lp25नुकत्याच पार पडलेल्या तेराव्या एशियन फिल्म फेस्टिव्हलमधील फिक्शन शॉर्ट फिल्म स्पर्धेत कोणाची गोष्ट छोटी, कोणाची मोठी, कोणाची शब्दबंबाळ, तर कोणाच्या गोष्टीत शब्दच नाहीत; पण गोष्ट सांगण्याची धडपड वाखाणण्याजोगी..

कमीत कमी शब्दांत जास्तीत जास्त व्यक्त होण्याचे लिखित माध्यम म्हणजे कविता, शब्दाविना प्रगटायचे माध्यम म्हणजे छायाचित्र, तर शब्द, चित्र, संगीत, नृत्य अशा सर्वच कलांचा आधार घेत प्रगटायचे आणखी प्रभावी माध्यम म्हणजे चित्रपट. त्यातही ‘शॉर्ट इज स्वीट’ असे सूत्र असेल तर छोटय़ाशा कहाणीत सामावलेले अनेक विचार मांडणारे माध्यम म्हणजे शॉर्ट फिल्म अर्थात लघुपट. पूर्ण लांबीच्या चित्रपटापेक्षा छोटय़ाशा कथेच्या परिघावर फिरतानादेखील भावभावनांचा कल्लोळ कसा मांडला जाऊ शकतो हे यातून प्रकर्षांने जाणवते. नुकत्याच पार पडलेल्या तेराव्या एशियन फिल्म फेस्टिव्हलमधील फिक्शन शॉर्ट फिल्म स्पर्धा ही अशीच अनेक गोष्टींनी बहरलेली होती. कोणाची गोष्ट छोटी, कोणाची मोठी, कोणाची शब्दबंबाळ, तर कोणाच्या गोष्टीत शब्दच नाहीत. दोन मिनिटांपासून ते २३ मिनिटांपर्यंत; पण गोष्ट सांगण्याची धडपड तीच.
स्पर्धेतील सारेच लघुपट हे वेगळ्या धाटणीचे होते. मात्र काही ठिकाणी फिक्शनची साथ सोडून वास्तववादीपणाकडे घुसण्याचा प्रयत्नदेखील आढळून आला. इराणी लघुपटांची संख्या अधिक असली तरी त्याच्या जोडीला तामिळ लघुपटांनी प्रेक्षकांची दाद मिळवली, तर मराठीने परीक्षकांची. महोत्सवात घेण्यात येणारी ही स्पर्धा आता चांगलीच जोर धरू लागली आहे. तब्बल ३०० लघुपटांतून तीस लघुपटांची निवड स्पर्धेसाठी करण्यात आली होती. इराण, जपान, सिंगापूर, इस्रायल अशा परदेशातील लघुपटांबरोबरच भारतीय लघुपटांची हजेरीदेखील नोंद घेण्याजोगी होती. त्यातही चार मराठी लघुपट होते हे विशेष.
दक्षिणेत चित्रपट संस्कृती मोठय़ा प्रमाणात रुजली असली तरी सध्या तेथील वातावरण केवळ अ‍ॅक्शनपॅक्ड अशा देमार सीन्सनी आणि उत्तेजक गाण्यांनी भरून गेले आहे. मात्र लघुपटांनी मात्र स्वत:चे वेगळेपण जोपासले आहे. ‘द डोअर’, ‘धर्मन’ आणि ‘१२ एएम’ हे तीनही तामिळ लघुपट होते. त्यांचा फिक्शनचा बाज एकदम वेगळाच होता.
मृत्यू टाळण्यासाठी यमदूताने दिलेल्या दोन संधी अशी भन्नाट संकल्पना मांडणारा ‘१२ एएम’ हा लघुपट धम्माल पद्धतीने घेतला आहे. मोबाइलवर बोलता बोलता रस्त्यावर पडलेला मोबाइल उचलताना गाडीने उडविल्यामुळे प्रियकराचा मृत्यू होणे आणि त्यानंतर यमदूताकडून (सोल कलेक्टर) मृत्यूला दूर ठेवण्यासाठी दोन वेळा चार सेकंद ग्रेस म्हणून मिळवणे ही अफलातून संकल्पना यात दिसते. पहिल्या ग्रेस सेकंदात मृत्यू टाळण्यात यशस्वी झाल्यावर रस्त्यापलीकडच्या लुटारूने खून केल्यामुळे पुन्हा सोल कलेक्टरकडे येणे, त्याने पुन्हा चार ग्रेस सेकंद देणे. तिसऱ्या वेळी सर्वाना चुकवून जिवंत घरी पोहोचणे, पण दरम्यान मोबाइलवरील संवाद तुटणे आणि त्यावरून गेलेला गाडीचा आवाज यामुळे प्रवासातील प्रेयसीने ट्रेन थांबविण्याची धडपड करणे आणि तिचाच मृत्यू होणे. निराश होऊन प्रियकराने आत्महत्या करणे आणि त्याच वेळी प्रेयसीला चार ग्रेस सेकंद मिळणे. संपूर्ण लघुपटात टिपिकल दाक्षिणात्य बाज, आधुनिक संकल्पनांचा वापर यामुळे चार सेकंद प्रेक्षकांनादेखील बाहेरच्या जगातील गोष्टी विसरायला लावतात. मृत्यू, जीवन, प्रेम, मोह अशा अनेक घटकांना चार सेकंदांत एकत्र आणून हे अजबच रसायन तयार झाले आहे.
कृष्णधवल चित्रीकरणाचा ‘द डोअर’ हा ग्रामीण पाश्र्वभूमीवरील तामिळ लघुपट मन हेलावून सोडणारा आहे. घरातील कर्ता पुरुष शहरात मोलमजुरी करतोय, घरी एक मोठी मुलगी, छोटा भाऊ, दोघेही शाळकरी वयाचे, तर पाळण्यात तान्हं मूल आणि मोलमजुरी करून कुटुंबाचा सांभाळ करणारी आई. कर न भरल्यामुळे कोरीवकाम असलेला घराचा मजबूत असा कडीपाटाचा दरवाजाच उचलून नेल्यामुळे त्या कुटुंबात एका वेगळ्याच संकटाची सुरुवात होते. त्या साऱ्या लहान मुलांचं भावविश्व दरवाजाशी जोडलेले असते. त्यावर चित्रं चिकटव, त्याला धरून लोंबकळ असे त्यांचे दिवसभराचे उद्योग. दरवाजाला धरून लोंबकळताना दरवाजाला बांधलेल्या दोरीमुळे आपसूकच तान्ह्य़ा मुलाचा पाळणा कम झोळीला झोके मिळतात आणि ते शांत झोपत असत; पण आता हा दरवाजाच नाही म्हटल्यावर मुलांचं भावविश्व उसवत जातं तर दुसरीकडे त्या झोळीतल्या मुलाची अस्वस्थतादेखील वाढते. परिणामी एके रात्री ते तान्हं मूल मृत्युमुखी पडतं आणि सर्वाचंच भावविश्व उद्ध्वस्त होतं. काही दिवसांनी त्या भावंडांना आपला दरवाजा गावाबाहेरच्या एका पडक्या घरात असल्याचे लक्षात येते आणि त्यांचं निरागस प्रेम त्या दरवाजावर दिसून येतं. कृष्णधवल चित्रीकरणाचा बाज आणि ग्रामीण पाश्र्वभूमीचं प्रभावी यथार्थ चित्रण, लहानग्यांचं भावविश्व नैसर्गिकपणे टिपणारा हा लघुपट लाजवाब होता.
lp26
तिसरा तामिळ चित्रपट म्हणजे धर्मन. समाजातील विसंगतीवर नेमकं बोट ठेवणारी ही गोष्ट. उच्च मध्यमवर्गीय घरातील मुलाला शाळेतील फॅन्सी ड्रेस स्पर्धेसाठी भिकाऱ्याचा वेश धारण करायला लावणारे आई-वडील आणि भिकाऱ्याचे शब्द उच्चारण्याची इच्छा नसलेला मुलगा. भिकारी इंग्रजी कसा बोलेल असा त्याचा साधा-सरळ प्रश्न, तर आई-वडील आपले म्हणणे धरून बसलेले, तर दुसरीकडे परीक्षा देऊन पोलीस दलात काही तरी ध्येय घेऊन आलेला अधिकारी त्याच्या वरिष्ठांबरोबर राऊंडला निघालेला. वरिष्ठांच्या सांगण्यानुसार फेरीवाले, विक्रेते, विनापरवाना गाडी चालविणाऱ्यांना पकडून पैसे उकळायचे हे त्याला रुचत नाही. त्याच वेळी भिकाऱ्याचा वेश घालून इनोव्हामध्ये बसलेल्या मुलाकडे भीक मागायला आलेला म्हातारा मुलाची थाळी रिकामी पाहून त्याच्या थाळीत चार पैसे टाकतो. मुलाला खरा भिकारी दिसतो, तो वडिलांच्या पाकिटातून पैसे देतो. वडिलांच्या नकळत दिलेले पैसे भिकाऱ्याला नको असतात, त्या गडबडीत तेथे आलेले वडील त्याला चोर समजतात. शेजारीच उभा असणारा पोलीस वडिलांकडून चार पैसे घेऊन प्रकरण मिटवतो आणि त्या दरम्यान भिकारी भीक मागताना नेमकं काय म्हणतो हे मुलाला कळते आणि तोच संवाद तो शाळेत म्हणून दाखवतो. त्याला प्रेक्षकांची दाददेखील मिळते. तिकडे पोलीस अधिकारी भिकाऱ्याचे पैसे काढून घेतो आणि विनापरवाना वाहन चालविणाऱ्या तरुणाचेदेखील. नव्याने आलेला पोलीस अधिकारी मग लाच म्हणून घेतलेले पैसे पुन्हा नेऊन भिकाऱ्याच्या थाळीत टाकतो. एक भीक मागणारा भिकारी आणि एक वर्दीतला भिकारी आणि फॅन्सी ड्रेससाठी भीक मागायला लावणारे आईवडील. भिकेशी निगडित असा एक वेगळाच त्रिकोण त्यातून उलगडतो.

वेगळ्या वळणाने जाणारा ‘आरण्यक’
मराठीत फारसे लघुपट होत नसताना आणि इराणी लघुपटांचा वरचष्मा असतानादेखील मराठी ‘आरण्यक’ने सवरेत्कृष्ट लघुपटाचा मान पटकावला. आजवर फारशी वापरली न जाणारी मांडणी-शैली वापरून एक वेगळा प्रयोग या लघुपटात करण्यात आला आहे. स्वत:च्याच कल्पनाविश्वात वावरणाऱ्या दोन मुलींचा प्रवास जंगलापासून शहरापर्यंत येऊन ठेपतो, तर शहरातून निघालेले दोन तरुण त्याच वाटेने गावाजवळच्या कारखान्यात पोहोचतात. अनेक प्रतीकं वापरत प्रेक्षकांच्या कल्पनाशक्तीला भरपूर खाद्य देणारा हा लघुपट पारंपरिक मांडणी तोडून व्यक्त होतो.

इराणी चित्रपट हा कायमच काही तरी वेगळं मांडणारा, वेगळं सांगणारा कलात्मक चित्रपट. स्पर्धेत सर्वाधिक दहा इराणी लघुपटांचा समावेश होता. दोन-तीन मिनिटांचे लघुपट खूपच प्रभावी असे होते. अगदी छोटीशी संकल्पना आणि त्याला आनुषंगिक चित्रण. काहीही न बोलता केवळ एक-दोन मिनिटांत खूप आशय मांडणारे हे लघुपट आवर्जून पाहण्यासारखे. गजबजलेल्या शहरात भर बाजारात तान्हं मूल रडायला लागल्यानंतर त्याला दूध कसं आणि कोठे पाजायचं, असा गहन प्रश्न मातेला पडतो. जेथे जाईल तेथे पुरुषांची उपस्थिती. या ठिकाणाहून त्या ठिकाणी अशी ती धडका मारू लागते. मॉलमधून बाहेर पडून रस्त्यावर येऊन आसरा शोधू लागते, पण व्यर्थ. एकीकडे मुलाच्या रडण्याचा आवाज वाढू लागतो आणि दुसरीकडे आईची बेचैनी. इतक्यात शाळेच्या इमारतीवर रंगवलेली फुलपाखरे आणि शाळेतून बाहेर पडणाऱ्या छोटय़ा मुली दिसतात. मुलाच्या रडण्याचा आवाज बंद होतो तेव्हा कॅमेरा गोलाकार उभ्या असणाऱ्या मुलींच्या हसऱ्या चेहऱ्यावर असतो आणि खिदळणाऱ्या तान्हुल्याच्या ओठावर दुधाचे थेंब असतात. अर्थातच ‘बटरफ्लाय’ या केवळ तीन मिनिटांच्या लघुपटाने एका फटक्यात प्रेक्षकांची उत्स्फूर्त दाद मिळवली.
कट्टरपंथीयांचा वरचष्मा असणाऱ्या इराणसारख्या देशात कुत्र्याचा अपघात ही घटनादेखील एखाद्या सोज्वळ धार्मिक विचारांच्या व्यक्तीच्या विचारांची आंदोलने वाढवणारी ठरू शकते हे ‘अनक्लिन’सारख्या १९ मिनिटांच्या लघुपटात दिसते. अंधाऱ्या रस्त्यावर एक कुत्रा गाडीखाली येऊन जखमी होतो. आता या जखमी कुत्र्याचं करायचं काय, या द्विधा मन:स्थितीतच तो त्या कुत्र्याला घरी घेऊन येतो. मात्र नवीनच संकट उभे राहते. शेजारपाजाऱ्यांना जर कुत्र्याचा आवाज गेला, तर ते निषिद्ध ठरवून त्याला अनक्लिन म्हणतील या भीतीपोटी घरूनदेखील त्याला विरोध होतो. अखेरीस जेथून त्याला आणले त्याच ठिकाणी त्याला नेऊन सोडतो; पण कुत्रा जगेल की वाचेल, जग आपल्याला अनक्लिन ठरवेल का? या द्वंद्वात तो पुरता अडकतो. अंधाऱ्या रात्री घडणारी ही घटना दिवस उजाडायच्या आत एखाद्या धार्मिक वृत्तीच्या व्यक्तीच्या मनात कसा वैचारिक-मानसिक गोंधळ निर्माण करू शकते हे नेमकेपणाने मांडते.
यत्रतत्रसर्वत्र युद्धाच्या वातावरणाखाली दबलेल्या इराणमधील एका वैराण जागी दहा-बारा कुटुंबहत्यादेखील अशीच दबून गेलेली असते. त्यावर मुंग्यांचं वारूळदेखील होतं. त्या ‘अ‍ॅण्टस् अपार्टमेंट’मध्ये कायमची विश्रांती घेणाऱ्या एका जोडप्याचा संवाद त्यांची व्यथाच मांडत असते. गेली अनेक वर्षे अशा प्रकारे अनेक घरांचा झालेला उद्ध्वस्तपणा यातून जाणवतो; पण हे सारे उलगडते ते काही लोक येऊन तेथे उत्खनन करतात तेव्हाच. गाडले गेलेल्यांचे सांगाडे आणि त्यांच्या वस्तू हे सारं त्या उत्खननात लघुपटाच्या शेवटच्या प्रसंगात समोर येतं. तोपर्यंत केवळ जमिनीलगत असणाऱ्या कॅमेऱ्यातून उजाड माळरान आणि लांबवरचा रस्ता इतकीच दृश्यं आणि संवादच पडद्यावर असतात.
डोंगराच्या पायथ्याच्या एका ओसाड उजाड गावात सर्वामागे राहिलेली आज्जी आणि तिची नात यांचं भावविश्व ‘पिकिंग द डॉन’मध्ये नेमकं पकडलं आहे. मरायला टेकलेली आज्जी आणि सतत धडपडणाऱ्या मुलीची धावपळ, खिडकीला पडदा कोणता लावायचा आणि काय काय छोटय़ा छोटय़ा गोष्टींवरून आज्जी-नात यांच्यातला संवाद ऐकण्यासारखा तर आहेच, पण बहुतांश काळ केवळ दृश्यातूनदेखील अनेक अव्यक्त संवाद जाणवतात. सरतेशेवटी त्यांच्या बकरीला झालेलं पिल्लू जपायची दोघींची धडपड ही बाब त्यांच्यासाठी आशेचा नवा किरण घेऊन येते.
सर्वच इराणी फिल्म्स उत्तम कथासूत्रावर बेतल्या असल्या तरी काही वेळा भरकटण्याचे, अनाकलनीय मांडणीचे प्रकारदेखील दिसून येतात. महत्त्वाचं म्हणजे इराणी लघुपटांचा प्रभावीपणा हा त्यांच्या शॉर्ट अ‍ॅण्ड स्वीटमध्येच जास्ती खुलून दिसतो. दोन-तीन मिनिटांत छोटय़ाशा घटनेवर मार्मिक भाष्य हा हेतू पुरेपूर सफल होतो. ‘सॉफ्ट यलो’, ‘स्टेशन’, ‘द केज’मधून बटरफ्लायसारखीच बिनसंवादाची मांडणी दिसून येते. तुलनेने भारतीय भाषांतील लघुपटांना दीर्घ कालावधीची गरज जाणवते. एकंदरीत या स्पर्धेवर इराणी लघुपटांचे वर्चस्व असले तरी आठ-एक हिंदी चित्रपटांनीदेखील हजेरी लावली होती. मात्र आशय आणि मांडणीच्या बाबतीत ‘इंट. कॅफे नाइट’ हा नसीरुद्दीन शहाची भूमिका असणारा लघुपट सोडला तर इतर लघुपटांनी नाराजच केलं असं म्हणावं लागेल.
‘न्यू डील’ हा जपानी आणि ‘ऑफ सीझन’ या इस्रायली लघुपटाचा बाज काहीसा गूढरम्य असाच होता. मात्र किमान संवाद अथवा संवादविरहितच मांडणी, गूढ वातावरणाची डूब असे हे लघुपट वेगळ्या धाटणीच्या-मांडणीचा प्रयत्न करताना दिसतात.
मराठी चित्रपटांत गेल्या काही वर्षांत झालेल्या बदलांच्या पाश्र्वभूमीवर मराठी चित्रपटांचा फेस्टिव्हलमध्ये समावेश तर होताच, पण लघुपट स्पर्धेतदेखील चार मराठी लघुपट होते आणि त्यातल्याच ‘आरण्यक’ने सवरेत्कृष्ट लघुपटाचा मान पटकावला.
पोस्टमनची कंटाळवाणी नोकरी करताना स्वत:च्या आयुष्याला गांजलेला असतानादेखील एका अनोख्या संकल्पनेमुळे कंटाळवाण्या नोकरीत त्याच्यात उत्साह संचारतोच, पण आयुष्यात काही तरी वेगळे करण्याचा आनंददेखील मिळतो हे ‘डायरी ऑफ पोस्टमन’मध्ये दिसून येते. रोज सकाळी वर्तमानपत्र वाचून कोणाचं अभिनंदन करायचं, कोणाला धीर द्यायचा याची नोंद हा पोस्टमन डायरीत करतो. आणि दिवसभरच्या कामानंतर त्या ठरावीक लोकांना पोस्टकार्ड वाटतो. मग कधी तो एखाद्या गुंडाचा बंदोबस्त करणारा पोलीस इन्स्पेक्टर असतो, तर कधी ट्रॅफिक हवालदार, कधी स्वत:च्या बहिणीच्या आत्महत्येने त्रस्त झालेली महिला, तर कधी एखाद्या वृद्धाश्रमातील आजोबा. पोस्टमनची डायरी अशी रोजच्या रोज समृद्ध होत असते आणि समाजातील अनेक घटकांचे जीवनदेखील. मराठीतील हा लघुपट तांत्रिक आणि अभिनयाच्या बाबतीत काहीसा कमी पडला असला तरी कथासूत्र मांडणी उत्तम होती.
स्पर्धेत असणाऱ्या एकमेव सिंगापुरी लघुपटाने लहान मुलांच्या लैंगिक शोषणासारख्या विषयाला वाचा फोडण्याचा प्रयत्न केला. सार्वजनिक शौचालयात नैसर्गिक विधी उरकायला गेलेल्या लहान मुलावर लैंगिक अत्याचार होतो आणि त्या मुलाचं कोवळं भावविश्व पुरतं उद्ध्वस्त होतं आणि इतका वेळ गाडीत भांडणारा मोठा भाऊ हाच त्याच्या भावविश्वाचा आधार ठरतो.
एकंदरीतच अनेक वेगवेगळ्या विषयांच्या माध्यमातून मानवी स्वभावांच्या अफाट पसाऱ्यात डोकावण्याचा प्रयत्न लघुपटांमध्ये प्रभावीपणे दिसून आला. एखादा विषय संकल्पना मांडण्यासाठी कायमच भलेमोठे संवाद, भव्यदिव सेट्स, मोठय़ा स्टारकास्टची गरज नसते. छोटय़ाशा गोष्टीत दडलेला मोठा आशयदेखील थोडक्या काळात प्रभावीपणे मांडता येतो.
सुहास जोशी