श्रद्धांजली : भोगले जे दु:ख…

अपार दु:ख सहन करत हसतमुखाने संघर्षमय जीवन जगत ‘अनाथांची माय’ झालेल्या सिंधुताई सपकाळ यांचे हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या ७३ व्या वर्षी निधन झाले.

sindhutai_sapkal
सिंधुताई सपकाळ

शिवाजी गावडे – response.lokprabha@expressindia.com

भोगले जे दु:ख त्याला,

सुख म्हणावे लागले

एवढे मी भोगिले की,

मज हसावे लागले

अपार दु:ख सहन करत हसतमुखाने संघर्षमय जीवन जगत ‘अनाथांची माय’ झालेल्या सिंधुताई सपकाळ यांचे हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या ७३ व्या वर्षी निधन झाले. ..त्यांनी अनेकांचे संसार उभारले, जगण्याचे बळ दिले. चौथीपर्यंत शिकलेली, घरच्यांनी आणि समाजाने मुलासह हाकलून दिलेली ती. भुकेसाठी भिक्षा मागायची, त्याच स्त्रीने हजारो मुलांची माता होत त्यांना प्रेमाने स्वत:च्या पायावर उभे केले. हजारो अनाथ मुला-मुलींना आश्रय देत त्यांची सेवा केली. महिलांवरच्या अन्याय-अत्याचाराला वाचा फोडण्याचे कामही त्यांनी केले.

‘‘फुलांवरून तर कुणीही चालेल रे.. पण काटय़ावरून चालायला शिका. स्त्रीस्वातंत्र्याच्या गप्पा न करता घरात माय बना. मायशिवाय घर नाही, देश नाही. मुलींनो आपली संस्कृती, संस्कार विसरू नका. शेतकऱ्यांनो उद्याचा दिवस चांगला असेल. जीव देऊ नका’’ असे आत्मीयतेने सांगणाऱ्या सिंधुताईंच्या शब्दाला त्यांच्या संघर्षांने एक वजन दिले होते. फिनिक्स पक्ष्याच्या उभारीची किनार असल्याने त्यांच्या शब्दांना स्वानुभवाची मोठी किंमत होती. जेवढा खडतर संघर्ष केला तेवढय़ाच निर्धाराने त्या जगल्या. आत्महत्येचा विचार केला तर समोर भुकेलेले दिसले म्हणून भीक त्याला दिली. तेव्हा समजले आपल्याला अनेकांच्या भुकेचा प्रश्न मिटवायचा आहे.. त्या म्हणायच्या.

गरिबांचा, अनाथांचा वाली कुणीच नसतो. आज मानवता संपलीय. लोक दगड झालेयत. तेव्हा काळजावर ठोके द्यायचे आहेत. अशी केवळ मानवतेची भाषा न करता ती कृतीतून साकारणाऱ्या सिंधुताई सपकाळ यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत उभ्या केलेल्या कामाची राज्यासह राष्ट्रीय स्तरावर मोठी प्रशंसा झाली. अलीकडेच त्यांना पद्मश्री सन्मानाने गौरविण्यात आले. सिंधुताईंच्या आयुष्याची कहाणी जेवढी संघर्षमय तेवढीच ती प्रेरक आहे. कोवळय़ा वयातील विवाह, त्यानंतर मुलांचा जन्म, मुलांना वाढवितानाच करावे लागणारे काबाडकष्ट, घरात आणि दारात होणारी उपेक्षा त्यांनी भोगली. पन्नास-साठच्या दशकात भारतातील बहुतेक महिलांची कहाणी अशीच असे.

वर्धा जिल्ह्यातील नवरगाव येथे १४ नोव्हेंबर १९४८ रोजी जन्मलेल्या सिंधुताईंची कथा याहून वेगळी नाही; आईच्या विरोधामुळे आणि घराच्या आर्थिक परिस्थितीमुळे लहानपणी सिंधुताईंच्या शिक्षणाला खीळ बसली. वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी वयाने मोठय़ा असलेल्या व्यक्तीशी त्यांचा विवाह झाला. लग्नानंतरदेखील त्यांचा संघर्ष संपला नाही. त्यांना घर सोडावे लागले. गोठय़ात मुलीला जन्म द्यावा लागला. रस्त्यावर आणि रेल्वे स्थानकावर भीक मागावी लागली. स्वत:ला आणि मुलीला जगविण्यासाठी त्यांचा पुन्हा संघर्ष सुरू झाला. कौटुंबिक आणि  सामाजिक अत्याचारांना बळी पडलेल्या सिंधुताईंनी आपल्या जीवनाचे धडे घेत महाराष्ट्रात अनाथांसाठी सहा अनाथाश्रम स्थापन केले त्यांना अन्न, शिक्षण आणि निवारा उपलब्ध करून दिला.

शेण काढणाऱ्या महिलांना मजुरी मिळत नसल्याबद्दल त्यांनी आवाज उठवला; परंतु त्याची मोठी किंमत त्यांना चुकवावी लागली. त्यांचे चारित्र्य मलिन करणारे आरोप झाले, सासरच्यांनीही साथ सोडली आणि तिथून सुरू झाला सिंधुताईंचा संघर्ष. बेघर झाल्यानंतर त्या भटकत राहिल्या.

    कधी रेल्वेत राहिल्या, कधी स्मशानात. पोटात भुकेचा आगडोंब उसळलेला असताना हिमतीने उभे राहण्याचा प्रयत्न त्यांनी केला. भीक मागण्याची वेळ आली; परंतु यातूनच त्यांना अनाथांच्या प्रश्नांचे भेदक दर्शन झाले. अनाथांची आई होण्याची प्रेरणाही त्यांना मिळाली. भुकेलाच त्या प्रेरणा मानत होत्या. स्वत:ची भूक भागवितानाच अन्य भुकेल्यांना आपल्या घासातील घास देत त्यांनी जगावेगळा प्रपंच सुरू केला आणि नंतर तो चांगलाच फुलला. त्यांच्यामार्फत चालविल्या जाणाऱ्या संस्थांनी असहाय्य आणि बेघर महिलांना मदत केली.

वाटेवर काटे वेचीत चाललो

वाटले जसा फुलाफुलांत चाललो

खांद्यावर बाळगिले ओझे सुखदु:खाचे

फेकून देऊन अता परत चाललो

शिक्षण नसतानाही अशी अविश्वसनीय वाटणारी त्यांची काव्यात्मक आणि अंत:करणातून प्रकटणारी भाषा होती. त्यात हृदयाला साद घालणारी संवादशैली होती. त्यांच्या भाषेत मृदुता, आपुलकी आणि सहानुभूती असायची. त्यातून ममता झिरपायची, म्हणूनच आज समाजाला भूषण वाटणाऱ्या अनेक संस्था त्यांनी उभ्या केलेल्या दिसतात. त्यांना लोकप्रभा परिवाराची आदरांजली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Sindhutai sapkal shraddhanjali dd

ताज्या बातम्या