साहित्य:

८ मोठे टोमॅटो, जाडसर चिरून
२ मोठी गाजरे, मध्यम चौकोनी तुकडे
१ लहान कांदा, बारीक चिरून
४ लसूण पाकळ्या, बारीक चिरून
दीड चमचा ऑलिव्ह ऑइल
१/४ वाटी बेसिल पाने, बारीक चिरून
२ तमालपत्रे
१/४ चमचा लाल तिखट
१ चमचा साखर (ऐच्छिक)
१/२ वाटी ताजा ऑरेंज ज्यूस (शक्यतो बिनसाखरेचा)
१/४ वाटी नारळाचे घट्ट दूध किंवा हेवी क्रीम
चवीपुरते मीठ
१/२ चमचा मिरपूड

कृती:

१)     खोलगट नॉनस्टिक पॅनमध्ये तेल गरम करावे. त्यात तमालपत्र आणि लसूण घालून परतावे. ५-७ सेकंदांनी कांदा घालावा. कांदा थोडासा पारदर्शक झाला की गाजर घालावे.

२)     गाजर घातल्यावर झाकण ठेवून गाजर नरम होईस्तोवर शिजवावे. नंतर टोमॅटोचे तुकडे घालून झाकण ठेवून शिजवावे. टोमॅटो मऊसर झाले की बेसिल पाने घालावीत. झाकण न ठेवता २-३ मिनिटे शिजवावे. गॅस बंद करून मिश्रण ५-१० मिनिटे कोमट होऊ द्यावे.

३)     तमालपत्रे काढून टाकावीत. गाजर-टोमॅटोचे मिश्रण मिक्सरमध्ये घालून बारीक पेस्ट करावी. ही पेस्ट गाळण्यातून गाळून घ्यावी. लागल्यास थोडे पाणी घालावे. नंतर गाळलेले सूप परत पातेल्यात घ्यावे. त्यात ऑरेंज ज्यूस घालावा. मीठ, साखर, आणि लाल तिखट घालावे. काही मिनिटे उकळवून त्यात क्रीम किंवा नारळाचे दूध घालावे. १-२ मिनिटे कमी आचेवर गरम करावे आणि लगेच सव्‍‌र्ह करावे.

सव्‍‌र्ह करताना लागल्यास थोडी मिरपूड घालावी.

वॉनटॉन सूप

साहित्य:

सारण

१ मध्यम गाजर
१ मध्यम भोपळी मिरची
३/४ वाटी कोबी, पातळ चिरून
५-६ फरसबी
३ बटन मश्रूम्स
१/४ वाटी टोफू, छोटे तुकडे
२ पाती कांद्याच्या काडय़ा
२ हिरव्या मिरच्या
१ चमचा भरून लसूण, बारीक चिरलेली
१ चमचा आले, बारीक चिरून
१ चमचा सोया सॉस
चवीपुरते मीठ
२ चमचे तेल

कव्हरसाठी

२ वाटय़ा मैदा
१/२ चमचा मीठ

सूपसाठी

६ ते ७ वाटय़ा व्हेजिटेबल स्टॉक
चवीपुरते मीठ
२-३ लसूण आणि १/४ चमचा आले ठेचून
१/२ चमचा व्हिनेगर

कृती:

१)     सारणासाठी गाजर, भोपळी मिरची, कोबी, फरसबी, मश्रूम्स, टोफू, मिरची आणि पाती कांदा बारीक चिरून घ्यावा. कढईत तेल गरम करावे. त्यात आले-लसूण परतावे. त्यात पातीकांदा परतावा.

२)     नंतर सर्व भाज्या मोठय़ा आचेवर एखाद मिनिट परताव्यात. सोया सॉस आणि मीठ घालावे. हे सारण वाडग्यात काढून ठेवावे.

३)     मैदा, मीठ आणि पाणी एकत्र करून पीठ मळावे. १५ मिनिटे झाकून ठेवावे. नंतर बोराएवढे गोळे करावे (२ सेंमी). कॉर्नफ्लोअर लावून पातळ लाटावेत.

४)     लाटलेल्या पारीच्या मध्यभागी १ लहान चमचा सारण ठेवावे. अध्र्या पारीच्या कडेला पाण्याचे बोट लावावे. करंजीसारखे दुमडून सील करावे. दोन कडा मागच्या बाजूने एकत्र जुळवाव्यात. अशा प्रकारे सर्व वॉनटॉन्स बनवून घ्यावे.

५)     व्हेजिटेबल स्टॉकमध्ये मीठ आणि आले, लसूण घालून उकळत ठेवावे. उकळी फुटली की साधारण १५ ते १६ वॉनटॉन्स आत घालावे. ५ मिनिटे उकळू द्यवे म्हणजे वॉनटॉन्स शिजतील.

६)     वॉनटॉन्स शिजले की वर तरंगतील. सूपमध्ये व्हिनेगर घालावे. प्रत्येक सवर्ि्हग बोलमध्ये ३-४ वॉनटॉन्स आणि स्टॉक घालावा. सूप लगेच सव्‍‌र्ह करावे.

टिपा:

१)     भाज्या शक्य तेवढय़ा बारीक चिराव्यात. किसू नयेत. जाड भाज्यांमुळे वॉनटॉन्स फाटतात.

२)     सारणामध्ये चिकनचे किंवा क्रॅबचे वाफवलेले तुकडे घालू शकतो.

३)     वॉनटॉन्स बनवताना फाटणार नाहीत याची काळजी घ्यावी. कारण सूपमध्ये उकळवताना सर्व सारण बाहेर पडते.

क्रीम ऑफ मश्रूम

साहित्य:

८ ते १० बटण मश्रूम्स (मध्यम आकाराचे) (साधारण १ कप स्लाइसेस)
१ चमचा बटर
१-२ लसूण पाकळ्या, बारीक चिरून
२ चमचे चिरलेला कांदा
१/२ वाटी पाणी
१/२ वाटी दूध
२ चमचे मैदा
१ चमचा क्रीम
२ चिमटी मिरपूड
३ चिमटी ड्राय बेसिल + ड्राय ओरेगानो + गार्लिक पावडर (इटालियन सीझनिंग)
चवीपुरते मीठ

कृती:

१)     दूध आणि मैदा एकत्र करून घ्यावे. गुठळी राहू देऊ  नये.

२)     कढईत बटर गरम करावे. त्यात लसूण परतावे. कांदा लालसर होईस्तोवर परतावा. नंतर मश्रूमचे स्लाइस आणि मीठ घालावे. मिनिटभर परतावे.

३)     मश्रूम आळले की पाणी घालावे. पाण्याला उकळी फुटली की दूध आणि मैद्याचे मिश्रण घालावे. (कढईत घालण्याआधी ढवळून घ्यावे.) मंद आचेवर शिजवावे. गुठळ्या होऊ नये म्हणून ढवळावे. २ मिनिटांनी क्रीम घालावे.

४)     २-३ मिनिटे उकळू द्यावे. जर सूप खूप घट्ट वाटले तर दूध घालून १ उकळी काढावी.

५)     चवीपुरते मीठ, इटालियन सीझनिंग आणि काळी मिरपूड घालून मिक्स करावे.
गरमागरम सव्‍‌र्ह करावे.

वैदेही भावे – response.lokprabha@expressindia.com