हिंदी चित्रपटसृष्टीतला गुणी कलावंत संजीवकुमारच्या निधनाला या सहा नोव्हेंबर रोजी २९ वर्षे झाली. आपल्या अभिनयाचा ठसा उमटवूनही स्टार न बनलेल्या संजीवकुमारचे स्मरण-

काळाच्या कसोटीवर उतरतो आणि आपले अस्तित्व अधोरेखित करतो, तोच खरा कलाकार.

हरीभाई जरीवाला अर्थात संजीवकुमार तसा होता.

त्याला अवघे सत्तेचाळीस वर्षांचे आयुष्य लाभले, त्यात गुजराती रंगभूमीपासूनचा अभिनय प्रवास मोजला तर त्याला पंचवीस वर्षांची कारकीर्द लाभली. त्यात हिंदी चित्रपटातील वाटचालीचा विचार करताना फक्त वीसच वर्षे मिळाली. तरी तेवढय़ातही त्याने आपल्या अष्टपैलू कारकिर्दीचा कायमस्वरूपी ठसा उमटवला.

लौकिक अर्थाने संजीवकुमार ‘स्टार’ कधीच नव्हता, पण ‘गुणी अ‍ॅक्टर’ मात्र होता.

६ जुलै १९३८ ते ६ नोव्हेंबर १९८५ एवढा त्याचा जीवनप्रवास! सुरतमध्ये जन्म झालेल्या संजीवकुमारची कर्मभूमी मुंबई ठरली. १९६० सालच्या सुनील दत्तची भूमिका असणाऱ्या ‘हम हिन्दुस्थानी’त छोटीशी भूमिका साकारत संजीवकुमार हिंदी चित्रपटाच्या विश्वात आला, पण त्याला ‘पूर्ण लांबीची भूमिका’ मिळण्यासाठी पाच वर्षे प्रयत्न करावे लागले. त्यानंतरही ‘निशान’ या स्टंटपटात त्याला ‘नायक’ पदाची संधी लाभली. मिशा वाढलेला, तलवारबाजी करणारा, चक्क नाटकी संवाद बोलणारा असा संजीवकुमार असू शकतो ही वस्तुस्थिती होती. सुरुवातीच्या दिवसात त्याने स्मगलर, हुस्न और इश्क, बादल, गुनहगार अशा ‘दे-मार’ चित्रपटांतून भूमिका केल्या. हे दारासिंग-रंधवा यांच्या पठडीतील चित्रपट होते. देवकुमार अशा चित्रपटातूनच वावरायचा. चित्रपटसृष्टीच्या आपण लक्षात येण्यासाठी आणि मिळणाऱ्या प्रत्येक संधीतून स्वत:चे अस्तित्व वाढवत नेण्यासाठी अशाही चित्रपटातून वाटचाल करावी लागे, ही त्या काळाची गरज होती.

तो काळ दिलीपकुमार, देव आनंद व राज कपूर या त्रिमूर्तीचा प्रचंड दबदबा असणारा होता. राजेंद्रकुमार त्या वेळी कुमार म्हणून लोकप्रिय होता. बलराज साहनी, सुनील दत्त, शम्मी कपूर, राजकुमार या चौघांची चार वैशिष्टय़े होती. शशी कपूर, धर्मेद्र जम बसवण्यासाठी धडपडत होते. राजेश खन्ना, जितेंद्र यांचे याच काळात आगमन झाले. पाठोपाठ अमिताभ बच्चनही आला. विनोद खन्ना, शत्रुघ्न सिन्हा याच गर्दीत खलनायकाकडून नायकाच्या भूमिकेकडे वळले होते. विश्वजीत, जॉय मुखर्जी, नवीन निश्चल, विनोद मेहरा ही नाणी काही काळ चालली, या हिंदी चित्रपटसृष्टीला नेहमीच ‘गल्लापेटी’वर चकाकणारी नाणी हवी असतात.

या साऱ्यात अभिनयाचे खणखणीत नाणेच संजीवकुमारला उपयोगी पडणारे होते.

एच.एस. रवेल दिग्दर्शित ‘संघर्ष’मध्ये छोटीशी भूमिका साकारतानाही दिलीपकुमारबरोबरच्या एका दृश्यात संजीवकुमारने आपला प्रभाव दाखवला आणि संजीवकुमार नावाला सर्वप्रथम वलय आणि वजन प्राप्त झाले.

संजीवकुमारची वाटचाल विविध प्रकारे आकाराला येत गेली.

त्याने अन्य नायकांच्या चित्रपटात दुसरा नायक साकारणे (‘शिकार’मध्ये धर्मेद्र, ‘बंधन’ व ‘आप की कसम’मध्ये राजेश खन्ना नायक, असे अनेकदा घडले), आपल्या प्रत्यक्ष वयापेक्षा मोठय़ा वयाच्या भूमिका साकारणे (‘शोले’तील ठाकूर बलदेवसिंग, ‘शतरंज के खिलाडी’मधील मिर्जा सज्जाद अशी), पिता व पुत्र अशा दोन्ही भूमिका साकारणे (‘विश्वासघात’ चित्रपटात त्याने या दोन भूमिकांचा दूरध्वनीवरून एकमेकांशी संवाद साधण्याचा प्रसंग उत्तमरीत्या साकारला). चरित्र भूमिकाही केल्या.

संजीवकुमार कोणत्याही ‘चौकटी’त मावणारा अथवा सामावणारा ‘कलाकार’ नव्हता. म्हणूनच तो ज्या सहजतेने ‘खिलौना’मध्ये विजयकमल सिंह हा वेडा साकारण्यात यशस्वी ठरला, तेवढाच तो ‘स्वर्ग नरक’मध्ये पंडित सोहनलाल त्रिपाठी असा खूप गोड बोलत आपले हित साधण्यातही तेवढाच प्रभावी ठरला.

गुलजार दिग्दर्शित ‘परिचय’ , ‘कोशिश’, ‘मोसम’ व ‘आंधी’ या चित्रपटांतील संजीवकुमार एकमेकांपेक्षा वेगळा! ‘कोशिश’मध्ये जया भादुरीसोबत त्याने मुका-बहिरा साकारताना आपली गुणवत्ता दाखवून दिली ‘मौसम’मधील त्याची भूमिका प्रियकर ते दुर्दैवी पिता अशी होती. हा चित्रपट गुलजार यांनी आपल्या नेहमीच्या ‘फ्लॅशबॅक’ तंत्राने साकारला. या पित्याची एका शरीरविक्रय करणाऱ्या युवतीशी (शर्मिला टागोर) भेट होते नि तो आश्चर्यचकित होतो. कारण तिचा चेहरा त्याच्या तरुणपणाच्या प्रेयसीच्या (शर्मिला टागोर) चेहऱ्याशी साम्य साधणारा असतो. ही आपलीच मुलगी असल्याची त्याला खात्री पटते, पण दरम्यान त्याच्या आयुष्यात काय बरे घडलेले असते? आपण संजीवकुमारच्या व्यक्तिरेखेशी एकरूप होत होत चित्रपट पाहतो. तेवढा विश्वास त्याने आपल्या अभिनयातून निर्माण केला. ‘आंधी’त त्याची पत्नी आरतीदेवी (सुचित्रा सेन) राजकारणातील एक मोठी शक्ती असते. तिचे राजकीय शह-काटशह-डावपेच यामध्ये गुंतून जाणे त्यांच्या भेटीत विघ्न आणते. राजकारणाच्या पाश्र्वभूमीवरील ही अनोखी प्रेमकथा होती.

संजीवकुमारने कायम व्यक्तिरेखेला प्राधान्य दिले म्हणूनच तर यश चोप्रा यांच्या ‘त्रिशूल’मध्ये त्याचा उद्योगपती आर.के.गुप्ता खूप वेगळा ठरला. वयात आलेला विजय (अमिताभ बच्चन) कायम त्याचा दुस्वास करतो, कारण आपल्या आईची (वहिदा रहेमान) त्याने पूर्वी फसवणूक केली व त्यातून आपण अनौरस पुत्र म्हणून जन्माला आलो अशी त्याची भावना असते.

रवी टंडनच्या ‘अनहोनी’तील वेडा, राहुल खेर दिग्दर्शित ‘बीवी ओ बीवी’मधील नाटक्या, राजा नवाथे दिग्दर्शित ‘मनचली’मधील गुलछबू अशा त्याच्या किती प्रकारच्या भूमिका सांगाव्यात तेवढे थोडेच! ‘चेहरे पे चेहरा’तील दुभंगलेले व्यक्तिमत्त्व, ‘नया दिन नयी रात’मधील नऊ रूपे अशी केवढी तरी विविधता त्याने सहजतेने दिली.

सुभाष घई दिग्दर्शित ‘विविधा’त एका आक्रमक दृश्यात दिलीपकुमारला तो गप्प करत धाडकन दरवाजा लावून घेतो आणि चित्रपटाचे मध्यंतर होते, त्यावरून संजीवकुमारने दिलीपकुमारला पुरते खाल्ले यावरून प्रचंड चर्चा झाली. दिलीपकुमारच्या एकनिष्ठ भक्तांना हे पचवणे जड जात होते, संजीवकुमरचे चाहते खूप होते, पण ते त्या काळातील राजेश खन्ना व अमिताभ यांच्या निस्सीम चाहत्यांसारखे आक्रमक नसत. म्हणूनच तर तेव्हा नेहमी असे म्हटले जाई की, संजीवकुमार कितीही गुणी असला तरी तो अन्य नायकांसमोर आपले अस्तित्व दाखवू शकतो, पण एकटय़ाच्या बळावर चित्रपट यशस्वी करू शकत नाही. हिंदी चित्रपटसृष्टी कायम ‘हुकमी गर्दी खेचणाऱ्या’ चेहऱ्यांना पसंती देते, संजीवकुमारचे ‘एकटा हिरो’ असणारे अनहोनी, मनचली (दोन्हीत लीना चंदावरकर नायिका), उलझन ( सुलक्षणा पंडित)असे काही मोजकेच चित्रपट यशस्वी ठरले. विशेष म्हणजे या चित्रपटांच्या निर्मितीकाळात तो आपल्या या नायिकांच्या प्रचंड प्रेमात पडल्याचे प्रकरण गाजले. इतके की, त्याच्या अकाली निधनामुळेच तर सुलक्षणा पंडित कायम अविवाहित राहिली. ‘देवी’ चित्रपट निर्मितीच्या काळात तो नूतनकडे आकर्षित झाला, पण तो नूतनला ओळखण्यात बहुधा कमी पडला असावा, कारण त्याची चंचलता न आवडल्याने एकदा तिने त्याच्या कानाखाली खेचल्याचे प्रकरण खूप गाजले. अशा गोष्टींना खूप मीठ-मसाला लावून पसरवले जाते. तसा तो हेमामालिनीच्याही अखंड प्रेमात होता, तिलाही ते न आवडल्याने दोघांची भूमिका असणाऱ्या ‘धूप छाँव’ चित्रपटासाठी हेमाने तारखा देण्यात प्रचंड टाळाटाळ केली.

संजीवकुमारने प्रेमप्रकरणात सतत मार खाल्ला, म्हणूनच तो अविवाहित राहिला.

तसा तो शौकिन! अमेरिकेवरून बायपास शस्त्रक्रिया करून आल्यावरही त्याने आपले सिगारेट वगैरे शौक थांबवले नाहीत. कांच की दिवार, प्रोफेसर की पडोसन या चित्रपटांच्या निमित्ताने त्याची भेट घेण्याचा योग आला असता त्याच्या बौद्धिक कुवतीचा झक्कास प्रत्यय आला, पण त्या प्रत्येकी चाळीस मिनिटांच्या भेटीत त्याने किती सिगारेट पेटवल्या याची गणतीच नाही. मधूनच तो लहरी बेफिकीरही वाटे.

त्याच्या अंत्यदर्शनासाठी गेलो असतानाचा अनुभव या क्षेत्राचा वेगळा रंग दाखवणारा ठरला.

तो तेव्हा पाली हिलवरील पेटीट हायस्कूलच्या शेजारच्या इमारतीत राहायला होता. संजीवकुमारचा मृतदेह निपचित पडून असतानाच राजेश खन्ना आला आणि पटकन काही दिग्दर्शक व फोटोग्राफर त्याच्या भेटीसाठी धावले.

त्यांचे तरी काय चुकले? संजीवकुमार हयात असतानाही तसा स्वत:च्याच कर्तृत्वाने मार्ग काढत होता, आता तर तो या जगातच नव्हता..

इमान, देवता, मनोरंजन, अपने रंग हजार, आक्रमण.. संजीवकुमारची किती रुपेरी रूपे सांगावीत?

तो एक होता की अनेक असा प्रश्न पडावा अशी त्याची वाटचाल होती.

पण तेवढय़ा उंचीचे त्याचे कौतुक मात्र कधीच झाले नाही. कारण तो ‘स्टार’नव्हता.