स्मिता आणि मी खूप जवळच्या मैत्रिणी. एकमेकींशी न बोलता आम्हाला एकमेकींच्या मनातलं कळायचं. आमची मैत्री झाली ती दूरदर्शनच्या न्यूज सेक्शनमध्ये. तिथे स्मिता ऑडिशन द्यायला आली होती. मी त्या ऑडिशनच्या पॅनलमध्ये होते. तिथे मी आधीपासूनच काम करत होते. नंतर स्मिताही तिथे रुजू झाली. एकाच विभागात काम करत असल्यामुळे आमची घट्ट मैत्री झाली. आम्हा दोघींचा प्रवास एकाच रस्त्यावरून सुरू होता. पुढे-मागे असण्याचाच काय तो फरक. त्यामुळे आम्ही एकमेकींच्या आणखीच जवळ होतो. तिची न्यूज सेक्शनमधली नोकरी, मग लग्न, तिच्या नवऱ्याचं लवकर जाणं, तिच्या मुलांचं बालपण, तिचं करिअर, अभिनय, दिग्दर्शन, प्रॉडक्शन हाऊस सुरू करणं असा स्मिताचा प्रवास. जो माझ्या वाटय़ालाही आला. पण, तिच्याआधी. म्हणूनच आम्हाला एकमेकींबद्दल आपुलकी, प्रेम, आदरही होता. यात फरक असा की, मी प्रॉडक्शनमध्ये फार काम केलं नाही. स्मिताने मात्र कमाल केली. दर्जेदार मालिका, चित्रपट केले. एक अभिनेत्री म्हणून तर ती यशस्वी होतीच, पण एक उत्तम दिग्दर्शिका, निर्माती म्हणूनही तिने नाव कमावलं.
मी, स्मिता आणि सुहास जोशीने ‘सख्या’ या नाटकात तर ‘सातच्या आत घरात’ यामध्ये भूमिका केली. त्यामुळे आम्ही दोघी पडद्यावर कधी एकत्र दिसलो नाही, पण पडद्यामागे मात्र एकमेकींशिवाय आमचं पान हलायचं नाही. तशी ती वयाने माझ्यापेक्षा लहान. पण, तिच्या आयुष्यात जे-जे सुरू होतं ते माझ्या आयुष्यात घडून जात होतं. त्यामुळे ती मला बिनधास्त सगळं सांगायची, विचारायची. खूप धडाडीची, जिद्दीची होती. तिने जी काही कामं केली त्याचा विशिष्ट दर्जा होता. कधीच एखादी विनोदी किंवा थातुरमातुर कलाकृती करून गल्लाभरू बिझनेस केला नाही. मनापासून जे वाटलं, ज्याची आवड होती तेच केलं. निर्माती झाल्यानंतरही तिने कशातूनच अंग काढून घेतलं नाही. केवळ पैसे पुरवणे आणि लोकांकडून काम करून घेणं हा तिचा स्वभावच नव्हता. दिग्दर्शन, अभिनय, क्रिएटिव्ह टीम, तांत्रिक भाग अशा सगळ्यातच तिचं नेहमी लक्ष असायचं. या तिच्या स्वभावामुळे तिला प्रत्येक विभागाची खोलवर जाण होती. तिला दिग्दर्शनापेक्षा निर्माती आणि अभिनेत्री म्हणून काम करण्यास अधिक रस असायचा.
मनमिळाऊ, प्रेमळ असं तिचं व्यक्तिमत्त्व होतं. मनात जे येईल ते ती समोरच्याला बोलून मोकळी व्हायची. पण, यामुळे तिने कधी कोणाला दुखावलं नाही. कारण तिला न पटणाऱ्या गोष्टी सांगताना तिचा टोन नेहमी हळवा आणि प्रेमळ असायचा. त्यामुळे तिच्यातल्या खरेपणाचा अनुभव सगळ्यांनाच यायचा. पहिल्यांदा तिला कॅन्सर डिटेक्ट झाला होता तेव्हा तिने कोणालाच सांगितलं नव्हतं. अनेकांना १-२ वर्षांनी कळलं होतं. हे सांगून तिला कोणाचीही सहानुभूती नको होती. गंभीर आजार होऊनही कधीच रडारड नसायची. आता माझं कसं होणार, बरी होणार की नाही असे विचार तिने शेवटपर्यंत केले नाहीत. याउलट ती सतत हसरा चेहरा घेऊन वावरायची. त्या वेळी वातावरण बदल हवा म्हणून मी तिला माझ्या घरी राहायला घेऊन आले होते. तेव्हा मला हे प्रकर्षांने जाणवलं होतं.
तिची मदत करण्याची, आवडीने इतरांसाठी काही करण्याची वृत्ती होती. मी पुण्यात एकदा शूट झाल्यावर रात्री उशिरा तिच्या घरी गेले होते. त्या वेळी स्वत:हून सगळा स्वयंपाक केला आणि मला जेवू घातलं. तसंच चारेक वर्षांपूर्वी मला पैशांची गरज होती. तेव्हा तिने एकही प्रश्न न विचारता मला मदत केली होती. हतबल न होता लहान मुलांसाठी तिने अभिनय शाळाही सुरू केली. तिने जे जे केलं त्यात स्वत:ला झोकून दिलं. देवावर श्रद्धा होती. चांगल्या गोष्टींचं कौतुक करणं, स्पष्ट बोलणं हा तिचा स्वभाव. ‘बागबान’ हा चित्रपट आला तेव्हा ती काहीशी दुखावली गेली होती. कारण चित्रपट तिच्या ‘तू तिथे मी’ या चित्रपटावर बेतलेला होता. त्यामुळे तिला किमान श्रेय द्यायला हवं होतं असं तिला वाटलं होतं. पण, ते तेवढय़ापुरतंच होतं. विचारी, शांत, प्रेमळ स्मिता तेवढीच मस्तीखोरही होती. आम्ही दोघी एकत्र असलो की खूप मस्ती करायचो. खोडय़ा काढणं, कोणाचा राग आला की शिव्या घालणं असं आमचं सुरूच असायचं. आजाराचा बाऊ न करता नेहमी प्रसन्न चेहऱ्याने सगळ्यांना भेटणं, बोलणं हे तिचं शेवटच्या क्षणापर्यंत सुरू होतं. माझ्या आयुष्यात स्मिताच्या रूपाने दिलखुलास स्मित आलं. ते कायम माझ्या मनात असेल.. !!