पाचपन्नास वर्षांपूर्वीपर्यंत ज्या नदीच्या किनाऱ्यावर जहाजं, व्यापारी, हमाल, पाहुण्यांची गर्दी असायची, त्या नदीनेच नव्हे तर सिंगापूरनेच स्वतंत्र झाल्यानंतर कात टाकली आहे. एखादा देश आपलं व्यक्तिमत्त्व किती आमूलाग्र बदलू शकतो, हे समजून घ्यायचं तर सिंगापूरला भेट देणं मस्ट.

नवीन काही पाहावं, अनुभवावं आणि त्यातून आनंद मिळवावा ही माणसाची निसर्गदत्त प्रवृत्ती आहे. त्यातूनच त्याच्या भटकण्याची, अलीकडच्या शब्दात पर्यटनाची सुरुवात झाली. आज जगभरातील माणसं पर्यटनातून मिळणाऱ्या आनंदासाठी जगभर भटकत असतात, नवनवीन मुलूख पाहत असतात. तशी प्रत्येक गावा-शहराला, देशा-प्रदेशाला स्वत:ची अशी स्वतंत्र आणि वेगळी ओळख असते. ते वेगळेपण पाहण्यासाठी देशोदेशीचे पर्यटक नव्या प्रदेशाच्या मुलूखगिरीवर आलेले असतात. ज्यांना आलेल्या पाहुण्यांना आकर्षक पद्धतीनं आपल्या मुलुखाची ‘ओळख’ करून देता येते तेच पर्यटकांना अपेक्षित असलेला अनुभव आणि आनंद देऊ शकतात. ‘सिंगापूर’च्या भटकंतीत तीच गोष्ट प्रकर्षांनं जाणवली.
तसं पाहिलं तर मलेशियाच्या भूभागापासून समुद्रानं अलग केलेल्या लहानशा बेटावरचा इवलासा देश म्हणजे सिंगापूर. औरसचौरस परिमाणाच्या भाषेत मुंबईच्या निम्मेही नसलेल्या सिंगापूरनं पाहण्यासारखी इतकी ठिकाणं निर्माण केलीत की पाहुण्यांचे आठ-दहा दिवस पर्यटनात सहज निघून जातात. आपल्या मुलुखाचं विविधरंगी दर्शन घडविण्यासाठी सिंगापूरनं विकसित केलेली पर्यटन स्थळं आणि पर्यटन व्यवस्था खरंच कौतुकास्पद आहे.
कोणत्याही शहराच्या पर्यटन स्थळांच्या यादीत ऐतिहासिक वास्तू, वस्तू संग्रहालय, प्राणी संग्रहालय, निसर्ग उद्यान, जलाशय, असलेच तर समुद्रकिनारे आदी ठिकाणांचा अंतर्भाव असतो. ती स्थळं दाखविणाऱ्या बसमध्ये बसायचं आणि एखाद्या चित्रपटाचा ट्रेलर पाहावा तसं धावतं स्थलदर्शन करायचं आणि ‘आम्ही अमकंतमकं शहर पाहिलं हं!’ असं सांगायचं. खरं तर, बसवाल्यानं दिलेल्या तीस-चाळीस मिनिटांत स्थलदर्शनाचा मनसोक्त आनंद मिळणं आणि मिळवणं शक्यच नसतं. या रूढ साइटसीइंगपेक्षा सिंगापूरमधील ‘सिटी टुर्स’ वेगळय़ा वाटल्या. तिथं शहरदर्शन घडविणाऱ्या बसचं तिकीट काढलं की ते २४ तास चालतं. तिकिटासोबत मिळणाऱ्या माहिती पत्रकात वेगवेगळे प्रवास मार्ग आणि त्या मार्गावरील प्रेक्षणीय स्थळांच्या थांब्याची यादी असते. कोणता मार्ग निवडून काय काय पाहायचं हे पर्यटक ठरवू शकतो. उघडय़ा टपाच्या हिप्पो बसमध्ये बसून तीन-चार तासांत वेगवेगळय़ा मार्गानं शहराचं धावतं दर्शन घेता येतं. तसंच एखाद्या थांब्यावर उतरून जवळच असलेल्या प्रेक्षणीय स्थळाला भेट देऊन, तिथं मनसोक्त भटकून पुन्हा बस थांब्यावर येऊन हिप्पो पकडून पुढच्या टप्प्यावर जाता येतं. ‘गाइड’च्या सूचनेनुसार होणाऱ्या शहर दर्शनाच्या तुलनेत हे मुक्त साइटसीइंग वेगळं वाटतं. प्रत्येक मार्गासाठी वेगवेगळय़ा रंगाच्या हिप्पो बसेस असल्यामुळे पर्यटकानं निवडलेला मार्ग चुकण्याची शक्यता नसते. शिवाय या व्यवस्थेमुळे आवडीच्या ठिकाणांसाठी अधिक वेळ देऊन इतर स्थळी न जाण्याचं स्वातंत्र्यही पर्यटकांना मिळतं. रस्त्यावरून आणि पाण्यातून चालणाऱ्या डकटुरने शहरदर्शन पर्यटकांना वेगळाच आनंद देऊन जातं. चार चाकांवर रस्त्यावरून धावणारं हे बदक एका वळणावर सिंगापूर नदीच्या पाण्यात उतरतं आणि लॉन्चसारखं पुढे पुढे जात दोन्ही तीरावरील नव्याजुन्या इमारती, वास्तूंचं दर्शन घडवितं.
सिंगापूर नदीला अनेक शतकांचा इतिहास आहे. अगदी पाचपन्नास वर्षांपूर्वीपर्यंत याच नदीच्या किनाऱ्यावर जहाजं, व्यापारी, हमाल, पाहुण्यांची गर्दी असायची. त्या गर्दीत चीन, भारत आणि पश्चिम आशियातील लोकांचा भरणा अधिक होता. सिंगापूर स्वतंत्र झाल्यानंतर देशाच्या परिवर्तनानं वेग घेतला. १९८०च्या आसपास सिंगापूर नदीच्या कायापालटाच्या कामाला प्रारंभ झाला. दूषित पाणी आणि अस्वच्छ नदीकाठांची साफसफाई सुरू झाली. किनाऱ्यावर असलेली मालगुदामं आणि व्यापार इमारती पुरातन वास्तू म्हणून संरक्षित करण्यात आल्या. नदीच्या दोन्ही तीरांना जोडणाऱ्या जुन्या पुलाचं सुशोभीकरण करण्यात आलं. त्याच परिसरात नंतर उंचच उंच आधुनिक पद्धतीच्या इमारती उभ्या राहू लागल्या. जुन्या-नव्या वास्तू-इमारतींनी तो भाग गजबजून गेला. सिंगापूर नदीचे काठ स्वच्छ झाले आणि पात्र नितळ! त्या पात्रातून आता बोटीनं फिरण्याची सोय करण्यात आली आहे. तासाभराच्या त्या जलप्रवासात सिंगापुरातील पुरातन आणि आधुनिक-अत्याधुनिक इमारतींचं दर्शन घडतं. सिंगापूर नदीच्या एका तटावर मर्लीऑनचं जुनं शिल्प उभं आहे, तर समोरच्या बाजूला आहे आभाळ उंचीचं हॉटेल मरिना बे सँड्स. चहूबाजूच्या इमारती पाहताना सिंगापूरने केलेल्या प्रगतीचा झपाटा लक्षात येतो.

शहर पाहायला आलेल्या पाहुण्यांना एखाद्या उंच ठिकाणी थांबून संपूर्ण शहराचं दर्शन घेण्याची इच्छा असते. सिंगापूरमध्ये अशा विहंगदर्शनाची व्यवस्था वेगवेगळय़ा पद्धतीनं वेगवेगळय़ा ठिकाणी केलेली आहे. त्यातील एक आहे सिंगापूर फ्लायर. संथ गतीनं फिरणाऱ्या या अवाढव्य पाळण्यात बसून क्षितिजापर्यंतचा समुद्र न्याहाळता येतो आणि दूरवर पसरलेलं सिंगापूरही पाहता येतं. तासाभराच्या त्या आवर्तनात वेगवेगळय़ा उंचीवरून आजूबाजूच्या परिसरावर लक्ष ठेवता येतं.
मरिना बे सँड्स हे सिंगापूरमधील एक प्रतिष्ठित हॉटेल. ५६ मजल्यांच्या आणि तीन इमारतींच्या या हॉटेलच्या शिखरावर एक ऑब्झर्वेशन डेक तयार करण्यात आलेला असून, हॉटेलच्या कामकाजात व्यत्यय न आणता पर्यटकांना छप्पनाव्या मजल्यावर पोहोचता येतं. त्या डेकच्या एका बाजूला पसरलाय अथांग सागर तर दुसऱ्या बाजूला उभं आहे अख्खं सिंगापूर. सिंगापूर प्लायरपेक्षाही उंच असलेल्या डेकवरून मनसोक्त सिंगापूर पाहता येतं, न्याहाळता येतं. सकाळी साडेनऊपासून रात्री अकरापर्यंत लोकांसाठी खुल्या असणाऱ्या या निरीक्षण मजल्यावर पर्यटकांनी किती वेळ थांबावं यावर बंधन नाही. एखाद्या खासगी स्टार हॉटेलचा एखादा भाग असा लोकांसाठी उपलब्ध करून देणं ही गोष्टही दखल घेण्यासारखीच आहे.
सिंगापूरच्या हार्बर फ्रंट या मेट्रो रेल्वे स्थानकावरून केबल कारने सेंटोसा बेटावर जाता येतं. संथ गतीनं समुद्र पार करणाऱ्या या पाळण्यात बसून सिंगापूर बंदर, सिंगापूर शहर आणि सेंटोसा बेटावरच्या वेगवेगळय़ा इमारती आणि वास्तू पाहता येतात. परिसराचं विहंग दर्शन घडावं या उद्देशानंच केबल कार खूप उंचीवरून नेली आहे. सेंटोसा बेटावर उतरताच सामोरा येतो टायगर स्काय टॉवर. ११० मीटर उंच असलेल्या या टॉवरमधून संपूर्ण सेंटोसा, सिंगापूर शहर आणि क्षितिजापर्यंत पसरलेली सागरसीमा नजरेत येते. टायगर स्काय टॉवरच्या जवळच असलेल्या मेर्लिऑन टॉवरच्या माथ्यावरून परिसर दर्शन करता येते.
सिंगापूरमध्ये उद्यानांची संख्याही बऱ्यापैकी आहे. त्या उद्यानांच्या मांडणी आणि रचनेतही कल्पकता दिसते. मुक्तपणे फिरण्यासाठी सिमेंटचे रस्ते, बागेचं दर्शन घडविण्यासाठी उभारलेले मनोरे, उद्यानातून जाणाऱ्या नदीवरचे पूल, उद्यानात असलेल्या इमारती या सगळय़ांतून एक सूत्र जाणवते. बॉटनिकल गार्डन, चायना गार्डन, गार्डन्स बाय बे अशा नावांतच त्या उद्यानाचं वैशिष्टय़ अधोरेखित होतं. मरीना बे सँड्सच्या जवळ सागरकिनारी असलेल्या गार्डन्स बाय बे उद्यानात दोन तंबूंच्या आकाराच्या वास्तू तयार करून, एका डोममध्ये फुलबाग तर दुसऱ्यात पर्जन्यवन विकसित केलं आहे. फ्लॉवर डोममध्ये जगभरची फुलं दिसतात, तर क्लाउड फॉरेस्टमध्ये शीतवनातील वनस्पती, रानफुलांचं दर्शन घडतं. टेकडीसारख्या दिसणाऱ्या कृत्रिम डोंगरावरील झाडाझुडुपांच्या निरीक्षणासाठी तयार केलेला मार्गही तितकाच कल्पक आहे. त्या डोममधील शीत वातावरण, कोसळणारा धबधबा पर्यटकांना वनात गेल्याचा आनंद देऊन जातो. कृत्रिम असूनही वास्तवतेजवळ जाणाऱ्या अशा स्थळनिर्मितीतून निर्मात्याच्या कल्पकतेची प्रचीती येते.
मानव आणि वनचरांचं नातं वेगळंच आहे. रानावनात जगणाऱ्या, वावरणाऱ्या पशुपक्ष्यांबद्दल माणसांना नेहमीच आकर्षण वाटत आलं आहे. त्या आकर्षणातूनच प्राणी संग्रहालयाची कल्पना पुढे आली असावी. जगभरातील अनेक शहरांतून प्राणी संग्रहालय – झू आहेत. प्रेक्षणीय स्थळांच्या यादीत या झूंचा समावेश असतोच असतो. सिंगापूरमध्येही प्राणी संग्रहालयं आहेत. जगभरातील अनेक प्राणी तिथं पाहता येतात. मात्र त्या प्राण्यांना पिंजऱ्यात कोंडून ठेवलेलं नाही. प्राण्यांच्या सवयी, परिसरासंबंधीच्या आवडी, जीवनक्रम अशा साऱ्याच गोष्टी लक्षात घेऊन त्यांची निवासस्थानं विकसित केली आहेत. त्यामुळे त्यांच्या वागण्या- वावरण्यात- हालचालीत नैसर्गिकता दिसते, तर झू पाहताना पर्यटकांना आपण ‘जंगल ट्रेक’ करतोय असं वाटतं. प्रेक्षक आणि प्राणी अतिसंपर्कात येणार नाहीत याची काळजी संग्रहालयाच्या आखणीतच घेतलेली आहे. जगभरच्या या वनचरांचं दर्शन पर्यटक तीन वेगवेगळय़ा प्रकारानं, तीन ठिकाणी घेऊ शकतात. एक नाइट सफारी, दुसरं सिंगापूर झू आणि तिसरं ठिकाण रिव्हर सफारी.
जेव्हा माणसांचा दिवस संपतो तेव्हा वनचरांचा दिवस सुरू होतो. दिवसभर विश्रांती घेऊन हे प्राणी रात्री आपले व्यवहार सुरू करतात. रात्रीच्या काळोखात वनचरांना पाहण्याची संधी पर्यटकांना मिळावी म्हणून सिंगापूरनं ‘नाइट सफारी’ सुरू केली. रात्री आठ ते दहापर्यंत ही सफारी-प्राणी संग्रहालय पाहता येतं, त्या आधी येऊन थांबलेल्या पर्यटकांच्या विरंगुळय़ासाठी सफारीच्या प्रवेशद्वाराशी आकर्षक ‘फायर शो’ केले जातात. नाइट सफारीत फिरण्यासाठी ट्रामची व्यवस्था आहे. मार्गावर ट्रामची दोन स्थानकं आहेत. तिथं उतरून आतील वाटांनी चालत जंगलमित्रांना जवळून पाहायचं आणि मागून येणाऱ्या दुसऱ्या ट्रामने पुढचा प्रवास सुरू करायचा. ‘नाइट सफारी’मध्ये कुठेही दिव्यांचा झगमगाट नाही. मंद अंधूक दिव्यांच्या प्रकाशात प्राणी आपल्या पद्धतीनं त्यांच्यासाठी निश्चित केलेल्या भागात वावरत असतात आणि पर्यटक ट्राममधून, नाहीतर पायी चालत त्यांना पाहत असतात.

सिंगापूर झूच्या प्रवेशद्वारातच संग्रहालयाचा नकाशा पर्यटकांना मिळतो आणि आतली भटकंती सोपी होऊन जाते. धावत्या दर्शनासाठी ‘झू’मध्येही ट्रामची सोय आहे. शिवाय टप्प्याटप्प्यावर उतरून आपल्या मर्जीत फिरण्याचीही सवलत पर्यटकांना आहे. जगभरातील अनेक प्राणी सिंगापूर झूमध्ये जंगलात असल्यागत आपल्या पद्धतीने जगत आहेत. झूमधील प्राण्यांच्या भोजन-आहाराच्या वेळा ठरलेल्या असतात. प्राण्यांना खाणं देणं ही क्रियासुद्धा ‘प्रेक्षणीय’ असते हे सिंगापूर ‘झू’मध्ये कळतं. प्राणी संग्रहालयाच्या माहितीपत्रकात कोणत्या प्राण्याला, कोणत्या वेळी खाणं देण्यात येणार आहे ती वेळ दिलेली असते. त्या वेळी संग्रहालयाचे सेवक प्राण्यांना खाणं देतात आणि जमलेल्या पर्यटकांना प्राण्यासंबधी माहितीही सांगतात.
‘झू’च्या माहिती-नकाशा पत्रकात संग्रहालयाच्या परिसरात होणाऱ्या शोंची- खेळांची वेळ आणि स्थळ दिलेलं असतं. वेगवेगळय़ा प्राण्यांचे हे ‘शो’ झू पाहायला आलेल्या पर्यटकांसाठी आकर्षण ठरतं. त्या खेळांसाठी तयार केलेली सभागृहं-थिएटर्स एकाच वेळी शेकडो पर्यटकांना सामावून घेण्याइतकी मोठी आहेत. वेगवेगळय़ा प्राण्यांच्या सहभागानं रंगणाऱ्या या शोमध्ये प्रेक्षकांतील एखाद्याला भाग घेण्याची, त्या प्राण्याला स्पर्श करण्याची संधी मिळते. ‘शो’ करणारे ‘झू’चे सेवक खेळात सहभागी झालेल्या प्राण्यांची सविस्तर माहितीही सांगत असतात. ‘एलिफन्ट्स ऑफ आशिया’ या हत्तीच्या खेळानंतर गजराजांना गाजरं खाऊ घालण्याची अनुमती पर्यटकांना दिली जाते.
‘नाइट सफारी’प्रमाणेच ‘रिव्हर सफारी’तही पर्यटकांना पशु-पक्षी-जलचरांचं दर्शन घडविलं जातं. वनचर मित्रांच्या सान्निध्यात फिरण्याचा आनंद या सफारीतून लहानथोरांना मिळतो. तसंच सिंगापूर ‘झू’च्या जवळ असलेल्या जलाशयात विहार करण्यासाठी बोटीची व्यवस्था केलेली आहे. त्या बोटीत बसून ‘झू’च्या सभोवती फेरफटका मारता येतो आणि संग्रहालयाच्या जंगल भागात विश्रांती घेणाऱ्या प्राण्यांना पाहता येतं.
प्राण्यांप्रमाणेच जगभरातील पक्षिगण सिंगापूरच्या जुरांग बर्ड पार्कमध्ये पाहायला मिळतात. त्याचबरोबर घार, गिधाडं, ससाणा यांसारख्या पक्ष्यांना घेऊन केलेल्या खेळांचा आनंदही घेता येतो. प्रत्येक पक्ष्याची जीवनपद्धती वेगवेगळी असते, हे लक्षात घेऊनच बर्ड पार्कची रचना केलेली आहे. रंगीबेरंगी पोपटांना खाणं भरविताना पर्यटक फोटोही काढू शकतात. वेगवेगळय़ा पर्यावरणातील पक्षी एकाच पिंजऱ्यात डांबून ठेवण्याचा प्रकार जुरांग पक्षी संग्रहालयात दिसत नाही, तर त्या पक्ष्यांच्या जगण्या-वावरण्यात सहजता येईल अशी निवासव्यवस्था बर्ड पार्कमध्ये तयार केली आहे. त्या त्या वातावरणातील वनस्पतींची लागवड केली आहे.
सेन्टोसा बेट हे ‘मनोरंजना’साठी विकसित आहे. वेगवेगळय़ा राइड्स आणि खेळांतून लोकांना आनंद देणं हाच सेंटोसाचा उद्देश आहे. त्या बेटाच्या सिलोसा बीच भागात पेंग्विन आणि सील जलचरांचे आकर्षक खेळ केले जातात. सूर्यास्तानंतर सेंटोसा बेटावर समुद्राच्या पाश्र्वभूमीवर आणि आकाशाच्या पडद्यावर साकारतो एक स्मरणीय लेझर शो- ‘साँग्स ऑफ सी’. किनाऱ्याच्या वाळूवर तयार केलेल्या थिएटरमध्ये लाइट अँड साऊंड शो पाहण्यासाठी पर्यटक खूपच गर्दी करतात. किनाऱ्यावर वावरणारे कलाकार, समुद्राच्या पाण्यात उभं केलेलं घर-झोपडय़ाचं नेपथ्य, प्रकाशातून आकार घेणाऱ्या वेगवेगळय़ा आकृत्या आणि मधुर संगीत यांतून साकार होते एक कथा साँग्स ऑफ द सी. ही ‘सागराची गाणी’ पंचवीसेक मिनिटं प्रेक्षकांना वेगळय़ा विश्वात घेऊन जातात.

सेन्टोसा बेटावर आहे जगातील सर्वात मोठं मत्स्यालय- एस.ई.ए. अॅक्वॅरियम. त्या मत्स्यालयाच्या मुख्य भागात प्रवेश करण्यासाठी एका सभागृहात दहाएक मिनिटाचा एक चित्रपट दाखविला जातो. वादळात सापडून फुटलेल्या जहाजाची ती कथा आहे. जहाजाच्या आकारातील सभागृहात बसून चित्रपट पाहताना प्रेक्षकांचे बाकही हलू लागतात. त्यांनाही लाटांचे जोरदार तडाखे बसतात. प्रेक्षकांच्या अंगावर पाण्याचे तुषार उडतात. आणि वादळात फुटून समुद्राच्या तळाशी गेलेल्या जहाजाबरोबर पर्यटक-प्रेक्षकही समुद्रतळ गाठतात. तिथून जलचरांच्या जगाची-मत्स्यालयाच्या प्रवासाची सुरुवात होते. पाण्याखालून चालत आहोत असं पर्यटकांना-प्रेक्षकांना वाटावं अशी मत्स्यालयाच्या मार्गाची रचना केली आहे. एका मोठ्ठय़ा फिश टँकमध्ये माशांना खाद्य पुरविणाऱ्या पाणबुडय़ांचंही दर्शन घडतं. जलचरांच्या सप्तरंगी आणि विशाल जगाची कल्पना एस.ई.ए. अॅक्वॅरिएमच्या भेटीनंतर पाहणाऱ्याला येऊ शकते.
मनोरंजन, साहसी खेळांचा अनुभव आणि कल्पित जगाची भ्रमंती यातून माणसांना-पर्यटकांना वेगळा आनंद मिळवून देण्याच्या उद्देशानेच सेन्टोसा आयलंडवर युनिव्हर्सल स्टुडिओ निर्माण केला आहे. मात्र निश्चित सूत्र समोर ठेवून प्रत्येक राइडची आखणी केलेली जाणवते. ‘त्रिमिती’चा अनुभव देताना एका राइडमध्ये कथानकाची गुंफण करण्यात आलेली आहे. दुसऱ्या एका राइडमध्ये वाकडय़ातिकडय़ा मार्गानं वेगानं जाणाऱ्या पाळण्यात बसलेल्यांना काळोख्या गूढ विश्वात नेलं जातं. गोल होडीत बसून ज्युरासिक पार्कमध्ये शिरलेल्यांना पाण्याचा भन्नाट वेग अनुभवायला मिळतो. गूढता, वेग, चमत्कृती, साहस याची आवड असणाऱ्यांसाठी युनिव्हर्सल स्टुडिओ सगळे अनुभव भरभरून देत असतो.
तसं पाहिलं तर इतिहासाचा वारसा, ऐतिहासिक वास्तू, नैसर्गिक ठेवा आदी पर्यटनदृष्टय़ा महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या गोष्टी सिंगापूरकडे मोठय़ा प्रमाणात नसतानाही सिंगापूरनं पर्यटन क्षेत्रात आणि जगभरातील पर्यटकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं आहे. नैसर्गिक रानावनांचा अभाव असला तरी मोकळय़ा जागेत सिंगापूरनं हिरव्या गालीचासारखी गार्डन्स तयार केली आहेत. निसर्गाचा अभ्यास करून मर्यादित स्वरूपात क्लाऊड फॉरेस्ट निर्माण केलं आहे. बागा फक्त झाडा झुडुपांपुरत्याच न ठेवता त्यांच्यामधून तयार केलेले रस्ते सायकलिंग जॉगिंगसाठीही मोकळे ठेवले आहेत. पशुपक्ष्यांना वन-अरण्यात असल्यासारखं वाटावं इतक्या नैसर्गिक पद्धतीनं झू आणि पार्क्स विकसत करताना येणाऱ्या माणसांना-पाहुण्यांना आकर्षक वाटतील असे शो आणि राइड्सचं आयोजन केलं आहे. शहरातून जाणाऱ्या नदीचा वापर गटार मार्ग म्हणून न करता लोकांना जलविहाराचा आनंद मिळवून देण्यासाठी केला आहे. शहरातील इमारती आणि इतर वास्तू तितक्याच प्रेक्षणीय नसल्या तरी त्यांनी व्यापलेल्या शहराचं चहूदिशी दर्शन घडविण्यासाठी केलेली अत्युच्च निरीक्षण स्थळाची योजना निश्चितच ‘कल्पक’ आहे, दाद देण्यासारखी आहे.
आपल्याकडे येणाऱ्या पाहुण्यांचा, पर्यटकांचा आनंद महत्त्वाचा मानून मर्यादित कक्षेतही सिंगापूरने निर्माण केलेली, कल्पकतेने विकसित केलेली पर्यटन स्थळे आणि कार्यक्रम पर्यटकांना खिळवून ठेवतात यात शंका नाही. त्यामुळेच जगभरातील पर्यटकांसाठी सिंगापूर हा ‘पाहण्यासारखा’ देश ठरला आहे.

power supply of Kalyan East was suddenly interrupted in early morning
उकाड्याच्या होरपळीत कल्याणमध्ये विजेचा लपंडाव, उकाड्याने नागरिक हैराण
taiwan earthquake
तैवानमध्ये भूकंपात बेपत्ता लोकांची शोधमोहीम अद्याप सुरू
Nagpur, Beauty Parlors, Emerging , Hub for Prostitution, 220 Young Women, Trapped, in 4 Years, crime news, marathi news,
ब्युटी पार्लर देहव्यापाराचे मुख्य केंद्र, चार वर्षांत उपराजधानीतील २२० मुली देहव्यापारात
buldhana japan marathi news, japanese language buldhana marathi news
गरिबीच्या अंधारावर मात करत निघाली उगवत्या सूर्याच्या देशात; बकऱ्या वळणाऱ्या रमाई कन्येला जपानमध्ये लाखोंचे ‘पॅकेज’