जपानमध्ये टोकियोत शिबुया नावाचा क्रॉसिंग पॉइंट आहे. त्या पॉइंटवर एका वेळेला चारही बाजूंनी हजारो लोक रस्ता क्रॉस करत असतात आणि हेच त्या क्रॉसिंगचं वेगळेपण आहे.

विकसित देशांमधल्या शहरांचं एक बरं असतं. ‘विकसित’ असल्याने मुळातच सर्वाना ते ठाऊ क असतात आणि मग त्याबरोबर आपोआपच तिथल्या कुठल्याही गोष्टी अप्रुपाच्या म्हणून जगभर प्रसिद्ध पावू शकतात.. जपानमधल्या तोक्यो शहरातील शिबुया नावाच्या उपनगरातला एक क्रॉसिंग पॉइंट असाच प्रसिद्ध आहे.
दोन रस्ते एकमेकांत मिळणारा तो आपला ‘चौक’ किंवा अमेरिकन इंग्रजीत जंक्शन. अशा जंक्शन्सना क्रॉसिंग पॉइंट (झेब्रा क्रॉसिंग) असणं काही नवीन गोष्ट नाही आणि सिग्नल पडल्यावरच वाहनांनी थांबणं आणि पादचाऱ्यांनी रस्ता पार करणंही (त्या देशात!) नवीन नाही. मग नवीन ते काय? नवीन हेच की या शिबुया नामक तोक्योतल्या एका भागातील क्रॉसिंग पॉइंटवर थोडे-थोडके नाहीत, तर हजारो लोक दरवेळेस चहूदिशांनी रस्ता क्रॉस करत असतात. कुणी म्हणे अडीच हजार तर कुणी म्हणे चार हजार लोक क्रॉस करतात इथे.
आता प्रत्येक वेळेस एवढी जनता जमते कुठून ते कळायला मार्ग नाही, पण खरोखर तिथे जनसागर लोटलेला असतो हे मात्र खरं. कदाचित ‘चलो शिबुया क्रॉसिंग देखेंगे’ म्हणणारी डोकी ही गर्दी वाढवतही असतील.
हा क्रॉसिंग सोहळा पाहण्यासाठी म्हणून मुद्दाम शिबुयाला जाणं झालं. त्याआधी एकदा शिबुया वार्डातल्या हाराजुकू नामक भागात मेईजी श्राईन आणि स्वत:ला ‘विअर्ड’ म्हणवून घेणारे फॅशनचे असामान्य नमुने बघायला जाणं झालं होतं, पण तेव्हा या क्रॉसिंग पॉइंटविषयी माहिती नव्हती, त्यामुळे तो नजरेतून सुटला होता. या खेपेस जाताना ‘आपण क्रॉसिंग पॉइंटच बघायला जातोय की अजून काही बघण्यासारखं आहे तिथे?’ असं न राहावून मी दोन-तीनदा विचारलंही होतं. शेवटी ‘त्यात काय बघायचंय?!’ हा प्रश्न मनातच ठेवला आणि चुपचाप जपान रेल्वेची माझी आवडती यामानोते लाइन पकडून शिबुयात दाखल झाले. या चौकाच्या एका बाजूस ‘त्सुताया’ नावाच्या बिल्डिंगच्या दुसऱ्या मजल्यावर एका सुप्रसिद्ध कॉफीपान चेनची शाखा आहे. तिथे उभं राहिलं, की हा सोहळा छान पाहायला मिळतो. कॉफी पिण्यापेक्षा असंख्य प्रवासी तिथे फक्त हे क्रॉसिंग पाहायला आपापल्या कॅमेऱ्यांसह हजर असतात आणि एकदा का सिग्नल पडला की कॅमेऱ्यांचा क्लिकक्लिकाट चालू होतो.
वाहनांसाठी सिग्नल लाल झाला की पादचारी रस्ता क्रॉस करायला सुरुवात करतात. ‘स्क्रॅम्बल’ टाइपच्या या क्रॉसिंगमध्ये असलेले प्रत्येक दिशेचे सिग्नल्स एकाच वेळी लाल होतात व त्यामुळे सर्व दिशांना थांबलेले पादचारी त्याक्षणी सुटतात. पादचाऱ्यांची संख्या प्रचंड असल्याने हे दृश्य साधारणपणे महाभारत, रामायण नाही तर मग ऐतिहासिक सीरियल्समधल्या लढायांच्या प्रसंगांसारखं दिसतं. ज्यामध्ये शिंग फुंकल्यावर दोन्ही बाजूंच्या सैनिकांच्या लाटा पुढेपुढे येतात आणि एकमेकांत मिसळतात. फरक इतकाच की इथे सैनिकांच्या हातातल्या ढाल-तलवारी नसतात तर, पर्सेस, शॉपिंगच्या नाही तर लॅपटॉपच्या बॅगा असतात आणि ‘हर हर महादेव’ म्हणत समोरच्यावर हल्ला करणारं कुणी नसतं. समस्त लोक शांतपणे रस्ता क्रॉस करतात. साधारण मिनिटभराच्या सिग्नलच्या अवधीत हा मोठ्ठा जनसमुदाय समोरच्या ईप्सित तीरावर पोचू लागतो, काही हळू आणि आरामात चालणारे लोक सिग्नल लाल होण्याचे आकडे दिसू लागताच धावायलाही सुरुवात करतात. अर्थात लगेचच वाहनांसाठीचा सिग्नल हिरवा होतो आणि त्या रस्त्यातून वाहने धावायला लागतात.
शिबुया स्टेशनचे ‘हाचिको’ एक्झिट घेऊन बाहेर पडले की समोरच हा प्रकार चालू असतो. ‘हाचिको’ हे एका कुत्र्याचं नाव असून त्याचा पुतळा स्टेशन व या चौकाच्या मध्ये आहे. ही एकमेकांना भेटण्याची एक लोकप्रिय जागा असल्याने प्रत्येक प्रहरी तिथे कुणी ना कुणी कुणाची तरी वाट पाहात उभं असतंच. क्रॉसिंगची जागा मोठय़ा स्क्रीन्स नाही तर जाहिरातींनी वेढलेली आहे.
तोक्योत आल्यावर शिबुया क्रॉसिंग बघण्याचं हे कार्य तिथे येणारा बहुतेक पर्यटक इमानेइतबारे पार पाडतो. अलीकडेच कुठल्याशा पर्यटन कंपनीच्या जपान टूर मार्गदर्शिकेमध्ये ‘न्यूयॉर्कच्या टाइम स्क्वेअरची आठवण करून देणारं, शिबुयातलं हे ‘कूऽऽल इंटरसेक्शन’ दिसलं आणि शिबुया क्रॉसिंगच्या आठवणी मनात जागृत झाल्या.’ अतिशय मर्यादित दिवसांच्या आणि वेळाच्या चौकटीत बसलेल्या प्रवाशांसाठी जपानमध्ये बघण्यासारख्या इतर अनेक सुंदर गोष्टी आहेतच. त्यातच या स्थळाचाही समावेश प्रवाशांनी करून टाकला आहे!