अट्टल भटक्याला खरं तर डोंगरात जाण्यासाठी आवतण लागतं नाही. तो वाटच पाहत असतो. जोडून सुट्टी आली म्हणून तर कधी डोंगरमित्रांबरोबर भटकायचं म्हणून तर कधी गडकिल्ल्यांची साद ऐकून तर कधी असंच वाटलं म्हणून दोन घटका तो डोंगरात जातोच. कारण सहय़ाद्री त्याच्या रक्तात भिनलेला असतो. जणू काही त्याच्या जीवनाचा भागच. 

पण यावेळचं आवतण जरा वेगळचं होतं. होतं डोंगराचंच. साद घातली होती तीदेखील आपल्याच डोंगरमित्राने. बोंबल्या फकिराने. त्याचं नाव रवी पवार, पण सारेच त्याला फकीर म्हणूनच ओळखतात. साद होती ती मात्र डोंगराच्या दृश्य स्मृती इंटरनेटच्या महाजालावर पोहचविण्याची. या आंतरजालावर याआधी आवडीची दहा पुस्तकं, कृष्णधवल छायाचित्रं अशी आवतणं घातली जात होती. फेसबुकच्या जगात थोडी हलचल झाली होती, पण सहय़ाद्रीच्या आवतणानं मात्र कहरच केला. साद घालायचा अवकाश एकेक करत डोंगरभटक्यांचे खजिने खुले होत गेले. मुळात ज्याच्या अंगाखांद्यावर सारे हुंदडत होते त्या सर्वाचा मूलस्र्ोत असणारा तो सहय़ाद्रीच इतका श्रीमंत आहे की जणू काही लयलूटच सुरू झाली. बोंबल्याच्याच शब्दात सांगायचं तर खणत्याच लागल्या. संगणक, एक्स्टर्नल हार्ड डिस्क, लॅपटॉप, डीव्हीडी बॅकअप सगळीकडे उलथापालथ होत गेली आणि सहय़ाद्रीच्या श्रीमंतीने डोळे दिपू लागले. कोठे धुक्यात हरवलेली डोंगररांग, तर कोठे असंख्य धबधब्यांनी न्हाऊन निघालेला अभेद्य कडा, तर कोठे गडकिल्ल्यांची मंत्रमुग्ध करणारी वास्तू, तर कोठे जैववैविध्याचे मनोहारी रूप, तर चांदण्या रात्रीचं तारकादल, तर कोठे सुळक्यांची रांग.

वर्षांनुवर्षे ऊनपावसाचे तडाखे झेललेल्या सहय़ाद्रीच्या थक्क करून सोडणाऱ्या प्रतिमा आंतरजालावर फिरू लागल्या.

हे करताना मात्र कोणताही अभिनिवेश नव्हता. होतं ते केवळ त्या सहय़पर्वताप्रती अपार प्रेम. कारण या साऱ्या डोंगरभटक्यांमध्ये एक अव्यक्त असं नातं आहे. भले त्या सर्वानी एकमेकांबरोबर डोंगरवाटा तुडवल्या नसतील, पण त्यात एक मोकळेपणा अध्याहृत आहे. अशा वेळी सारी भौतिक औपचारिक बंधनं गळून पडतात आणि सुरू होतो एक अनुपमेय सोहळा. सहय़ाद्रीच्याच भाषेत सांगायचं तर त्याच्या आवतणामुळे या डोंगरभटक्यांनी सुंबरानंच मांडलंय. त्याच सुंबरानाचा हा निवडक अंश.

lp74रवी वैद्यनाथन

picधुक्यात गुरफटलेला सह्य़ाद्री (अमित बोरोले)

lp70तिकोन्यावरून टिपलेला हा सूर्यास्त म्हणजे जणू काही ज्वालामुखीचा उद्रेकच.. (बाळा पांचाळ)

lp68भोर येथील वेळवंडी नदीचं हे दृश्य कालिदासाच्या मेघदूतातील चर्मणवतीची आठवण करुन देतं. (अनिल शिंदोरे)

05माहुली कि ल्ल्याच्या कल्याण दरवाजाच्या कातळकोरीव पायऱ्या (संकल्प चौधरी)

lp71वर्षांनुवर्षे ऊनपावसाचे तडाखे झेलल्यावर कातळाने घेतलेला हा मानवी चेहरा (सुहास जोशी)

lp72डोंगरभटक्यांची जिद्द इतकी दांडगी की त्यांनी या सह्य़ाद्रीत माउंटन बाइकिंगला सुरुवात केली. (यतिन नामजोशी)

lp73डोंगरभटकंतीतला एक निवांत क्षण (पंकज झरेकर)

lp75रांगडय़ा सह्य़ाद्रीतलं नाजूक लेणं (रवी पवार)