lp53
01youthकपडय़ांबाबत जागरूक असणारे शूजच्या बाबतीत मात्र चलता है यार, या अ‍ॅटिय़टय़ूडने वावरत असतात. पण असं नाही चालत बॉस, योग्य कपडय़ांवर शूजपण योग्यच असायला हवेत..

हुश्श.. चला सणांच्या मूडमधून बाहेर आलात की नाही? आधी गणपती, मग नवरात्री, दिवाळी. सगळं संपलं आता. गोडधोडाच्या पंचपक्वान्नाच्या जेवणावर हात साफ करून झाला असेलच ना. आता परत बॅक टू रुटीन.. कॉलेज, सबमिशन्स, ऑफिस, प्रोजेक्ट्स पुन्हा सुरू. त्यामुळे आजपासून आपण पण सणासुदीच्या गोडगोड, झगमगीत फॅशनमधून बाहेर पडून आपल्या नेहमीच्या फॅशनच्या दुनियेत परत जाऊ या.

या भागापासून आपण वेगवेगळ्या अ‍ॅक्सेसरीजबद्दल बोलणार आहोत. शूज, बॅग्स, ज्वेलरी या अ‍ॅक्सेसरीज आपला लुक पूर्ण करण्यासाठी किती गरजेच्या असतात, याबद्दल आपण मागे बोललोच आहे. पण कोणत्या ड्रेसवर कधी, कुठली अ‍ॅक्सेसरीज घालायची याबद्दल कित्येकांच्या मनामध्ये शंका असतात. म्हणजे बघा हां, तुम्हाला ठाऊक आहे का, की कित्येकदा तुम्ही ऑफिसमध्ये जे शूज घातले होते, ते खरेतर तुम्ही तुमच्या ‘फर्स्ट डेट’ला जाताना घातले पाहिजे होते, किंवा जी कल्च छोटी आहे म्हणून कपाटात मागे पडून आहे ती खरंतर ख्रिसमस पार्टीच्या वेळी वापरण्यासाठी बेस्ट आहे. हे सगळं कित्येकदा आपल्याला माहीत नसतं किंवा नेमकं जेव्हा हवं तेव्हाच आपण विसरतो. त्यामुळे आजपासून पुढचे काही भाग मी तुम्हाला तुमच्या योग्य कपडय़ांसोबत योग्य अ‍ॅक्सेसरीज निवडायला मदत करणार आहे.

सो करायची सुरुवात?

नेहमी आपण डोक्यापासून पायापर्यंत जातो. पण आज आपण नेमकं याच्या उलट प्रवास करणार आहोत. आपल्या या भागांची सुरुवात आपण शूजपासून करू या. यामागचे कारण हे की दरवेळी तयार होताना शूजकडे आपण सगळ्यात कमी लक्ष देतो. ‘कुछ भी चलेगा यार..’ असे बोलून आपण त्यांना कमी लेखतो. पण बॉस.. हेच शूज तुमचं लाइफ सुधारू किंवा बिघडवू शकतात. मध्यंतरी एका सर्वेक्षणामध्ये नोकरीसाठी मुलाखत द्यायला गेलेल्या उमेदवारांपैकी ज्यांचे शूज नीट पॉलिश केलेले नसतात, त्यांना नोकरी मिळायचे चान्सेस सगळ्यात कमी असतात हे लक्षात आले आहे. तसेच जर तुम्ही मुलींना विचारलेत तर दहा पैकी सात मुली मुलाला त्याच्या शूजवरून पडताळतात. त्यामुळे योग्य शूज निवडणं हे मुलं आणि मुली दोघांसाठी महत्त्वाचं आहे.

शूज मग ते फ्लॅट्स असोत, हिल्स, स्निकर्स किंवा मग फॉर्मल फुटवेअर असोत, प्रत्येक वेळेनुसार योग्य फुटवेअर निवडणं खूप महत्त्वाचं असतं. सुरुवात करू या सकाळी घालायच्या शूजपासून, म्हणजेच कॉलेज किंवा ऑफिसवेअर शूजपासून. कॉलेज किंवा ऑफिसचं नाव घेतलं की, पहिल्यांदा विचार येतो तो प्रवासाचा. ट्रेन, बसचे धक्के खात आपण घाईघाईने ऑफिसला किंवा कॉलेजला पोहोचत असतो. त्यामुळे सकाळी शक्यतो हिल्स घालायच्या फंदात पडू नका. बॅलरिना, फ्लॅट चप्पल किंवा सँडल्स घालणं उत्तम. सध्या मुलींच्या स्निकर्समध्ये खूप विविधता पाहायला मिळते आहे. डेनिमसोबत हे स्निकर्स केव्हाही उत्तम. मुलांसाठी स्निकर्स, लोफर्स, स्लिपॉन्सचे पर्याय आहेत. या प्रकारांमध्ये सकाळच्या वेळेस फंकी, कॅज्युअल लुक ठेवायला पुरेसा वाव आहे. त्यामुळे या प्रकारच्या शूजमध्ये तुम्हाला हवे तितके पण तुमच्या कपडय़ांनुसार प्रयोग नक्की करा. मुलांच्या चप्पल्समध्येसुद्धा खूप पर्याय सध्या पाहायला मिळत आहेत. त्यामुळे त्यांचा विचार नक्की करा. ऑफिसला जाताना जर फॉर्मल फुटवेअर घालणे बंधनकारक असेल तर मात्र हिल्सना पर्याय नसतो. ब्लॅक बॅलरिना पुष्कळदा तुम्हाला मदत करतात, नाहीतर हिल्स हवेच. पण अशा वेळेस मोठे हिल्स न निवडता, एक-दोन इंच हिल्स असलेले किटन हिलशूज तुम्ही नक्कीच वापरू शकता. कमी हिल्स असलेले वेजेससुद्धा चालू शकतात. ऑफिसला घालायच्या हिल्सना पुढे पॉइंट असणे गरजेचे असते, त्यातून तुमच्या व्यक्तिमत्त्वामध्ये असलेला आत्मविश्वास दिसून येतो. त्यामुळे पुढच्या बाजूला गोलाकार असलेले शूज घालणे टाळा. मुलांसाठी ऑफिससाठी लेदर शूज कधीही उत्तम. ब्लॅक आणि ब्राऊ न शूज विथ लेस हे तुमच्या वॉडरोबमध्ये असलेच पाहिजेत.

दुपारच्या ब्रंच किंवा छोटय़ाशा गेटटूगेदरसाठीसुद्धा फ्लॅट चप्पल किंवा सँडल्स उत्तम. पॉइंटेड फ्लॅट सँडल्स सध्या पाहायला मिळतात. या ऑकेजनसाठी तेही उत्तम पर्याय ठरू शकतील. बीच पार्टी असेल तरी यांचा पर्याय तुम्हाला चालू शकेल. अशा कॅज्युअल ऑकेजन्ससाठी मुलांसाठी स्निकर्स कधीही उत्तम. त्यांच्या पलीकडे पाहायची तुम्हाला गरज नाही. लोफर्ससोबत सॉक्स न घालता किंवा घालायचे असल्यास फंकी सॉक्स घालून तुम्ही या ऑकेजन्ससाठी एव्हररेडी राहू शकता.

संध्याकाळी पार्टीमध्ये घालायच्या शूजवर मात्र तुम्हाला विशेष लक्ष द्यायची गरज आहे. तुम्ही संध्याकाळी नक्की कुठे जाताय, यावर तुमचे शूज कोणते घालायचे हे ठरलं जातं. ऑफिस पार्टी किंवा एखाद्या कॉर्पोरेट पार्टीला जात असाल, तर फुटवेअर सिंपल असू द्या. या पार्टीजमध्ये हिल्सची उंची वाढली तरी हरकत नाही. तुम्ही सिलेटोज, स्ट्रापी हिल्स या पार्टीजमध्ये घालू शकता. रंगांच्या बाबतीतसुद्धा काळा, ब्राऊन, ग्रे, मरून, डार्क ग्रीन असे सटल रंग निवडा. तुमचे शूज कोणाच्याही डोळ्यांत चटकन भरणार नाहीत ना, याकडे लक्ष असू द्या. पण पब, डिस्कोमध्ये जाताना मात्र ‘गो सेक्सी’ हा मंत्रा विसरू नका. त्या वेळेस ग्लिटर, हाय हिल सिलेटोज यांना पर्याय नाही. इथे तुमच्या प्रयोगांना पूर्ण वाव मिळेल. अ‍ॅनिमल प्रिंट शूजसुद्धा या वेळी घालायला हरकत नाही.

फॉर्मल पार्टीला जाताना लेस शूज मुलांसाठी उत्तम पर्याय ठरू शकतात. पण मित्रांसोबत पार्टीला जाताना लोफर्स, स्लिपॉन्स घालायला विसरू नका. सकाळपेक्षा रात्रीच्या शूजमध्ये प्रिंट्समध्ये फारसे प्रयोग करण्याच्या फंदात न पडणेच उत्तम ठरेल.

मग अजून काय, रॉक द पार्टी.. ही सगळी उजळणी झाल्यावर आता घराबाहेर पडताना तुमच्या शूजवर एक नजर टाकायला विसरू नका.