महालक्ष्मीच्या वर्दळीच्या रस्त्यावर ई मोझेस रोडवरील आनंद निकेतन म्हणजे विविध क्षेत्रांत काम करत असलेल्या सामाजिक संस्थांचे कार्यस्थळ. तिथे कॅन्सर पेशंट्स एड सोसायटीचे छोटेखानी कार्यालय आहे. या कार्यालयाच्या मागच्या भागातच सामान घेऊन जाणारा ट्रक दिसत होता. वस्तूंनी भरलेली मोठमोठी खोकी बांधून ठेवलेली होती. मागच्या बाजूला पणत्यांचे कच्चे सामान रचून ठेवले होते. तिथेच मधल्या भागात लावलेल्या लांबच लांब टेबलाभोवती बसून १५-२० स्त्रिया पणत्या तयार करत होत्या. मॉल आणि ब्रॅण्डेड स्टोअरमध्ये दिसणाऱ्या चमचमत्या, अत्याकर्षक पणत्यांचा उगम येथे होतो आणि त्या करणारे सुंदर हात हे कर्करोगावर मात करत असलेल्या महिला किंवा त्यांच्या नातेवाईक मुलींचे असतात.
या कामाची सुरुवात झाली ती एका लहान वाटणाऱ्या घटनेतून. एका नातेवाईकाला भेटण्यासाठी संस्थेचे संस्थापक वाय. के. सप्रू टाटा रुग्णालयात गेले होते. तिथे शेजारीच लहानगी जया झब्बार रक्ताच्या कर्करोगाशी लढा देत होती. मात्र, तिच्या केमोथेरपीसाठी आईवडिलांकडे पैसे नसल्याने तिची लढाई अर्धवटच राहणार होती. हे लक्षात आल्यावर सप्रू आणि त्यांच्या मित्रांनी एकत्र येऊन औषधांची व्यवस्था केली. छोटी जया बरी झाली आणि कॅन्सर पेशंट एड असोसिएशनचा जन्म झाला.
गरजवंतांना आर्थिक मदत देण्याच्या हेतूने ही संस्था सुरू केली तेव्हा केवळ एक टंकलेखन यंत्रआणि ५०० रुपये एवढीच संस्थेची पुंजी होती. संस्थेच्या ध्येयाबाबत अनेकांना शंका होती आणि त्यामुळे साहजिकच मदतीचे हात पुढे येत नव्हते. शहरात ठिकठिकाणी ठेवलेल्या दानपेटय़ांमधून जमा होणाऱ्या निधीच्या उपयोगाबाबतही काही संस्थांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मात्र, या पैशांमधून मदत होत असलेल्या रुग्णांनी स्वतचे अनुभव मांडायला सुरुवात केली आणि सर्व प्रश्नांना आपोआप उत्तरे मिळत गेली. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक करून पाच हजार रुपयांची वैयक्तिक देणगी दिली.
संस्थेच्या कामाची सुरुवात सप्रू यांच्या घरातूनच झाली. त्यानंतर फोर्ट परिसरातील मल्होत्रा हाऊसमध्ये भाडय़ाने जागा घेण्यात आली. संस्थेचे आजही तेथे लहानसे कार्यालय आहे. १९७१ पासून सोफिया कॉलेज मेडिकल सेंटरमधून तपासणी शिबिरांना प्रारंभ झाला. १९७९ मध्ये संस्थेची दिल्ली येथे शाखा सुरू झाली. १९८४ मध्ये पुनर्वसन केद्रांची सुरुवात झाली. आतापर्यंत या केंद्रातून तब्बल २५ हजार रुग्णांना मदत मिळाली असून आता या केंद्राची वार्षिक उलाढाल एक कोटी रुपयांवर गेली आहे. सध्या जीप, व्हॅन, रुग्णवाहिका मिळून संस्थेकडे ११ वाहने आहेत. संस्थेचे काम आणि व्यापक जनहित लक्षात घेऊन टाटा स्मारक रुग्णालयाने कर्करोग प्रतिबंधात्मक विभाग सुरू करण्यासाठी सीपीएएची मदत मागितली. आज टाटाच्या विविध विभागांमध्ये संस्थेचे स्वयंसेवक काम करत आहेत. भारतातील बहुसंख्य रुग्णांच्या कर्करोगामागील कारण ठरलेला तंबाखू हद्दपार करण्यासाठी संस्थेने मोहीम हाती घेतली. गर्भाशय मुखाच्या कर्करोगासाठी अभ्यास सुरू केला, प्रयोगशाळा थाटली. यासाठी संस्थेला देशविदेशातून अनंत पुरस्कार मिळाले. १९९६ मध्ये महालक्ष्मीच्या आनंद निकेतनमध्ये संस्थेला कायमस्वरूपी जागा मिळाली. राज्याच्या ग्रामीण भागात तसेच गुजरात, राजस्थान, दिल्ली अशा अनेक राज्यांमध्ये तसेच मुंबई-पुण्यातील कॉर्पोरेट कार्यालयांमध्येही सातत्याने शिबिरे सुरू असतात, जनजागृती करून लवकर निदान होण्याचे, उपचारांचे महत्त्व सांगणे हे संस्थेचे उद्दिष्ट आहे, असे संस्थेच्या कार्यकारी संचालक नीता मोरे म्हणाल्या. संस्थेने कोणत्याही रुग्णाला थेट आर्थिक मदत करणे आता बंद केले आहे. त्याऐवजी उपचार, औषध, अन्न, निवासीव्यवस्था, कपडे, छत्री, समुपदेशन, रोजगार अशा सर्वप्रकारे मदत दिली जाते.
औषधनिर्मितीवरील संशोधनाचा खर्च कंपनीला वसूल करता यावा यासाठी संबंधित औषध तयार करण्याचे पूर्ण हक्क (पेटंट) काही वर्षांसाठी कंपनीला दिले जातात. लहान मुलांच्या रक्ताच्या कर्करोगावर उपचारांसाठी नोवार्टिस कंपनीने बाजारात आणलेल्या गिल्वेक या औषधांचा महिन्याला सुमारे एक लाख २० हजार रुपये खर्च येत असे. औषधाचे पेटंटचे वर्ष संपल्यावरही ते पुन्हा सुरू ठेवावे यासाठी कंपनी प्रयत्न करत होती. मात्र कॅन्सर पेशंट एड असोसिएशनने त्याविरोधात न्यायालयात धाव घेतली. असोसिएशनचा न्यायालयीन लढा यशस्वी झाला आणि आता या औषधासाठी महिन्याला आठ ते दहा हजार रुपये खर्च येतो.
विख्यात क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, अभिनेत्री वर्षां उसगांवकर, जुही चावला, गीतकार प्रसून जोशी यांच्यासारख्या अनेकांनीही ‘सीपीएए’ संस्थेच्या कार्याची मुक्तकंठाने प्रशंसा केली आहे. मात्र देशातील कर्करोगग्रस्तांचा वाढता आकडा, त्यांच्यावरील उपचारांचा वाढता खर्च आणि रुग्णांच्या अन्य गरजा विचारात घेता संस्थेला भक्कम आर्थिक पाठबळाची निश्चितच गरज आहे.

संस्थेपर्यंत कसे जाल?
मुंबईतील पश्चिम रेल्वेमार्गावरील महालक्ष्मी रेल्वे स्थानकावर उतरल्यावर पश्चिम दिशेने चालत गेले की आनंद निकेतन आहे. या आनंद निकेतनच्या आवारातच ‘कॅन्सर पेशंट्स एड असोसिएशन’ या संस्थेचे कार्यालय आहे.

nashik, Adulterated Goods, Worth Rs 54 thousand, Adulterated Goods Seized, Adulterated prasad, Trimbakeshwar Adulterated prasad, nashik news,
त्र्यंबकेश्वरमध्ये ५४ हजार रुपयांचा भेसळयुक्त माल जप्त
GST Uniform taxation of goods and services
‘जीएसटी’च्या ध्येयपूर्तीसाठी…
Tungareshwar Protected Forest is in danger
तुंगारेश्वरचे संरक्षित वन धोक्यात, पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रात प्रदूषणकारी कारखाने व अतिक्रमण
In redevelopment of flat holders Redevelopment Senior
पुनर्विकासातील ज्येष्ठ!