गोड पराठे

साहित्य –

अर्धा कप खवा, एक चमचा साखर, अर्धा चमचा वेलदोडे पूड, एक टीस्पून सुकामेवा बारीक पावडर केलेला, दोन कप मैदा किंवा गव्हाचे पीठ, अर्धा कप साजूक तूप.

कृती –

एका कढईमध्ये खवा परतून घ्या. त्यात वेलदोडे पूड, सुकामेवा, साखर घालून चांगले परतून घ्या. गॅसवरून काढून बाजूला ठेवून द्या.

मैदा किंवा गव्हाचे पीठ घेऊन कणीक तयार करून घ्या. कणकेचे गोळे करून त्यात माव्याचे सारण भरून पोळी लाटून घ्या. तव्यावर ती चांगली भाजून घ्या. भाजताना त्यावर तूप सोडा.

टीप – घरी पेढे, बर्फी अशा दुधापासून तयार केलेल्या मिठाया किंवा बाहेरून कुणाकडून आलेले लाडू पडून असतात. ते कुस्करून कढईत गरम करून घेतले आणि त्याचे सारण भरून गोड पराठे केले तर ते पराठेही उत्तम लागतात आणि पदार्थ वायाही जात नाहीत.

पालक पराठा

साहित्य –

अर्धा ते एक कप पालकाची प्युरी, दोन ते तीन कप गव्हाचे पीठ, दोन ते तीन हिरव्या मिरच्या, हळद पावडर, चवीप्रमाणे पीठ, एक टी स्पून ओवा आणि तीळ.

कृती –

सर्व साहित्य एकत्र करून शक्यतो पाणी न घालता मळून घेणे. अगदी गरज लागलीच तर पाणी घालणे. नेहमीप्रमाणे पराठे करणे.

टीप – या पिठापासून पुऱ्याही करता येतात.

कच्च्या पपईचा पराठा

साहित्य –

एक कप कच्च्या पपईचा कीस, दोन ते तीन हिरव्या मिरच्या ठेचून बारीक करून, मीठ, अर्धा टी स्पून हळद पावडर, दोन-तीन कप गव्हाचे पीठ

कृती –

सर्व साहित्य एकत्र करून पराठे करावेत. हे पराठे अतिशय पौष्टिक आहेत.

पनीर कोबी पराठा

साहित्य –

१०० ते १५० ग्रॅम पनीर, अर्धा कप कोबी बारीक किसून घेणे, दोन ते तीन हिरव्या मिरच्या, एक टी स्पून हळद, दोन-तीन कप गव्हाचे पीठ, चवीनुसार मीठ.

कृती –

गव्हाच्या पिठामध्ये पनीर कुस्करून घालणे. त्यात कोबी आणि इतर साहित्य मिसळणे. कोबीच्या अंगच्या पाण्यात मिसळेल तेवढे पीठ मिसळून घेणे. अगदी थोडे पाणी घालून मळून घेणे. त्यानंतर नेहमीसारखे पराठे करावे. हे पराठे अतिशय चविष्ट लागतात.

पुदिन्याचे पराठे

साहित्य –

दोन-तीन वाटय़ा गव्हाचे पीठ, अर्धा कप बारीक चिरलेला पुदिना, हळद, लाल तिखट, मीठ चवीनुसार.

कृती –

हे सर्व साहित्य एकत्र मिसळून घ्या आणि नेहमी करतो तसे पराठे करा.

टीप – हे पराठे पौष्टिक आहेत. ते न ठरवता अचानक करता येतात. दह्य़ाबरोबर आणि लोणच्याबरोबर चांगले लागतात.
सीमा नाईक – response.lokprabha@expressindia.com