16 February 2019

News Flash

सिक्कीमानुभव

पर्यटकांमध्ये लोकप्रिय असलेली ठरावीक ठिकाणं पहात फिरण्याऐवजी जरा हटके अनुभव घ्यायचा म्हणून काही जण यूथ होस्टेलतर्फे सिक्कीमच्या गावांमध्ये, थेट तिथल्या लोकांच्या घरातच जाऊन राहिले...

| June 26, 2015 01:02 am

पर्यटकांमध्ये लोकप्रिय असलेली ठरावीक ठिकाणं पहात फिरण्याऐवजी जरा हटके अनुभव घ्यायचा म्हणून काही जण यूथ होस्टेलतर्फे सिक्कीमच्या गावांमध्ये, थेट तिथल्या लोकांच्या घरातच जाऊन राहिले..

शाळांच्या परीक्षा संपल्या की सुट्टय़ांचे वेध लागतात आणि पर्यटनासाठी स्थलदर्शनाचे विविध पर्याय आपण धुंडाळू लागतो. एकदा का स्थलदर्शन निश्चित झाले की, त्या अनुषंगाने हॉटेल बुकिंग्ज आणि तेथे जाण्यासाठी ट्रेन किंवा विमानाची बुकिंग्ज अशी आपली गाडी ठरावीक रुळांवरून प्रवास करू लागते. या साऱ्या प्रकारापासून ‘हटके’ असा यावर्षीचा वाय.एच.ए.आय. (युथ हॉस्टेल असोसिएशन ऑफ इंडिया) महाराष्ट्र राज्य शाखेचा सिक्कीमचा कार्यक्रम जाहीर झाला. त्यात समावेश होता तो किताम, ितगवाँग ग्रामगृहनिवासचा. खरे तर आत्तापर्यंत ग्रामगृहनिवास ही संकल्पना थोडीफार का होईना माहितीची व्हायला लागलीये. परंतु एका मोठय़ा पर्यटक समूहासाठी ती यशस्वीरीत्या राबविणे हे फार मोठे आव्हानच होते. वायएचएआयचे उपाध्यक्ष हृषीकेश यादव यांच्या डोक्यातून या संकल्पनेचा जन्म झाला आणि आमच्यासारखे अनेकजण नव्या उमेदीने त्यात सामील झालो.
खरे तर जेव्हा एखादे ठिकाण पर्यटनस्थळ म्हणून नकाशावर जन्माला येते तेव्हा आपसूकच तेथे हॉटेलव्यवस्था उभारली जाते. अनेकजणांना रोजगार उपलब्ध होऊ लागतो. परंतु त्याचा व्यावसायिक फायदा ना त्या गावांना ना त्या गावातील लोकांना! झालाच तर त्या हॉटेलमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गावातील बडय़ा लोकांना किंवा गावाबाहेरून आलेल्या गुंतवणूकदारांना!! हे टाळता यावे म्हणून तेथे जाणारे पर्यटक जर त्या गावातील लोकांकडेच, त्यांच्याच घरात त्यांचे पाहुणे म्हणून राहिले तर तो फायदा त्या गावकऱ्यांनाच प्रत्यक्ष होईल या हेतूने हृषीकेश यांनी किताम व तिंगवाँग जीपीयू (Group Panchayat Uni) या ठिकाणांची निवड केली.

कार्यक्रमाचे स्वरूप असे होते-
मुंबईहून दार्जिलिंगला रिपोर्टिग- एक दिवस दार्जिलिंग पाहायचे.- तेथून पेलिंग- नंतर दोन दिवस किताम मुक्काम- त्यानंतर दोन दिवस तिंगवाँग जीपीयू मुक्काम- पुढे दोन दिवस गंगटोक मुक्काम व स्थलदर्शन आणि परत मुंबई असा एकंदर दहा दिवसांचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला. यातील चार मुक्काम हॉटेल्समध्ये व चार मुक्काम गावात गावकऱ्यांसमवेत असणार होते. दर एकाआड एक दिवस किमान २० जणांची बॅच दार्जिलिंगला रिपोर्ट करणार होती. किताम आणि तिंगवाँग गावकऱ्यांशी वैचारिक, भावनिक देवाणघेवाण व्हावी म्हणून आम्ही दोघी मैत्रिणी थेट कितामला गेलो. दार्जिलिंग ते किताम हा प्रवास आम्ही संपूर्णतया स्थानिक वाहतूक व्यवस्थेने म्हणजे दहा जणांच्या जीपने केला.. तोसुद्धा तीन टप्प्यांमध्ये! (दार्जििलग २० किमी जोरथांग, जोरथांग २० किमी नामची, नामची १५ किमी किताम) या कोणत्याही टप्प्याच्या ग्रामीण प्रवासात आम्हाला अजिबात बाहेरचे असल्याचे जाणीव झाली नाही. दोघी स्त्रिया असूनही तेथील पुरुष सहप्रवाशांकडून साधा धक्कादेखील लागण्याची आगळीक घडली नाही. एका जीपमध्ये दहा प्रवासी अगदी गुण्यागोविंदाने प्रवास करत. इतकेच नव्हे तर स्त्रियांची उपस्थितीसुद्धा लक्षणीय होती. सीट नंबर्स बसायच्या आधीच दिले जात आणि त्याचे इमानेइतबारे पालन होई.
सिक्कीम राज्याची अर्धी जनता नेपाळी. या नेपाळी हिंदूंचे एक गाव- किताम. आमच्या या गृहनिवास प्रकल्पात सामील झाले होते. या गावाची स्वत:ची इकोटुरिझम कमिटी आहे. या कमिटीच्या माध्यमातून अनेक इकोफ्रेंडली प्रकल्प गावात राबविले जातात.
किताम गावात शिरल्यापासूनच तेथील आतिथ्याचा आहाला सुखद अनुभव येऊ लागला. गावच्या सरपंचीणबाई-सावित्री (वय वर्षे २६/२८) आणि इकोसिस्टीम कमिटीचे अध्यक्ष के. एन. प्रधान यांच्या घरी आमची राहण्याची व्यवस्था केली होती. आम्ही ज्या जीपने किताम गावात पोचलो त्या जीपच्या सारथ्याने आम्हाला स्टॅण्डपासून अगदी घरपोच पोचवले. त्यामुळे घर विचारत विचारत जाण्याची वेळ आणि तसदी पडलीच नाही.
दुपारच्या जेवणाची वेळ झाल्याने आम्ही लगेचच भोजनावर भरपेट ताव मारला. जेवायला भरपूर भात, डावीकडे चार प्रकारच्या चटण्या व लोणची, उजवीकडे तीन भाज्या आणि पातळ आमटीसदृश पदार्थ! शहरी माफक जेवणाची सवय असलेल्या आम्ही त्या भोजनदर्शनानेच अध्र्या तृप्त झालो आणि उरलेल्या अध्र्या भोजनआस्वादाने तृप्त झालो. तेव्हा लक्षात आले की इथले सर्व पदार्थ सेंद्रिय आहेत. सोयाबीनचा मुक्त वापर, पालेभाज्यांचा पुरेपूर समावेश आणि शिजविण्याच्या पद्धती अशा की पचनाला सुलभ पण भाज्यांचे स्वतंत्र अस्तित्व कायम!!
आमचे जसे स्वागत झाले तसेच कार्यक्रमाच्या सर्व सहभागींचे मन:पूर्वक स्वागत त्यांना ‘खता’ (उपरण्यासारखे रेशमी वस्त्र) घालून करण्यात येत होते. असे स्वागत झाले की, त्यांना त्यांचे गृहनिवास सांगितले जाई. त्या प्रत्येक घरी जाण्यासाठी एक एक गाईड-कम-साहाय्यक त्यांच्या बरोबर असे. एकदा का व्यक्ती त्या त्या घरी गेल्या की पुढचे दोन दिवस त्यांच्या चहापाण्याची, भोजनाची, नाश्त्याची व्यवस्था त्या त्या गृहस्वामी/ गृहस्वामिनीकडे असे. आमच्या सहभागींनीही कौतुकाने घरोघरी द्यायला भेटवस्तू आणल्या होत्या. काहींनी खाद्यपदार्थ तर काहींनी वस्तू. त्या सर्वाची देवाणघेवाण स्नेहपूर्ण पद्धतीने घराघरांत होत असे.
किताम गाव तीन विभागांत विभागले गेले आहे. अप्पर किताम, लोअर किताम आणि मिडल किताम! अगदी गुहागरमधील खालची आळी, वरची आळी असते तसंच! परंतु सारा मार्ग चढावावरचा आणि हा रस्ता राज्य महामार्ग असलेला! त्याचे राष्ट्रीय महामार्गामध्ये रूपांतरण सुरू आहे. गाडीरस्ता वळणावळणाचा असल्याने किलोमीटरमध्ये अधिक होतो. परंतु वरच्या किताममधून मधल्या किताममध्ये जायला पायऱ्या-पायऱ्या असलेला (काँक्रीटच्या पायऱ्या) जवळचा रस्ता आहे. त्यामुळे ज्यांना चालण्याची आवड आणि इच्छा आहे त्यांनी हे मार्ग वापरून पाहायला अजिबात हरकत नाही. त्यामुळे गाडीरस्त्यांच्या खुणांचा काहीच उपयोग नाही. हे मार्ग तुम्हाला अगदी वेगळय़ाच विश्वात घेऊन जातात आणि स्वर्गसुखाची आठवण करून देतात. आम्ही दोघी जेव्हा या मार्गानी गेलो तेव्हा शाळेतल्या वेगवेगळय़ा मराठी कवितांच्या आठवणी काढून नॉस्टॉल्जिक झालो.
किताम गाव हिंदू वस्तीचे! अनेक मराठी शब्द त्यांच्या नेपाळी भाषेत मिसळून गेलेले. आजा, आजी, उखळ, मुसळ, जातं यासारख्या शब्दांनी मराठी आणि नेपाळी भाषांची दरी अगदी कमी करून टाकलेली. ‘इकडे-तिकडे’ या शब्दाने तर तिथल्या आमच्या गाइडना अगदी भुरळ पाडली होती. पहिल्या गटानंतर इतर सगळय़ा बॅचना त्यांनी त्यांच्या ठेक्यात ‘इकडे-तिकडे बघू नका’ आणि ‘लवकर लवकर चला’ या वाक्यांनी जिंकूनच घेतले.
इथले ‘किताम पक्षी अभयारण्य’ प्रसिद्ध आहे. साल आणि पाइन वृक्षांचे हे जंगल पक्ष्यांसाठी उत्तम अधिवास आहे. मोरांचे दर्शन अगदीच सहज आणि पावसाचा शिडकावा झाल्यावर तर अप्रतिम मयूरनृत्य म्हणजे पर्वणीच! जागोजागी आढळणारे दगडफुलांचे (छ्रूँील्ल२) विविध प्रकार आणि नेचे (ाी१ल्ल) याच्या विविध जातींचे नमुने, अधूनमधून दिसणारे ऑर्किडचे पुष्पगुच्छ यांनी येथील हवा किती स्वच्छ व प्रदूषणमुक्त आहे याचे दाखलेच दिले. हवेत गिरक्या घेणारे स्कार्लेट मिनिवेट, हिमालयन बुलबुल, किंगफिशर यांनी आमची अभयारण्याची सहल सार्थकी लावली.
रंगीत नदीच्या काठावर सकाळी नऊ वाजता घेतलेल्या चहा- बिस्किटांची अजूनही जिभेवर रेंगाळणारी चव संध्याकाळच्या व्हिलेज वॉकला रेंगाळत मारलेल्या गप्पा, गावाकडील पाळीव जनावरे, मृत्य व्यक्तींच्या स्मरणार्थ बांधलेले आरामदायी चबुतरे, विसाव्याची ठिकाणे, पारंपरिक घरे, प्रत्येक घराच्या दारातील असंख्य रंगीबेरंगी फुले हे सारे पाहत, अनुभवत आम्ही गावातील वास्तव्याचा मनमुराद आस्वाद घेतला. या सर्वात महत्त्वाचे म्हणजे आम्ही फिरत असताना प्रत्येक घरातून संपूर्ण गटाला येणारे चहापाण्याचे आमंत्रण! आणि जर हे आमंत्रण आम्ही नम्रपणे नाकारले तर किमान ‘तातोपानी’ (कोमट पाणी) तरी घ्या असा प्रेमळ, आर्जवी आग्रह! या आग्रहाचा मान राखायचा तर पुढच्या संकटाची चाहूल! कारण संपूर्ण सिक्कीम भटकंतीमध्ये आम्ही कुठेही, कधीही, कोणीही, प्रातर्विधीसाठी किंवा आणीबाणी म्हणूनही गैर वागताना पाहिले नाही. प्रत्येकाकडे व्यवस्थित स्वच्छतागृहाची सोय! तिथे आणि तिथेच सारे विधी उरकायचे! इतके की इमर्जन्सी म्हणून ड्रायव्हरसुद्धा गाडी इथे तिथे उभी करत नाहीत. व्यवस्थित हॉटेल बघूनच उभी करतात. नाही तर आपल्या महाराष्ट्रात, साधारण गाव आले याची सूचना वाऱ्यावरून येणारा दरुगधच देतो. वयाने ‘सर्वात धाकटे’ असणाऱ्या राज्याकडून आपल्यासारख्या ‘दादा’ राज्याने हे तर शिकायलाच हवे.
गावात मुलींचे प्राबल्य हे येथील अजून एक वैशिष्टय़. तसेच प्रत्येक मुलगी किमान पदवीधर तर आहेच. मुलांची संख्या गावात कमी. शिवाय गावामध्ये बर्थ कंट्रोल आणि आरोग्यविषयक कार्यक्रम दर आठवडय़ाला. सरकारी शाळांमध्ये सरकारकडून प्रत्येकाला गणवेश, पुस्तके, वह्य, रेनकोट, बूट मोफत! तसेच सर्वाना माध्यान्ह भोजन. शाळेच्या मुख्याध्यापकांना आपल्या शाळेचा आणि पर्यायाने ऑरगॅनिक स्टेट अशा सिक्कीम राज्याचा सार्थ अभिमान! आपल्या शाळेबद्दल भरभरून बोलण्यासाठी शिक्षक व मुख्याध्यापक सदैव तयार! येथील शाळेच्या मुख्याध्यापकांनी तर आम्हाला त्यांची शाळा उत्साहाने फिरवून दाखवली.. तीही अगदी माध्यान्ह भोजनगृहासकट! आश्चर्याची गोष्ट म्हणजे या भोजनगृहाच्या आसपास अगदी भाताचे एक शीतसुद्धा पडलेले दिसले नाही की भाजीचा देठ, नको असलेले दांडे असा कचरादेखील आढळला नाही. नाही तर आपल्या भोजनगृहांची अवस्था..! तिकडे मात्र कोठेही सांडपाण्याचा लवलेश नाही, चिकटपणा, माश्या आणि धुळीचे साम्राज्य नाही. सारे काही नीटनेटके आणि व्यवस्थित! आणि विशेष म्हणजे हे सारे आम्ही येणार म्हणून नाही तर अंगभूत सवय म्हणूनच! कारण आम्ही जाणार हे शाळांत अथवा कोठेही आधी सांगितलेलेच नसायचे. सारेच अनौपचारिक! अर्थात गावची लोकसंख्या मोजकी असल्याने आणि पाहुण्यांचे अप्रूप खूप असल्याने हे सारे सहज जमत असे.. त्यांनाही आणि आम्हालाही! असाच नेटकेपणा आम्ही घराघरांत अनुभवला. घरच्या गृहस्वामिनी स्वयंपाक कधी आणि कशा करायच्या हे त्यांच्या पाकगृहांच्या स्थितीवरून कधीच समजले नाही. कायम सारे आवरलेले आणि पसारा शून्य!
वायएचएआयकडून कॉम्प्युटर मिळाल्यावर त्याबद्दल त्यांना वाटलेले सार्थ कौतुक व आनंद आम्हालाही समाधान देऊन गेले.
संध्याकाळच्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये दर वेळी नवीन नवीन गाणी व विविध नृत्ये सादर होत. त्यांची थोडक्यात माहिती सावित्रीदीदी किंवा रोशनभैया देत असत. सर्व गाण्यांची मूलभूत रूपरेषा ‘निसर्ग’ हीच असे. या संध्याकाळच्या सांस्कृतिक देवाणघेवाणीत तर एक आश्चर्यजनक अनुभव आला. आमच्या एका गटातल्या ‘नेहा’ नावाच्या १५ वर्षीय मुलीने किताम गावच्या ‘सुषमा’ नामक मुलीला ‘अप्सरा आली’ या गीतावर ‘लावणी नृत्य’ करायला शिकवले, तर सुषमाने नेहाला ‘नेपाळी नृत्य’ करायला शिकवले. ही दोन्ही नृत्ये कार्यक्रमात मोठ्ठी बाजी मारून तर गेलीच शिवाय कितामवासीयांना आणि मुंबईकरांना कायमचा आनंदाचा ठेवा देऊन गेली.
घरी येऊन बघतो तर काय ‘सवितादीदी प्रधान’ (आमच्या केएन दाजूंच्या- केएन भैयांच्या- पत्नी) चक्क नऊवारी साडी नेसून पेशवाई थाटात आमच्या स्वागताला तयार! इतक्या सहजसुंदर पद्धतीने त्या नऊवारी साडीत वावरल्या की त्या स्थानिक आहेत असे वाटलेच नाही. अगदी जेवायला वाढून होईपर्यंत त्या महाराष्ट्रीय वेशात होत्या, की नंतर आम्हालाच अवघडल्यासारखे वाटले.
येथल्या रीतीभातींशी आमचा परिचय झाला. येथे लग्न होऊन सासरी आल्यावर मुलीचे नाव बदलत नाहीत. म्हणजे सावित्री छेत्री आणि रोशन कौशिक हे पती-पत्नी आहेत हे सांगितल्याशिवाय समजत नाही. येथे कोणतीही वस्तू आपल्याला देताना स्वत:चा डावा हात स्वत:च्या उजव्या हाताच्या कोपराला लावूनच देतात. अगदी सत्यनारायणाच्या पूजेला बसल्यावर पत्नीने पतीच्या हाताला हात लावून ‘मम’ म्हणण्याची स्टाइल इथे आठवते.
कितामवासीयांच्या घरातील काही गैरसोयींचा (उदाहरणार्थ : स्नानगृहात कपडे टांगायला खुंटी नसणे, सामान ठेवायला कपाट नसणे, कपडे बदलायला पडदे नसणे इत्यादी) प्रवाशांनी फारसा बाऊ केला नाही, तर आपल्या शहरी राहणीमानामुळे नकळत घडणाऱ्या आगळिकी (उदा. हात धुतल्यावर नॅपकिन मागावा लागणे, फिरायला जाताना आरशात डोकावण्याची सवय असल्याने तो कोठे आहे हे विचारणे वगैरे) कितामवासीयांनी मनाला लावून घेतल्या नाहीत. या दोन दिवसांच्या मुक्कामात प्रवासी आणि स्थानिक लोक या दोघांनीही एकमेकांना लळा लावला व पुढच्या वर्षी पुन्हा भेटण्याचे आश्वासन देऊन एकमेकांचा साश्रूनयनांनी निरोप घेतला.
अशा प्रकारे आठवडय़ाभराचा पाहुणचार घेऊन आम्ही तिंगवाँग जीपीयूकडे प्रयाण केले. जाताना सिंगताम येथून आम्ही आमच्या जीप बदलल्या कारण येथून पुढे उत्तर सिक्कीमला जाण्यासाठी इनरलाइन परमिटची आवश्यकता असते.
तिंगवाँग जीपीयूमध्ये खालून वर अशी एकूण पाच गावे- नामप्रिक, नुंग, तिंगवाँग, लिंकू, कुसाँग. (आणि तेथून पुढे टोलुंग गुहेला जायला ट्रेक रुट.) उत्तर सिक्कीममधला अप्पर झाँगू हा भाग बौद्ध धर्मीयांचा. लिमडिम, पासिंगडॉन ही या भागातील इतर गावे. तिंगवाँग हे गाव ‘लेपचा’ जमातीचे- संपूर्णपणे लेपचा जमातीचे.
लेपचा ही अगदी भोळी जमात. कोणीही सहजपणे फसवावे अशी. त्यामुळेच की काय यांचे स्वतंत्र अस्तित्व कायम राहावे म्हणून कित्येक वर्षांपूर्वी राजाने एक नियम घालून दिलेला- ‘लेपचाने आपली जमीन लेपचालाच विकायची.’ आजही हा नियम पाळला जातो. म्हणूनच कदाचित यांची स्वतंत्र संस्कृती अजूनही टिकून आहे.
आमचे गृहनिवास तिंगवाँग जीपीयूमध्ये सर्व गावांत होते. दोन गावांतील अंतर तसे जास्त म्हणजे तीन ते चार किमी आणि त्यात उतार-चढावाचे रस्ते! त्यामुळे दमछाक व्हायचीच. नामप्रिक गावाला जायला तर रस्ताच नाही! त्यामुळे दोन दिवसांचे मोजकेच सामान घेऊन तेथे जायची विनंती सर्वाना करण्यात आली होती. त्यामुळे तसा निवांतपणा देखील मिळायचा. गावात प्रेक्षणीय स्थळे म्हणजे लिंकूची गुहा आणि त्याजवळच असणारा बांबूंचा वैशिष्टपूर्ण पूल. अप्रतिम सृष्टीसौंदर्याने नटलेला हा ग्रामसमूह. ज्या वेळी आकाश निरभ्र असेल तेव्हा लिंकू, तिंगवाँग व कुसाँग येथून कांचनजंगा पर्वतरांगेची बर्फाच्छादित शिखरे दर्शन द्यायची. अन्यथा संपूर्ण पर्वतरांग व दऱ्या धुक्यात गुडूप!! आम्हाला पावसाळी व निरभ्र अशा दोन्हींचे दर्शन झाले.
संपूर्ण तिंगवाँग ग्रामसमूह ऑर्किडच्या मुबलक गुच्छांनी सजलेला. डोळ्यांचे पारणे फेडणारी नाना रंगांची आणि रूपांची ऑर्किड्स. इथे आपण ऑर्किडच्या एका काडीसाठी जीव टाकतो तेथे ऑर्किड्स आपल्यावरून जीव ओवाळून टाकायला तयार असतात. इथले जंगल नेच्याच्या विविध जातींनी समृद्ध. प्रत्येक वृक्ष विविध प्रकारच्या वनस्पतीसमूहांनी युक्त जसे – कचनार वृक्षावर ऑर्किड्स, फर्न्स, मॉसेस, वेली सारे काही.. ऑल इन वन! एकाच वृक्षाचा सांगोपांग अभ्यास करायला किमान एक महिना लागतोच. मुसलेडी (नेपाळी) म्हणजेच मल्लेरो (लेपचा) हे कळायला तिंगवाँगला यावेच लागेल. वृक्ष दिसतो. त्यावर लगडलेली फळेही दिसतात. चव पाहायची असेल तर गावातील कोणतीही व्यक्ती फळे काढून द्यायला तयारच! सुख सुख म्हणजे तरी नक्की काय? हेच ते! नामप्रिक, कुसुंग, लिंकू, नुंग या ठिकाणी वेलचीचे उत्पादन होते. हे यांचे कॅश क्रॉपच आहे. गेल्या काही वर्षांपासून वेलचीचे उत्पादन कमी झालेय, परंतु सरकारी व स्थानिक पातळीवर रसायनांचा वापर करायला लोक तयार नाहीत. गोमूत्र चिकित्सेचा कसा उपयोग करता येईल याचा सध्या विचार चालू आहे. नक्की परिणाम निश्चित झाले की पुढची उपाययोजना ठरेल. वेलचीमध्येच देशाचे मार्केट असतानादेखील लोक धीराने या अडचणीवर सेंद्रिय पद्धतीने मात करताना दिसतायत. सरकारी मंडळीसुद्धा प्रामाणिकपणाने मातीचे नमुने गोळा करून ऑरगॅनिक सिक्कीमच्या बांधणीत स्वत:चा सहभाग नोंदविताना दिसताहेत. शासकीय प्रामाणिकपणाला मिळालेली गावकऱ्यांची सेंद्रिय साथ खरेच मोलाची!
या भागात आलेला अजून एक मजेदार अनुभव म्हणजे जळवा लागण्याचा! काही ठिकाणी मुबलक तर काही ठिकाणी कमी! पण अस्तित्व सगळीकडेच! त्यामुळे आधी आम्ही धास्तावलोच पण आमच्या अतीव उत्साहामुळे जळवांवरचा उतारा म्हणून मिठाच्या पुडय़ा सोबत घेऊन आम्ही भ्रमंती करतच राहिलो.
गावात साऱ्यांचे आडनाव एकच! ‘लेपचा!’ संपूर्ण गावच लेपचा. त्यामुळे शाळेतील मुलांची नावे शिक्षक कशी बरे लक्षात ठेवत असतील हा आम्हाला उगीचच पडलेला प्रश्न.
या पूर्ण गावाचा धर्म बौद्ध. नेपाळपासून हा परिसर किमान ८०-१०० किमीवर! येथेच आम्ही २५ एप्रिलच्या महाभयंकर भूकंपाचा थरारक अनुभव घेतला! येथल्या शाळेत आम्ही व्हॉलीबॉलची मॅच पाहायला आलो होतो. फोटो काढण्यासाठी म्हणून उभे राहिलो आणि तो थरारक क्षण अनुभवला. सारी मुले एका क्षणात जागच्या जागी स्थिर झाली. डोळे विस्फारून! अनुभव सरला आणि पुढच्याच पाच मिनिटांत सारे जण पुन्हा मॅच खेळायला तयार! इथे भूकंपाचा अनुभव तसा नेहमीचाच! परंतु हा धक्का जोरदार होता. इथली घरे बांबूची, लिंपण केलेली, लाकडी, जोत्यावर बांधलेली, खाली दगडी पाया अशी. त्यामुळे कोठेही पडझड अथवा जीवितहानी झाली नाही. ही थोडक्यात कृपाच म्हणायची! हा भाग भूकंपप्रवण क्षेत्रात येतो. परंतु घरबांधणी या संकटाला पुरून उरेल अशी! सगळी घरे शॉक प्रूफ. त्यामुळे गावातले कोणीच फारसे धास्तावलेले दिसले नाही.

आम्ही आल्याने साऱ्यांनाच ‘किती करू स्वागता!’ असे झालेले. त्यांच्या सणवाराला करायचे पदार्थ आम्हाला दोन दिवसांत खिलवण्याची त्यांची इच्छा आणि तयारी कौतुकास्पद! कितामच्या तुलनेत इथले लोक थोडे बुजरे जाणवले. त्यात भाषेचा अडसर, हिंदीशी थोडी थोडी तोंडओळख, भाषा समजणारी पण बोलण्याची अडचण हे सारे. पण सरावाने हळूहळू अंगवळणी पडत गेले, त्यांच्या आणि आमच्याही. त्यांची नावेही आगळीवेगळी. सवय नसलेली. उदा. चुंगडेन जिल्हादीदी, नलिमित, नीसाम (नयसाम) या सर्वानी आम्हाला मनापासून सहकार्य केले. आम्ही अजाणतेपणी केलेल्या चुका सावरून घेतल्या आणि आम्हाला हा कार्यक्रम यशस्वी करण्यात सर्वतोपरी मदत केली.
शहरीकरणाचा थोडाफार स्पर्श येथे जाणवला तो म्हणजे आर्थिकदृष्टय़ा सुदृढ स्तरातील मुले गंगटोक अथवा कॅलिम्पाँग येथील निवासी शाळांत पहिलीपासून जातात. अर्थात शिकून आल्यावर त्यांची गाव सोडून जायची फारशी तयारी नसते. परंतु उच्च आर्थिक स्तरातील मुले गावातील शाळेत फारशी दिसली नाहीत. निम्न स्तरांतील मुले सरकारी शाळांत जातात, ज्या अगदी चार ते पाच किमीच्या परिसरातच आहेत. (म्हणजे तिंगवाँग व लिंकू येथे स्वतंत्र शाळा आहेत.)
या सिक्कीम राज्यात पूर्व प्राथमिक ते उच्च माध्यमिक या साऱ्या वर्गाचे शिक्षण सरकारतर्फे मोफत दिले जाते. अगदी गणवेश, पुस्तके, वह्य़ा, रेनकोट, बूट या गोष्टीदेखील! माध्यान्ह भोजनाची व्यवस्थादेखील सरकारच पाहते. त्यामुळे गरिबातल्या गरिबालादेखील शिक्षणासाठी वणवण करावी लागत नाही. आपण स्वत:ला वयाने आणि अकलेनेदेखील ‘दादा’ राज्य समजतो, पण अजूनही आपल्याला शिक्षणाचे हे ध्येय साकार करता आलेले नाही, याची खंत वाटते. पुन्हा हे सारे शिक्षण इंग्लिश आणि त्यांच्या मातृभाषेतदेखील उपलब्ध आहे आणि सारे विद्यार्थी याचा पुरेपूर लाभ घेतात.
तिंगवाँगच्या शाळेत रोज सकाळी साडेनऊ वाजता सारी मुले एकत्र जमून निसर्गजपणुकीची प्रार्थना करतात. प्रार्थनेचा थोडक्यात भाव असा की आम्ही या निसर्गाचेच अंश आहोत. आणि त्यामुळेच हा निसर्ग जोपासण्याची, त्याचे संवर्धन करण्याची तो उत्तम अवस्थेत टिकवून ठेवण्याची आम्ही एकदिलाने शपथ घेत आहोत. जी मुले त्यांच्या रोजच्या आयुष्यात निसर्गाची जपणूक करीतच आहेत, त्याला धक्का लागू नये याची खबरदारी घेतच आहेत, ती मुले त्यांच्या दिवसाची सुरुवात या शपथेने करतात आणि आम्ही तथाकथित पुढारलेली मंडळी निसर्ग ओरबाडण्यातच धन्यता मानतो.
इथली तरुणाई किमान पदवीधर तर आहेच! ट्रॅव्हल आणि टुरिझमसारख्या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेऊन शहरात जाण्याची इच्छा तर सोडाच, आपल्याच गावाला आपल्या ज्ञानाचा उपयोग करून गावाला पुढे नेण्यासाठी त्याची आस बाळगणारे नीसाम आणि पेमासारखे तरुण या तिंगवाँग जीपीयूचे आदर्श आहेत. बरे या साऱ्या तरुण रक्ताने या शहराची हवा चाखलीच नाही असेही नाही. बाहेरगावी काम करून आल्यावर आपणही काही आपल्याच गावात करू शकतो ही भावना खूप प्रबळ आहे. २७/२८ वर्षांच्या जिल्हादीदी चुंगडेनला मिळणारे मानधन आणि तिची भटकंती याचा कुठेच ताळमेळ लागत नाही. वायएचएआयच्या जवळजवळ दोनशे मंडळींनी या दोन ग्रामगटांतील अतिथीपदाचा सन्मान उपभोगला, गावातील प्रत्येकाचा या ना त्या स्वरूपातील सहभाग अनुभवला. सर्वानी मन:पूत आनंदाने आमचे स्वागत केले. आम्ही तर आमच्या नातेवाईकांकडेही राहिलो नाही इतके दिवस तिथे घरचे होऊन राहिलो.
किताम आणि तिंगवाँग या दोन्ही जीपीयूंना निसर्गाने अमाप आणि अनुपम सौंदर्य बहाल केले आहे. येथील अरण्यात फिरताना विशेष नवलाची गोष्ट म्हणजे कुठेही प्लास्टिक पिशव्या, कुरकुऱ्यांचे पुडे, फडकी, दोरे असा कचरा दिसला नाही. अस्पर्श अशा अरण्यातसुद्धा विविध जागी झाडांपाशी बांबूच्या टोपल्या असत; की ज्यात कचरा टाकता येईल. अगदीच काही नाही तरी जमिनीत खड्डे केलेले असत. आमच्याबरोबर येणारे आमचे गाइड, अगदी सरपंचबाईंचे पतीसुद्धा, आमच्यापैकी इतरांनी कधीमधी टाकलेला कचरा त्यातच गोळा करत. रस्त्यात आढळणारा कुठलाही कचरा न बोलता, त्याचा बाऊ न करता योग्य जागी टोपलीत, डब्यात, खडय़ात साठवीत. कुठल्याही ठिकाणी व कोणत्याही गाइडला आम्ही कधी रस्त्यावर, जंगलात कधीही थुंकताना पाहिले नाही. भले त्यांना आम्हाला प्रभावित करायचे असेलही. पण मग आपल्या राज्यातील गाइडना, पर्यटकांना हे नियम का सांगावे लागतात?
किताम काय अथवा तिंगवाँग काय, दोन्ही डोंगरडतारावरची गावे! अर्धाच काय पाव एकर जमीनसुद्धा सलग एका प्रतलात नाही. कित्येकदा घरेसुद्धा अशी की स्वयंपाकघर वरच्या प्रतलात स्वतंत्र बांधलेले, तर झोपण्याच्या खोल्या व बैठकीच्या खोल्या खालच्या प्रतलात स्वतंत्र! सतत चढ-उतार केल्याशिवाय कोणतीही कामे करणे अशक्य! असं असतानादेखील प्रत्येक घर अन्नधान्याच्या बाबतीत संपूर्णपणे स्वयंपूर्ण! स्वत:च्या कुटुंबापुरते धान्य प्रत्येकाच्या घरी पिकते. कोबी, फ्लॉवर, वांगी, ब्रोकोली, गाजर, मुळा, बटाटा, आलं, हळद, टोमॅटो अशा भाज्या, तर मुसलेडी, पॅशन-फ्रुट, केळी अशी फळझाडे प्रत्येकाच्या आवारात. कुणालाही यातली कुठलीही भाजी वापरायची असेल तर आरामात कुणाच्याही आवारात शिरून आणावी. शेतातून थेट स्वयंपाकघरात! तीच गोष्ट पशुधनाची, मांसाहार संपूर्ण गावाचा होतो. ‘माझ्यापुरता मी’ ही भावनाच नाही. सर्वच बाबतीत अखंड गावाचा सहभाग. काही ठिकाणी (कुसाँग) तर आमच्या बॅचला जेवू घालण्याची जबाबदारी संपूर्ण गावाने उचललेली. ज्याच्याकडे जे उपलब्ध आहे, ते त्याने आणून द्यायचे. काहींकडे दूध, काहींकडे भाज्या, तर काहींकडे बक्वीट (नाचणीसारखे तृणधान्य), मिलेट यासारखी तृणधान्ये अथवा त्यांची पिठे या सर्व उपलब्ध सामग्रीतून आमच्यासाठी भोजनाची निर्मिती झाली. कम्युनिटी किचनचे उत्तम उदाहरण आम्ही प्रत्यक्ष अनुभवले.

वाइननिर्मिती हा तर घराघराचा उपव्यवसाय. बाहेरून येणाऱ्या पाहुण्याला गृहनिर्मित वाइन चाखायला देणे हा तर आतिथ्याचा परमोच्च क्षण! वायएचएआयच्या कुठल्याही कार्यक्रमात याला परवानगी नसल्याने साऱ्यांनीच आमची ही विनंती मान्य केली आणि ‘पुन्हा कधीतरी’ म्हणून आमचा मान राखला. नाहीतर आपल्या महाराष्ट्रातील गावात ‘पाहुण्यांना आवडणारी गोष्ट’ म्हणून दारू हा आतिथ्याचा अविभाज्य घटक होतो आणि गावसंस्कृतीचा त्यात बळी जातो. असं काहीही न घडता ही आमची पर्यटन सहल यशस्वीरीत्या पूर्ण झाली.
पर्यटन व्यवसायाचा विस्तार होताना त्या त्या ठिकाणची संस्कृती टिकून राहणे अधिक महत्त्वाचे. भारत देश विविध संस्कृतींचे माहेरघर आहे. त्यातील एकात्मता हे भारतदेशाचे बलस्थान आहे. या संस्कृती टिकवताना तिथला निसर्ग जपण्याचीही आपणा सर्वाची इच्छा हवी. त्या निसर्गाची ओरबाडणूक नको, तसेच तिथल्या संस्कृतीवर अतिक्रमणही नको. आपले शहरीकरण तिथे लादणे नको, तर त्यांच्याशी मिळून-मिसळून राहण्याची तयारी हवी. संस्कृतींची देवाणघेवाण हवी. आपलं तेच योग्य, इतरांनी आपल्यासारखे वागले पाहिजे हा अट्टहास, दुराग्रह नको. अन्यथा मनालीसारख्या अनेक सुंदर गावांचे जे बाजारीकरण झाले तेच होण्याचा धोका पुढे आ वासून उभा राहील. भारतीय सीमांवरची अशी अनेक गावे दुर्लक्षित राहू नयेत, त्यांना ‘टाकले’पणाची भावना येऊ नये अशी कृती आपल्याकडून घडायला हवी. भारतदेश अखंड, अबाधित ठेवण्याची जबाबदारी आपणा सर्वाची आहे.
विमानात डोळे मिटून बसल्यावर या सगळ्या दिवसांचा अनुभवपट डोळ्यांसमोरून सरकत होता. वाटले की ही आपल्या देशाच्या विविध भागांतील गावे अशीच शहरीकरणाचा स्पर्श नसलेली राहोत. गावात बाजारूपणा शिरून त्या त्या गावाचे स्वतंत्र अस्तित्व आणि वैशिष्टय़पूर्ण संस्कृती नामशेष न होवो. किमान या सर्वाचा अनुभव घेण्यासाठी तरी प्रत्येकाने आपली शहरी संस्कृती बाजूला ठेवून काही दिवस तरी या वातावरणाशी मिळूनमिसळून राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जेणेकरून विविधतेमधील एकता आपल्याला कृतीतून दाखवता येईल.
हेमलता जोशी – response.lokprabha@expressindia.com
छायाचित्र – राजू नायक, मंदार चौधरी

First Published on June 26, 2015 1:02 am

Web Title: sikkim
टॅग Sikkim,Travel