01prachiसोशल नेटवर्किंग साइटवर एखादा ट्रेंड आला की आंधळेपणाने तो फॉलो करण्याचा ट्रेंड तरुणाईमध्ये दिसतो आहे. खरं तर असं न करता नीट समजून घेऊन आपण तो ट्रेंड फॉलो करायचा की नाही याचा निर्णय घेतला पाहिजे.
वैज्ञानिकांनी एक प्रयोग केला, एका खोलीमध्ये ८-१० माकडांना ठेवण्यात आले. त्या खोलीच्या मध्यभागी एक शिडी सरळ उभी ठेवली आणि त्या शिडीच्या वर केळीचा एक गुच्छा लटकत ठेवण्यात आला.
थोडय़ाच वेळात एका माकडाचे लक्ष त्या केळीच्या गुच्छय़ाकडे जाते आणि ते माकड शिडी चढून केळयांकडे जाण्याच्या प्रयत्न करते, तोच त्याच्या अंगावर थंडगार पाणी पडते व इतर उरलेल्या माकडांवरसुद्धा पडते आणि शिडी चढण्याचा प्रयत्न करणारा माकड खाली परत येतो.
दुसऱ्या दिवशी दुसरा एक माकड असाच प्रयत्न करतो, तेव्हासुद्धा त्याच्या अंगावर आणि इतर सर्व माकडांच्या अंगावर थंडगार पाणी पडते.
असे सतत ३-४ दिवस घडते, त्यामुळे याचे कारण माकडांच्या लक्षात येते की, केळ्यांकडे धाव घेतल्यामुळे आपल्यासोबत असे होत आहे.
मग पाचव्या दिवशी जेव्हा पुन्हा एक माकड केळीसाठी शिडी चढण्याचा प्रयत्न करतो, इतर सगळे माकड मिळून त्याला खूप मारतात, त्यामुळे तो माकड परत येऊन कोपऱ्यात बसतो, यामुळे त्या दिवशी कोणावरही पाणी पडत नाही.
पुढील ३-४ दिवस असे सतत घडते, जो कोणी माकड शिडीकडे वळला की इतर सर्व माकड मिळून मारायचे. अशा प्रकारे सर्व त्या माकडांपैकी कोणीही केळ्यांकडे बघायचासुद्धा नाही. तेव्हा मग वैज्ञानिकांनी पाणी घालणेच बंद केले.
आता वैज्ञानिकांनी त्या माकडांपैकी एक माकड बाहेर काढले आणि दुसरे एक नवीन माकड आत टाकले. या नवीन माकडाच्या केळी नजरेत पडताच शिडी चढण्याचा प्रयत्न करतो तोच जुनी सर्व माकडे मिळून त्या नवीन माकडाला खूप मारतात.
दुसऱ्या दिवशी वैज्ञानिक जुन्या माकडांपैकी आणखी एक माकड बाहेर काढून नवीन एक माकड आत टाकतात. हे माकडदेखील केळी बघून शिडी चढण्याचा प्रयत्न करतो. पुन्हा इतर सर्व माकड त्याला बेदम मारतात. पण यात विशेष हे असते की काल आलेला नवीन माकड ज्याला या सगळ्याचे मूळ कारण माहितीच नाही तोसुद्धा या मारणाऱ्या माकडांत सहभागी होतो. यानंतर वैज्ञानिक दररोज जुने माकड काढून नवीन माकड आत घालतात. आणि रोज तोच प्रकार घडतो. नवीन माकड केळीसाठी शिडीकडे वळले की उर्वरित सर्व माकडे त्याला बेदम मारतात. अशा प्रकारे दररोज एक एक करून सर्व जुने माकड बाहेर काढून नवीन माकड आत घालण्यात येतात. प्रत्येक नवीन येणाऱ्या माकडाला शिडी चढण्याचा प्रयत्न केल्यास मार पडत असतो.
आता मात्र खोलीमध्ये सगळी नवीन माकडे असतात ज्यांना या मारहाणीमागचे मूळ कारण माहीत नसते. पण जर कोण्या एखाद्या माकडाने शिडी चढण्याचा प्रयत्न केला की इतर सर्व माकड त्याला मारतात. कारण आता हा ट्रेण्ड तिथे रूढ झालेला असतो. आपण का मारत आहोत याचे मूळ कारण माहीत नसूनसुद्धा फक्त कोणी त्या शिडीकडे वळला की त्याला मारायचे. बस्स..
गोष्टीतली गंमत अशी की जितकी ही माकडांसाठी खरी दिसते ती मापे आणि परिमाणे बदलली की माणसांसाठीपण तितकीच लागू ठरते. काय आहे, माणूस हा अनुकरणप्रिय आणि समाजशील प्राणी आहेच आणि आपण याच समाजाचा भाग आहोत हे दाखविण्याचा तो सतत आटोकाट प्रयत्न करीत असतो, यासाठी नावानेच समाजाशी घट्ट बांधणारा सोशल नेटवìकग त्याचा हा प्रयत्न ठळकपणे दर्शवून देत असतो. या माकडांसारख्या प्राण्यांचे स्पेशल जातीसमूह आपल्याला या सोशल नेटवìकग साइट्सवर खोऱ्याने सापडतात. एखादी व्यक्ती स्वत:ची अशी वेगळी वाट चोखाळतो आणि लोक त्याची क्षणार्धात पायवाट करून टाकतात. म्हणजे काय तर एखाद्याच्या पाठी जात त्याला फॉलो करायचे आणि भलत्याच घरचे दार ठोठवायचे..
कॉलेजमधून येऊन दोन तास झाले तरी पोरगी अजून बेडरूममध्येच आहे, काय करतेय ही आत इतका वेळ! आईच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. तिने हळूच बेडरूमचा दरवाजा उघडला आणि मुलीचा अवतार पाहून ती जवळ जवळ किंचाळण्याच्या बेतात होती. अगं काय करतेस हे? जीभ बाहेर काढून डोळे मोठे करून तोंडाचा चंबू करून सेल्फी काढण्यात मग्न असणारी तिची पोरगी दचकलीच – ‘काय गं आई किती जोरात ओरडलीस. घाबरले ना मी. फोकस पण चुकला माझा मोबाइलमधला.. आता सेट करावा लागणार पुन्हा..’ ‘अगं पण काय आहे हे सगळं अशी वेडीवाकडी तोंड करून काय चाललंय?’ ‘मॉम थांब तुला नाही कळणार, क्युटेस्ट सेल्फई चॅलेंज सुरू आहे सध्या एफ बी वर त्यासाठी सेल्फी काढतेय.. अजूनही बरेच चॅलेंजेस बाकी आहेत weirdest selfie,  black and white selfie,  natural selfie,  upside down selfie ओह गॉड सो मच टू डू! मॉम तू जा गं मला जरा कॉन्सन्ट्रेट करू देत’ मुलीच्या या बोलण्यावर आईचा चेहरा ‘कर्म माझं’ सेल्फी चॅलेंज नक्की जिंकला असता.. हल्ली लोकांना मोबाइलवरून फोन करता आला नाही तरी चालतं पण मोबाइलचा कॅमेरा विशेषत: फ्रंट कॅमेरा किमान २०-३० मेगापिक्सेलचा असायला हवा असतो, मगच तर सेल्फीचा सिलसीला सुरू होतो. बरं तो स्वत:पुरता थांबत नाही. मैत्रिणी मैत्रिणींचा काढला तर तो ‘गल्फी’ होतो, मोठय़ा घोळक्यात काढला तर तो ‘ग्रुपी’ होतो, मध्यंतरी एकाने हत्तीबरोबरचा ‘एल्फी’ काढला म्हणे! आता बोला! तरी नशीब कुठेही काढलेला म्हणून अजून ‘कुल्फी’ आलेला नाहीए (यानंतर आल्यास मी जबाबदार नाही.)
पूर्वी वेडेवाकडे चेहरे करून विदूषक लोकांची करमणूक करायचे. आता मात्र लोकांना विदूषकाची गरज भासत नाही. कारण याबाबतीत आता लोक स्वावलंबी होताना दिसत आहेत. कारण लोक हल्ली स्वत:चेच वेडेवाकडे चेहरे केलेले फोटोज एफ बी आणि इतर सोशल नेटवìकग साइट्सवर पोस्ट करतात आणि याचे प्रकार तरी किती! तोंडाचा चंबू करून, (बदकाला अगदी तोड कॉम्पिटीशन) मान वाकडी करून किंवा यो मॅन बनून, रात्रीचा काळा गॉगल लावून, डोळे मिचकावून, जीभ बाहेर काढून किती ते असंख्य, अगणित प्रकार. म्हणजे विदूषकही अगदी पोट दुखेपर्यंत हसेल इतकी ही करमणूक’. आजकाल मित्र-मैत्रिणी भेटल्यावर आठवणींवरची धूळ उडविण्याच्या आधी फोटोजचा साज चढविला जातो आणि गप्पांच्या पावसाला सेल्फीचा वारा हुसकावून लावतो..भेटण्यावरून आठवले .. एफबीवरच्या ‘चेक इन’ प्रकारामध्ये तर शो ऑफ करण्याची जणू स्पर्धाच लागलेली असते. एरवी घरी आई-बाबांना कुठे जातोय याबद्दल अवाक्षरही न सांगणारा मुलगा जगाला मात्र आपल्या ‘पल पल’ची खबर देत असतो. म्हणजे पालकांना याचा फारच फायदा आहे. आपला पाल्य जर आपल्या फोनला दाद देत नसेल तर एफ बी वरच त्याचे चेक इन पहावे. क्षणार्धात तुम्हाला तुमचा मुलगा कोठे आहे, कुणासोबत आहे हे कळेल. काहींनी या चेक इनमध्ये स्वत:ला इतके वहावून घेतलेले असते की आता मी गोवंडी स्टेशनला आहे किंवा कासारवडवली बस स्टॉप असेही चेक इन करायला मागेपुढे पाहात नाहीत.. सामान्य माणसाचे काय, तोच असा मूर्खपणा करतो असे वाटत असले तर तो काढून टाकण्यात आइस बकेट चॅलेंज तुम्हाला मदत करेल या गोष्टीने मध्यंतरी सोशल नेटवर्िंकग साइट्सवर प्रचंड धुमाकूळ घातलेला. सेलिब्रिटीजनी तर या बर्फाचा वणवाच पसरवलेला सगळीकडे एक बादली बर्फ डोक्यावर टाकल्यावर समाजसेवा होते म्हणे, म्हणजे शीत प्रदेशात राहणारे पेंग्विन्स किती उच्चकोटीचे समाजसेवक आहेत याची आपण कल्पना न केलेलीच बरी. ‘तुमचा एक लाईक एक शेअर या मुलाला अन्न मिळवून देईल’ वाचून टचकन पाणीच येते डोळ्यांत, करूच यात शेअर. हे म्हणजे लहानपणी परीक्षेच्या आदल्या रात्री पुस्तक उशाशी ठेवून झोपण्यासारखे आहे; जेणेकरून पुस्तकातले सगळे धडे येणारच आहेत आपल्या डोक्यात आणि आपण लिहिणार आहोत परीक्षेत धडाधड.. पण हे असे वागणे म्हणजे मोठेपणी लहान बुद्धीने होण्यासारखे आहे..!!
‘ये मेसेज दस लोगों को फॉरवर्ड करो, नहीं तो सात साल के लिये आपका बॅडलक शूरू!!’ असा धमकीवजा सूचनेचा मेसेज येतो आणि आपण तो लोकांना फॉरवर्ड करतो, ‘आधीच गुडलकसाठी लक साथ देत नाहीये, पुन्हा बॅडलकचा कलकलाट हवाय कशाला मागे’ करा मग फॉरवर्ड.
नुकताच एफ बीवर एक नवा ट्रेण्ड आला. आपले प्रोफाईल सप्तरंगी करण्याचा. अनेकांनी ओह इट्स सो कलरफूल म्हणत आपला फोटो सात रंगांत रंगविला, काहींना अर्धीच बात माहीत होती की, समिलगी संबंधांबद्दल संमत झालेल्या कायद्याला पाठिंबा करण्यासाठी आपण फोटो रंगवितो आहोत, खरे कारण जाणून घेण्याचा नेमका प्रयत्न फारसा कोणी केलाच नाही. आपले डीपी रंगबेरंगी करून मोकळे झाले सारे आणि जेव्हा साऱ्यांना यामागचे खरे कारण कळले तेव्हा त्यांचा चेहरा काळा-निळा पडण्याची वेळ आली होती.. कारण त्याचा अर्थ होता ‘आय अ‍ॅम गे’ असे जाहीर करणे.. बिचारे ‘भुलले रंगाशी’ अशी अवस्था करून घेण्यामागे ते स्वत:च जबाबदार होते.
एखादा ट्रेण्ड फॉलो करण्यात, त्यात सहभागी होण्यात काहीच गैर नाही ही खरेतर प्रत्येकाची वैयक्तिक निवड आहे. पण असे काही करण्याआधी यात मूर्खपणाचे पारडे जड तर होत नाहीये ना हे तोलून पाहायला हवे. लोक करतात तेच करण्यासाठी आपण काही कळपातून जाणाऱ्या मेंढय़ा नाही आहोत. आपल्याला मिळालेल्या बुद्धीवर मूर्खपणाचा गंज चढू दिलात की बॅडलक सात वर्षांसाठी नाही तर कायमच तुमच्या आयुष्यात नांदायला येईल. त्यामुळे लाईक कशाला करायचे मूर्खपणाला की सारासार विचारांना हे ज्याने त्याने आपापल्या मूर्खपणाने (अं सॉरी बुद्धीने) ठरवावे..!!!
प्राची साटम – response.lokprabha@expressindia.com