lp54गॉसिप्स, वाद यांमधलं नेहमीचं नाव म्हणजे सैफ अली खान; पण ‘परिणीता’, ‘ओमकारा’ या सिनेमांमधल्या त्याच्या भूमिकांमुळेही तो चर्चेत राहिला. गेल्या दोनेक वर्षांत तो निर्मात्याच्याही भूमिकेत दिसतोय. ‘हॅपी एंडिंग’ हा नवा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला. निर्माता आणि अभिनेता म्हणून याही सिनेमात तो दुहेरी भूमिका बजावतोय.

‘हॅपी एंडिंग’ या सिनेमातल्या तुझ्या व्यक्तिरेखेबद्दल सांग.

– मला नाही माहीत तुम्ही या सिनेमातल्या माझ्या व्यक्तिरेखेला लेखक म्हणू शकता की नाही ते, कारण त्याने एकच पुस्तक लिहिलेलं असतं. त्या पुस्तकाला प्रचंड यश मिळतं, त्याला खूप पैसे मिळतात. त्याचं नाव असतं ‘ऑपरेशन पेबॅक’. ते अ‍ॅक्शन थ्रिलर पुस्तक असतं. त्यानंतर अनेक गोष्टी त्याने लिहिलेल्या असतात; पण त्या गोष्टींचं ‘हॅपी एंडिंग’ सापडत नसल्यामुळे तो त्या पूर्ण करू शकत नाही. त्यामुळे तो त्याची नोकरी गमावतो. त्याच्याकडे एक शेवटची संधी चालून येते. एका कलाकाराला हॉलीवूड स्टाइलमध्ये बॉलीवूडची स्क्रिप्ट लिहून हवी असते. या सगळ्यातून मार्ग काढत मुख्य व्यक्तिरेखा स्वत:ला वाचवू शकते का, हे सगळं या सिनेमात आहे. यात तात्पर्य शोधायचंच असेल, तर ते असं असेल की, ‘काही गोष्टी मागे सोडून द्यायच्या असतात. त्या सोडून न देता तुम्ही त्या तशाच धरून बसलात, तर तुम्ही मागे पडता.’

या सिनेमातल्या इतर व्यक्तिरेखाही खूप मजेशीर आहेत. रणवीर शौरीने उत्तम प्रकारे त्याची व्यक्तिरेखा साकारली आहे. तशी व्यक्तिरेखा तुम्ही यापूर्वी बघितली असेल; पण त्याने ती चांगल्या प्रकारे वठवली आहे, तर कल्की कोएलचिनने एका सायको गर्लफ्रेंडची भूमिका केली आहे. प्रीती झिंटाने एका शांत, समंजस गर्लफ्रेंडची व्यक्तिरेखा साकारली आहे. माझ्यासोबत काम केलेल्या दोनेक जणींना मी या भूमिकेबाबत विचारलं होतं; पण त्या म्हणाल्या, ‘तीन मुलांच्या आईची भूमिका आम्ही का करू?’ पण प्रीतीने ती भूमिका उत्तमरीत्या वठवली.

या सिनेमातल्या एखाद्या विनोदी प्रसंगाबद्दल सांग.

– खरं तर तसे चार-पाच प्रसंग आहेत; पण सगळ्यात जास्त विनोदी प्रसंग कोणता असेल, तर तो सिनेमाचा नायक कल्कीसोबत पाचव्यांदा ब्रेक अप करण्याचा प्रयत्न करतो तोच असेल, कारण त्या वेळचे सीन्स गोविंदासोबतचे आहेत. त्यातले संवाद खूप मजेशीर आहेत. राज आणि डीके या दोघांनी हे मजेशीर प्रसंग लिहिले आहेत. मी त्यांच्यासोबत आणखी बऱ्याच सिनेमांचे करार करायला हवा होता असं मला वाटतं (हसतो).

गोविंदासोबत काम करण्याचा अनुभव कसा होता?

– फार पूर्वी आम्ही एका सिनेमात काम केलं होतं; पण तो सिनेमा पूर्ण होऊ शकला नाही. गोविंदा यांचं नृत्य बघताना मला थक्क व्हायला व्हायचं. ते सतत त्यांचे प्रसंग, वाक्य यावर मेहनत घ्यायचे, सराव करायचे. ही सगळी मजा मी खूप एंजॉय केली. या सिनेमात आमच्या वेगवेगळ्या भूमिका आहेत. खऱ्या आयुष्यातही आमचं व्यक्तिमत्त्व एकमेकांपासून वेगळं आहे. खरं तर आमची व्यक्तिमत्त्वं वेगळी असल्यामुळे आमची आगळीवेगळी जोडी सिनेमात दिसणं मजेशीर आहे.

हा सिनेमा गोविंदा यांचा विचार करूनच लिहिला आहे. या सिनेमातली गाणी या वर्षीच्या उत्तम गाण्यांपैकी असतील. गोविंदा सिनेमातल्या गाण्यांवर धमाल नाचलेत. त्यामुळे तुमचे पैसे वसूल होतील हे नक्की. आमच्या दोघांचे काही प्रसंगही तुम्हाला हसवतील.

या सिनेमामध्ये बरेच पाहुणे कलाकार आहेत. सगळ्यात जास्त चर्चा आहे ती करीना कपूरच्या एन्ट्रीबद्दल. त्याबाबत काय सांगशील?

– खरं तर तिच्यासाठी या सिनेमात फारसं काही करण्यासारखं नव्हतं. तिच्या सीनमध्ये ती आमची म्हणजे प्रसिद्ध लोकांची विशेषत: खिल्ली उडवते. तिची विनोदबुद्धी खूप चांगली आहे. त्यामुळे तिने हा प्रसंग खिलाडूवृत्तीने केला. केवळ एकदाच नाही, तर दोनदा तिला या प्रसंगाचं शूटिंग करावं लागलं, कारण मला तो पुन्हा शूट करायचा होता. करिनाने त्या सीनमध्ये उत्तम काम केलंय. तसंच प्रीती झिंटाचंही. तिने तीन मुलांच्या आईची भूमिका केली आहे, जिने एका देखण्या, उंच अमेरिकी मुलाशी लग्न केलंय, कदाचित तिच्या ड्रीम बॉयशी.. (हसतो). तिने माझ्या एक्स-गर्लफ्रेंडची भूमिका केली आहे. ती आयुष्यात पुढे जाते. मी मात्र तसाच असतो.

चित्रपटात तू एका लेखकाची भूमिका केली आहे, तर संधी मिळालीच तर तुला कोणत्या लेखकासारखं बनायला आवडेल?

– मला सलमान रश्दी किंवा उम्बटरे एको (Umberto Eco) यांच्यासारखं लेखन करायला आवडेल. तुमच्या लेखनामध्ये तुमचं व्यक्तिमत्त्व उमटत जातं. तुम्ही खूप चांगल्या शब्दांचा वापर करू शकता; पण त्याहीपेक्षा काव्यात्मक आणि वर्णनात्मक लेखन महत्त्वाचं आहे. चार्ल्स डिकन यांच्या ‘अ टेल ऑफ टू सिटीज’ या पुस्तकातलं एक वाक्य खूप सुंदर आहे. ते असं, ‘तो उत्तम काळ होता, तेव्हाच्या लोकांकडे शहाणपणा, वेडेपणा, ज्ञान-अज्ञान, आशा-निराशा असं सगळंच होतं.’

पी. जी. वूडहाऊस?

-ओह.. मला पी.जी. वूडहाऊससारखं लिहायला आवडेल, कारण तो तुम्हाला हसवतो आणि हो, त्याची पुस्तकं माझ्याजवळ आहेत. १९८२ मध्ये माझ्या मित्राने मला ती पुस्तकं दिली होती. ती पुस्तकं खऱ्या अर्थाने रोमकॉम पठडीतली होती, ज्यामध्ये एका आत्याचं आगमन म्हणजे मोठं संकट असायचं आणि त्यामुळे घडणाऱ्या घटना विनोदी वाटायच्या.

रोमँटिक कॉमेडी सिनेमांचा एक सीझन होता. त्यातल्या बऱ्याचशा सिनेमांमध्ये तू काम केलंयस. रोमँटिक कॉमेडी सिनेमांचा हिरो आणि रोमँटिक कॉमेडी यशस्वी होण्यासाठी कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत असं तुला वाटतं?

– मला या सिनेमाबाबत एक गोष्ट आवडली ती म्हणजे, त्यांचं वेगळेपण आणि यातल्या व्यक्तिरेखा. कमिटमेंट आणि लक्ष केंद्रित करणं या दोन गोष्टी त्यांना अडचणीच्या वाटतात. यामुळे ते उथळ आहेत. त्यांच्यात हिरोइझम शोधणं कठीण आहे, कारण त्यांच्या समस्याच मुळात विचित्र आहेत. सिनेमा विनोदी आहे. त्यामुळे त्यात मजा, धमालच असायला हवी, हे खरं दडपण असतं. रोमकॉम सिनेमांमध्ये अनेक गोष्टींचा समावेश असू शकतो. ‘हॅपी एंडिंग’मधल्या व्यक्तिरेखा शेवटी अनेक गोष्टी गांभीर्याने घेऊ लागतात. मला वाटतं, भरकटलेला तरुण ते शिस्तबद्ध पुरुष हा नेहमीचा ट्रॅक यात आहे. ही कथा वेगळी आहे. मी साकारत असलेली व्यक्तिरेखा चांगलं काम करत असते. भरपूर पैसा कमावते. पण, ते कमावलेलं सगळं गमावतेही. याआधी मी असं काम केलं नव्हतं; पण आपण जे करतो त्याला लोकांचा प्रतिसाद मिळत असेल तर अभिनेत्यासाठी ते खूप प्रोत्साहन देणारं ठरतं. उदाहरणार्थ या सिनेमात हा तरुण दु:खात आहे, त्याला पैशांची गरज आहे, आणि ती भूमिका करणारा अभिनेता म्हणून मला त्याच्याबद्दल अनुकंपा वाटते. ही व्यक्तिरेखा इतर रोमकॉम हिरोसारखी नाही, ज्याच्याविषयी तुम्हाला वाईट वाटणार नाही.

रोमँटिक कॉमेडी सिनेमांमध्ये कॉमिक एनर्जी आणि रंगसंगती यांचं मिश्रण असायला हवं. उदा- ‘फ्रेण्ड्स’ हा शो. या शोमधले लोक लाल रंगाचं टी-शर्ट घालतात, सेट हिरव्या, तपकिरी अशा रंगांचा आहे. यामुळे तुम्ही कोणत्याही विचारात असाल तरी तुमचा मूड चटकन बदलला जातो. चांगल्या दर्जाचे विनोद, काही तरी वेगळं किंवा अगदी वाहय़ात विनोद हवेत असं नाही. पण, ‘फ्रेण्ड्स’सारखा शो जो प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेईल. त्यामुळे रोमकॉम सिनेमांमध्ये एक वेगळी मजेशीर एनर्जी असते. कारण, त्यातली व्यक्तिरेखा त्याच्या आयुष्यात गोंधळ घालत असते आणि प्रेक्षक म्हणून तुम्ही ते एन्जॉय करीत असता.

तुझा आवडता रोमकॉम कलाकार कोण?

– जुद अ‍ॅपटोव्हच्या ‘धिस इज फोर्टी’ या सिनेमातला पोल रुद फार मजेशीर आहे. तो उत्तम अभिनेता आहे. तसंच सिनेमाही खूप चांगला आहे. त्यानंतर ‘थर्टी रॉक’ यातली टीना फे ही (?) सुद्धा उत्तम आहे. ते शोज लेखनाच्या बाबतीतही सर्वोत्तम ठरले आहेत.

‘भारतीय सिनेमामध्ये उत्तम लेखनाची कमतरता आहे’ अशी अनेकांची तक्रार असते.

– भारतीय सिनेमांमध्ये चातुर्य आहे. बिमल रॉय आणि सत्यजित रे यांसारखे दिग्गज फिल्म मेकर सिनेमे करीत होते. ते अनुभवी होते. प्रेम, आयुष्य या सगळ्याची त्यांना माहिती होती. पण, आज इंडस्ट्रीत असलेल्या काही तरुण लोकांकडचे अनुभव मर्यादित आहेत. उत्तम फिल्ममेकर होण्यासाठी आयुष्याचं गूढ, खोल ज्ञान असणं आवश्यक आहे. आकर्षक रंग, डान्स शोज म्हणजे बॉलीवूड या टॅगला आपण खोडून काढायला हवं. अनुभव नसलेली, अपरिपक्व इंडस्ट्री हेही खोटं ठरवायला हवं. मला असंही वाटतं की लंचबॉक्ससारखे सिनेमे निघत असतील तर हा टॅग फार काळ टिकेल. भारतीय कलाकार स्व-बळावर, त्यांनी केलेल्या उत्तम कामगिरीमुळे परदेशात जात आहेत. जागतिकीकरणामुळे वेगाने पुढे जाणं गरजेचं आहेच. पण, दुर्दैवाने त्याच वेळी आपल्याकडे उत्तम लेखकांची मात्र कमतरता आहे. अशा लेखकांची आवश्यकता आहे जे अनुभवी असतील, ज्यांना वाल्मीकी ते टागोर अशा सगळ्यांबाबत ज्ञान असेल आणि ते आत्मविश्वासाने सिनेमातल्या एखाद्या सीनमध्ये विशिष्ट घटना घडण्यामागची योग्य कारणंही सांगतील. मी तक्रार करत नाही. खरं तर सध्या आपण चांगल्या काळात आहोत. पण, तरी चांगल्या संहितांची कमतरता भासते. कदाचित मी वाचत असलेल्या संहिता चांगल्या नसतील. आमिर खान किंवा इतर कोणी कोणत्या स्क्रिप्ट वाचतं हे मला माहीत नाही; पण ज्या स्क्रिप्टची मला ऑफर येते त्या योग्य नसतात. त्या आणखी चांगल्या प्रकारे लिहायला हव्यात, असं मला वाटतं. कारण तिसरा अ‍ॅक्ट बिघडला तर त्यात कशी सुधारणा करायची हे सांगण्यासाठी मी लेखक नाही. लेखकांच्याही काही अडचणी असतील. पण, आपल्याकडचे अनेक सिनेमे साधारण एकाच धर्तीचे असतात. फक्त त्यातल्या मुख्य कलाकाराचं वय वाढलं की त्याच्या जागी दुसरा आणला जातो पण, कथा तीच असते. ‘स्टार ट्रेक’चं उदाहरण घ्या. यात इतरांपेक्षा एक वेगळा विचार मांडला आहे. अमेरिकी टीव्ही शोचा प्रत्येक एपिसोड उत्तमरीत्या लिहिलेला असतो. हिंदी सिनेमांच्या स्क्रिप्टबाबत असे किती जण म्हणतात, ‘स्क्रिप्ट खूपच चांगली आहे आणि मी तो सिनेमा शूट करण्यासाठी खूप उत्सुक आहे.’ असे अनेक जण असावेत असं वाटतं.

‘बुलेट राजा’ या सिनेमाच्या वेळी तू म्हणाला होतास की, दिग्दर्शकाचं व्हिजननुसार जाण्याची ती फेज होती..

– मी असं म्हणालो? पण, अशा अनुभवातून जाणं चांगलंच. बॉक्स ऑफिसवर काय होतंय ही पुढची गोष्ट आहे; पण असेही काही अनुभव असतात जिथे तुम्हाला वाटतं आपण केलेल्या कामात फारशी मजा नाही. त्या वेळी पुन्हा तेच काम करण्याचं तुम्ही टाळता; पण जे काम तुम्ही एंजॉय करता तेच पुन:पुन्हा करण्यासाठी तुमची हरकत नसते. तिगमांशु धुलिया आणि साजिद खान यांनी दुर्दैवाने ‘पानसिंग तोमर’ आणि ‘हाऊसफुल’ यांसारख्या सिनेमांची पुनरावृत्ती केली. ‘बुलेट राजा’पेक्षा ‘हमशकल्स’ बघणारे अधिक होते. तरी व्यक्तिश: मी ‘बुलेट राजा’ जास्त एन्जॉय केला.

तुझ्या यशस्वी रोमकॉम सिनेमांमध्ये ‘हॅपी एंडिंग’चा समावेश होईल असं वाटतं का?

– मी वेगळे प्रयोग करण्याच्या मूडमध्ये होतो तेव्हाच मी ‘हॅपी एंडिंग’सारखा सिनेमासारखा सिनेमा स्वीकारला. मी माझ्या प्रॉडक्शन टीमला सांगितलं होतं की मला सिनेमा वेगळाही हवा आणि दीर्घकाळ लोकांच्या लक्षात राहील असाही हवा. सिनेमाच्या क्षेत्रात नेहमी नशीब हा फॅक्टर महत्त्वाचा ठरतो. पण सुदैवाने ‘हॅपी एंडिंग’ यात एका रोमँटिक कॉमेडीसाठी आवश्यक त्या सगळ्या गोष्टी आहेत. स्वत:वर केलेले विनोद, उर्जा, एक्स गर्लफ्रेंड असे सगळे घटक त्यात आहेत.

प्रस्थापित कलाकारांपेक्षा नवोदित, तरुण कलाकार अधिकाधिक कामाच्या संधी कशा मिळतील याकडे बघत असतात. असं का?

– याचं कारण प्रस्थापित कलाकारांकडे गमावण्यासारखं बरंच काही असतं असं असू शकेल. एखाद्या सिनेमाने तिकीटबारीवर चांगली सुरुवात केली नाही, तर ते दुखावणारं असतं. जर बॉक्स ऑफिसवरचा आकडा तुमच्यासाठी महत्त्वाचा असेल, तर तशा प्रकारचे इतर सिनेमे आहेत; पण ते तुमच्या व्यक्तिमत्त्वावर आणि तुम्हाला आयुष्यात नेमकं काय हवंय यावरही अवलंबून असतं. मला नेहमी असं वाटतं की, बॉक्स ऑफिसवर हिट ठरणारेही सिनेमे करायला मिळावे आणि ‘परिणीता’सारख्या सुंदर सिनेमांमध्ये भूमिका करावी. मी अशा दोन्ही प्रकारचे सिनेमे केलेले तुमच्या लक्षात येईल. काही वेळा ते चालतात, तर काही वेळा नाही. मी ‘तारा रम पम’साठी दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदसोबत काम करत होतो तेव्हा ते मला सांगायचे, ‘आता तू बंगाली सेटवर नाहीस.’

माझ्या आईसारख्या काही यशस्वी कलाकारांनी सगळ्या प्रकारचे सिनेमे केले आहेत आणि हा समतोल तुम्हाला दीर्घायुष्य आणि आदर मिळवून देतो. नवोदित कलाकार अधिकाधिक काम करण्याची संधी शोधतात, कारण त्यांना नवनवीन गोष्टी जाणून त्यांचं त्याविषयीचं ज्ञान वाढवायचं असतं.

करिअरच्या सुरुवातीच्या काळात तुला संघर्ष करावा लागला का?

– जसा इतरांचा असतो तसाच. पण भाडय़ाच्या घरात राहणं, लोकांना कामासाठी भेटणं, अनेकांना भेटून काम न मिळणं हे खूप वाईट असतं. यश चोप्रा यांनी मला पहिलं काम दिलं तेव्हा ते म्हणाले होते, ‘मी असं ऐकलंय की, तू फार निष्काळजी आणि बेशिस्त आहेस. सुधारशील असं वचन देशील?’ मी लगेच म्हणालो, ‘हो, वचन देतो.’ मी असं वचन दिल्यानंतरच त्यांनी मला सिनेमात घेतलं. या दिवसानंतर माझं आयुष्यच बदलून गेलं; पण मी खरंच वाईट होतो, कारण मी काय करतोय, हे मला काही कळत नव्हतं. माझी ज्यासाठी निवड केली होती तिथवर पोहोचायला मला भरपूर वेळ लागला. साधारण वीस र्वष लागली; पण अधिकाधिक चांगलं काम करण्यासाठी मात्र मी मेहनत घ्यायचो.

खरं तर तू कोणत्याही प्रकारचं अभिनयाचं प्रशिक्षण घेतलं नाहीस. तरी या क्षेत्राकडे तू कसा वळलास?

– मी दिल्लीत राहत होतो. त्या वेळी इंग्लंडमध्ये काम करण्याच्या संधी हुकत होत्या. शिक्षणातही मला फारसा रस नव्हता, त्यामुळे मला पदवीही मिळू शकली नाही. माझ्या कुटुंबात माझ्याशिवाय इतर सगळे ऑक्सफर्डला गेले होते. उशिरा उठणं, पार्टी करणं असं माझं दिल्लीमधलं आयुष्य होतं. भविष्यात काय करायचं याबाबत मी दिशाहीन होतो. त्या वेळी माझ्या आई-वडिलांचा मित्रपरिवार म्हणायचा, ‘तुला सिनेमात जायचंय का?’ मला मुंबईत येऊन या क्षेत्रात काम करण्याची उत्सुकता असायची, कारण मुंबईत काम करण्याची ऊर्जा अवर्णनीय आहे. मी स्व:ला नशीबवान समजतो की, सगळ्या गोष्टी जमून आल्या.

स्टारडम असणं आणि चांगला अभिनय करता येणं या दोन्ही गोष्टी एकत्र नांदू शकतात का?

– आपण हॉलीवूड कलाकारांप्रमाणे का राहू शकत नाही, याचं कारण कळत नाही. मला ज्या भूमिका मिळाल्या त्या माझ्यामधल्या मर्यादांसह मी केल्या, हे मला माहीत आहे; पण आता मी पुरेसा वेळ घेऊन निर्णय घ्यायला आवडेल. माझ्या परिचयाच्या काही दिग्गजांशी एखाद्या भूमिकेसाठी कशा प्रकारे तयारी करायची याबाबत चर्चा करीन. मी काम केलेल्या अनेकांनी असं केलं आहे. विशाल भारद्वाज यांनी नसीरुद्दीन शहा यांना एखाद्या भूमिकेची तयारी कशी करावी याविषयी आमच्याशी बोलण्यासाठी बोलावलं होतं. असं काही तरी आयुष्यात मिळणं ही मोठी आणि महत्त्वाची गोष्ट आहे. हे क्षेत्र स्पर्धात्मक, तणावाचं आहे अशा नकारात्मक गोष्टीतच आम्ही अडकतो; पण खरं तर ते खूप सुंदर आहे. ‘स्टार’ असण्याची आणखी एक अडचण म्हणजे त्याची इमेज. मी अशा काही कलाकारांना भेटलोय की जे ‘मी पाच हजार सिनेमे केले आहेत’ असं म्हणतात. माझ्या मते, ही मोठी गोष्ट नाही. सहा सिनेमे केले तरी हरकत नाही पण, ते चांगले असावे.

अभिनय करणं हे उत्स्फूर्त असू शकत नाही. अभिनयाच्या कार्यशाळा त्यासाठी उपयुक्त ठरतात?

– इंडस्ट्रीत अनेक वर्षांचा अनुभव असला तरी प्रत्येक नव्या कामासाठी उत्साह टिकवून ठेवणं हे आव्हानात्मक असतं. एखाद्या भूमिकेसाठी तुम्ही वापरत असलेलं तंत्र थेट प्रेक्षकांना कळता कामा नये. पण, त्यामागे विशिष्ट तंत्र असणं आवश्यक असतं. एखादी चांगली संहिता मिळणं, एखाद्या शिक्षकाने ती संपूर्ण संहिता बघणं आणि त्यानंतर परफॉर्म हे करणं मला आवडतं. ‘ओमकारा’ आणि ‘परिणिता’ या दोन सिनेमांच्या वेळी मी हे तंत्र वापरलं होतं आणि या दोन्ही सिनेमांतला माझा परफॉर्मन्स चांगला झाला होता.

तुला कधी रंगभूमीवर काम करावंसं वाटत नाही?

– नाटक करणं हे उत्तमच आहे. पण, सिनेमात काम करताना तुम्हाला हवं तितका वेळ तुमच्या भूमिकेचा सराव करता येतो. तसंच एकच भूमिका सतत करणं मला कितपत जमेल माहीत नाही. मी रंगभूमीचा आदर करतो. रंगभूमीवर काम करणाऱ्या कलाकारांना बघून मला आनंदही मिळतो. पण, ते करावंसं वाटत नाही.

इंडस्ट्रीत गुणवत्तेला महत्त्व आहे की इंडस्ट्रीतल्या कौटुंबिक पाश्र्वभूमीला?

– बॉलीवूड हे असं क्षेत्र आहे, जिथे तुम्ही कुठून आलात, सिने इंडस्ट्रीत कुटुंबातलं कोणी आहे का यापेक्षा तुमच्या गुणवत्तेलाच महत्त्व दिलं जातं. कारण जोवर प्रेक्षकांना तुमचं काम आवडतंय तोवर यश तुमच्यासोबतच असतं.
अनुवाद – चैताली जोशी
(‘स्क्रीन’मधून)