पुण्या-मुंबईत आयुष्य घालवलेल्या आशा कामत आणि प्रतिभा सेनगुप्ता या दोघी बहिणी. यजमानांच्या बदलीच्या नोकरीमुळे आशाताईंना नियमित नोकरी करता आली नाही. पण मुलांना शिकवण्याची हौस आणि सामाजिक जाणिवेपोटी आशाताई शक्य तिथे शाळकरी मुलांच्या शिकवण्या घेत राहिल्या. प्रतिभाताईंनी पुण्याच्या प्रसिद्ध अंध शाळेत तीन दशकं सेवा बजावली. या दोघींनी अंध मुलांसाठी काम करण्याचा संकल्प सोडला.
रत्नागिरी जिल्ह्य़ातल्या मंडणगड तालुक्यात घराडी येथील त्यांच्या माहेरच्या लहानशा जागेत सुरू झालं- स्नेहज्योती निवासी अंध विद्यालय! अर्थात प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यापूर्वी या दोघींनी नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड (नॅब) आणि नॅशनल फेडरेशन ऑफ ब्लाइंड या संस्थांच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना भेटून कोकणातल्या अंध लोकांच्या प्रश्नांची, परिस्थितीची माहिती करून घेतली. दुर्गम भागातल्या खेडय़ांमध्ये जाऊन तिथे असलेल्या अंध मुलांच्या पालकांच्या गाठी-भेटी घेतल्या. त्यांच्या घरातल्या अंध मुलाबद्दल माहिती गोळा केली. अशा मुलांसाठी आपण सुरू करीत असलेल्या निवासी शाळेची माहिती देऊन त्यांच्या पाल्याला या शाळेत पाठवण्याबाबत विनंती केली. चार-पाच मुलांचे पालक तयार झाल्यानंतर २००३ च्या मार्च महिन्यात शाळेचं प्रत्यक्ष काम सुरू झालं. आज या शाळेत चार-पाच वर्षांपासून अठरा-एकोणीस वर्षांपर्यंतची एकूण ३० मुलं-मुली शिकत आहेत.
ाा शाळेतली मुलं दररोज सकाळी पाच वाजता उठल्यानंतर थोडा वेळ व्यायाम आणि त्यानंतर गायन-वादनाचा सराव करतात. सकाळी आठ ते साडेनऊ या वेळात अभ्यास केल्यानंतर अकरा वाजता शाळा सुरू होते. संध्याकाळी पावणेपाच वाजता शाळा सुटल्यानंतर मुलांना थोडा मोकळा वेळ दिला जातो. त्यानंतर जेवण आणि थोडा वेळ अभ्यास करून घेतला जातो. पहिली ते आठवीपर्यंतच्या या शाळेत मुलांसाठी तीन विशेष शिक्षक, एक कला शिक्षक आणि दोन संगीताचे शिक्षक आहेत. त्याव्यतिरिक्त पाच वसतिगृह कर्मचारी आहेत. ‘स्नेहज्योती’च्या मुला-मुलींचा खास वाद्यवृंद आहे. दापोली तालुक्यातील कुडावळे येथील वीणाताई महाजन यांच्याकडे ही मुलं संगीताचं शास्त्रीय शिक्षण घेऊन गांधर्व महाविद्यालयाच्या परीक्षांनाही बसतात. त्यांपैकी १४ जणांनी या परीक्षांमध्ये विशेष प्रावीण्य मिळवलं आहे. अमेरिकेतील दलाल परिवाराच्या उदार देणगीतून साकार झालेल्या खास संगीत दालनामध्ये सर्व प्रकारची वाद्यं आधुनिक ध्वनिव्यवस्थेसह मुलांना उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
एखाद्या कुटुंबात मतिमंद, मूकबधिर किंवा अंध मूल जन्माला आलं की त्या कुटुंबाच्या आनंदावर स्वाभाविकपणे विरजण पडतं. नियतीने दिलेलं दु:ख पचवून काही पालक त्या मुलाचं आयुष्य सुसह्य़ कसं होईल, यासाठी प्रयत्न सुरू करतात. अशा वेळी ‘स्नेहज्योती’सारख्या संस्था त्यांच्यासाठी मोठा आधार असतात. पण त्याबाबतचे आशाताईंचे अनुभव वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. काही पालक आपल्या मुलांची नियमितपणे चौकशी करतात. गणपती, दसरा-दिवाळी किंवा उन्हाळी सुट्टीत त्यांना घरी घेऊन जातात आणि सुट्टी संपल्यावर पुन्हा शाळेत आणून सोडतात. पण काही पालक असं मूल शाळेवर सोपवून त्याला जणू विसरूनच जातात. लांजा तालुक्यात चिरेखाणीवर काम करणाऱ्या एका बिहारी कष्टकरी दाम्पत्याच्या पोटी जन्माला आलेली पूजा तुरा ही जन्मांध मुलगी जेमतेम तीन वर्षांची असताना तिला घरात एकटं सोडून आई-बाप परागंदा झाले. लहानग्या पूजाच्या रडण्याचा आवाज ऐकून शेजाऱ्यांनी घरात डोकावून पाहिलं तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर सर्व कायदेशीर सोपस्कार पूर्ण करून तिला आशाताईंच्या स्वाधीन करण्यात आलं. रत्नागिरीच्या स्वयंसेतू संस्थेच्या श्रद्धा कळंबटे यांनी त्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. उत्तम मराठी बोलणारी पूजा आता या संस्थेत चांगली रुळली आहे. इथे येणाऱ्या अपरिचितांशीही ती अतिशय चुणचुणीतपणे संवाद साधते. आशाताईंमुळे तिला मायाळू आधार लाभला आहे.
यंदा संस्थेच्या वाटचालीची दशकपूर्ती झाली. त्यानिमित्त आयोजित सोहळ्याला क्रिकेट जगतातला जादूगार सचिन तेंडुलकर उपस्थित राहिल्यामुळे सर्वासाठी हा सोहळा अविस्मरणीय ठरला.

संस्थेपर्यंत कसे जाल?
मुंबई-गोवा महामार्गावर माणगावजवळ आंबेत फाटय़ाला वळून मंडणगडमार्गे सुमारे ४० किलोमीटर अंतरावरील घराडी इथे असलेल्या स्नेहज्योती निवासी अंध विद्यालयाला आपण भेट देऊ शकतो. दापोलीपासून सुमारे ३५ किमी अंतरावर असलेल्या या संस्थेत आपण जाऊ शकतो.

goa mango farmers deploy jamun to fight
फक्त १० रुपयांच्या जांभळांनी वाचवा आंब्याची बाग? शेतकऱ्याने सांगितला माकडांच्या हल्ल्यापासून वाचण्याचा हटके जुगाड!
Harsha Bhogle's reaction to Hardik Pandya
IPL 2024 : ‘त्याची चूक काय…’, हार्दिकवर होणाऱ्या टीकेवर दिग्गज समालोचक संतापला, टीकाकारांना दाखवला आरसा
child who fell into the open canal rescued
सोलापूर: उघड्या कूपनलिकेत पडलेल्या बालकास सुखरूप बाहेर काढण्यास यश
Loksatta anvyarth wheat rates Pradhan Mantri Garib Kalyan Food Yojana to Central Government
अन्वयार्थ: गव्हाचा सरकारी तिढा!