वासुदेव कामत, अनिल नाईक आणि सुहास बहुळकर असे भारतातील तीन प्रख्यात व्यक्तिचित्रकार येत्या ३० डिसेंबर रोजी मुंबईमध्ये एकाच वेळेस एकमेकांचे व्यक्तिचित्रण करण्याचे प्रात्यक्षिक सादर करणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे तीन कलावंत, तीन वेगवेगळ्या रंगमाध्यमांचा वापर करणार आहेत. अशा प्रकारचा अनोखा उपक्रम यापूर्वी झालेला नाही. त्यामुळे कलारसिक आणि विद्यार्थ्यांसाठी ही अनोखी अशीच पर्वणी असणार आहे!

lp40‘खरेतर या उपक्रमाला सुरुवात झाली ती २००६ साली व्यक्तिचित्रणाच्या जागतिक परिषदेला गेलो त्यावेळेस..’ प्रख्यात चित्रकार वासुदेव कामत सांगत होते.. ‘केवळ व्यक्तिचित्रणाला वाहिलेली ती आंतरराष्ट्रीय परिषद पाहून अवाक झालो होतो. व्यक्तिचित्रणाबाबत जाणीवजागृती वाढावी म्हणून एवढे नानाविध स्तरावरचे प्रयत्न सुरू होते. प्रख्यात कलावंत आपले तंत्र गुप्त ठेवतात, असा एक समजोपल्याकडे आहे. काहीअंशी तो खराही आहे. पण तिथे विदेशात प्रख्यात कलावंत व्यावसायिक पद्धतीने आपली व्यक्तिचित्रणकला समोरच्या रसिक आणि चित्रकारांना समजावून सांगत होते.. खरेतर भारतातून गेलेल्या माझ्यासाठी तो अनोखाच प्रकार होता.. याच्या अगदी उलट परिस्थिती आपल्याकडे भारतात आहे. यथातथ्यचित्रणामध्ये मोडणाऱ्या सर्व कलाप्रकारांकडे आपण आताशा हिणकस नजरेनेच पाहातो. हे कलाप्रकारच नाहीत, ते काय कुणीही करू शकते, असे मानले जाते. आणि अमूर्त कला म्हणजेच खरी कला असे मानण्याचा प्रघात रूढ झाला आहे. खरे तर चांगले चित्र आणि वाईट चित्र असे दोनच प्रकार अस्तित्त्वात असतात.. पण आताशा अमूर्त चित्रांना ग्लॅमर आहे आणि व्यक्तिचित्रणादी प्रकार अव्हेरले जातात. त्यामुळेच नवी पिढीदेखील या कलाप्रकारांकडे फारशी वळत नाही. एक काळ होता की ज्यावेळेस संपूर्ण भारतात व्यक्तिचित्रणाची एक वेगळी चांगली परंपरा होती. त्यातही सवरेत्कृष्ट समृद्ध परंपरा ही महाराष्ट्रामध्ये होती. पण आज महाराष्ट्रामध्ये चांगले व्यक्तिचित्रणात्मक काम करणारे कलावंत निर्माण होण्यासारखी परिस्थिती राहिलेली नाही. यासाठी कलावंतांच्या बाजूनेही प्रयत्न व्हायला हवे होते. ते झाले नाही. दरम्यानच्या काळात रसिक आणि कलावंत यांच्यामधले अंतर सातत्याने वाढतेच आहे, त्यालाही कलावंत प्रामुख्याने जबाबदार आहेत. म्हणूनच ही दरी कमी करण्यासाठी आपण पुढाकार घ्यावा असे मनात आले. काही कलावंत मित्र आणि विद्यार्थी यांच्याशी बोलणे झाले आणि मग या उपक्रमाला सुरुवात झाली’.. कामत सरांच्या बोलण्यातून व्यक्तिचित्रणाविषयी त्यांना जाणवणारी कळकळ सहज नजरेस पडत होती. या खेपेस त्यांच्या भेटीचे निमित्त होते तो येत्या ३० व ३१ डिसेंबर रोजी वर्षअखेरीस साजरा होणारा व्यक्तिचित्रणसोहळा !
प्रख्यात भारतीय चित्रकारांची चित्रे पाहण्यास सुरुवात केली तर असे लक्षात येईल की, त्यातील अनेक गाजलेली चित्रे ही व्यक्तिचित्रणात्मक आहेत. या संपूर्ण वर्षभरात ‘लोकप्रभा’ने चित्रजाणीव वाढविण्यासाठी एक उपक्रम राबवला त्यामध्येही हेच लक्षात आले. मात्र ही व्यक्तिचित्रणाची परंपरा आता ऱ्हास होण्याच्या मार्गावर आहे. अशा वेळेस प्रख्यात व्यक्तिचित्रणकार वासुदेव कामत यांनी पुढाकार घेतला असून नवोदित व्यक्तिचित्रकारांसाठी एक अभिनव उपक्रम वर्षभर राबविला..
हा व्यक्तिचित्रणसोहळा वर्षअखेरीस साजरा होणार असला तरी प्रत्यक्षात त्याला सुरुवात झाली ती गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात. सध्याचे युग हे अधिक धावपळीचे आहे. भेटायचे म्हटले तर सर्वाचेच सारे काही जुळून यायलाच वर्ष लागेल, त्यामुळे फेसबुकसारखा सोशल मीडिया वापरण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याआधी कामत सरांच्या नेतृत्त्वाखाली पोर्ट्रेट आर्टिस्ट्स ग्रुपची स्थापना करण्यात आली. त्यात काही प्रथितयश तर काही नवोदित चित्रकारांचाही समावेश होता. ठरले असे की, वर्षभर चालणारी अशी एक व्यक्तिचित्रण स्पर्धा आयोजित करायची. त्याचे निकष काटेकोरपणे ठरविण्यात आले.
ग्रुप स्थापन झाला तेव्हापासून संस्थापक विश्वस्त म्हणून वासुदेव कामत काम पाहात असून त्यांच्यासोबत अजय पाटील व गायत्री मेहता विश्वस्त म्हणून काम पाहात आहेत. तर प्रसिद्ध चित्रकार प्रकाश घाडगे, प्रदीप राऊत, सुनील पुजारी, शरद तावडे, भारती कामत, साहेबराव हारे आदी कलावंतांनी मदत केली. संपूर्ण ग्रुपने त्यानंतर कामत सरांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण वर्षभर रेखीव पद्धतीने काम केले.
इंटरनेटवर सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून फेसबुकचा वापर करण्यात आला आणि मग पोर्ट्रेट आर्टिस्ट्स ग्रुपचे फेसबुकपेज तयार करण्यात आले. त्यावरूनच आवाहन करून नियमावली देऊन कलावंतांना दर महिन्याला त्यांनी केलेले नवीन व्यक्तिचित्रण पाठविण्याचे आवाहन करण्यात आले. दर महिन्याला साधारणपणे ४० नवीन व्यक्तिचित्रे सादर व्हायची. मग कामत सरांच्यासोबत बसून आणखी एक चित्रकलातज्ज्ञ किंवा समीक्षक यांच्या परिक्षणानंतर त्या महिन्यातील उत्कृष्ट व्यक्तिचित्रणाची निवड करून ती फेसबुकपेजवरच जाहीर केली जायची. १२ महिने झाले की, त्यानंतर एक मोठा सोहळा असणार एवढेच त्यावेळेस सांगण्यात आले होते. या उपक्रमाला आता एक वर्ष पूर्ण झाले.
दर महिन्याला साधारण ४० व्यक्तिचित्रे सादर होत होती. त्यातील १० जण नेहमी चित्रण सादर करणारे होते. तर साधारणपणे ३० चित्रकार नवे असायचे. यातही महाराष्ट्रात आजही ही परंपरा काहीशी कायम असल्याने इथून मिळणारा प्रतिसाद अधिक होता, विश्वस्तांपैकी एक अजय पाटील सांगतात. मात्र त्याचप्रमाणे बनारस, कोलकाता, कर्नाटक आदी ठिकाणांहूनही चांगला प्रतिसाद मिळाला. केवळ एवढेच नव्हे तर देशभरात व्यक्तिचित्रण करणाऱ्या कलावंतांचा एक संवादही सुरु झाला, वासुदेव कामत सांगतात. इतर राज्यांमध्ये कलावंत आहेत किंवा अशी आस असलेले विद्यार्थीही आहेत पण त्यांना मार्गदर्शन करणाऱ््या चांगल्या व्य्िक्तचित्रणकारांची वानवा आहे. म्हणूनच यंदाच्या वर्षअखेरीस होणारा हा व्यक्तिचित्रणसोहळा नंतर राज्यभरात इतरत्रही नेण्याचा किंवा नंतर संधी मिळाल्यास राज्याबाहेरही नेण्याचा विचार वासुदेव कामत बोलून दाखवतात.
३० डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता या व्यक्तिचित्रणसोहळ्याला सुरुवात होईल. उद्घाटनाच्या कार्यक्रमानंतर पहिला अनोखा कार्यक्रम सादर होणार असून ही रसिकांसाठी मोठी पर्वणीच असणार आहे. त्यामध्ये भारतातील तीन प्रख्यात व्यक्तिचित्रणकार ज्यात स्वत कामत सरांचाही समावेश आहे, ते व्यक्तिचित्रणाचे प्रात्यक्षिक सादर करणार आहेत. यातील गंमत म्हणजे हे तिन्ही चित्रकार एकमेकांचे व्यक्तिचित्र रसिकांसमोर एकाच वेळेस सादर करणार आहेत. म्हणजे रसिकांना तीन उत्तम चित्रकार चित्रण करताना एकाच वेळेस पाहायला मिळतील.. यात इतर दोन चित्रकारांमध्ये सुहास बहुळकर आणि अनिल नाईक यांचा समावेश आहे. हे तीन चित्रकार तीन वेगवेगळ्या माध्यमांमध्ये काम करणार आहेत हे विशेष! म्हणजे सुहास बहुळकर अ‍ॅक्रेलिकमध्ये, वासुदेव कामत सॉफ्ट पेस्टल तर अनिल नाईक हे जलरंगामध्ये व्यक्तिचित्रण प्रात्यक्षिक सादर करतील. हे होत असताना माध्यमांचे आणि त्या माध्यमांतील चित्रणाचे बारकावे रसिकांसमोर सहज उलगडत जातील. भारतात अशा प्रकारचा प्रयोग प्रथमच होणार आहे. त्यामुळे या अनोख्या प्रयोगाकडे कलारसिकांचे डोळे लागून राहिले आहेत.
दुपारच्या जेवणानंतरच्या सत्रामध्ये हे तिन्ही चित्रकार शिवाय जेजे कला महाविद्यालयाचे अधिष्ठाता विश्वनाथ साबळे हे व्यक्तिचित्रण कलेवर विद्यार्थी आणि रसिकांशी संवाद साधतील.
३१ डिसेंबर रोजी या वर्षभर आयोजित स्पर्धेतील विजेत्या कलावंतांसाठी विशेष स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून त्यामध्ये या सर्व कलावंतांचा कस लागणार आहे. ही स्पर्धा खुल्या पद्धतीने होणार आहे. उपस्थित रसिक आणि विद्यार्थ्यांसमोर या १२ विजेत्या कलावंतांना व्यक्तिचित्रण प्रत्यक्षात करायचे आहे. साधारणपणे समोर मॉडेल आल्यानंतर प्रत्येक जण आपल्याला सोयीची अशी जागा पकडतो आणि चित्रणाला सुरुवात करतो. या कलावंतांमधील कस पणाला लागावा यासाठी या स्पर्धेप्रसंगी मॉडेलच्या बाजूला १२ जागा निश्चित करण्यात आल्याअसून त्यात कोणत्या कलावंताने कोणत्या जागेवर बसायचे याचा निर्णय चिठ्ठय़ा टाकून सोडतीच्या पद्धतीने केला जाणार आहे. त्यामुळे उपलब्ध आणि निश्चित केलेल्या जागेवरूनच कलावंतांना त्यांचे प्रात्यक्षिक करावे लागेल. ३१ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता या अनोख्या स्पर्धेला सुरुवात होईल. दुपारी १.३० वाजेपर्यंतचा वेळ व्यक्तिचित्रणासाठी देण्यात आला आहे. ३ मॉडेल्स आणि १२ महिन्यांचे १२ विजेते, त्यांनी साकारलेली १२ व्यक्तिचित्रे असा हा सोहळा रंगणार आहे. यातील सवरेत्कृष्ट व्यक्तिचित्रकाराला तब्बल ७५ हजार रुपयांचा वासुदेव कामत पुरस्कार उपविजेत्याला ५० हजार रुपये आणि तृतीय क्रमांकाला २५ हजार रुपयांचा पुरस्कार सन्मानचिन्हांसह मिळणार आहे. त्याचप्रमाणे उर्वरित ९ प्रत्येक महिन्याच्या विजेत्यास प्रत्येकी १५ हजार रुपयांचा पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. व्यक्तिचित्रण कलेच्या प्रचार आणि प्रसारार्थ एवढा मोठा पुरस्कार देणारा हा पहिलाच उपक्रम आहे.
अमूर्त चित्रणही तेवढेच चांगले आणि यथातथ्यदर्शन करणारे चित्रण मात्र कुचकामी हा गैरसमज पुसून टाकायचा आहे, असे वासुदेव कामत सांगतात. कोणत्याही इतर कलाप्रकाराशी आमची स्पर्धा नाही. मात्र ही परंपराही तेवढीच महत्त्वाची आणि आपली आहे, याकडे आम्हाला कलाजगत, रसिक आणि विद्यार्थी यांचे लक्ष वळवायचे आहे.. पोर्ट्रेट आर्टिस्ट्स ग्रुपच्या फेसबुकपेजला मिळणारे लाइक्स आता तीन हजारांच्या पुढे गेले आहेत. ते प्रत्यक्षात व्यक्तिचित्रण कलेच्या पाठीराख्यांमध्ये परिवर्तित व्हावेत, अशी वासुदेव कामत यांची इच्छा आहे. आणि त्यासाठीचे निमित्त आहे तो हा व्यक्तिचित्रणसोहळा!