21 February 2019

News Flash

शुभ्र काही जीवघेणे…

जगभरात इस्लामी संस्कृतीचा खरा संदेश पोहोचविला जावा या हेतूने शेख झाएद बिन सुलतान अल नाह्यन यांनी बांधून घेतलेली ही जगातली तिसऱ्या क्रमांकाची भव्य मशीद म्हणजे

| April 24, 2015 01:03 am

lp63जगभरात इस्लामी संस्कृतीचा खरा संदेश पोहोचविला जावा या हेतूने शेख झाएद बिन सुलतान अल नाह्यन यांनी बांधून घेतलेली ही जगातली तिसऱ्या क्रमांकाची भव्य मशीद म्हणजे इस्लामी वास्तुशैलीचा एक उत्कृष्ट आविष्कार आहे.

दुबईच्या वास्तव्यात अबूधाबी येथील प्रसिद्ध मशीद पहायची होती. प्रशस्त, गुळगुळीत रस्त्यावरून दुबईपासून साधारण शंभर किलोमीटर अंतरावर असलेल्या अबुधाबीला पोहोचण्यासाठी केवळ तासभर लागला. एका बाजूला समुद्र असलेल्या रस्त्याच्या दुतर्फा आणि मधील दुभाजकावरसुद्धा खजुराची झाडं ताठपणे उभी होती. अथांग पसरलेलं सोनेरी रेतीचं वाळवंट आणि त्यातून सळसळणारा काळाभोर रस्ता. मधेच असलेलं एखाददुसरं बांधकाम सोडलं तर बाकी वस्ती कमीच. हे सारं पाहताना माणसाच्या कर्तृत्वाची कमाल वाटली. अबुधाबी शहर अत्यंत नीटनेटकं, स्वच्छ आणि देखणं आहे. अर्थातच अबुधाबीची तुलना दुबईशी करणे योग्य होणार नाही. दुबई एखाद्या अप्रतिम सुंदर आणि अलंकारांनी नखशिखांत नटलेल्या, तारुण्यानं मुसमुसलेल्या स्त्रीप्रमाणं आहे. रमणीय, मोहवणारं, लखलखत्या रूपानं घायाळ करणारं! अबुधाबी मात्र शांत, देखणं; परंतु कमी लखलखाट असलेलं शहर आहे! तिथला मरिना बीच पाहण्यासारखा आहे.
अबुधाबी येथेसुद्धा भव्य आणि अप्रतिम आधुनिक स्थापत्यशैलीनं नटलेल्या अनेक इमारती आहेत. त्यापकीच एक अत्यंत भव्य वास्तू म्हणजे तेथील अमिरात पॅलेस नावाच्या एका पंचतारांकित हॉटेलची इमारत. लालसर गुलाबी रंगाच्या सँडस्टोनमध्ये बांधलेली ही इमारत खरोखरच सुरेख आहे. आजच्या घडीला इथे हॉटेल असले तरी बहुधा हा तेथील शेखने स्वत:साठी बांधलेला पॅलेस होता. या हॉटेलच्या काही भागांत पर्यटकांना प्रवेश दिला जातो.
अर्थातच अबुधाबीचे मुख्य आकर्षण आहे तिथला शेख झाएद ग्रँड मॉस्क..! जगातील सर्वात सुंदर मशीद असं या मशिदीचं वर्णन केलं जाते आणि ही इमारत पाहिल्यानंतर ते सार्थ आहे हेही लक्षात येतं. सौदी अरेबियामधील मक्का आणि मदिना येथील मशिदींच्या खालोखाल अबुधाबी येथील ही मशीद आकाराने जगातील तिसऱ्या क्रमांकाची मोठी मशीद आहे. युनायटेड अरब अमिरातीचे स्वप्न पाहून ते प्रत्यक्षात उतरवण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या शेख झाएद बिन सुलतान अल नाह्यन यांनीच या सुंदर मशिदीचे स्वप्न पाहिले. अरब अमिरातीचे पहिले अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मशीद कुठे बांधली जावी हे ठरवण्यापासून ते तिचे स्थापत्य कसे असावे या गोष्टीपर्यंत सर्वच बाबींमध्ये स्वत: शेख झाएद यांनी लक्ष घातले आणि त्यांच्या इच्छेनुसार आज जगातील सर्वोत्तम अशी मशीद बांधली गेली..
इस्लामी धर्मशास्त्राचे जगातील प्रमुख केंद्र अशी या मशिदीची जगभरात ओळख व्हावी अशी ही वास्तू बांधण्यामागे शेख झाएद यांची इच्छा होती; पण मशिदीचे काम पूर्ण होण्याआधीच २००४ साली त्यांनी या जगाचा निरोप घेतला. मात्र त्यांच्या मृत्यूनंतर, त्यांच्या मुलाने, मशिदीच्या निर्माण कार्याची जबाबदारी यथोचित पार पाडली आणि शेख झाएद यांच्या इच्छेनुसार ग्रँड मॉस्कच्या आवारातच त्यांना चिरविश्रांती देण्यात आली. शेख झाएद यांनी मुस्लीम धर्माचे पालन करून शांतता, सहिष्णुता आणि आधुनिक विचारसरणीचा पुरस्कार केला. इस्लाममधील कट्टर विचारसरणीपासून ते नेहमीच दूर राहिले. ही मशीद
म्हणजे इस्लामी वास्तुशैलीचा एक उत्कृष्ट आविष्कार म्हणून ओळखली जावी, जगभरात इस्लामी संस्कृतीचा खरा संदेश पोहोचविला जावा अशी त्यांची इच्छा होती. म्हणूनच त्यांचे नाव या जगप्रसिद्ध मशिदीला देण्यात आले.
lp62शेख झाएद बिन सुलतान अल नाह्यन यांच्या निर्णयानुसार ग्रँड मॉस्कची निर्मिती नवीन अबुधाबी शहराच्या अगदी मध्यवर्ती ठिकाणी केलेली असून हे बांधकाम समुद्रसपाटीपासून अंदाजे अकरा मीटर उंचावर आहे. त्यामुळे ही देखणी वास्तू शहरातील कुठल्याही कोनातून अगदी ठळकपणे अबुधाबी शहराच्या क्षितिजावर उठून दिसते. मशिदीच्या निर्मिती कार्याची सुरुवात एकोणीसशे शहाण्णव सालात केली गेली. विविध देशांतील अडतीस कंपन्या आणि साडेतीन हजार कामगार या वास्तूच्या निर्मितीसाठी बारा वष्रे अविरतपणे राबत होते. २००७ साली, २० डिसेंबर रोजी खुद्द शेख खलीफा बिन झाएद अल नाह्यन यांच्या उपस्थितीत अबुधाबीच्या या मशिदीमध्ये पहिला सामूहिक नमाज अदा करण्यात आला.
अबुधाबीची ही अतिशय सुंदर वास्तू पाहण्यासाठी दोन वेळा गेले. अगदी दुरूनही आपल्याला या भव्य वास्तूचे पांढरे शुभ्र घुमट पाहायला मिळतात. एखादं अनाघ्रात, शुभ्र फूल त्याच्या पूर्णोन्मिलीत स्वरूपात दिसावे त्याप्रमाणे ही पांढरी शुभ्र इमारत विस्तीर्ण अशा वाळवंटी भूमीवर उठून दिसते. संपूर्ण इमारतीसाठी अतिशय उच्च प्रतीचा पांढऱ्या रंगाचा इटालियन संगमरवर वापरण्यात आलेला आहे. या वास्तूची अनेक ठळक वैशिष्टय़े आहेत. त्यांच्यामुळे ती जगातील एक अद्वितीय मशीद ठरली आहे. या इस्लामी स्थापत्यशैलीतील वास्तूला मोरोक्कन शैलीतील एकूण लहानमोठे ८२ घुमट आहेत. मशिदीच्या आतमध्ये एकाच वेळी चाळीस हजार भाविक नमाज पडण्यासाठी बसू शकतात. इमारतीच्या बाह्य़ भागामध्ये हजाराच्या वर गोल स्तंभ असून त्यावरील पानाफुलांची नक्षी उत्कृष्ट प्रतीच्या रंगबिरंगी दगडांनी सजवलेली आहे. मुख्य दालनात शहाण्णव गोलाकार खांब असून त्यावरील नक्षीकाम मदर ऑफ पर्लने सजवलेले आहे. याच दालनात अंथरलेला गालिचा जगातील सर्वात मोठय़ा आकाराचा गालिचा असून त्याचे डिझाइन इराणी कलाकार अल खालिकी यांनी बनवलेले आहे. तेराशे इराणी कारागिरांनी हा संपूर्ण गालिचा हातांनी गाठी मारून तयार केला. अतिशय सुंदर नक्षी असलेला हा गालीचा हिरव्या रंगात असून पंचवीस प्रकारच्या नसर्गिक रंगातील धाग्यांनी हे नक्षीकाम या गालिचामध्ये विणलेले आहे. या गालिचावरून नजर हटत नाही. रंगसंगती आणि त्यातील पानाफुलांची नक्षी अप्रतिम सुंदर आहेच, पण कारागिरांनी ते विणताना त्यात नजरेला सहजासहजी न दिसणाऱ्या, पण नमाज पढण्यासाठी आलेल्या लोकांना ओळीने बसता यावे म्हणून थोडय़ाशा उंच ओळी विणल्या आहेत. संपूर्ण गालिचा अखंड विणल्यानंतर तो तुकडय़ा-तुकडय़ांनी मुख्य दालनात अंथरलेला आहे. हे काम करताना कुठे त्या गालिचामधील नक्षीकामाला धक्का लागणार नाही याची खबरदारी घेण्यात आली आहे. या गालिच्यावरून चालताना मऊ मऊ गालिचात पाय रुतल्याची जाणीव होते.
िभतीवरील शुभ्र संगमरवरामध्ये पाना-फुलांचे इन ले वर्क केलेले आहे. त्याचे सौंदर्य आणि स्वरूप पाहून मन थक्क होऊन जाते. असे ‘पिएत्रा दुर्रा’ म्हणजेच इनले वर्क आपल्याला ताजमहालमध्ये पाहायला मिळते. संगमरवरामध्ये पानाफुलांची नक्षी कोरून त्यामध्ये विविध रंगांतील मौल्यवान दगडांचे (प्रेशियस स्टोन्स) तुकडे बसवायचे. नंतर त्या तुकडय़ांची मूळ संगमरवरासह घसाई करून ते संपूर्ण काम इतके एकजीव केले जाते, की नक्षीकामासाठी वेगळे रंगीत दगड वापरलेले आहेत यावर आपला विश्वासच बसत नाही..! ग्रँड मॉस्कमधील ‘इनले’ पद्धतीच्या कामातील सफाई उच्चकोटीची आहे. पानाफुलांच्या नक्षीबरोबरच येथे कुराण lp64शरीफमधील ओळी तीन वेगवेगळ्या अरबी लिपीमध्ये कोरलेल्या आहेत. संगमरवर इतका शुभ्र आणि शुद्ध आहे की त्या शुभ्रतेला तीळभरही काळा डाग नाही.
नमाज पढण्यासाठीचे मुख्य दालन खूप मोठे आहेच.. आपण पर्यटक म्हणून या दालनाच्या विशिष्ट मर्यादेपर्यंतच फिरू शकतो.. नमाजसाठी बसण्याच्या जागी आपल्याला प्रवेश करता येत नाही. या दालनाच्या बाहेरील अतिशय भव्य पटांगणामध्ये असलेली मोझ्ॉइक पद्धतीची फरसबंदी दृष्ट लागण्यासारखी आहे. या पटांगणात उभे राहून चारही बाजूंचे संगमरवरी बांधकाम पाहताना आपले डोळे अक्षरश: दिपून जातात, कारण पांढऱ्या शुभ्र संगमरवरी घुमटावरून परावíतत होणारे तीव्र सूर्यकिरण आपल्याला सहन होत नाहीत. या ठिकाणी आपल्याला आपली पादत्राणे काढावी लागतात. त्यासाठी बसण्याची तसेच पादत्राणे ठेवण्याची व्यवस्था आहे. मशिदीच्या आतमध्ये एसीचा थंडावा असतो. मध्यवर्ती घुमटाच्या आतमध्ये लटकवलेले झुंबर जगातील सर्वात मोठे झुंबर असून ते जर्मनीमध्ये बनवलेले आहे. या झुंबरासाठी ऑस्ट्रियातील स्वरोवस्की क्रिस्टल्स आणि इटालीतील काच वापरली आहे. इतर घुमटांच्या आतमध्येही एकापेक्षा एक सुंदर झुंबरं लटकवलेली आहेत. ही झुंबरं खरोखरच उत्कृष्ट आहेत! आणि असं म्हणतात की यातील दिव्यांचे तेज आकाशातील चंद्राच्या कलांप्रमाणे कमी-अधिक होत जाते.
पसा काय करू शकतो या प्रश्नाचे उत्तर आपल्याला दुबई, अबुधाबी या चिमुकल्या देशांत गेल्यानंतर अजमावता येते. पशांच्या जोरावर मनुष्य काहीही करू शकतो हे सत्य आपण ही मशीद पाहताना आपसूक स्वीकारतो. या मशिदीच्या बांधकामासाठी आणि अंतर्गत सजावटीसाठी विविध देशांतून उच्चकोटीचे साहित्य मागवण्यात आले आणि ते उत्कृष्टपणे वापरले गेले याची प्रचीती आपल्याला ही अप्रतिम सुंदर वास्तू पाहताना येते. मशिदीच्या बाहेरील आवारातही चोहोबाजूंनी मोझ्ॉइक टाइल्स लावलेली सुंदर फरसबंदी आहे. सर्व बाजूंनी आयताकृती पाण्याचे हौद आहेत. त्यामध्ये कारंजी आहेत. मशिदीचे मुख्य द्वार अर्थातच मक्केच्या दिशेने आहे. वाळवंटात फुलवलेल्या सुंदर बागा ही तर या श्रीमंत अमिरातींची खासियतच म्हणावी लागते. शेख झाएद ग्रँड मॉस्कच्या सभोवती बगिचा नाही असं होणं शक्यच नाही. हिरवळींचे हिरवेगार गालीचे संपूर्ण वास्तूच्या सभोवती अंथरले आहेतच. शिवाय इतर फुलझाडं, खजुराचे आणि विविध प्रकारचे वृक्ष यांनी सभोवती हिरवीगार बाग फुलवलेली आहे.
ही मशीद नमाजासाठी येणाऱ्या सर्वासाठी दिवसभरासाठी खुली असते. शुक्रवारची सकाळ सोडता, सकाळी नऊ ते रात्री दहा वाजेपर्यंत जगभरातील पर्यटकांना मशीद पाहण्यासाठी प्रवेश दिला जातो. कमी कपडय़ात येणाऱ्या पर्यटकांना प्रवेश नाकारला जातो. शिवाय बहुतेक सर्व स्त्रियांना मुस्लीम स्त्रिया घालतात त्याप्रमाणे बुरखा घालूनच आतमध्ये जावे लागते. त्यासाठी तेथे बुरखा उपलब्ध करून देण्यात येतो. पहिल्यांदा जेव्हा मी ही मशीद पाहायला गेले तेव्हा हा बुरखा घालूनच आत जावे लागले. दुसऱ्या वेळी मात्र मी लांब बाह्य़ांचा पंजाबी सूट घालून गेले होते. माझ्याच ओढणीने केस झाकून घेतले. त्यामुळे मला बुरखा न घालता आत जाता आले.
एक सुंदर वास्तुशिल्प म्हणून आज जगभरात या मशिदीची ओळख झाली आहे. दृढ धर्मसंकल्पनांच्या पलीकडे जाऊन रोज हजारोंच्या संख्येने देशविदेशातील अनेक जाती-धर्मांचे लोक ही अद्वितीय वास्तू पाहायला येतात. पांढऱ्या शुभ्र संगमरवरातील ही अतिभव्य, सौंदर्यपूर्ण वास्तू पाहून भारावतात. प्रत्येकालाच काही तरी सुंदर, संपन्न पाहिल्याचा आनंद अनुभवास येतो. शांत, सौंदर्यपूर्ण इस्लाम धर्माची जगाला ओळख व्हावी या शेख झाएद यांच्या स्वप्नाचं प्रतीक ठरलेल्या मशिदीची हीच ताकद आहे.
राधिका टिपरे

First Published on April 24, 2015 1:03 am

Web Title: sheikh zayed grand mosque
टॅग Travellog