08 July 2020

News Flash

सेक्स एज्युकेशन

कुठलंच फूल कधी अवचित फुलत नसतं. आधी एक कळी येते,

| November 14, 2014 01:30 am

कुठलंच फूल कधी अवचित फुलत नसतं.
आधी एक कळी येते,
अवतीभवतीच्या ऊनवाऱ्याचा अंदाज घेत
ती हळूहळू वाढत राहते.

कारण तिला ठाऊक असतं
या ऊनवाऱ्याच्या सोबतीनंच
तिला एक दिवस फुलायचं आहे.

हळूहळू तिला स्वत:तल्या सौंदर्याची,
आत दाटत चाललेल्या सुगंधाची जाणीव होत जाते.

ती भानावर येते;
नव्या जोमानं भराभरा वाढू लागते.
मग एक दिवस अंगचा सुगंध
तिच्यात मावेनासा होतो
तेव्हा..
एका सकाळी कोवळ्या उन्हात
वाऱ्याच्या तिला पालवणाऱ्या कोमल स्पर्शानं
ती उमलते.
ती वार्ता सांगत आता आत दाटलेला गंध
दशदिशांना धावत सुटतो.

स्वत:त दाटलेला सुगंध
अशा शुद्ध जाणिवेनं बाहेर काढून
इतरांना देखणं दर्शन देणं,
म्हणजेच असतं शिक्षण.
माझ्या किशोरवयीन लेकरांनो,
तुम्हीसुद्धा आज आहात
उमलण्याच्या प्रतीक्षेतली एकेक कळी.

इतकी र्वष सुप्त असलेली तुमच्यातली
स्त्री किंवा पुरुषत्वाची यंत्रणा
आता कामाला लागते आहे.
त्या, त्या मनोवृत्तीला परिपोषक
अशी हॉर्मोन्स आता तुमच्या
शरीरात वाहू लागली आहेत.
त्या प्रवाहाच्या लहरी तुमच्यातलं
हळवं हळुवारपण, सौंदर्यपिपासा
आणि जग जिंकण्याची ऊर्मी
जागी करताहेत.
हे सारं तितकंसं स्पष्टपणे
तुमच्या ध्यानातच येत नसणार आज.

आज तुम्हांला प्रकर्षांनं जाणवतं,
ते स्वत:त उमटलेलं
अनावर भिन्निलगी आकर्षण.
इतक्या वर्षांच्या दोस्तीत
प्रथमच स्त्री आणि पुरुष
असा िलगभेद जागा झालाय मनात.
त्यानं तुमची नजरच पार बदलून गेलीय.
हे भिन्निलगी आकर्षण अनेकदा तुमच्या मनालाही
भरकटत नेतंय कुठच्या कुठे.
पार घाबरवून टाकतंय ते तुम्हांला अधूनमधून.
क्वचित कधी अपराधीही वाटतं तुम्हांला
स्वत:तील या अवचित बदलांपायी.
पण भिऊ नका मुळीच.
किशोरवयासाठी हे सारं असं घडणं
हेच मुळी नॉर्मल असतं.

मात्र या टप्प्यावर सावध राहा.
ही हॉर्मोन्स हे आकर्षण जागं करताहेत
ते प्राणी जगतातल्या वाढीचा एक टप्पा म्हणूनच.

पण एक उक्रांत मानव  (Homosepian)
म्हणून तुमच्यापाशी आहे
एक अनोखी ताकद.
स्वत:च्या भावभावनांना समजून घेत
त्यांना शिस्त लावून त्यांची समृद्ध
अभिव्यक्ती होण्यासाठी
लागणारी मदत करण्यासाठी
तुमच्यापाशी आहे एक नवा मेंदू,
केवळ माणसातच असलेला
आणि त्याच्यासोबतीनंच विकसित झालेला.
या सर्व नव्याजुन्या भावना समजून घ्या.
त्यांना नाकारू नका. त्यांचा आदर करा.
नाना माध्यमांतून तुमच्यासमोर पसरलेलं
स्त्री-पुरुष संबंधांचं प्रदर्शन भलतंच
बटबटीत, कुरूप आणि एकांगी आहे.
आणि तेवढंच ते आभासीही (श्कफळवअछ) आहे.

स्त्री आणि पुरुषांमधलं प्रगल्भ, पलूदार नातं
तुमच्या अवतीभवती विखुरलेलं आहे.
आई-मुलगा, बापलेक, मित्रमत्रिणी
अशी किती, किती रूपं घेत नटलंय ते!
त्या प्रत्येकाचं वेगळेपण समजून घ्या.
केवळ नर आणि मादी यात त्याला घुसमटवू नका.

आपापल्या मित्रमत्रिणींचा घोळका
हीच आता तुमची शाळा.
त्यातून घडवा एक प्रगल्भ
भावनाप्रधान प्रज्ञावंत
तुमचा तुम्हीच.

मग पुढे तरुण वयात याल,
आणि जीवनाला सामोरे जाल,
स्त्री-पुरुषातल्या नरमादीच्या नात्याचा
त्यातल्या आदिम, तरल अनुभूतींचा
आस्वाद घ्याल; तेव्हा हेच सारं शिक्षण
कामी येईल तुमच्या
आणि तेव्हाच तुम्ही उपभोगू शकाल
निरामय कामजीवन.

‘मौज प्रकाशन गृह’ने प्रसिद्ध केलेल्या ‘आनंदमेवा’ या डॉ. लता काटदरे यांच्या पुस्तकातून साभार

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 14, 2014 1:30 am

Web Title: sex education
Next Stories
1 परखड शास्त्रीय माहितीची गरज
2 चित्रपटांतून उलगडणारं ‘त्यांचं’ भावविश्व
3 सोळाव्या वर्षी लॉग इन
Just Now!
X