lp32दिवाळी २०१४
आडवाटेवरच्या हुपरीसारख्या एका दोन-चार हजार वस्तीच्या गावात १९०४ मध्ये चांदीचे दागिने घडविण्याची कला रुजते आणि ११० वर्षांत सारं गावच चांदी उद्योगात गढून जातं. पिढीजात पद्धतीने संक्रमित झालेला व्यवसाय संपूर्ण गावाचा आणि पंचक्रोशीच्या अर्थव्यवस्थेचा कणा बनून जातो. नेमका हा प्रवास झाला कसा आणि आजच्या स्पर्धेच्या युगात हे अनोखं विशेष उद्योग क्षेत्र नेमकं काय करतंय, हे पाहणं सयुक्तिक ठरावं.

साधारण १५ वर्षांपूर्वी आपल्या देशात विशेष आर्थिक क्षेत्रासाठी (स्पेशल इकॉनॉमिक झोन) रेड कार्पेट अंथरण्यात आलं होतं. त्यासाठी ढीगभर सवलती आणि खंडीभर योजना पुरविण्यात संपूर्ण सरकारी यंत्रणा कार्यान्वित झाली होती. उद्योगधंद्याची एकात्मिक वाढ व्हावी या उद्देशाने सुरू झालेल्या या योजनेचा मात्र इतर सरकारी योजनांप्रमाणेच बोजवारा उडाला. मात्र आपल्या देशात काही गावं अशी आहेत की जेथे अशी कोणतीही सरकारी विशेष योजना नाही, मात्र केवळ पिढीजात पद्धतीने संक्रमित झालेला एखादाच व्यवसाय संपूर्ण गावाचा आणि पंचक्रोशीच्या अर्थव्यवस्थेचा कणा बनून राहिला आहे. ही स्थानिक पातळीवरची विशेष आर्थिक क्षेत्रचं म्हणावी लागतील. अशाच पैकी एक महत्त्वाचं उद्योग केंद्र म्हणजे कोल्हापूर जिल्ह्य़ातील चांदीनगरी म्हणून ओळखलं जाणारं हुपरी.
तब्बल ११० वर्षांपासून या गावात चांदीच्या व्यवसायाने इतके भरभक्कम पाय रोवले आहेत की आजही हुपरी आणि आजूबाजूच्या गावांची अर्थव्यवस्था चांदी उद्योगावर अवलंबून आहे. सेझच्या संकल्पनेतील विशेष करसवलत सोडली तर सारं काही हुपरीत आहे. पण कोणत्याही सरकारी औपचारिकतेत न सामावणारं असं हे विशेष आर्थिक क्षेत्र गेली ११० र्वष स्वबळावर आपला गाडा हाकत आहे.
या गावातील प्रत्येकाच्या जगण्यात चांदीचा अंश सापडतो. जुन्या हुपरीच्या गल्ल्यांमधून फिरताना कोणत्याही घरात डोकावलं तरी तुम्हाला दोन-चार स्त्रिया चांदीच्या दागिन्यांच्या जोडकामात व्यग्र असताना दिसतात. दुपारच्या वेळी तांदूळ निवडायला सासू-सुना बसायच्या अगदी तसंच चित्र हुपरीतल्या घराघरांतून दिसतं. हे तर काहीच नाही, जेव्हा हुपरीतला व्यापार ऐन भरात होता तेव्हा तर प्रत्येकाच्या अंगणात सांडगे-पापड वाळत घालावेत तसे चांदीच्या दागिने पॉलिश करून वाळत घातलेले दिसायचे. प्रत्येकाच्या दारात शेणकुटांची भट्टी पेटलेली असायची. कोठे आटणीचा धूर निघत असतो, तर कोठे तार पाष्टा मशीनचा खडखडाट सुरू असतो. येथील प्रत्येक घर शत-प्रतिशत चांदीच्या कामात बुडालेलं असायचं. इतकंच नाही तर हुपरीतल्या ज्या भागात चांदीचे कारखाने अधिक आहेत त्या भागातील रस्त्यांवरचा कचरा काढणाऱ्या महिलादेखील दिवसाला कचरा विकून दोन-तीनशे रुपये मिळवतात. यावरूनच या गावाची चांदीमग्नता लक्षात येईल.
कालौघात काही बदल झाले असले तरी आजदेखील पन्नास-साठ हजार लोकवस्तीच्या या गावात निम्म्याहून अधिक लोकसंख्या चांदी व्यवसायाशी जोडली गेली आहे. त्यामुळे हुपरी गावातील लोकसंख्येचं वर्गीकरण करायचं तर कारागीर, धडी उत्पादक, व्यापारी, चांदी उत्पादक कारखानदार आणि पूरक यंत्रसुविधा देणारे व्यावसायिक अशा व्यवसायानुसारच करावं लागतं. एखादं विशेष आर्थिक क्षेत्र म्हणून जे काही हवं आहे, ते सारं या हुपरीत गेली ११० र्वष नांदत आहे, वाढत आहे. देशात आग्रा, राजकोट, सेलम आणि हुपरी या चारच ठिकाणी चांदीचा व्यवसाय अशा प्रकारे एकवटलेला आहे. त्यातही हुपरीतील व्यवसाय हा घराघरांतून वाढला आहे. तसा तो इतर शहरांमध्ये वाढलेला नाही. म्हणूनच महाराष्ट्रातल्या या चांदीनगरीच्या अंतरंगात lp31डोकवावंसं वाटतं. नेमका यांचा डीएनए आहे तरी काय, की ज्यामुळे हे सारं चक्र अव्याहतपणे सुरू आहे. येथे कधी बदल झालाच नाही का? झालाच असेल तर तो काय होता? कामगारांचे प्रश्न कधी भेडसावलेच नाहीत का? चांदीचा उद्योग सोडून दुसरं काही कोणाला करावंसंच वाटलं नाही का?
कोल्हापूरपासून कर्नाटक हद्दीवर असणाऱ्या बोरगावला जाणाऱ्या वाटेवरील हुपरीला ऐतिहासिक महत्त्वदेखील आहे. इ.स. १३०० मध्ये विजापूरहून कोकणात जाणाऱ्या व्यापाऱ्यांचा हुपरी हा एक ठरलेला विसावा होता. इ.स. १७५० च्या सुमारास हुपरी कोल्हापुरांकडून पटर्वधनानी जिंकलेलं हुपरी नवकोटनारायणास गहाण टाकले. इ.स. १८०० ला निपाणीकर देसाईंनी हुपरी ताब्यात घेतले त्यानंतर कोल्हापूरच्या छत्रपतींनी हे गाव काबीज केलं. साधारणपणे हुपरी कोल्हापूरकरांच्या ताब्यात होतं त्याच काळात येथील कसबी कारागीर सोनार मंडळी कोल्हापूरच्या राजघराण्याच्या सण समारंभाच्या वेळी हत्ती-घोडे यांना घालण्यासाठी कोयऱ्या, गोंडे इ. सांजवात दागिने बनवून देत. त्यांच्या कारागिरीचे कौतुक होत गेले, स्फूर्ती मिळत गेली आणि केवळ हत्ती-घोडय़ांच्या दागिन्यापुरते मर्यादित न राहता हुपरीतील काही तरुणांनी स्वत:च्या हिमतीवर सोन्या-रुप्याच्या दागिन्यात अनेक प्रयोग सुरू केले.
अर्थात त्या काळी कसलीच यंत्रसामग्री नव्हती, तरीदेखील दादोबा केशव पोतदार, वामन कृष्णाजी सोनार, कृष्णाजी रामचंद्र पोतदार यांनी आपल्या बुद्धिकौशल्याने चांदीच्या दागिन्यात नवनवे प्रयोग सुरू केले. कोयली, मासोळ्या, जोडवी, चाळ, घागरी, कडदोरे, गोंडे, छल्ले, वाळे, तोडे, वाक्या असे अनेक अलंकार येथे तयार होऊ लागले. हा काळ होता साधारण १९०४ च्या आसपासचा. हुपरीच्या तयार दागिन्यांनी कोल्हापूर, मिरज, सांगली, बेळगाव अशा आजूबाजूच्या संस्थानातील बाजारपेठा सजू लागल्या. हुपरीचं नाव होऊ लागलं तशी मागणी वाढत गेली. पोतदार बंधूंनी दागिने तयार करण्याचं कसब केवळ स्वत: पुरते मर्यादित न ठेवता त्यांनी ते घराघरांत पोहचविलं. केवळ चारपाच हजार लोकवस्तीच्या गावात घरोघरी चांदीच्या दागिन्यांचे प्रशिक्षण घडू लागले. आज हुपरीतील चांदी उद्योगात दिसणारे बहुजिनसी समाजाचे स्वरूप हे या लोकांच्या धोरणीपणाचे फळ म्हणावं लागेल.
कालांतराने हुपरीतील दागिने देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचू लागले तेव्हा मुख्यत: उत्तर भारतातील बाजारपेठांना भावलं ते हुपरीचं पैंजण. हुपरीच्या पैंजणांची मागणी वाढू लागली, हुपरीचा चांदी उद्योग पैंजणाभोवती केंद्रित होत गेला. हुपरी आणि चांदीचं पैंजण असं समीकरणच बनून गेलं. परिणामी आजदेखील हुपरीत सुरू असणाऱ्या उलाढालीत ८०-८५ टक्के वाटा हा केवळ पैंजणांचा आहे. उत्तरोत्तर व्यापाऱ्यांची आणि कारागिरांची संख्या वाढत गेली. १९०४ साली केवळ दोनचार हजार लोकवस्ती असणारे हुपरीत आज तब्बल पन्नास-साठ हजारांवर लोकसंख्येचं झालं असून चांदी हाच बहुतांश लोकांचा आधार आहे.
आज हुपरीतील संपूर्ण चांदी व्यवसायाची आणि पर्यायाने लोकवस्तीची व्याप्ती पाच प्रकारात विस्तारली आहे. कच्च्या चांदीपासून तयार मालाच्या उत्पादनापर्यंत आणि त्याच्या विक्रीपर्यंत सर्वच काम एकाच ठिकाणी करणारे उद्योजक. चांदीचे दागिने देशभरात परपेठांवर नेऊन विकणारा दुसरा वर्ग हा व्यापाऱ्यांचा. त्यांची संख्या बरीच आहे. तिसरा महत्त्वाचा घटक धडी उत्पादक. व्यापाऱ्यांकडून कच्ची चांदी घेऊन त्याचे रूपांतर दागिन्यांमध्ये करणारा हा घटक एके काळी हजारोंच्या संख्येत होता. चौथा घटक आहे पूरक उद्योग यंत्रणा पुरविणाऱ्या व्यावसायिकांचा. चांदीवर कराव्या लागणाऱ्या प्रक्रियेचे हुपरीत आज किमान प्रत्येकी १००-२०० कारखाने आहेत. पाचवा घटक कारागिरांचा. धडी उत्पादकाकडे आणि इतर पूरक कारखान्यात काम करणारा कारागिरांचा वर्ग हा सर्वात मोठा वर्ग या व्यवसायातील सर्वात तळाचा घटक आहे. या सर्वाना सामावणाऱ्या चारपाच संघटना येथे कार्यरत आहेत. त्यांचे किमान पाच-सात हजार सभासद आहेत. म्हणजेच हुपरीतील २५-३५ हजार लोकसंख्या ही केवळ चांदी व्यवसायावरच अवलंबून आहे म्हणावं लागेल.
धडी उत्पादक हा हुपरीच्या चांदी व्यवसायाचा गाभा आहे. व्यापाऱ्याकडून चांदी घ्यायची आणि त्याच्या मागणीनुसार चांदीचे दागिने तयार करून द्यायचे हा त्याचा व्यवसाय. दागिने करण्यासाठी आपल्या ऐपतीप्रमाणे कधी तो सात-आठ कारागीर नेमतो, तर कधी घरातील माणसांच्या मदतीनेच काम पूर्ण करतो. त्या बदल्यात त्याला काय मिळतं? तर ५.५ टक्के घट आणि मालाच्या प्रकारानुसार मजुरी. कधी किलोमागे ४२० रुपये, तर किलोमागे २१० रुपये. यातूनच कारागिरांची मजुरी आणि दागिना तयार करण्यासाठी ज्या काही प्रक्रिया बाहेरून करून घ्यायच्या आहेत त्याची मजुरी द्यावी लागते. अर्थात त्याला मिळणारी मजुरी ही या दोन बाबींवरच खर्च होते. मग त्याच्या हाती उरते काय, तर व्यापाऱ्याने त्याला जी ५.५ टक्के घट म्हणून दिलेली चांदी असते त्यामधून प्रक्रिया करताना घट/झीज होऊन शिल्लक राहिलेली चांदी. हीच त्याची खरी संपत्ती.
lp33धडी हा शब्द नेमका कसा आणि कोठून आला याबद्दल सध्या तरी हुपरीतील कोणीही जुनाजाणता स्पष्टीकरण देऊ शकत नाही. धडी उत्पादकांच्या घरात पिढय़ान् पिढय़ा दागिने तयार करण्याचे कौशल्य संक्रमित होत गेलं आहे. ज्याने धडी उत्पादनात भरारी घेतली तोच भविष्यात उद्योजक म्हणून नावारूपास आला आहे. व्यापाऱ्याकडून कच्ची चांदी घेऊन धडी उत्पादन करताना घट स्वरूपात राहणारी चांदी जशी वाढू लागली तसतसं त्याचं भांडवल तयार होऊ लागलं. पर्याप्त भांडवल जमा झाल्यावर तोच स्वत: दागिने तयार करून बाजारपेठांत जाऊ लागला. हे सर्व करताना या व्यवसायातील गुप्तता आणि कौशल्याची गरज या दोन गोष्टींमुळे सुरुवातीच्या काळात त्याने आपल्याच नात्यातील अनेकांना मदतीला हुपरीत आणले. त्यातूनच ज्यांनी ही कला आत्मसात केली त्यापैकी कामसू लोक धडी उत्पादनात उतरू लागले आणि कुवतीनुसार भविष्यात चांदी माल उद्योजक कारखानदार होत गेले.
हुपरीतील चांदी व्यवसाय याच पद्धतीने वाढला आणि स्थिरावला आहे. त्यामुळेच ‘आजचा कामगार हा उद्याचा मालक’ ही संकल्पनाच येथे रूढ झाली. एखाद्या व्यवसायात अशा प्रकारे संक्रमण होत उद्योगाची भरभराट होण्याची उदाहरणे तशी विरळाच आहेत. त्यामुळेच हुपरीतील हे संक्रमण विशेष नोंद घेण्यासारखे आहे.
हुपरीतला चांदी मालाचा व्यापारी वर्ग हा तर खास अभ्यासाचा विषय आहे. चांदी व्यवसाय स्थिरावत गेला तसा येथील माल देशभरातील बाजारपेठांमध्ये पोहोचू लागला. हा माल येथील व्यापारी स्वत: नेऊन विकत. थोडीशी अतिशयोक्ती वाटेल, पण हुपरीतील जुनेजाणते सांगतात की, भारतातील एकाही जिल्ह्य़ाचं ठिकाण नसेल जेथे हुपरीचा व्यापारी पोहोचला नसेल. बरं या व्यापाराची पद्धतदेखील एकदम वेगळी आणि आदिम अशा बार्टर सिस्टीमची आठवण करून देणारी आहे. हुपरीत चांदीचे दागिने तयार करायचे आणि परपेठांमध्ये विकायचे, पण त्या बदल्यात पैसे न घेता तेवढय़ाच वजनाची, टंचाची चांदी आणि मजुरीचे पैसे घ्यायचे. यालाच येथील व्यापारी बदला चांदी व्यवहार म्हणतात. गेली ११० वर्षे हुपरीतील व्यापार याच पद्धतीने चालतो. अशा पद्धतीने चालणारा हा देशातील बहुधा एकमेवच व्यवसाय असावा.
अर्थात त्यामुळेच चांदी हीच संपत्ती हे हुपरीचं ब्रीदवाक्य आहे. हुपरीत एखाद्याची संपत्ती मोजायची तर पैसा, शेती, घर, गाडी या मालमत्तेपेक्षा त्याच्याकडे चांदी किती यावरच त्याला जोखलं जातं. चांदी माल व्यापारी असो की कारखानदार असो की धडी कामगार रोख रकमेच्या स्वरूपात होणाऱ्या फायद्यापेक्षा हाती उरणारी चांदी हाच त्याचा उत्पन्नाचा आणि भांडवलाचा मुख्य स्रोत आहे. हीच चांदी वेळीअवेळी मदतीस येते. शिल्लक चांदी अडीनडीला मोडून त्याचे रूपांतर पैशात करता येते.
हुपरीतील सारा उद्योग याच पद्धतीने गेली ११० वर्षे सुरू आहे. मुख्य म्हणजे हा सारा कारभार सुरू आहे तो केवळ आणि केवळ विश्वासावर. चांदी उत्पादक धडी कामगाराला कितीही किलो चांदी बिनदिक्कत देतो ती विश्वासावर. धडी उत्पादक कारागिराला काम देतो ते विश्वासावर. गेल्या चार-पाच वर्षांपूर्वीच्या दोन-चार घटना सोडल्या तर आजवर कोणीही कोणाची फसवणूक केलेली नाही. अर्थात या सर्वामागे बाजारातील पत हा कळीचा मुद्दा आहे. एकदा का पत गेली की मग हुपरीत कोणालाही व्यवसाय करणे अवघड जाते.
lp34हुपरीत समाजातील सर्वच थरांतील लोकांचा समावेश चांदी व्यवसायात झालेला दिसून येतो. त्यामुळे एकाच एक वर्गाचं वर्चस्व असण्याची बहुतांश ठिकाणी आढळणारी पद्धत येथे अजिबात दिसत नाही. त्याला दोन कारणं आहेत. एक म्हणजे घट/झीज माध्यमातून जमा होणारी चांदी हे येथील भांडवल. त्यामुळे जो भरपूर काम करतो आणि ज्याला व्यापाराचे थोडेसे अंग आहे तो या भांडवलातून कारागीर- धडी उत्पादक-कारखानदार-व्यापारी असा प्रवास करू शकतो. दुसरा मुद्दा असा की, हुपरीतील व्यापारात एक काळ असा होता की, जे द्याल ते खपत होतं. कामाला खळ पडत नव्हता. सर्वच प्रकारच्या कामांच्या प्रचंड संधी होत्या. परिणामी हुपरीतल्या प्रत्येकालाच या चांदीनं साथ दिली, इतकेच नाही नात्यागोत्यातील अनेकांना हुपरीत नशीब अजमावता आलं.
सुबत्तेचे वर्णन करताना देशात सोन्याचा धूर निघत होता असं म्हणायची प्रथा आहे; पण हुपरीच्या बाबतीत चांदी धूर निघतो असा बदल करावा लागेल. हुपरीनं स्वत:चं वेगळंपण देशभरातील बाजारात टिकवलं आणि वाढवलं आहे. त्यासाठी तीन-चार पिढय़ाचे श्रम कारणी लागले आहेत. चांदीचा दागिना जरी पांढराशुभ्र आणि झळाळून निघणारा असला तरी कच्च्या चांदीपासून ते दागिना तयार होईपर्यंत हात काळे करत मान मोडून अविश्रांत मेहनत या व्यवसायात करावी लागते.
गेल्या ११० वर्षांत हुपरीतदेखील प्रचंड बदल झाले आहेत. चांदी व्यवसायाला खरी गती मिळाली ती ५०च्या दशकानंतर. त्याकामी पुढाकार घेतला तो दिवंगत य. रा. नाईक यांनी. खरं तर नाईकांनी आपला चांदी व्यापार व्यवसाय कमी केला होता, किंबहुना तो बंदच केला होता. मात्र आपल्या गावाच्या व्यवसायाला दिशा मिळावी, भरभराट व्हावी या उद्देशाने त्यांनी अनेकांना मार्गदर्शन केलं. चांदी उत्पादकांना एकत्र आणण्याच्या उद्देशाने १९४४ साली चांदी कारखानदार (उद्योजक) असोसिएशनची स्थापना केली. कालांतराने नेमिनाथ वाळवेकर यांच्या पुढाकाराने १९६० साली चांदीमाल उत्पादक सहकारी संघदेखील स्थापन झाला. या दोन्ही संघटनांमुळे हुपरीतील व्यवसायाला संघटित रूप मिळाले. हुपरीतील चांदी उत्पादनासंदर्भात या संस्थांनी सभासदांसाठी मार्गदर्शक नियमावली केली आहे. उत्पादनातील कोणताही तंटा हा या संघटनांच्या माध्यमातून मार्गी लावला जातो, तर चांदी व्यावसायिकांना लागणारा कच्चा माल व हत्यारे एकाच जागी मिळावीत म्हणून चांदी औद्योगिक सहकारी संघाची स्थापना १९५६ साली करण्यात आली.
हुपरीतील उद्योग हा घराघरांतून होणारा उद्योग असल्यामुळे कारागीर, धडी उत्पादकाचे राहण्याचे ठिकाण आणि कामाचे ठिकाण एकच असेल तर फायदेशीर ठरणार होते. त्यामुळेच १९७० साली हुपरीच्या माळावर यशवंत औद्योगिक रहिवासी वसाहत सुरू झाली. रहिवासी स्वरूपातील अशी औद्योगिक वसाहत ही तेव्हा राज्यातील एकमेव वसाहत होती. आज येथे चांदी आटणीपासून ते पॉलिश करण्याच्या शेवटच्या टप्प्यांपर्यंतच सारे व्यवहार येथे होतात. नुकतेच हुपरीनजीक झालेल्या पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतदेखील सिल्व्हर झोन तयार करण्यात आला आहे.
महिला कारागिरांचा वाढता सहभाग हे येथील व्यवसायाचे वैशिष्टय़ आहे. खरंतर महिलांचा सहभाग या उद्योगात होताच, पण तो घरापुरता मर्यादित होता. धडी उत्पादक जेव्हा छोटय़ा प्रमाणात काम घेत असे, तर तो दागिने तयार करण्याचं काम तो घरच्या घरीच घरच्यांच्या मदतीने करत असे. घरात आई, बायको, बहीण, मुलगी अशा दोन-तीन तरी महिला असायच्या. घरची कामं करून अथवा काम सुरू असतानाच दागिने तयार करण्याच्या कामातील अनेक कामं या महिला पूर्ण करत असत. मीनाकाम करण्यात तर येथील महिलांचा हातखंडाच आहे. घरातल्यांच्या सहभागामुळे मजुरीत तर बचत होतेच, पण कामातील गुणवत्तादेखील टिकून राहत असे आणि जी काही चांदीची झीज होईल ती घरातच पडत असे. अर्थात हुपरीतील कामाचे घरगुती स्वरूप हाच त्या व्यवसायाचा कणा आहे.
lp35मात्र गेल्या काही वर्षांत पुरुष कारागिरांच्या कमतरतेमुळे अनेक महिलांची कारागिरी केवळ स्वत:च्या घरापुरत्या मर्यादित न राहता धडी उत्पादकाच्या कारखान्यापर्यंत जाऊन पोहोचली आहे. भरणी, मीनाकाम अशा कामांत महिलांचा हातखंडा तयार झाला आहे. दुसरं असं की पुरुष कारागिरापेक्षा महिला कारागिरांच्या कामाचा वेग आधिक आहे. पुरुषांप्रमाणे मध्येच चहा-विडीसाठी जाणारा वेळ येथे वाचू लागला. आज त्यामुळेच येथील कारागिरांमध्ये महिला वर्गाचं प्रमाण जवळपास पन्नास टक्के इतके आहे.
हुपरीच्या चांदी उद्योगाने पंचक्रोशीत आपले हातपाय पसरले आहेत. साधारण १०-१५ किलोमीटर परिघातील सर्वच गावांमध्ये हुपरीच्या चांदी व्यवसायाची मुळं पोहोचली आहेत. मांगूर, यळगूड, रेंदाळ, तळंदगे, पट्टणकोडोली, इंगळी, रांगोळी, बारवाड, कारदगा, रणदेवीवाडी अशा जवळपास दहा-बारा गावांमध्ये चांदी व्यवसायाची पाळंमुळं पोहोचली आहेत. आज जरी इतर अनेक व्यवसायांचा त्या गावांना आधार असला तरी एके काळी हुपरीतील चांदी व्यवसाय हेच त्या गावांच्या रोजगाराचे मुख्य साधन होते. सुरुवातीस आपल्या गावापासून हुपरीत येऊन काम करणारा हा घटक, हुपरीतील व्यापाऱ्यांचा, कारखानदारांचा विश्वास बसल्यावर थेट स्वत:च्या गावात चांदी घेऊन जाऊ लागला आणि स्वत:च्या घरी दागिन्यांचे उत्पादन करू लागला. त्यातूनच परिसरातील गावांमध्ये अनेक धडी उत्पादक तयार होऊ लागले.
अशा धडी उत्पादकांचं गाव म्हणजे आठ किलोमीटरवर असणारं पट्टणकोडोली. १९५० पासून येथील कारागीर हुपरीत जाऊन काम करत असत. येथील एक ज्येष्ठ व्यावसायिक आणि चांदी माल उत्पादक कारागीर असोसिएशनचे उपाध्यक्ष महादेव तळस्कर सांगतात की, ‘‘साधारण १९७० च्या आसपास सुमारे ३५ जणांनी एकत्र येऊन गावात पहिलं सूत पाष्टा मशीन टाकलं. अशा दुकानाला येथे कंपनी सुरू करणं म्हणतात. कालांतराने यात वाढ होत गेली. धडी उत्पादक वाढू लागले, हुपरीतील व्यापाऱ्यांचा विश्वास वाढत गेला तशी कोडोलीतील कामांची संख्यादेखील. पाहता पाहता कोडोलीत आटणीपासून ते दागिना पॉलिश करण्याच्या सुविधा देणाऱ्या सर्वच पूरक सेवा कार्यरत झाल्या. इतकंच नाही तर येथील धडी उत्पादकदेखील कालांतराने व्यापारी बनत गेला. हा पसारा जसा वाढत गेला तसतसे येथील उत्पादकांना आपल्या समस्या सोडविण्यासाठी एकत्र येण्याची गरज निर्माण झाली. तोपर्यंत हुपरीतल्याच असोसिएशनचे ते सारे सभासद होते, पण काही वर्षांपूर्वी कोडोलीकरांनी स्वतंत्र असोसिएशन सुरू केली. चांदी माल उत्पादक कारागीर असोसिएशन कोडोलीचे अध्यक्ष दिलीप वळीवडे सांगतात की आज २५० सभासदांमध्ये धडी उत्पादक, व्यापारी, माल उत्पादन सेवा पुरविणारे अशा अनेकांचा समावेश आहे. सर्वच सुविधा कोडोलीतच असल्यामुळे हुपरीवरचं अवलंबित्व कमी झालं. एका मोठय़ा उद्योग केंद्राच्या छायेत असताना आणखीन एक स्वतंत्र उद्योग केंद्रच तयार होणं हे अर्थव्यवस्थेला गती देणारं अनोखं उदाहरण म्हणावं लागेल.
परिसरातील दुसरं महत्त्वाचं गाव म्हणजे मांगुर. हुपरीपासून पाच किलोमीटरवर कर्नाटकाच्या हद्दीत असलेलं हे गाव एकेकाळी हुपरीच्या संपूर्ण चांदी व्यवसायाचा कणा होतं. त्याचं कारण या गावात तयार होणारी हातसाखळी. चांदीच्या पैंजणात हुपरीचा व्यवसाय स्थिरावू लागला होता तेव्हा सर्वच काम तेव्हा हाताने होत असत. त्यातील सर्वात महत्त्वाचा घटक होता तो साखळी. या साखळीवरच पुढील डिझाइनचे जोडकाम चालत असे. अर्थातच ही साखळी किती चांगली आणि मजबूत त्यावर पैंजणाची सारी मदार असते. मांगुर गावाची खासियत ही साखळी तयार करणं होती. १९५५-५६ च्या आसपास श्रीपाद घोडके, लिंगाप्पा इंगरोळ आणि एकनाथ तराळ यांनी अत्यंत कौशल्याचं आणि किचकट असं जिकिरीचं काम करायला सुरुवात केली. कारागीर घडत गेले. मांगुरची हातसाखळी देशभरात प्रसिद्ध होती. साधारण १९५० च्या आसपास हुपरीतून सूत काढून आणायचं आणि साखळी मांगुरात करायची पद्धत सुरू झाली. हळूहळू मांगुरातदेखील सूत पाष्टा तयार करण्याचं काम सुरू झालं. या साखळीला मागणी प्रचंड असे. कारागिरांना उसंत मिळणार नाही असं काम होत होतं. पण हे सारं काम वेळ खाणारं होतं. दिवसाला एक कारागीर फार फार तर ३०० ग्रॅम साखळी तयार करत असे. हुपरीतील वाढत्या व्यवसायाला हा पुरवठा तोकडाच होता. त्याच दरम्यान साखळी तयार करण्याचं मशीन हुपरीत सुरू झालं. दिवसाला १५-२० किलो साखळी एका मशीनमधून मिळायला सुरुवात झाल्यावर हातसाखळीची मागणी कमी होत गेली आणि कारागिरी कमी होत गेली. आज मांगुरात केवळ एका हाताच्या बोटांवर मोजण्याइतपतच हातसाखळी कारागीर आहेत.
आज या चार -पाच हजार वस्तीच्या गावाने चांदी उद्योगात स्वतंत्र स्थान मिळवलं आहे. मांगुरातील चांदी व्यावसायिक मल्लापा चौगुले सांगतात की, ‘‘आज गावात सर्वच प्रकारच्या प्रक्रिया करणारी सामग्री उपलब्ध तर आहेच, पण हुपरीप्रमाणेच परपेठांवर जाऊन मालाची विक्री करणारे व्यापारीदेखील आहेत.’’ महाराष्ट्राच्या सीमारेषेपासून कर्नाटकात केवळ दोन किलोमीटरवर असणाऱ्या मांगुरची अर्थव्यवस्था अवलंबून आहे ती महाराष्ट्रातील हुपरीवर व इतर बाजारपेठांवर. पण त्याच वेळी कर्नाटक सरकारचे मांगुरवर लक्ष असल्यामुळे तेथे सिल्व्हर क्लस्टरची भूमी संपादनाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
रेंदाळ हे हुपरीच्या बाजूस असणारं गाव. हुपरीच्या बरोबरीनेच रेंदाळचा विकास होत गेला आहे. हुपरीच्या दोन-तीन किलोमीटर परिसरात आणखीनदेखील अनेक छोटी-मोठी गावं आहेत जेथे चांदी व्यवसायाची भरभराट झाली आहे. त्यापैकी एक म्हणजे तळंदगे. केवळ पाच-सात हजार वस्तीच्या या गावी, हुपरीपासून जवळच्या मार्गाने येथे केवळ तीन किलोमीटर अंतर पार करून येथे पोहोचता येतं. त्यामुळे ९०च्या आसपास गावातील बहुतांश लोक हे हुपरीत कामाला जायचे. कालांतराने हुपरीतील व्यापाऱ्यांकडून काम आणून चांदी माल तयार करणारे धडी उत्पादक येथे तयार होत गेले आणि त्याला पूरक व्यवसायदेखील. तारा पाष्टा मशीन, डायप्रेस वगैरे सारं काही आलं.
गेली ११० वर्षे हुपरी आणि परिसरातील हे चांदीचक्र अव्याहतपणे सुरू आहे. एका पिढीची जागा दुसरी पिढी सहजपणे घेत आहे. गरजेप्रमाणे हुपरीबाहेरील लोकदेखील येथे येऊन त्यांच्यापैकीच एक झाले आहेत. यंत्रांच्या वापरामुळे कामातील वेगात आणि गुणवत्तेत फरक पडला आहे. दिवसाचे आठ-दहा तास मान मोडून काम, साप्ताहिक आणि दिवाळीची मोठी सुट्टी सोडली तर येथे सारा व्यवहार वर्षभर सुरू असतो.
चांदी व्यवसायातील कष्टाच्या कामामुळे कारागिरांच्या बाबतीतदेखील अनेक प्रश्न आहेत. धडी उत्पादक जरी संघटित असला तरी कारागीर आजही काही प्रमाणात असंघटितच आहेत, असे म्हणावे लागेल. यंत्रावर असो अथवा भरणी, जोडणीचं मान मोडून हातानं करायचं काम, असं हे सारंच काम कष्टाचं आणि जिकिरीचं. हे सारंच काम शारीरिक दुखण्याला निमंत्रण देणारं ठरतं. धडी उत्पादक संघटनेचे संतोष वाशीकर याबद्दल इशारा देताना सांगतात की, पाठदुखी, डोळ्याचे प्रश्न येथील कारागिरांना कायमच अनुभवयाला येतात. तर दुसरीकडे मजुरीचा प्रश्नदेखील गंभीर झाल्याचे जाणवते. आज चांदीचा भाव वाढला असला तरी पूर्वीसारखी दागिन्यांची मागणी नाही. तसेच धडी उत्पादकच मजुरीवर काम करत असल्यामुळे त्याच्या हाताखाली काम करणाऱ्यांना मजुरीदेखील जेमतेमच आणि चांदीच्या मूल्याप्रमाणे अल्पच. मागील वर्षी झालेल्या आंदोलनानंतर मजुरीत वाढ झाली असून सध्या दिवसाला १५० रुपयांपर्यंत मजुरी मिळते. हुपरीत झालेलं हे पहिलंच आंदोलन होतं. कारागिरांबाबतीतला दुसरा मुद्दा आहे तो कर्जाचा. उत्पादकाकडून गरजेप्रमाणे कारागीर धडी उत्पादकाकडून उचल घेतो. त्यावर व्याज लागत नाही. मात्र हे कर्ज घेण्याचं प्रमाण कायम वाढतच राहतं. दिवाळीला उत्पादक-मालक बदलायचा असेल, तर नवीन उत्पादक मालक त्याची देणी जुन्या मालकास देऊन कारागिराला आपल्याकडे वर्ग करून घेतो.
पण अशी हुशारी अथवा व्यापाराचं अंग सर्वानाच नाही. कामाच्या प्रचंड रेटय़ामुळे अनेक वेळा शिक्षण घेतानाच येथील मुलंमुली घरी चालणाऱ्या चांदीच्या कामात लागतात. मुलांच्या बाबतीत तर हा प्रकार मधल्या काही पिढय़ांमध्ये मोठय़ा प्रमाणात जाणवतो. येथील ज्येष्ठांचं म्हणणं असं की, आमच्या हुपरीत मुलीच जास्त शिकतात. मुलांना काय शिक्षण नसलं तरी चालायचं, पिढीजात धंदा पुढे न्यायचा हेच त्यांचं काम. आज काही प्रमाणात तरी ही मानसिकता बदलते आहे.
हुपरीच्या चांदी नगरीने आज देशभरातील सराफी पेठांमध्ये नावलौकिक मिळवला आहे. त्यातही हुपरीचं पैंजण ही हुपरीची आणि पर्यायानं महाराष्ट्राची ओळख बनून राहिलं आहे. मात्र हुपरीबद्दल आपल्याच राज्यकर्त्यांना, धोरणकर्त्यांना आणि शासनकर्त्यांना फार काही देणंघेणं नाही असंच दिसून येतं. उद्योग त्याच्या वाटेने सुरू आहे ना? मग चालू दे आणि या उद्योगातील व्यावसायिकांचादेखील इंडस्ट्री म्हणून म्हणावा तसा दबाव नाही हे आज हुपरीतील प्रत्येक व्यावसायिक कबूल करतो.
चांदी उद्योगाशी संबंधित हुपरीतल्याच संघटनांना आणि काही जाणकारांना भेटल्यावर मात्र काही प्रश्न उभे राहतात, किंबहुना सारं काही आलबेल नाही अशी धोक्याची घंटाच हे प्रश्न वाजवताना दिसतात. उद्योग व्यवसाय म्हटल्यावर त्यात चढउतार हे असणारच; पण येथील प्रश्न हे केवळ चढउताराच्या कसोटीवर मोजण्यासारखे नाहीत, तर ते थेट येथील मानसिकतेत दडले आहेत, तर काही इतर व्यवस्थांमध्ये.
देशातील संपूर्ण चांदी व्यवसायाला गेल्या दहा वर्षांत सर्वात मोठा फटका बसला आहे तो चांदीची खरेदी-विक्री एमसीएक्सवर गेल्यामुळे. कमॉडिटी एक्स्चेंजवर चांदीचा दर अव्वाच्या सवा वाढत गेला आणि त्याच वेगाने कमीदेखील झाला. २००४ साली केवळ आठ हजार रुपये प्रतिकिलो असणारी चांदी पुढे वाढत वाढत ७५ हजार रुपये किलोपर्यंत जाऊन आज ३८ हजार रुपये प्रति किलोपर्यंत स्थिरावली आहे. परिणामी मौल्यवान धातू म्हणून गुंतवणुकीसाठी चांदीवरचा विश्वास कमी होत गेला. अर्थात भाववाढीच्या सुरुवातीच्या टप्प्यात ज्यांच्याकडे जुनी चांदी होती त्यांची चांदी झाली हेदेखील खरे; पण आज व्यापारातील चांदीची किंमत १० वर्षांपूर्वीपेक्षादेखील वाढल्यामुळे हजार-दीड हजारात मिळणारे १०० ग्रॅमचे पैंजण तीन-चार हजारांपर्यंत जाऊन धडकले. चांदीचे दागिने वापरण्यात पारंपरिक दृष्टिकोन तर होताच; पण अल्प किमतीचा मुद्दादेखील होता. त्याला येथे धक्का बसला. त्यामुळे वजनदार पैंजणं कमी होत गेली. दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा की, कमी असे वजनाचे पैंजण अथवा तोडे वगैरे घेण्यापेक्षा लोकांचा कल कमी वजनाचाच, पण सोन्याचा ऐवज घेण्यावर भर वाढत गेला. निदान सोनं घेतल्याचा आविर्भाव मिरवता येतो.
चांदीच्या या चढय़ा दराला आणखीन दोन घटकांची जोड मिळाली ती म्हणजे पैंजणासारखे दागिने वापरण्याची पद्धत कमी होत जाणं आणि वजनदार पैंजणापेक्षा फॅन्सी डिझाइनचे, पण कमी वजनाचे पैंजण वापरण्यावर भर वाढत गेला. दुसरीकडे शाळांमधून पैंजण वापरण्यावर आलेली बंधनं. तरीदेखील हुपरीतील पैंजणांना मागणी येत होती ती प्रामुख्यानं उत्तर भारतातून; पण ती वगळता इतर ठिकाणच्या मागणीवर मात्र जाणविण्याइतपत परिणाम झाला आहे.
भावाच्या चढउताराचा आणि बदलत्या समाजमनाचा हा परिणाम बाह्य़ घटकांमुळे होत असला असे जरी मानले तरी हुपरीतील समाजमनाचा खूप मोठा फटका बसल्याचे येथील अनेक धडी उत्पादक, कारखानदार आणि व्यापारी कबूल करतात. त्यामागचे महत्त्वाचे कारण म्हणजे येथील उद्योगाचे पिढीजात संक्रमण आणि कारागिराचा मालक होण्याची व्यवस्था. पिढीजात संक्रमणामुळे झाले असे की, आमचे आजोबा हेच काम करायचे म्हणून आमचे वडील करायला लागले आणि म्हणून आम्हीदेखील हेच करतो आहोत. पण डिझाइनमधील बदल म्हणा अथवा नवीन उत्पादन असेल, नवीन प्रयोग म्हणा, हुपरीतील लोकांनी फार काही उत्साहवर्धक प्रतिसाद दाखविला असे म्हणता येत नाही. यशवंत औद्योगिक सहकारी वसाहतीचे चेअरमन अभयसिंह घोरपडे सांगतात, ‘‘वर्षांनुवर्षे सुरू असणारी राजश्री, रुपाली हीच डिझाइन्स आजदेखील उत्पादित केली जातात. वर्षांनुवर्षे वापरली जाणारी डाय बदलण्याची मानसिकता नाही की नवीन काही डाय तयार करावी असं वाटत नाही.’’ कारागिरांना नवं काही शिकण्याचा ध्यास नाही की काय, अशीच परिस्थिती येथे आहे. प्रशिक्षणासाठी आणि नवीन काही सुधारणांसाठी म्हणून येथे ठोस प्रयत्न फारसे होताना दिसले नाहीत. जे झाले ते अगदीच हाताच्या बोटावर मोजण्याइतपत. कारागिराचा मालक या संकल्पनेमुळे उद्योजकाच्या भूमिकेत सरसावयाला कारागिराला बराच काळ गेला असेच म्हणावे लागेल. तर दुसरीकडे ज्यांना काही नवं करावंसं वाटतं त्याला योग्य तो आधार शेजारच्या शहरातील व्यवस्थेने मिळू दिला नाही.
अशा परिस्थितीत दुसऱ्या उत्पादनाचं अतिक्रमण होणं साहजिक होतं, तेच आज येथे दिसून येत आहे. आम्ही आमच्यात बदल केला नाही हे सर्वाकडून ऐकताना त्याच वेळी बाहेरच्या बाजारपेठांनी त्यांना बदल करायला लावला आहे आणि तो त्यांच्या फायद्याचा आहे हे अगदी ठळकपणे जाणवते. आज चांदी व्यापार जोमात सुरू असला तरी येथील मूळ चांदी दागिने उत्पादन मात्र मंदावलं आहे. हुपरीतील डिझाइनला मागणी कमी होत आहे म्हटल्यावर इतर पेठांवरील मालाचा समावेशदेखील येथील व्यापाऱ्यांनी आपल्या व्यापारात केला. त्यामुळे व्यापाराचे उद्दिष्ट पूर्ण झाले, पण हुपरीचं काय? आता हुपरीतदेखील हुपरीच्या डिझाइनबरोबर परपेठांमधील डिझाइनचे पैंजण तयार होऊ लागलं आहे. इतकंच नाही, तर काही जणांनी आग्य्राहून कारागीर आणले आहेत. परिणामी, हुपरीतील मालाची मागणी कमी झाली. तळंदग्यातील ज्येष्ठ चांदी उत्पादक रावसाहेब चौगुले सद्य:स्थितीवर सांगतात की, आमच्याकडे दागिने पॉलिश करण्याची यंत्रणा होती, पण आज ती बंद ठेवावी लागत आहेत. धडी उत्पादकांच्या प्रश्नावर बोलताना संतोष वाशीकरदेखील धडी उत्पादक कमी झाल्याचे नमूद करतात. चांदीमाल उत्पादक सहकारी संघाचे व्हाइस चेअरमनदेखील याच मुद्दय़ाकडे लक्ष वेधतात.
अर्थात या सर्वामागचे सर्वात महत्त्वाचे कारण आहे ते म्हणजे आपल्या उत्पादनाचा ब्रॅण्ड तयार करणं आणि तो बाजारपेठेत सातत्याने वाजवत राहणं हुपरीकरांना जमलं नाही. पंधरा-वीस वर्षांपूर्वीच्या बाजारव्यवस्थेत हुपरीचा दागिना नावावर खपायचा. पण आजची बाजारव्यवस्था बॅ्रण्ड आधारित असल्यामुळे मार्केटिंगमधील जो आक्रमकपणा लागतो, बाजारव्यवस्था फिरविण्याचं कसब लागतं त्याची येथे कमतरता आहे असंच म्हणावं लागेल. अन्यथा सेलमचे पैंजण आजही हातसाखळीवर बनत असूनदेखील त्याला मागणी राहते आणि हुपरीच्या मालाची मागणी कमी होते हे कोडं सुटत नाही. किंबहुना अशी कोडी सोडविण्याचा प्रयत्न आजच्या बाजारव्यवस्थेच्या पद्धतीने येथे झाला नाही.
परिणामी, होतं काय की एक इंडस्ट्री म्हणून जो दबाव हवा तो येथे कमी पडतो. गेली आठ वर्षे क्लस्टरच्या उभारणीत अनंत सरकारी अडचणी येत आहेत. जागा मंजूर झाली आहे, पण क्लस्टरचं घोडं काही पुढं जात नाही. तर पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत सिल्व्हर झोनला ३०० रहिवासी औद्योगिक प्लॉट मिळूनदेखील तेथे सुविधांची वानवाच आहे. मुख्य गावापासून तीनचार किलोमीटर माळरानावर असणाऱ्या या सिल्व्हर झोनसाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नाही की त्या माळरानाला साधं कुंपणदेखील नाही. मग ना सुरक्षेची हमी, ना वाहतूक सुविधा, मग उद्योगाची वाढ होणार कशी.
कालौघात या चांदीच्या पुलाखालून बरेच पाणी वाहून गेलं आहे. नवी पिढी चांदीच्या व्यवसायात येण्याचं प्रमाण कमी झालं. हात काळे करून दिवसभर मान मोडत काम करण्यापेक्षा ऑफिसात पंख्याखाली काम करण्याची मानसिकता वाढू लागली. तर कारागीरदेखील शेजारीच झालेल्या चांदीच्या कामापेक्षा पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील जास्त मजुरीच्या कामाकडे वळू लागला आहे. परिणामी, कारागीर मिळेनासे झाले. अनेक धडी उत्पादकांची मुलं तर शिक्षण घेऊन बाहेर जाऊ लागली आहेत. व्यापारी टिकून आहे. एके काळी कारागिरांबरोबर स्वत: राबणारा मालक वर्ग आता दिसत नाही, आजचा चांदी उत्पादक परावलंबी झाला आहे.
चांदीच्या बाबतीत असं म्हणतात की, कितीही शुद्ध चांदीचा दागिना असला तरी तो हवामानामुळे काळा पडतोच. हुपरीकरांनी तर झळाळतं चांदीचं पैंजण तयार करण्यासाठी मेहनत करताना स्वत:चे हात काळे होण्याचीदेखील तमा बाळगली नाही. आज या ११० वर्षांच्या उद्योगाची चांदीवर दाटलेली काजळी दूर करण्याचं काम त्यांनाच करावं लागणार आहे. बाहेरून कोणी येऊन काहीतरी करेल हे शक्य नाही. किंबहुना ज्यांच्या जगण्यात चांदीचा अंश आहे तेच हे करू शकतात.