सलमान खान याच्या ट्विटर अकाऊंटवर त्याने आपली ओळख चित्रपट अभिनेता, कलाकार, चित्रकार, मानवतावादी अशी दिलेली आहे. ‘सर्वात िनदनीय गुन्हा म्हणजे कुणा निष्पाप माणसाचा जीव घेणं’ असे ट्वीट सलमाननेच १९ डिसेंबर २०१४ रोजी केले होते. पण तेरा वर्षांपूर्वी घडलेल्या हिट अ‍ॅण्ड रन प्रकरणात पाच वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा झाल्यावर, हेच ट्वीट पुन्हा ट्रेंडमध्ये आले. संपूर्ण सोशल मीडिया ६ मे रोजी आणि पुढील दोन दिवस (त्याला उच्च न्यायालयातून जामीन मिळेपर्यंत) सलमानमय झाले होते. एकीकडे काही अपवाद वगळता संपूर्ण चित्रपटसृष्टीने त्याला आपला पाठिंबा दर्शवला. तर दुसरीकडे तेरा वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर न्यायालयाने दिलेल्या निकालाचे सर्वच स्तरांतून मोठय़ा प्रमाणात स्वागत करण्यात आले. या देशात न्यायव्यवस्था भक्कम आहे, याचा अनेकांनी पुनरुच्चार केला. फेसबुक, ट्विटर सगळीकडेच सलमानच्या चाहत्यांना झोडपून काढण्यात येत असताना आपल्या हिरो नंबर वनचं समर्थन करण्यासाठी हे चाहतेच वकिलाच्या भूमिकेत शिरले होते. प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात, याप्रमाणे आरोप-प्रत्यारोपांचा हा मुकाबला अद्यापही थांबलेला नाही. 

सलमानला काहीही शिक्षा झाली असती तरी त्याला चित्रपटसृष्टीकडून पाठिंबाच मिळाला असता, हे सांगायला कुणा ज्योतिषाची आवश्यकता नाही. परंतु, त्याला झालेल्या शिक्षेबाबत नाही तर या प्रकरणात मृत पावलेल्या व्यक्तीबाबत गायक अभिजीत भट्टाचार्य यांनी ट्वीट केलं आणि सलमानविरोधाला अधिकच धार चढली. ‘‘कुत्रा रस्त्यावर झोपला तर त्याला कुत्र्याचेच मरण येणार. रस्ता हा गरिबांच्या बापाचा नाही. माझ्या डोक्यावर जवळपास वर्षभर छत्र नव्हते, तेव्हा मी काही रस्त्यावर नाही झोपलो,’’ अभिजीतच्या या ट्वीटवर सर्वानी चांगलेच तोंडसुख घेतले आणि शेवटी त्याला जाहीर माफी मागावी लागली. अभिजीतला साथ मिळाली ती फराह खान हिची. दोन व्यक्तींमध्ये रेल्वे ट्रॅक ओलांडायाची पैज लागली असेल आणि ट्रॅक ओलांडताना त्यापैकी एकजण ठार झाला तर त्याचा दोष मोटरमनवर कसा काय येणार? अशा आशयाच्या तिच्या ट्वीटमुळे आगीत आणखीनच तेल ओतले गेले. विशेष म्हणजे हे सर्व होत असताना ॠषी कपूर, सोनाक्षी सिन्हा वगळता अन्य कोणी बॉलीवूडकराने या दोषांच्या विधानावर जाहीर निषेध नोंदवला नाही.
दरम्यान, सामान्य जनता, काही प्रतिष्ठित व अभ्यासू व्यक्ती आणि सामाजिक कार्यकर्ते सलमानला मिळालेल्या जामिनावर आपला निषेध नोंदवत आहेत. ‘‘सर्वोत्तम कायदेशीर मदत घेऊन, व्हीआयपी हे कारागृहात जाण्यापासून कसे स्वत:ला वाचवू शकतात, हे सलमान खानच्या निकालाने स्पष्ट केलं आहे,’’ असं माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी यांनी म्हटलं आहे. तर, न्याय हा रस्त्याच्या कडेला फुटपाथवर झोपलेला होता. कुणी तरी त्याच्यावर गाडी चढवून गेला, असं ज्येष्ठ पत्रकार माधवन नारायणन यांनी म्हटलं आहे. अभिनेता सलमान खानने काही काळ कारागृहात घालवलाच पाहिजे. त्याने कुणाला धडक दिली नाही म्हणून तर पळून गेला म्हणून, असं भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी लिहिलं आहे.

सार्वत्रिक अपरिपक्वता
सलमानच्या केसचा निकाल पाच मे रोजी होणार हे नक्की झाल्यावर दोन प्रकारच्या लोकांना चेव चढला. एक म्हणजे त्याचा सोकॉल्ड फॅनक्लब आणि समस्त बॉलीवूडकर आणि दुसरा वर्ग होता तो म्हणजे आम्ही कसे सामाजिक दृष्टिकोन ठेवून आहोत हे ठसविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचा. मात्र या सर्वात दिसून आली ती केवळ आणि केवळ सार्वत्रिक अपरिपक्वता.
ज्या क्षणी सलमानला शिक्षा सुनावण्यात आली त्या क्षणी एकाच वेळी हजारो ठिकाणाहून प्रतिक्रियांचा पूर वाहू लागला. ब्रेकिंग न्यूजच्या नावाखाली सणसणाटी मथळे झळकू लागले. इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी तर दिसला कलाकार धर बूम या धर्तीवर दिसेल त्याला पकडले. आणि कायदा काय आहे, नेमकं काय झालंय याची कसलीही कल्पना नसताना, कायदेशीर बाबींचीदेखील मर्यादा न बाळगता अख्खं बॉलीवूड गळा काढू लागलं. हेमा मालिनीसारखी गतस्मृतीत गेलेली नायिकादेखील त्यात मागे राहिली नाही की एरवी संपूर्ण जगाला नैतिकतेचे धडे शिकविणारा आमिर खान. किंबहुना आपण बोललो नाही तर सलमान निराधार होईल की काय असेच त्यांना वाटत होते. या सर्वाचा सूर एकच होतो. सलमान, तुला शिक्षा झाली असली तरी आम्ही तुझ्या मागे आहोत.. संपूर्ण कपूर खानदानच सलमानच्या मागे असल्याचा निर्वाळा ॠषी कपूर यांनी दिला. टिनपाट गायक अभिजीतने केलेल्या ट्विटमुळे यासर्वात भरच पडली.
हे सर्व म्हणजे जणू काही सलमानवर खूप अन्याय झाला आहे, आता तो तुरुंगात गेल्यावर त्यांच्या कुटुंबियांकडे लक्ष्य द्यायला कोणीच नाही. त्याचं सारं कुटुंब वाऱ्यावर उघडं पडलं आहे. अशा स्वरूपाचं होतं.
या सर्वाचं विश्लेषण करताना दोन गोष्टी समोर येतात एक तर तमाम बॉलीवूडकरांना त्यांचे हितसंबंध जोपासायचे होते. किंवा गेलाबाजार काहीही करून प्रसिद्धीत राहण्याचा संधीसाधूपणा करायचा होता. खरंतर यातल्या कितीजणांना कायद्याच्या नेमक्या तरतुदी माहीत असतील हे कोडच आहे. आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे कायद्याने गुन्हेगार ठरविलेल्या व्यक्तीला पाठिंबा देताना आपण समाजासमोर काय आदर्श मांडतो आहोत याचंही भान राहिले नाही.
तर दुसरीकडे पूर आला होता तो थेट टीकाबाजीचा. माध्यमांनी यात तेल ओतलं. दोन तासांत जामीन मिळाल्यापासून ते गरिबांना न्याय मिळणार का हे सांगताना आपण न्यायालयीन प्रक्रियेचादेखील अपमान करतो आहोत याचं भानदेखील सुटलं होतं. ज्या न्यायव्यवस्थेने त्याला शिक्षा सुणावली त्याच व्यवस्थेने जामीन दिला आहे हेच सारेजण विसरले. त्यामुळे शिक्षा सुनावणारी न्यायव्यवस्था बरोबर आणि जामीन देणारी चुकीची, अशी दुहेरी भूमिका घेताना कोणालाच काही वावगं वागतोय असं वाटलं नाही.
या सर्वाच्या मुळाशी आहे ते आपल्या न्यायप्रक्रियेबद्दलचं अज्ञान. कारण जामिनाची प्रक्रिया कशी करावी याचं र्सवकष कायदेशीर ज्ञान असणाऱ्यांनी ती योग्य प्रकारे वेगवान पद्धतीने वापरल्यामुळेच जामिनाची प्रक्रिया पुरी झाली होती. पण हे धान्यात न घेताच देण्यात आलेल्या प्रतिक्रिया बॉलीवूडकरांच्याच उथळ विचारांच्या पंक्तीत जाऊन बसणाऱ्या होत्या.

सलमान खानची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाने स्थगित केली. यावरून हा देश फाइव्ह स्टार वकिलांमार्फत चालतो हे सिद्ध झाले, हे परखड मत लेखक मिनहाझ र्मचट यांनी मांडले.भाजप खासदार यांनी तर सलमानच्या शिक्षेला उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर, या देशात गरिबांना न्याय मिळत नाही, असं म्हणत न्यायव्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह उभं केलं आहे.
हे असं असताना मिश्कीलपणे टिप्पणी करण्यातही अनेक जण आघाडीवर होते. हे सर्व पत्रकार जिवंत आहेत, कारण सलमान खान गाडी चालवत नव्हता, असं ‘मुंबई की छोकरी’ने ट्वीट केलं आहे. तर फुटपाथवर झोपलेल्या अनेकांच्या अंगावर गाडी न चालवून सलमान खानने अनेकांचा जीव वाचवला आहे, असं सायको या अकाऊंटवर म्हटलं आहे. या सुनावणीसाठी सलमानचं संपूर्ण कुटुंब न्यायालयात हजर आहे. घरात एकमेव व्यक्ती कमावती असली की हे असं होतं, असं एकाने म्हटलं आहे. तर ‘कॅटेगर5मोरॉन’ या अकाऊंटवर, तेरा वर्षांनंतर एक गोष्ट लक्षात आली की, नशेत कोण असेल तर ती म्हणजे भारतीय न्यायव्यवस्था, असं म्हटलं आहे.
प्रीझन ब्रेक एक्सडीच्या भारतीय आवृत्तीमध्ये आता संजय दत्त आणि सलमान खान काम करू शकतात, असा सल्लाही एका ट्वीटमध्ये देण्यात आला आहे. सलमानला शिक्षा झाल्याचा निकाल एकून माझ्या कार्यालयातील एक मुलगी ढसढसा रडत होती. मी तिला कार्यालयातल्या वॉशरूममध्ये बंद करून टाकलं, असं ‘लांबरदार’ अकाऊंटवरून ट्वीट करण्यात आलंय.

हॅशटॅग ट्रेंड
सलमानला शिक्षा काय आणि किती काळासाठी होणार याची खरी चर्चा रंगायला सुरुवात झाली ते ५ मेच्या रात्रीपासून जेव्हा बॉलीवूड बादशाह शाहरूख खानने सलमानची त्याच्या राहत्या घरी जाऊन भेट घेतली. तेव्हापासून  #SalmanKhanVerdict  #SalmanKhan #SalmanKhanCase #BeingHuman #सलमानचा फैसला #सलमानचा निकाल हे हॅशटॅग ट्विटर आणि फेसबुकवर ट्रेंड करत करायला लागले. त्यानंतर सलमानला पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर लागलीच #SalmanBailOrJail हे त्याला उच्च न्यायालयाकडून जामीन मिळेपर्यंत ट्रेंड करत होते.

आलिया भट्ट, सुभाष घई आणि अश्विन मुश्रन या बॉलीवूड सेलिब्रिटींनी सलमानला ना पाठिंबा दर्शवला ना त्याचा विरोध केला पण त्यांनी घेतलेल्या भूमिकेचे सामान्यजनांकडून बडय़ा दिलाने स्वागत करण्यात आले. सलमानच्या शिक्षेवर पुढील सुनावणी जून महिन्यात होणार आहे. तोपर्यंतच त्याच्या किक या चित्रपटातील हे वाक्य सध्याच्या वातावरणात अगदी साजेसं आहे.
मेरे बारे में इतना मत सोचना, दिल में आता हू, दिल में आता हूँ, समझ में नही..
प्रशांत ननावरे, सुहास जोशी