09 December 2019

News Flash

अक्षम्य नाकर्तेपणा!

इतिहास, पारंपरिक वारसा आणि त्याचे जतन व संवर्धन या विषयावर एक जागतिक परिषद अमेरिकेमध्ये सुरू होती. इतिहास किंवा पारंपरिक वारसा असे शब्द आले की, भारताचे

| July 25, 2014 01:29 am


इतिहास, पारंपरिक वारसा आणि त्याचे जतन व संवर्धन या विषयावर एक जागतिक परिषद अमेरिकेमध्ये सुरू होती. इतिहास किंवा पारंपरिक वारसा असे शब्द आले की, भारताचे नाव प्रामुख्याने येतेच. कारण जगातील प्राचीनतम असलेल्या आणि परंपरेचा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या देशांमध्ये भारत, चीन, इजिप्त आदींचा समावेश होतो. या विषयामध्ये तज्ज्ञ असलेली जगभरातील नामवंत मंडळी या परिषदेमध्ये सहभागी झाली होती. चर्चा भारताच्या बाबतीत सुरू झाल्यानंतर मात्र सर्वच तज्ज्ञांनी पारंपरिक वारशाच्या संदर्भात भारतीयांचे होत असलेले दुर्लक्ष आणि कदर न करण्याची वृत्ती यावर टीकेची एकच झोड उठवली. त्याच परिषदेमध्ये सहभागी झालेल्या एका भारतीय तज्ज्ञालाही भारतीयांच्या मानसिकतेची पूर्ण कल्पना होती. पण आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाची होत असलेली हेटाळणी त्याला पाहावली नाही. अखेरीस त्याने त्या सर्व आक्षेपांना थोडक्यात उत्तर दिले. तो म्हणाला की, तुम्ही सारे म्हणताय ते भारताच्या बाबतीत खरे आहे. पण हे असे का आहे? याचाही विचार एकदा कधी तरी करा की! ज्या अमेरिकेमध्ये ही परिषद होते आहे, तिला अवघ्या पाचशे वर्षांचा इतिहास आहे. आणि तुलनेने भारतासारख्या देशाला हजारो वर्षांचा. तेच इतिहासाच्याही बाबतीत आहे. अमेरिकेसारखे देश वेगवगळे तुकडे जोडून इतिहासाचे एक चित्र उभे करण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यामुळे इतिहासाचा एखादा तुकडा सापडला तरी अमेरिकन्स भारावून जातात आणि त्याच्या संवर्धनाच्या कामी स्वतला जोडून घेतात. भारतीयांना असे करण्याची गरज वाटत नाही. कारण इतिहास त्यांच्या घराच्या व्हरांडय़ात आणि परसदारीही असतो. गावामध्ये हजारो वर्षे असलेल्या अनेक गोष्टी अशाच पडलेल्या असतात आणि कमी अधिक फरकाने हे सर्वच गावांच्या बाबतीत लागू आहे. मग कधी ती देवळं असतात तर कधी इतर काही अवशेष! त्यामुळे एखादा नवीन इतिहासाचा तुकडा सापडला काय किंवा गमावला काय भारतीयांना त्याचे फारसे काही वाटत नाही!.. त्याच्या या भाषणानंतर भारतावरच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला किंबहुना त्याच्या बोलण्यातील आवेशामुळे तर आपल्याला भारताएवढा गौरवशाली इतिहास नसल्याची खंतच इतरांच्या मनात अधिक बळावली! ..पण त्या तज्ज्ञाला मात्र देशातील इतिहासाच्या हेळसांडीने अस्वस्थ करून सोडले होते!
गेल्याच आठवडय़ात शुक्रवारी घडलेल्या गुजरातमधील एका दुर्घटनेनंतर हा किस्सा आठवला आणि प्रश्न मनात आला की, आता या लज्जास्पद दुर्घटनेनंतर त्या तज्ज्ञाच्या मनात काय प्रतिक्रिया उमटतील? गुजरातेतील गिरनार येथे असलेला सम्राट अशोकाच्या राजाज्ञेचा शिलाखंड हा भारताच्या इतिहासातील सर्वात जुना लिखित स्वरूपातील पुरावा आहे. प्राचीन भारतात होती ती, मौखिक परंपरा त्यामुळे आपल्याकडे परंपरेने सारे काही मौखिक रूपात लक्षात ठेवले जाते. लिखित स्वरूपातील बाबी तुलनेने खूप उशिरा म्हणजेच इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकापासून सापडतात. त्या लिखित पुराव्यामध्ये हा सर्वाच प्राचीन पुरावा आहे. सुमारे २३०० वर्षे उन्हापावासाचे आणि निसर्गाचे अनंत तडाखे सहन करूनही हा शिलाखंड आजवर ताठ मानेने उभा होता. या शिलाखंडाचे महत्त्व लक्षात आल्यानंतर त्याचे संरक्षण व्हावे म्हणून काही वर्षांपूर्वी त्याच्याभोवती एक संरक्षक वास्तू बांधण्यात आली. हीच संरक्षक सरकारी वास्तूच जीर्ण होऊन गेल्या आठवडय़ात शिलाखंडावर कोसळली.
या शिलाखंडावर सम्राट अशोकाच्या राजाज्ञा ब्राह्मी लिपीमध्ये कोरलेल्या आहेत. या राजाज्ञा म्हणजे समाजाला दिलेली एक प्रकारची नैतिक शिकवणच आहे. या एकूण १४ राजाज्ञांमध्ये प्राणीहत्या करू नका, तीर्थक्षेत्रांना भेटी द्या, अनैतिक वर्तन करू नका, आई-वडिलांशी व समाजातील ज्येष्ठांशी चांगले वागा आदींचा समावेश आहे. असे न वागणाऱ्यास कडक शासन करण्याचे सूतोवाचही यामध्ये करण्यात आले आहे. माणसांसाठी व प्राण्यांसाठी रुग्णालये उभारावीत, औषधी वनस्पतींचे उत्पादन करावे आदी राजकर्तव्यांचाही उल्लेख त्यात आहे. भारतीय इतिहासामध्ये या शिलाखंडाला सर्वाधिक महत्त्व आहे. कारण तोच भारतीय इतिहासाचा पहिला लिखित पुरावा आहे. किंबहुना म्हणूनच त्याची प्रतिकृती नवी दिल्ली येथील राष्ट्रीय संग्रहालयाच्या प्रवेशद्वारी उभारण्यात आली आहे.
इतिहास आणि पुरातत्त्वविज्ञानाच्या अभ्यासकांसाठी असे शिलालेख खूप महत्त्वाचे असतात. कारण त्या माध्यमातून इतिहासातील अनेक कोडी उलगडतात किंवा काळानुसार स्थित्यंतरे कशी येत गेली त्याची कल्पनाही अभ्यासकांना येते. आज आपल्याला जो इतिहास वाचायला मिळतो किंवा आपण अभ्यासतो, त्याची जुळणी अभ्यासकांनी अशा शेकडो शिलालेखांच्या अभ्यासातून सिद्ध केली आहे. यावरून कोणत्या कालखंडात, कोणता राजा झाला किंवा त्यांचे साम्राज्य किती दूरवर पसरले होते, त्याची नेमकी कल्पना येते. त्यावेळच्या प्रथा-परंपरांची माहिती मिळते. सम्राट अशोकाच्या काळात भारत हे प्रगत राष्ट्र होते, याचा अंदाज जगभरातील तज्ज्ञांना आला तो प्राण्यांसाठीही रुग्णालये काढणाऱ्या अशोकाच्या या राजाज्ञेवरूनच!
केवळ सामाजिक काम म्हणून नव्हे तर त्यावेळचे बांधकामही किती पक्के टिकणारे होते, याचीही कल्पना याच शिलाखंडावरील लेखनातून इतिहासतज्ज्ञांना आली. या शिलाखंडावर रुद्रदमनचाही शिलालेख आहे. त्यात सम्राट अशोकाच्या वडिलांनी बांधलेल्या सुदर्शन तलावाचा उल्लेख आहे. हा तलाव सलग एक हजार वर्षे वापरात होता. त्याची डागडुजी नंतर रुद्रदमन याने केली, असा उल्लेख शिलालेखात आहे. म्हणजे त्याचवेळचे बांधकाम किती पक्के होते, ते आपल्याला कळते! दुरुस्ती एक हजार वर्षांनंतर करावी लागली! नाही तर आता बांधकाम केले की, लगेचच त्या पाठोपाठ दुरुस्तीला सुरुवात होते. मुंबईमध्ये तर जनतेला वेदना देत िदडोशी पुलाचे काम तब्बल दोन महिने बंद ठेवून सुरू होते. त्या दोन महिन्यांत कंत्राटदाराने काय केले ते जनतेला सांगण्याचे काम पहिल्या पावसाने केले. त्यावर निकृष्ट कामामुळे मोठाले खड्डे पडले होते. इतकेच काय तर अशोकाच्या या शिलाखंडाने साऱ्या गोष्टींना सहन केले. ऊन-पाऊस सारे काही, पण सरकारी अनास्था मात्र त्यालाही सहन करता आली नाही. अखेरीस सरकारी अनास्थेचे छत त्यावर कोसळलेच!
ही सरकारी अनास्था काही केवळ गुजरात सरकार किंवा आर्किऑलॉजीकल सव्‍‌र्हे ऑफ इंडियाची नाही. महाराष्ट्रात तर ती पदोपदी दिसते आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी जीवाचे रान करून गडकोट वसवले. त्यांनीच त्याच्या संवर्धनाचे पहिले धडेही महाराष्ट्राला दिले. पण आज छत्रपतींनी दिलेल्या धडय़ांचा विसर आपल्याला पडला आहे. लोकांनी शिवछत्रपतींचेच नाव घेऊन वेगवेगळे उद्योग आरंभले आहे. कुणी त्यांच्याच चित्रांचा बाजार मांडला आहे तर कुणी त्यांचे नाव घेऊन सत्तेत येण्याची भाषा करतो. त्यांचे नाव घेऊन सत्तेत आलेले युतीचे सरकारही या महाराष्ट्राने पाहिले पण गडकिल्ल्यांच्या बाबतीत कोणताही फरक पडला नाही. सध्या सरकारला स्वप्ने पडतात ती, छत्रपतींचे सागरी स्मारक उभारण्याची. पण ज्या गडकिल्ल्यांमध्ये छत्रपतींची स्वप्ने पाहिली आणि या महाराष्ट्राचे हिंदूवी स्वराज्याचे स्वप्न पाहिले त्या वारसा लाभलेल्या वास्तूची आपण कदरच केलेली नाही. काही ठिकाणी तर वास्तूंच्या संवर्धनाच्या नावाखाली केवळ पैशांची लूट चालू आहे. रसाळगडावर संवर्धनाच्या नावाखाली झालेल्या खर्चाने कोटींचे आकडे गाठले आणि झाले ते विद्रुपीकरण आणि झोलझाल! छत्रपती असते तर कडेलोटाची शिक्षा बहुधा दररोजच कुणाला ना कुणाला तरी करावी लागली असती! भ्रष्टाचाराचे माजलेले तण आता जंगल होऊ पाहाते आहे.
या पाश्र्वभूमीवर कुणी एखादा इतिहासप्रेमी थेट उच्च न्यायालय गाठतो तेव्हा निर्लज्ज सरकारी अधिकारी न्यायालयात सांगतात, ‘निसर्गामुळेच पडझड होते, तोच या वास्तूंच्या पडझडीला कारणीभूत आहे, त्याला आम्ही काय करणार?’ स्वत:चे कर्तव्यापासून ढळणे, बेजबाबदार नाकर्तेपणा हा असा निसर्गावर दोषारोप ठेवून झाकण्याचा प्रयत्न केला जातो आहे.
खरेतर अजूनही वेळ गेलेली नाही, तो तज्ज्ञ अमेरिकेतील परिषदेत म्हणाला त्याप्रमाणे इथल्या घरांच्या व्हरांडय़ात आणि परसदारात इतिहास खेळतो आहे, त्याची जाण ठेवून जपणुकीची पावले तात्काळ उचलायला हवीत. अन्यथा सध्या जमिनीवर दिसणाऱ्या या इतिहासाच्या पाऊलखुणा काळाच्या उदरात गडप होतील आणि मग केवळ त्या पुस्तकामध्येच पाहाव्या लागतील.. मग एक दिवस ते पुस्तकही शिल्लक राहील की नाही माहीत नाही. मग स्वतच्याच इतिहासाचे तुकडे शोधत फिरत ते पुन्हा नव्याने ते तुकडे जोडत इतिहास लिहीत बसण्याची वेळ आपल्यावर येईल!
 

First Published on July 25, 2014 1:29 am

Web Title: samrat ashok shilalekh
Just Now!
X