त्यांचा नेहमीचा कौटुंबिक बाज सोडला नसावा. डेली सोपचा प्रेक्षकवर्ग बघता त्यानुसार बदल केले जातात असं वाटतं. प्रेक्षकवर्गामुळे टीआरपी मिळतो आणि टीआरपीमुळे मालिकेचं यश. शेवटी हा व्यवसाय आहे.
हिंदी मालिकांचा आवाका बघता तिथेच स्थिरावं असं वाटलं नाही का?
– कोणत्या माध्यमात, भाषेत स्थिरावं हे प्रत्येक कलाकारावर अवलंबून असतं. मी ‘डोर’ या हिंदी मालिकेच्या वेळी कंटाळले होते, कारण तेव्हा रोजच्या रोज शूट असायचं. तुमचं पॅकअप कधी होणार हे माहीत नसतं. सोशल लाइफ सोडाच पण, कुटुंबासोबतही वेळ घालवायला मिळायचा नाही, घरातली कामं रखडायची. या सगळ्याचं व्यवस्थित नियोजन असेल तरच कदाचित तिकडे वळण्याचा विचार करेन किंवा करू शकेन. सुदैवाने ‘होणार सून..’ करत असताना मी तमिळ, तेलुगू सिनेमे केले. एक नाटकही करतेय. मराठीऐवजी मी हिंदी मालिका करत असते तर नाटक, सिनेमा करू शकले असते, असं मला वाटत नाही. त्यामुळे तुलनेने मराठीमध्ये त्यातही आमच्या प्रॉडक्शन हाऊसमध्ये कलाकाराला स्वत:साठी पुरेसा वेळ मिळतो.
तुम्हाला इंग्रजी सिनेमे करायलाही आवडतील, असं तुम्ही एकदा म्हटलंय. याचं काही विशेष कारण.
– एका इंग्रजी निर्मिती संस्थेच्या सिनेमात काम केल्यानंतर तिथल्या नियोजन पद्धतीच्या तुम्ही प्रेमात पडता. तसंच माझं झालं. ‘गांधी’ करताना त्या नियोजन पद्धतीची मला चांगली सवय लागली. हॉलीवूडचे कलाकार एक सिनेमा पूर्ण झाल्याशिवाय दुसऱ्या सिनेमाकडे वळत नाहीत. आता हा ट्रेंड बॉलीवूडकडेही रुजतोय. एकाग्रतेने एकच काम करून ते पूर्ण झाल्यानंतर पुढचं काम करायला नक्कीच आवडेल. तिथली पद्धत आवडली असल्यामुळे मला इंग्रजी सिनेमांमध्ये काम करायला नक्की आवडेल.
गेल्या काही वर्षांपासून मराठी सिनेमे राष्ट्रीय पुरस्कारापर्यंत पोहोचताहेत. तरीही ‘मराठी सिनेमे बघायला मराठी प्रेक्षकांनी सिनेमागृहात जावं’ अशी ओरड सुरूच आहे. तर दुसरीकडे काही सिनेमे बॉक्स ऑफिसवर कोटींचा गल्ला करताहेत. या संपूर्ण चित्राबद्दल तुम्ही कसं बघताय?
– आता, या काळात मी मराठी सिनेमा करण्याला प्राधान्य देईन. ‘मराठी सिनेमे, मराठी प्रेक्षक, सिनेमागृह’ याबाबत होत असलेली चर्चा, ओरड, नकारात्मक दृष्टिकोन हे सगळं बदलत चाललं आहे. एखाद्या मराठी सिनेमासाठी हाऊसफुल्लचा बोर्ड लागल्याचं मला कधी कळलं तर मला नक्कीच आनंद होतो. कारण मराठी सिनेमांमधल्या विषयांमध्ये आता खूप वैविध्य येऊ लागलं आहे. विषयांची निवड करताना चौकटीबाहेरचा विचार केला जातोय. कमी बजेटमध्ये उत्तम सिनेमा करणाऱ्यांचं कौतुक आहे. ‘हा कमर्शिअल सिनेमा नाही’ या विचारावर ठाम राहून कलाकारही चांगला सिनेमा करायला तयार होताहेत. अशा वैविध्यपूर्ण सिनेमासाठी मला विचारलं गेलं तर मी त्वरित होकार कळवेन. वैविध्यपूर्ण मराठी सिनेमांच्या भूमिकांमधलं वैविध्य आणि प्रयोग जगायला कलाकारालाही हवंच असतं. ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ या सिनेमाच्या ऑफरच्या वेळी माझे तीनच सीन्स आहेत हे मला दिग्दर्शकाने आधीच सांगितलं होतं. पण, तरी मी त्यासाठी तयार झाले. कारण एकच होतं, सिनेमाची कथा. असा विचार करणारे कलाकार मराठी सिनेसृष्टीत शंभर टक्के आहेत. प्रत्येक कलाकार चांगलं काही करण्याच्या आणि चांगल्या कलाकृतीशी जोडला जाण्याच्या प्रतीक्षेत असतो. वेगवेगळ्या दृष्टिकोनातून विचारमंथन केलं की चांगल्या सिनेमांची निर्मिती होतेच. तीन वर्षांपूर्वी मी राष्ट्रीय पुरस्कारांच्या पॅनेलमध्ये होते. तेव्हा पन्नास सिनेमांपैकी आठ सिनेमे मराठी होते. आठही सिनेमांचे विषय, पठडी वेगळी होती. या गोष्टीचा मला अभिमान होता. ‘देऊळ’ सिनेमाला सगळ्यांचीच पसंती होती. वेगळं काही देऊ पाहण्याचा नवीन तरुण मुलांच्या प्रयत्नाला यश मिळू लागलंय. कारण येणारी ही नवीन फळी प्रयोगशील आहे. इंटरनेटमुळे देशातील तसंच जगभरातील वेगवेगळ्या भाषांमधल्या वेगवेगळ्या कलाकृती ते बघू शकतात. त्यामुळे इतर भाषांमधल्या दर्जेदार कलाकृतीसारखं काही बनवू पाहण्याचा त्यांचा सतत प्रयत्न असतो. हे केवळ मराठीत नसून हिंदीतही आहे. फक्त तिथले तरुण दिग्दर्शक प्रयोग आणि व्यवसाय अशा दोन्ही बाजूंचा एकाच वेळी विचार करताना दिसतात. यातला समतोल साधण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. हा विचार आता मराठीमध्येही रुजू होताना दिसतोय.
एकीकडे मराठी सिनेमांमधलं वैविध्य, प्रयोगशील विषय दिसताहेत तर दुसरीकडे हिंदी सिनेमा अति व्यावसायिकतेकडे झुकतोय असं वाटतंय का?
– हिंदी सिनेमांचे शंभर कोटी, दोनशे कोटी क्लब यावर मी फार विश्वास ठेवत नाही. माझ्या मते असे कोटय़वधी रुपयांचे क्लब ही अतिशयोक्ती आहे. ज्याप्रमाणे कलाकारांचे क्रमांक ठरवले जातात तसंच सिनेमांच्या कोटी क्लबविषयी म्हणता येईल. माझ्या मते हिंदी सिनेमांमध्ये अर्धा खर्च उगाचच होतो. जो मराठीमध्ये होत नसावा. मला फक्त चांगला सिनेमा आणि वाईट सिनेमा या दोनच गोष्टी कळतात. मग तो सिनेमा शंभर कोटी कमवलेला असो किंवा दहा कोटी.
तुम्ही तिन्ही माध्यमांमध्ये काम केलंय. तुमचं आवडतं माध्यम कोणतं आहे? का?
– माझं प्राधान्य पहिल्यापासून नेहमी नाटकालाच आहे. मी त्या क्षेत्राचं विशिष्ट प्रशिक्षण घेतलंय. नाटकामध्ये मला अनेक प्रयोग करायला मिळतं. आयुष्यात तुम्ही जे शिकता, अनुभवता ते नाटकात उतरत जातं. सिनेमा, मालिकेत उतरत नाही असं नाही. पण, तुलनेने नाटकात ते प्रकर्षांने उतरतं. पहिला प्रयोग आणि शंभरावा प्रयोग यात नक्कीच तफावत असते. व्यक्तिरेखेत नसेल पण, समजुतीत असते. व्यक्तिरेखेचं नेमकं काय प्रेक्षकांपर्यंत पोहोचलं पाहिजे याच्यात चालणारे प्रयोग मला जास्त भुरळ घालतात. कोणत्याही व्यक्तिरेखेचा नाटकात विशिष्ट आलेख असतो. तो तुटता कामा नये. त्यात तुटकपणा आला की त्यातली गंमत जाते. त्याच्यामध्ये एक धागा असतो. तो शोधण्याचा जो प्रयत्न असतो तो त्या व्यक्तिरेखेचा प्रवास असतो. आपण केलेलं काम हे प्रेक्षकांपर्यंत पोहोचतंय की नाही याचा विचार करणं, हा सगळा प्रवास नाटकात करता येतो. म्हणून नाटक हे माझ्या खूप जवळचं आहे. तुम्ही कोणत्या माध्यमात काम करता यावर तुमचा प्रेक्षकही ठरतो. टीव्हीत काम करत असता तेव्हा रिमोट प्रेक्षकांच्या हातात असतो. त्यामुळे मी मालिकेत दिसत असताना त्यांना तो बंद करावासा वाटू नये असं मी काम करायला हवं; तर सिनेमात काम करताना हा सिनेमा पन्नास वर्षांनी बघितला तरी तितकाच चांगला वाटला पाहिजे असं केलं पाहिजे. तिन्ही माध्यमांची आव्हानं वेगवेगळी आहेत. तसेच त्यांचे विचारप्रवाहसुद्धा वेगवेगळे आहेत.
‘आई, तुला मी कुठे ठेवू’ या नाटकाच्या निमित्ताने तुम्ही ठिकठिकाणी प्रयोग करता. एकूणच नाटय़गृहांच्या अवस्थेबद्दल काय सांगाल?
– नाटय़गृहांची अवस्था अतिशय बिकट आहे, हे अगदी खरं आहे. नाटय़गृहांची हवी तशी काळजी घेतली जात नाही. म्हणजे हत्ती आणायचा पण, त्याला द्यायला चाराच नसेल तर काय होणार त्या हत्तीचं, हा विचार होत नाही. तसंच नाटय़गृहांचं झालंय. नाटय़गृह बांधून तर ठेवली आहेत, पण ते सुस्थितीत ठेवणं, काळजी घेणं हे मात्र होत नाही. महाराष्ट्रातच बाहेरगावी असलेल्या नाटय़गृहांपैकी ठरावीकच नाटय़गृह बऱ्या स्थितीत आहेत. बाकीच्यांचा मेंटेनन्स नाहीच. सरकारी नाटय़गृहांमध्येच वाईट अवस्था असेल तर इतरांबद्दल काय बोलणार? चांगली नाटय़गृहं बांधली आहेत तर ती नीट ठेवा. काही नाटय़गृहांमध्ये तर पाण्याची सोयही नाही. तरीही काही कलाकार सातत्याने मुंबईसह बाहेरगावीही प्रयोग करताहेत त्यांचं खरंच कौतुक करावंसं वाटतं. गावांमध्ये जी नाटय़गृहं बांधली आहेत ती खरं तर गावाबाहेर आहेत. येणार कोण तिथे? आणि कसे? छान बांधलेलं असलं तरी तिथे प्रेक्षक यायला तर पाहिजे. मग प्रेक्षक आले नाही की नाटय़गृह मेंटेन करायला त्रास होतो. प्रेक्षक येत नाहीत म्हणून तिथे प्रयोग होत नाहीत. असं ते चक्र आहे. एसी चालू नसणं, पाण्याची सोय नसणं, स्वच्छता नसणं अशा अनेक गैरसोयी विविध नाटय़गृहांमध्ये बघायला मिळतात. त्यामुळे प्रसन्न वाटत नाही. मेकअप रुम चांगल्या आहेत, पण इतर सोयी नसल्यामुळे प्रचंड त्रास होतो. चांगल्या नाटय़गृहांमध्येही अशा गैरसोयी आहेत. अपंग लोकांसाठी काही सोयच नाही. सगळ्या नाटय़गृहांमध्ये जिने चढून जावं लागतं. ज्येष्ठ नागरिकांचा विचारच नाही. नाटय़गृहाच्या व्यवस्थापनेशी याबाबत बोलण्याचा प्रयत्न केला तर तात्पुरता तोडगा काढला जातो. असं होता कामा नये. त्यावर कायमस्वरूपी असा तोडगा काढायला हवा.
अशा वेळी कलाकार आणि निर्मिती संस्था यांच्या मताला किती किंमत असते?
– नाटक माध्यमाची परदेशातली व्यवस्था आणि आपल्याकडची व्यवस्था यात खूप फरक आहे. परदेशात एक थिएटर-एक निर्माता-एक नाटक असा पायंडा आहे. आपल्याकडे चार थिएटर-दहा निर्माते अशी पद्धत आहे. ही पद्धत पूर्वीपासून आहे. ती आता कितपत बदलता येईल मला माहीत नाही. एखादा निर्माता दहा थिएटर बुक करतो आणि त्यानुसार प्रयोग करतो. निर्मात्याकडे एकच थिएटर असेल तर वेगळा प्रभाव पडू शकतो. उदा. एखाद्या थिएटरने एका नाटकाची निर्मिती करायचं ठरवलं आणि फक्त त्याच नाटकाचे प्रयोग तिथे केले तर बदल होऊ शकतो. पण, असं झालं तर मात्र अशा नाटकांसाठी प्रेक्षक यायला पाहिजेत. प्रेक्षक आले की, नाटय़गृहांमधल्या सोयीसुविधा वाढवल्या पाहिजेत. अशा अनेक गोष्टी करता आल्या पाहिजेत. पण, आता चार निर्माते, दहा थिएटर अशी स्थिती असताना निर्मात्यांच्या म्हणण्याला फारसं महत्त्व नसतं.
नाटय़गृहांची अशी स्थिती असली तरी नाटकांची संख्या मात्र वाढताना दिसतेय.
– जयदेवजी नेहमी म्हणायचे, ‘थिएटर सीम्स टू बी डाइंग, बट नेव्हर डाइज’. जोवर हाडामांसाची माणसं समोर हाडामांसाच्या माणसांना पाहू इच्छितात तोवर रंगभूमीला मरण नाही. त्याविषयी असणारा ओढा, प्रेम कमी-जास्त असू शकतं. पण, त्याला मरण नक्कीच नाही. काळ बदलतो तसा हा ओढा टीव्हीकडे वळू शकतो. पण, एखाद्या चांगल्या नाटकासाठी प्रेक्षक नाटय़गृहाकडे नक्कीच वळू शकतो. खूप नाटकं आली की प्रेक्षक विभागला जातो. याचा परिणाम नाटकांच्या खर्चावर होऊ शकतो. मग दोनच व्यक्तिरेखा असलेली नाटकं किंवा एक स्टारडम असलेला कलाकार आणि इतर नवोदित कलाकार असलेली नाटकंही येतात. आमच्या नाटकात माझ्यासह काम करणारे कलाकार नवीन आणि तरुण आहेत. पूर्वी असं व्हायचं नाही, असं नाही. पण, तेव्हा प्रमाण कमी होतं. नाटक तर करायचंय मग दोघांचंच करूया, म्हणजे खर्च कमी, कमी खर्चात जास्त प्रयोग करू शकू; असे विचार नाटय़कर्त्यांच्या मनात येतात. जेव्हा प्रयोग कमी करण्याचं एखादा निर्माता ठरवतो म्हणजे फक्त रविवारी प्रयोग करणार असं ठरवतो तेव्हा तेवढाच स्टारडम असलेलं ते नाटक असायला हवं. जेणेकरून त्या बडय़ा कलाकारासाठी प्रेक्षक नाटकाकडे खेचले जातील. अशा प्रकारे सगळ्या गोष्टी एकमेकांवर अवलंबून आहेत. त्याला विशिष्ट गणित लावता येत नाही.
तुम्ही तुमच्या नाटकातल्या नवोदित तरुण कलाकारांचा उल्लेख केलात. आता अनेक पर्याय उपलब्ध झाल्यामुळे या क्षेत्रात काम करण्यासाठी नवीन पिढीचा संघर्ष सोपा झालाय असं वाटतं का?
– आता अनेक पर्याय उपलब्ध झालेत हे खरंय. आमच्या सुरुवातीच्या काळात सिनेमा आणि नाटक असे दोनच पर्याय होते. टीव्ही हे माध्यम होतं पण, दूरदर्शनवर एखाद्या मालिकेत काम करण्यापुरतंच त्याचं महत्त्व होतं. आतासारखं ब्रेड-बटर देणारं माध्यम म्हणून त्याकडे तेव्हा पाहिलं जायचं नाही. त्यामुळे आम्हाला रंगभूमीवर स्थिर राहावंचं लागलं. अर्थात तेव्हा ज्या कलाकारांना खरंच नाटकात रस आहे असेच लोक नाटकात राहिले. कालांतराने नाटकातल्या कामाची दखल घेतली की सिनेमात झळकायचं असाही दृष्टिकोन कलाकारांचा झाला होता. नाटक हे फारशी मिळकत न मिळणारं माध्यम असल्यामुळे तिथे फक्त आवड म्हणून काम करणारे कलाकार होते. प्रायोगिक आणि व्यावसायिक अशा दोन्हीकडे काम करणारे कलाकारही आता आहेत. टीव्ही, शॉर्ट फिल्म, जाहिराती, सिनेमा अशी माध्यमांची संख्या आता वाढली आहे. पूर्वी दुसरीकडे चांगलं काम केल्याशिवाय, त्या कामाची दखल घेतल्याशिवाय सिनेमांमध्ये काम मिळत नव्हतं. पण, आता ते कमी झालंय. माध्यमांच्या वाढत्या संख्येमुळे कलाकारांची मागणीही वाढू लागली आहे. त्यामुळे थेट टीव्हीमध्ये काम करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. अभिनयाचं प्रशिक्षण घेतलेला मुलगा ‘हजार रुपये पर डे द्या’ असं सांगू लागला आणि दुसरीकडे एखादा हौशी मुलगा ‘पाचशे रुपये पर डे’वर तयार झाला तर निर्माता पाचशे रुपयांवर तयार होणाऱ्याला प्राधान्य देईल. असाही मध्ये काळ आला होता. पण, प्रशिक्षण घेऊन आलेल्या मुलाला घेतलं तर त्यांचा वेळ वाचेल ही सोपी गोष्ट त्यांच्या लक्षात येत नाही.
पण, उत्तम कलाकार असूनसुद्धा आताच्या तरुण पिढीमध्ये संयमी वृत्ती कमी आढळून येते का? कमी वेळात यशस्वी व्हायची त्यांची धडपड पटते का?
– टीव्ही या माध्यमात पैसा आहे, हे खरंय. त्यात संयमी वृत्तीचाही मुद्दा येतोच. ‘दिसणं’ आणि त्या दिसण्यातून पटकन ओळख मिळणं हे आजच्या तरुण पिढीला वाटतं. तसंच अलीकडे चेहऱ्याला महत्त्व दिलं जातंय. तुम्ही काम काय करता हे बाजूला राहातं. असं होता कामा नये. बरीचशी मुलं-मुली एक-दोन मालिकांमध्ये काम करून नाहीशी झाली आहेत. पण, जे खरंच हुशार आणि मेहनती आहेत ते आजही दिसताहेत.
कलाकाराने वयाचा विशिष्ट टप्पा गाठला की तो निवृत्त होण्याची भाषा करतो. तुम्ही मात्र अजूनही या क्षेत्रात सक्रिय आहात. ‘आता थांबावं’ असं इतरांसारखं तुमच्या मनात कधी आलं नाही?
– कधीच नाही. मला एकेक चांगली कामं मिळत गेली आणि मी ती करत गेले. त्यामुळे ‘आता थांबूया’ असं कधीच वाटलं नाही. मला अभिनय करायला आवडतो. त्यामुळे विचारणा झालेल्या भूमिका सुदैवाने आवडत आणि पटत गेल्यामुळे मी ‘नाही’ म्हणाले नाही. मला वाटतं, कामं मिळण्याच्या दृष्टीने या क्षेत्रात तुम्ही सक्रिय आहात हे दिसत राहिलं पाहिजे. जेव्हा अमुक एका कामाचा आपल्याला कंटाळा आल्यावर निवृत्त होण्याचा विचार मनात येतो. मी मधल्या काळात सिनेमांमध्ये दिसले नसले तरी त्याच वेळी मी इतर भाषांमधल्या सिनेमांमध्ये, नाटकांममध्ये, मालिकांमध्ये काम करत होते. त्यामुळे मी हे क्षेत्र सोडलेलं नाही. तर याच क्षेत्रात विविध माध्यमांमध्ये काम करतेय.
एफटीआयआयच्या अध्यक्षपदी गजेंद्र चौहान यांच्या नियुक्तीसाठी विरोध झाला. याबद्दल तुमचं मत काय?
– कोणत्याही इन्स्टिटय़ूटच्या मुख्य व्यक्तीला त्या क्षेत्राची माहिती असावी. तसंच इन्स्टिटय़ूट म्हणजे मॅनेजमेंटचा मुद्दा येतो. तर त्याबाबतही त्या व्यक्तीला ज्ञान असावं. मुळात अभिनयाचं शिक्षण म्हणजे काय याची त्या व्यक्तीला जाण हवी. अ‍ॅडमिनिस्ट्रेशन आणि क्रिएटिव्ह या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. माझ्या मते खरं तर या दोन्हीचे डिरेक्टर्स असायला हवेत. असं होणं शक्य नसलं तरी या दोन्ही गोष्टींची माहिती असलेल्या व्यक्तीची त्या जागी नेमणूक व्हावी. प्रॅक्टिसिंग कलाकार म्हणजे जे कलाकार इतरत्र कामांमध्ये व्यग्र आहेत ते साधारणपणे वेळेअभावी अशा इन्स्टिटय़ूटमध्ये शिकवण्यासाठी तयार होत नाहीत. मग अशा वेळी जे कलाकार इतरत्र काम करत नाहीत पण, या क्षेत्रातले जाणकार आहेत अशा व्यक्तींनी इन्स्टिटय़ूटमध्ये येऊन शिकवावं असं विद्यार्थ्यांना वाटू शकतं. म्हणून त्यांचा या अध्यक्षपदी निवडलेल्या व्यक्तीला आक्षेप असू शकतो. फिल्ममध्ये काम करणं आणि त्याच्या अभ्यासक्रमाविषयीची माहिती असणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. अभ्यासक्रमाविषयी माहिती असणं जास्त महत्त्वाचं आहे.
तुम्हाला कँडी क्रश खेळायला आवडतं असं कळलंय.
– हो, मला कँडी क्रश खेळायला खूप आवडतं. हा खेळ म्हणजे उत्तम स्ट्रेस बस्टर आहे. पूर्वीपासूनच मला कोडी, सुडोकू असं सोडवायला आवडतं. मोबाइलमधला कोणताही गेम केव्हाही बंद करून आपण आपल्या कामाला पुन्हा सुरुवात करू शकतो. सेटवर एखाद्या सीनसाठी हाक मारली आणि मी कँडी क्रश खेळत असेन तर तो तसाच बंद करून मी माझ्या कामासाठी जाते. पण, त्याऐवजी एखादं गंभीर पुस्तकं वाचत असेन तर ते मात्र मध्येच थांबवता येत नाही. अशा वेळी कँडी क्रश या गेमचा चांगला उपयोग होतो. कामाचा ताण कमी करण्यासाठी कँडी क्रश मला उत्तम पर्याय वाटतो.
तुम्हाला ड्रायव्हिंग करायलाही खूप आवडतं. आजही तुम्ही स्वत:च गाडी चालवता.
– मला ड्रायव्हिंग करायलासुद्धा खूप आवडतं. जेव्हा मला गाडी चालवता येत नव्हती तेव्हा मी ड्रायव्हर ठेवला होता. नंतर मी शिकले. त्यानंतरही काही काळ मी ड्रायव्हर ठेवला होता. पण, तो शेजारी बसायचा आणि मी गाडी चालवायचे. कालांतराने मी स्वत:च गाडी चालवायला लागले. नवीन गाडी घेतल्यानंतर ‘इट्स प्लेजर टू ड्राइव्ह’ असं असायचं. ‘मर्सिडीज घ्यायची आणि ती मी चालवायची नाही, ती गंमत मी स्वत: अनुभवायची नाही असं कसं? असं मला वाटायचं. म्हणून मी स्वत:च गाडी चालवते आणि त्याचा आनंद घेते.
चैताली जोशी response.lokprabha@expressindia.com