समाजमाध्यमांमध्ये फिरत असणाऱ्या राष्ट्राभिमानी संदेशांना हल्ली पाश्चात्य वैज्ञानिकांचा हवाला दिला जातो. अर्थातच शहानिशा न केलेले हे संदेश म्हणजे मिथ्यकथाच म्हणाव्या लागतील. समाजमाध्यमांतील अशाच काही मिथ्यकथांविषयी.

सुमारे सहा वर्षांपूर्वीची गोष्ट. एके दिवशी अचानक इंटरनेटवरून एक बातमी आली. ती वाचली आणि अनेकांची मने कशी राष्ट्राभिमानाने उचंबळून आली. राहवलेच नाही त्यांना. तातडीने त्यांनी ती इतरांना सांगितली, फेसबुकवर टाकली, ती वाचून अनेकांनी आवडल्याची नोंद केली. पुढे धाडली.
बातमीच तशी होती. आपल्या राष्ट्रगीताबद्दलची. जन-गण-मन हे रवींद्रनाथ ठाकूर लिखित आणि संगीत-संयोजित राष्ट्रगीत जगातील सर्वोत्तम राष्ट्रगीत असल्याचे युनेस्कोने जाहीर केल्याचे त्या बातमीत म्हटले होते. युनेस्को ही संयुक्त राष्ट्रांची शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संस्था. तिने जन-गण-मनची सर्वोत्कृष्ट राष्ट्रगीत अशी निवड केली म्हटल्यावर तमाम भारतवासीयांना आनंद होणे स्वाभाविकच होते.
मात्र त्या भरात या बातमीची सत्यता तपासून पाहण्याचे भान कोणास उरलेच नाही. फेसबुक सदस्यांकडून ती अपेक्षा नव्हती. ते काम पारंपरिक माध्यमांचे होते. परंतु एका मराठी दैनिकानेच ही बातमी अगदी पहिल्या पानावर प्रसिद्ध केली म्हटल्यावर पुढचा शोधच संपला. सगळे जण ती माहिती खरी असल्याचेच धरून चालले.
वस्तुत: युनेस्को अशी राष्ट्रगीतांची कोणतीही स्पर्धा घेत नाही. तिने जन-गण-मनची अशी कोणतीही निवड केलेली नाही. कोणाच्या तरी सुपीक मेंदूने ही मिथ्यकथा प्रसृत केली आणि सगळ्यांनीच तिला डोक्यावर घेतले. पुढे काही वृत्तपत्रांनी ही गंमत छापली आणि तो बुडबुडा फुटला. वाटले हे प्रकरण मिटले. पण तसे झाले नाही. अजूनही ती माहिती इंटरनेटवर उपलब्ध आहे. त्या वेळी लहान असलेली मुले आज ती बातमी खरी मानून चालण्याचा धोका आहे. किंबहुना ती तशी मानत आहेतच. आज विविध व्हॉट्सअॅप गटांतून ही माहिती फिरत आहे. तुम्ही खरे राष्ट्रप्रेमी असाल तर हा संदेश पुढे पाठवा, असे आवाहन केल्यावर कोण राष्ट्रद्रोह करण्याच्या भानगडीत पडेल? शिवाय संदेश पुढे पाठविण्यास फारसा खर्चही येत नाही. त्यामुळे अशा खोटय़ा कहाण्या वाऱ्याच्या वेगाने पसरत आहेत.
एखादी प्रचंड खोटी गोष्ट सातत्याने सांगितली की कालांतराने लोक ती खरीच मानून चालतात हे नाझींच्या प्रचारतंत्राचे एक प्रमुख सूत्र होते. आजच्या माहितीयुगात माहितीची सत्यता तपासून पाहण्याचे अनेक मार्ग उपलब्ध असल्याने हे सूत्र खोटे ठरेल असे वाटत होते. परंतु ते खोटे ठरले असून, उलट इंटरनेटच्या मदतीने साध्यासुध्या सर्वसामान्य लोकांच्या माथी विविध प्रकारची मिथके मारली जात आहेत. जन-गण-मनच्या बहुमानाची कथा ही त्यातलीच एक. अशी अनेक उदाहरणे आपल्यासमोर आहेत. त्यातील हा व्हॉट्सअॅपवरून फिरत असलेला एक नमुना पाहा. लोकसभा निवडणुकीच्या काळात हा संदेश अगदी बहरात होता. पण अजूनही कुणाच्या ना कुणाच्या दूरध्वनीसंचात तो अवतरतोच.
‘गायत्री मंत्र हा जगातील सर्वात शक्तिशाली मंत्र’
डॉ. हॉवर्ड्स स्टेनगेरील या अमेरिकन वैज्ञानिकाने जगभरातून विविध मंत्र, स्तोत्रे आणि प्रार्थना गोळा करून आपल्या फिजिओलॉजी प्रयोगशाळेत त्यांच्या शक्तीची तपासणी केली. त्यात हिंदूंच्या गायत्री मंत्रातून प्रतिसेकंद एक लाख दहा हजार ध्वनिलहरी निर्माण झाल्याचे दिसून आले. ही संख्या सर्वोच्च असून, त्यावरून गायत्री मंत्र हा जगातील सर्वात शक्तिशाली मंत्र असल्याचे स्पष्ट झाले आहे.
विशिष्ट वारंवारतेच्या ध्वनिलहरी किंवा ध्वनींच्या संयोगातून हा मंत्र विशेष आध्यात्मिक क्षमता निर्माण करीत असल्याचा दावा करण्यात येत आहे. या मंत्राच्या मानसिक आणि शारीरिक अशा दोन्ही पातळींवरील निर्मितीच्या क्षमतेविषयी हॅम्बर्ग विद्यापीठाने संशोधन सुरू केले आहे.
दक्षिण अमिरकेतील सुरिनाम या देशातील रेडिओ परमारिबो या केंद्रावरून गेल्या दोन वर्षांपासून रोज सायंकाळी ७ वाजता १५ मिनिटे हा मंत्र प्रसारित केला जातो. अॅमस्टरडॅम, हॉलंडमध्येही गेल्या सहा महिन्यांपासून हा मंत्र प्रसारित केला जातो.
ॐ भूर्भुव: स्व: तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न: प्रचोदयात्।
अर्थात – माझ्या श्वासांप्रमाणेच परमेश्वर मला प्रिय आहे. तो माझ्या वेदना शमविणारा आहे, सुखदायक आहे. मी त्या उत्पादक, प्रकाशक परमात्म्याची प्रार्थना करतो. तो माझे विचार आणि समज यांस प्रेरणा देवो.
वरील माहिती सर्वाना देण्यायोग्य असून, ती प्रत्येकाला द्या.
आपले वेद किती श्रीमंत आणि अद्भुत आहेत.
हा गायत्री मंत्र पहिल्यांदा येतो तो ऋग्वेदाच्या तिसऱ्या मंडलातील ६२व्या सूक्तामध्ये. या सूक्तामध्ये इंद्र, वरुण, बृहस्पती, पूषा, सविता, सोम आणि मित्रावरुण यांची स्तुती आहे. गायत्री मंत्र हा सविता अर्थात सूर्य देवतेस उद्देशून आहे. ऋग्वेदात तो येतो तो ‘ॐ भूर्भुव: स्व:’ हे पहिले तीन शब्द गाळून. तेथे तो ‘तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न: प्रचोदयात्।’ (ऋग्वेद, ३/६२/१०) या स्वरूपात आहे. पुन्हा यजुर्वेदातील तिसऱ्या, बाविसाव्या आणि तिसाव्या अध्यायांतही तो याच स्वरूपात आहे. (यजुर्वेद ३/३५, २२/९, ३०/२). ‘भूर्भुव: स्व:’सह उर्वरित भाग येतो तो यजुर्वेदाच्या छत्तिसाव्या अध्यायात. (यजुर्वेद ३६/३) यातही ओम या प्रणवाचा समावेश नाही.
तर आपल्या वेदांतील या मंत्राचे आध्यात्मिक माहात्म्य आपल्या परंपरेने गायलेलेच आहे, परंतु हॅम्बर्ग विद्यापीठातील कोणा वैज्ञानिकाने ते शास्त्रीय संशोधनातून गोचर केले म्हटल्यावर त्याबद्दल तमाम धार्मिकांचा आनंद गगनात मावेनासा होणारच. उपरोक्त संदेश आजही व्हॉट्सअॅपवरून फिरता आहे यातूनच तो आनंद केवढा मोठा आहे याचा अंदाज येतो. पण हा आनंद सत्यावर आधारलेला आहे का?
तर मुळीच नाही. ज्या विदेशी संशोधकाने – डॉ. हॉवर्ड्स स्टेनगेरील (Dr Howards Steingeril) यांनी हे संशोधन केल्याचे सांगण्यात येते त्या नावाचा कोणी वैज्ञानिकच नाही. त्याच्या नावाचे कोणतेही पुस्तक, कोणतीही संशोधनपत्रिका नाही. हॅम्बर्ग विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर त्यांचा उल्लेख नाही. तो इंटरनेटवरील अनेक संकेतस्थळांत सापडतो तो केवळ गायत्रीबाबतच्या उपरोक्त संदेशामध्ये. आता हे वैज्ञानिकच अस्तित्वात नसल्यामुळे त्यांच्या संशोधनाचा पायाच ढासळून पडतो.
असेच दुसरे उदाहरण आहे हनुमान चालिसाचे. व्हॉट्सअॅपवर फिरत असलेला तो संदेश असा आहे –
‘कुणाला हुनमान चालिसा माहीत आहे? हनुमान चालिसामध्ये म्हटले आहे की :
जुग सहस्र जोजन पर भानु, लील्यो ताहि मधुर फल जानू
याचा अर्थ भानू म्हणजे सूर्य हा युग सहस्र योजन अंतरावर आहे.
१ युग = १२००० वर्षे
१ सहस्र = १०००
१ योजन = ८ मैल
युग ७ सहस्र ७ योजन = पर भानू
१२००० ७ १००० ७ ८ मैल = ९६०००००० मैल
१ मैल = १.६ किमी
९६०००००० मैल ७ १.६ किमी = १५३,६००,०००० किमी सूर्यापासून
पृथ्वी आणि सूर्यामधील हे तंतोतंत अंतर असल्याचे नासाने म्हटले आहे. यातून सूर्य हे एक मधुर फळ आहे असे समजून त्याकडे झेप घेणाऱ्या प्रभू हनुमानाचे गणित अगदी योग्य होते असे सिद्ध होते.
आपले प्राचीन ग्रंथ किती अर्थपूर्ण आणि अचूक आहेत हे पाहणे खरोखरच सुरस आहे. दुर्दैवाने आज ना कुणाला त्याची ओळख आहे, कोणाला त्याचा अर्थ समजत आहे वा जाणीव आहे..’
हनुमान चालिसा ही गोस्वामी तुलसीदासांची (१५३२-१६२३) रचना. त्यांचा जन्म उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यतल्या राजापूरचा. ते अकबराचे समकालीन. या संदेशानुसार त्या काळात म्हणजे सोळाव्या वा सतराव्या शतकात सूर्य आणि पृथ्वी यांतील अचूक अंतराचे ज्ञान होते.
आधुनिक विज्ञानानुसार सूर्य आणि पृथ्वी यांतील अंतर आहे १४९,६००,००० किमी.
वरील गणित आणि हे अंतर यांत तब्बल एक अब्ज ३८ कोटी ४६ लाख किमीचा फरक आहे. खरे तर वरचे गणित चुकले आहे. त्याच्या उत्तरात एक शून्य जास्त पडला आहे. (आणि ते लक्षात न घेता त्या चुकीसह तो संदेश पुढे पाठविला जात आहे.) परंतु ते गणित दुरुस्त करून घेतले तरी चाळीस लाख किमीचा फरक राहतोच. (शिवाय यात नासाचे नाव आणण्याचे काहीच कारण नव्हते. परंतु अशा संदेशांत नासाचे नाव असले की त्यावर विश्वास ठेवणाऱ्यांची संख्या वाढते हे गणित या संदेशाच्या निर्मात्याला चांगलेच माहीत असावे.)
या गणितात आणखी एक त्रुटी आहे. ती म्हणजे युग हे काळाचे परिमाण असून, योजन हे अंतराचे आहे. आणि वर्ष आणि अंतराचा गुणाकार करून त्याचे उत्तर मात्र अंतरात देण्यात आले आहे. बरे पुन्हा युग म्हणजे किती वर्षे यातही घोळ केलेला आहे. युग म्हणजे १२०० वर्षे हे येथे गृहीत धरले आहे ते केवळ कलियुगाबाबत. पुन्हा ही वर्षेही मानवी नाहीत, तर दिव्य वर्षे आहेत. आपल्या पुराणांनुसार कलियुग हे १२०० दिव्य वर्षांचे आहे. आणि एक दिव्य वर्ष म्हणजे ३६० संवत्सरे अर्थात मानवी वर्षे. याचा अर्थ कलियुग हे ४ लाख ३२ हजार वर्षांचे आहे. हा आकडा घेतला तर सगळाच हिशेब चुकतो आहे.
थोडक्यात हनुमान चालिसामध्ये आधुनिक विज्ञान शोधण्याचा हा प्रयत्न फसवा आहे. अशी अनेक उदाहरणे देता येतील. पण त्या सर्वातून निष्पन्न होणारा मुद्दा एकच आहे. तो म्हणजे हा मिथ्यकथा पसरविण्याचा, सर्वसामान्यांना मूर्ख बनविण्याचा उद्योग आहे.
येथे आपण ही महत्त्वाची बाब लक्षात घ्यायला हवी की अध्यात्म, तत्त्वज्ञान, समाजशास्त्र, भाषाशास्त्र अशा विविध बाबतींत प्राचीन भारतीय ग्रंथ महत्त्वाचे ठरतातच. त्यांची महती सांगण्यासाठी खोटय़ा पाश्चात्य संशोधनाचे हवाले देण्याची काही आवश्यकता नाही आणि त्याच बरोबर सगळ्याच प्राचीन ग्रंथांवर आधुनिक विज्ञान आरोपित करून त्यांना छद्मविज्ञानग्रंथ बनविण्याची गरज नाही.
आपल्या प्राचीन ग्रंथांत सगळेच विज्ञान, तंत्रज्ञान भरलेले होते. आजचे सगळे शोध आपल्या ऋषीमुनींनी मागेच लावले होते अशा भ्रमात राहणारांनी तसे खुशाल राहावे. वस्तुस्थिती अशी आहे की प्राचीन भारतातही जसे कला, साहित्य बहरले होते, तसाच विज्ञानाचाही अभ्यास करण्यात येत होता. प्राचीन भारतीयांनीही अनेक वैज्ञानिक शोध लावले आहेत. त्याचे श्रेय त्यांना दिलेच पाहिजे. त्यापुढे नतमस्तक झालेच पाहिजे. परंतु नको त्या ठिकाणी, कविकल्पनांना आधुनिक विज्ञान चिकटवून आपण मात्र त्या प्राचीन वैज्ञानिकांच्या माथी नसते श्रेय आरोपित करून त्यांचा अवमानच करीत असतो, हे समजून घेतले पाहिजे.
ते अवघड आहे, हे खरेच. त्यापेक्षा प्राचीन वारशाच्या आधारे आपले छोटेपण झाकणे हे खूपच सोपे! तोच तर हेतू असतो अशी मिथके तयार करण्याचा आणि प्रसृत करण्याचाही.
रवि आमले – response.lokprabha@expressindia.com