स्वप्निल जोशी – response.lokprabha@expressindia.com
स्मार्टफोन खरेदी करताना प्रोसेसर, कॅमेरा, मेमरी स्टोअरेज याबरोबरच सेन्सरचा देखील विचार होणे आवश्यक आहे. स्मार्टफोनमधील बहुसंख्य कार्ये ही सेन्सर्समार्फतच होतात. दैनंदिन जीवनात आपण स्मार्टफोनवर ज्या अनेक गोष्टी करत असतो, त्यातही सेन्सर्स आपली मदत करत असतात. त्यांच्यामुळे स्मार्टफोनचा वापर करणे सोपे होते. स्मार्टफोनला खऱ्या अर्थाने ‘स्मार्ट’ करणाऱ्या या सेन्सर्सबद्दल..

प्रॉक्सिमिटी सेन्सर

हा सर्वच स्मार्टफोनमध्ये आढळून येणारा सेन्सर आहे. सर्वसाधारणपणे स्मार्टफोनवर जिथे फ्रन्ट कॅमेरा असतो त्याच्या आसपास हा सेन्सर असतो. या सेन्सरचा मुख्य वापर हा एखादी गोष्ट डिस्प्लेपासून ठरावीक अंतरापेक्षा जास्त जवळ असल्यास डिस्प्ले बंद करण्यासाठी होतो. याच सेन्सरमुळे आपल्याला एखादा कॉल आल्यावर आपण फोन कानाजवळ नेला की फोनचा डिस्प्ले आपोआप बंद होतो. पॉकेट मोडसारखे सेटिंग्ससुद्धा या सेन्सरद्वारेच साध्य केलेले असतात. याद्वारे टच स्क्रीन डिस्प्लेवर फोन खिशात किंवा बॅगमध्ये असताना आपल्या नकळत स्पर्श होऊन एखादा मेनू उघडणे किंवा कॉल लागणे यासारख्या गोष्टी रोखल्या जातात.

अ‍ॅम्बियन्ट लाइट सेन्सर

स्मार्टफोनमध्ये साधारण २००४ सालापासून म्हणजे स्मार्टफोन युगाच्या अगदी सुरुवातीपासून हा सेन्सर वापरला जात आहे. आजकाल सर्वच स्मार्टफोनमध्ये तो आढळतो. याचा वापर हा स्क्रीनचा प्रकाश सभोवताली असणाऱ्या प्रकाशाच्या आधारावर आपोआप कमी अथवा जास्त करण्यासाठी केला जातो. याद्वारे वापरकर्त्यांच्या डोळ्यांवर स्क्रीनचा अतिरिक्त प्रकाश न येता स्क्रीन व्यवस्थित पाहता येतो. प्रकाशाची तीव्रता मोजत असल्यामुळे या सेन्सरला लक्स सेन्सर असे देखील संबोधले जाते. लक्स हे प्रकाशाची तीव्रता मोजण्याचे एकक आहे. हा सेन्सर ५० लक्स ते १० हजार लक्स या दरम्यान काम करू शकतो. आपल्या घरात प्रकाशाची तीव्रता साधारणत: ५०-१०० लक्सपर्यंत असते तर दिवसाचा सूर्यप्रकाश हा १० हजार लक्सपर्यंत असतो. जर आपल्या स्क्रीनवर थेट सूर्य प्रकाश येत असेल तर आपल्याला स्क्रीन स्पष्टपणे दिसत नाही, कारण त्याची तीव्रता लाइट सेन्सरच्या कार्यप्रणालीपेक्षा जास्त म्हणजे सुमारे ३२ हजार लक्स किंवा त्यापेक्षा जास्त असते.

एक्सेलरॉमीटर सेन्सर

हा सेन्सर स्मार्टफोनची हालचाल समजून घेण्यासाठी वापरला जातो. आपण फोन उभा अथवा आडवा धरल्यावर स्क्रीनवरील चित्रसुद्धा त्याच दिशेने याच सेन्सरद्वारे फिरवले जाते. या सेन्सरचा वापर अनेक गेम्समध्ये फोनची हालचाल समजून घेण्यासाठी केला जातो. गूगल मॅप्ससारख्या अप्लिकेशनमध्येसुद्धा आपल्या वाहनांची दिशा किंवा वेग दर्शवण्यामध्ये या सेन्सरची महत्त्वाची भूमिका असते.

जायरोस्कोप सेन्सर

एक्सेलरॉमीटर हा फक्त स्मार्टफोनची पुढे अथवा मागे जाण्याची हालचाल समजून घेऊ शकतो. परंतु स्मार्टफोन संपूर्णत: गोल फिरवला गेला तर तीनही अक्षांमध्ये फिरतो. ते समजण्यासाठी जायरोस्कोपचा वापर केला जातो. गेमिंग, व्हर्चुअल रिअ‍ॅलिटी व्हिडीओ, ३६० डिग्री व्हिडीओ अथवा छायाचित्र या सर्वामध्ये जायरोस्कोप महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असतो.

मॅग्नेटोमीटर सेन्सर

याचा उपयोग स्मार्टफोनमधील होकायंत्र म्हणजेच कंपासमध्ये केला जातो. आपल्या सर्वसाधारण होकायंत्रामध्ये ज्याप्रमाणे उत्तर ध्रुव दर्शवला जातो त्याचप्रमाणे मॅग्नेटोमीटर देखील स्मार्टफोनमध्ये काम करत असतो.

जीपीएस

जीपीएस म्हणजेच ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम हा सध्याच्या काळात मोठय़ा प्रमाणावर वापराला जाणारा घटक आहे. पृथ्वीच्या पृष्ठभागावर आपण नक्की कुठे उभे आहोत याचे अक्षांश आणि रेखांश मिळवण्यासाठी जीपीएसचा वापर केला जातो. हा सेन्सर एक्सेलरॉमीटर, जायरोस्कोप आणि मॅग्नेटोमीटर यांच्यासोबत एकत्रितपणे काम करून गूगल मॅप्ससारख्या अ‍ॅप्लिकेशनमध्ये वापरात आणलेला दिसतो. जीपीएस हे अमेरिकेने आणलेले तंत्रज्ञान आहे, याच्या जोडीला रशियाचे ग्लोनास किंवा सध्या भारताचे नॅव्हिक हे पर्याय देखील काही स्मार्टफोन्समध्ये उपलब्ध आहेत.

ऑडिओ सेन्सर

याचा वापर स्मार्टफोनच्या मायक्रोफोनमध्ये केला जातो. आपण बोलत असताना आपला आवाज योग्य प्रकारे कमी जास्त करणे किंवा सामान प्रमाणात दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचवणे, सभोवतालचा आवाज कमी करून मुख्य व्यक्तीचीच आवाज अधोरेखित करणे हे सर्व ऑडिओ सेन्सरद्वारे केले जाते. सध्याच्या दूरस्थ संभाषणांमध्ये समोरच्या व्यक्तीपर्यंत अखंडित आणि श्रवणीय आवाज पोहोचणे महत्त्वाचे असल्यामुळे ऑडिओ सेन्सरच्या आधारे अनेक अ‍ॅप्लिकेशन्समध्ये सॉफ्टवेअर प्रोसेसिंग केलेले दिसते.

फिंगरप्रिंट सेन्सर

नावाप्रमाणेच याचा वापर  फिंगरप्रिंट म्हणजे बोटांचे ठसे घेऊन त्याद्वारे स्मार्टफोन अनलॉक करण्यासाठी केला जातो. गोपनीयता आणि सुरक्षा याच्या दृष्टीने फिंगरप्रिंट सेन्सर हा महत्त्वाचा आहे. आजकाल डिस्प्लेवरच फिंगरप्रिंट सेन्सर पाहायला मिळत असला तरी त्याचे कार्य पूर्वीच्या बटणसदृश सेन्सरप्रमाणेच आहे.

बॅरोमीटर सेन्सर

हा अगदी निवडक स्मार्टफोन्समध्ये आढळून येणारा सेन्सर आहे. याच्या मदतीने आपण समुद्रसपाटीपासून किती उंचीवर आहोत ते समजते. याचा वापर जीपीएस सेन्सरबरोबर काही अप्लिकेशन्समध्ये केला जातो. या सेन्सरद्वारे आता हवेचा दाबसुद्धा पाहिला जाऊ शकतो त्यामुळे स्मार्टफोन्समधील हवामानाचा अंदाज वर्तवणारी अ‍ॅप्लिकेशन्सदेखील या सेन्सरचा वापर करताना पाहायला मिळतात. बॅरोमीटर बरोबरच आजकाल ह्य़ुमिडिटी सेन्सर देखील वापरला जातो ज्याद्वारे हवेमधील आद्र्रता समजण्यास मदत होते.

पेडोमीटर सेन्सर

ही सेन्सर चिप एक्सेलरॉमीटर आणि जायरोस्कोपच्या आधारावर स्वत:ची आज्ञावली म्हणजेच अल्गोरिदम वापरून आपण किती पावले चाललो ते दर्शवते. आजकाल फिटनेस अ‍ॅप्लिकेशन्सच्या जमान्यामध्ये पेडोमीटर सेन्सर महत्त्वाचा ठरतो. काही ठिकाणी पेडोमीटर सेन्सरच्या मदतीने एखाद्या जमिनीच्या तुकडय़ाचे क्षेत्रफळ मोजणे किंवा त्याचा निश्चित आकार ठरवणे अशी कामेसुद्धा केली जातात.

थर्मोमीटर सेन्सर

हा सेन्सर प्रत्यक्ष वापरकर्त्यांला वापरता येत नसला तरी स्मार्टफोनच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. याद्वारे स्मार्टफोनच्या प्रोसेसरचे, स्क्रीनचे तसेच इतर तांत्रिक भागाचे तापमान मोजले जाते. सर्वसाधारण स्मार्टफोनचे तापमान ५० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त झाल्यास प्रोसेसरची गती आपोआप कमी केली जाते त्यामध्ये थर्मोमीटर महत्त्वाची भूमिका बजावत असतो. यामुळे आपल्या स्मार्टफोनच्या बॅटरी आणि प्रोसेसरची उच्च तापमानामुळे होणारी हानी रोखली जाऊ शकते.

हार्ट रेट सेन्सर

हा आजकाल काही निवडक स्मार्टफोनमध्ये पाहायला मिळतो. कॅमेरा फ्लॅशच्या बाजूला एका ऑप्टिकल सेन्सरच्या आधारे स्मार्टफोन वापरकर्त्यांच्या हृदयाचे ठोके याद्वारे मोजले जाऊ शकतात. यासाठी ऑप्टिकल सेन्सरवर फिंगरप्रिंटप्रमाणे आपले बोट ठेवावे लागते.

एनएफसी सेन्सर

एनएफसी म्हणजेच नियर फिल्ड कम्युनिकेशन. हा सेन्सर स्मार्टफोनमधील ब्लूटूथप्रमाणे काम करत असला तरी याची मर्यादा चार सेंटीमीटर एवढीच आहे. याचा उपगोय प्रामुख्याने ‘टॅप टू पे’सारख्या अप्लिकेशनमध्ये केला जातो. याला ब्लूटूथप्रमाणे पेअरिंगची गरज भासत नाही तर केवळ उपकरणे एकमेकांना जोडून म्हणजेच ‘टॅप’ करून आपण दोन उपकरणांमधील संपर्क स्थापित करता येतो.

कॅमेरा आणि टीओएफ सेन्सर

आपल्या स्मार्टफोनचा कॅमेरा हा देखील एक सेन्सरच आहे. याद्वारे प्रामुख्याने प्रकाश समजून आपल्याला चांगल्या दर्जाचे छायाचित्र काढता येते. मुख्य कॅमेराबरोबर आजकाल टीओएफ म्हणजेच टाइम ऑफ फ्लाइट सेन्सरचा वापर केलेला पाहायला मिळतो. आपल्या फोनमधून फोटो काढताना बॅकग्राउंड ब्लरचा पर्याय म्हणजेच पोट्र्रेट मोडमध्ये टीओएफ सेन्सर वापरला जातो.

हॉल सेन्सर

याचा वापर स्मार्टफोनपेक्षा टॅब्लेट्समध्ये जास्त प्रमाणात केला जातो. आपल्या टॅबलेटचे फ्लिप कव्हर बंद केले की तो आपोआप बंद होतो आणि कव्हर उघडल्यावर तो आपोआप चालू होतो. हे प्रामुख्याने हॉल सेन्सरद्वारे नियंत्रित केले जाते.

इन्फ्रारेड सेन्सर

यालाच आय-आर ब्लास्टर असे देखील संबोधले जाते. आपल्या स्मार्टफोनचा वापर हा टेलिव्हिजन किंवा इतर उपकरणांच्या रिमोटप्रमाणे करण्यासाठी या सेन्सरचा वापर केला जातो. हा सेन्सर फोनच्या वरच्या भागात मध्यभागी असतो आणि सॉफ्टवेअरच्या मार्फत त्याला नियंत्रित केले जाते. बहुतांश शिओमी फोनमध्ये आपल्याला इन्फ्रारेड सेन्सर पाहायला मिळतो.