नायक-नायिकांच्या मागे नाचणारा शंभर दीडशे जणांचा ताफा हे बॉलिवूड सिनेमांमधलं एक महत्त्वाचं वैशिष्टय़. या पाश्र्वनर्तकांची नावंही आपल्याला माहीत नसतात. पण म्हणून त्यांचं या क्षेत्रातलं महत्त्व कमी होत नाही.

बॉलीवूड चित्रपट म्हटला की, चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी व नंतरही हिट होतात ती चित्रपटातली गाणी! चित्रपटातलं गाणं म्हणजे डान्स आलाच. कॅमेरा आणि फोकस मुख्यत्वे मुख्य कलाकारांवर असला तरी त्यांच्या बरोबरीने अथवा त्यांच्या मागे डान्स करणाऱ्या कलाकारांचा त्या गाण्यात तितकाच वाटा असतो. पडद्यामागचे कलाकार प्रसिद्धीपासून बरेचदा दूर राहतात, परंतु त्यांच्या एखाद्या कलाकृतीमागे सिंहाचा वाटा असतो. पाश्र्वनर्तक मात्र पडद्यावर येऊनदेखील बहुतांश वेळा नजरेआड केले जातात. खरंतर समूह नृत्याची हीच खासियत असते की संपूर्ण समूहातील सुसूत्रता आणि एकसारखेपणा त्या कलाकृतीला खुलवतो. त्यामध्ये सगळ्यांचे एकत्रित मेहनत आणि कौशल्य आवश्यक असते. परंतु चित्रपटगीतांमध्ये त्या चित्रपटातील नायक/नायिका प्रमुख असतात व सहकलाकार त्या गाण्याला अधिक बहार आणतात आणि इतक्या मोठय़ा संख्येत नर्तक आणि नर्तिका सामील झाल्यानेच त्या गाण्याला ‘ग्रँड’ स्वरूप प्राप्त होते. तरीही बरेचदा या कलाकारांना दुर्लक्षित केलं जातं, हेदेखील कटू सत्य आहे.
जुन्या काळी बरेचदा गाण्यामध्ये नायक आणि नायिका अभिनयाद्वारे चित्रपटगीत सादर करीत असत. मग हळूहळू नाजूक, सौंदर्यपूर्ण (बरेचदा शास्त्रीय नृत्याचा पाया असलेल्या) हालचाली गाण्यात वापरल्या जाऊ लागल्या. कालांतराने या गाण्यांमध्ये नृत्याची जागा वाढली, आणि नायक-नायिकांबरोबर पाश्र्वनर्तक-नर्तिकांना चित्रपटगीतात काम मिळू लागले. आज तर या क्षेत्राने इतकी उंच झेप घेतली आहे की, बॉलीवूड चित्रपटाचे पाश्र्वनर्तक-नर्तिका अविभाज्य भाग बनले आहेत. त्यांच्याकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोनही हळूहळू बदलू लागलाय, परंतु संपूर्णपणे अद्याप बदललेला नाही याची थोडी खंत वाटते. फक्त ‘एक्स्ट्रा’ म्हणून त्यांच्याकडे काही लोक बघतात, पण ते नसतील तर चित्रपटगीतांचं ‘ग्रॅण्ड’ स्वरूप अजिबात दिसणार नाही. हे मात्र हे लोक विसरतात. चित्रपटगीतांबरोबरच हे नर्तक ‘अ‍ॅवॉर्ड शोज’मध्ये नृत्य करतात, त्यामुळे ‘इंडस्ट्री’मध्ये त्यांना चांगलेच दिवस आले आहेत हे नाकारता येणार नाही!
‘महेश पुजारी’ गेली १५ वर्षे या क्षेत्रात नर्तक आणि आता साहाय्यक नृत्यदिग्दर्शक म्हणून काम करीत आहे. आतापर्यंत जवळपास ५० हून अधिक स्टेज शोजसाठी महेशने बॉलीवूडमधील विविध ‘कोरिऑग्राफर’बरोबर काम केले आहे. लहानपणी ‘स्टेज फिअर’ असलेल्या महेशला त्याच्या आईने प्रोत्साहन देण्यासाठी योगेश पाटकर यांच्याकडे डान्सच्या क्लासला घातले. नर्तनाची आवड निर्माण झाली आणि महाविद्यालयीन काळात गणेश हेगडे यांच्या ग्रुपसाठी निवड चाचणी दिली, तिथे निवड झाल्यावर ‘कंबक्त इश्क’ या गाण्यासाठी पाश्र्वनर्तन केले. तिथे महेशच्या करिअरला किक स्टार्ट मिळाला आणि मग हा प्रवास न थांबता उत्तरोत्तर यशस्वीच होत गेला. चार-पाच वर्षे गणेश हेगडेच्या ग्रुपबरोबर काम करताना विविध चित्रपट, विदेश वाऱ्या महेशला करायला मिळाल्या. या क्षेत्रात अचानक प्रवेश झाला असला तरी त्यामध्येच करिअर करावं असं का वाटलं? यावर महेश म्हणतो, ‘‘या क्षेत्रात मोठमोठय़ा ‘स्टार’बरोबर काम करायला मिळतं, विविध देश फिरायला मिळतात. शिवाय या कामातून ज्या रकमेचे धनादेश माझ्या नावाने यायचे, तेवढी रक्कम मी माझ्या नावावर कधी त्यापूर्वी बघितली नव्हती. त्यामुळे घरालाही हातभार लावता यायचा. त्यामुळे या क्षेत्राबद्दल अधिक ओढ निर्माण झाली. या क्षेत्रात करिअर करण्यासाठी ‘मेहनत आणि टॅलेंट’ हे दोन यशाचे मूलमंत्र आहेत. प्रत्येक क्षेत्रात चढाओढ आहे आणि आज कुठल्याच क्षेत्रात शाश्वती राहिलेली दिसत नाही. तेव्हा फक्त ‘चित्रपट दुनियेला’ नाव ठेवण्याची गरज नाही, असंही महेशचं मत आहे. बॉलीवूड चित्रपटांसाठी बॉलीवूड नृत्यशैलीचा सर्वाधिक वापर होत असला तरी इतर हिपहॉप, बी-बोइंग, लोकनृत्य, इ. नृत्यशैली येत असतील तरच या क्षेत्रात तुमचा टिकाव लागू शकतो. बदलत्या काळाबरोबर स्वत:लासुद्धा ‘अपडेट’ ठेवणं तितकंच महत्त्वाचं आहे. ‘गणेश हेगडे’कडे हिपहॉप, बॉलीवूडचा पाया पक्का झाला असं बऱ्याच पाश्र्वनर्तकांप्रमाणे महेश मान्य करत गणेश हेगडेला श्रेय देतो.
आपण चार-पाच मिनिटांचं फक्त गाणं स्क्रीनवर बघताना त्यामागच्या अहोरात्र केलेल्या मेहनतीचा आपण अंदाज लावू शकत नाही. एखादं गाणं चित्रित करायचं ठरलं की आधी नृत्यदिग्दर्शकाबरोबर चित्रपटाच्या दिग्दर्शकाची भेट होते आणि चित्रपटामध्ये कुठल्या प्रसंगानंतर गाणे येते, त्यात काय दाखविणे अपेक्षित आहे, याची चर्चा होते. मग नृत्यदिग्दर्शक आणि त्याचे साहाय्यक मिळून नृत्य बसवतात व पाश्र्वनर्तक-नर्तिकांना शिकवतात. तीन-चार दिवस सलग बरेच तास ही तालीम चालते, मग चित्रपटाच्या दिग्दर्शकाला दाखविली जाते. मग हवे तसे बदल केल्यावर शूटिंगच लोकेशन, तारीख ठरते. दोन-तीन दिवस अहोरात्र शूटिंग करून एक गाणं चित्रित होतं. आधी तर अद्ययावत तंत्रज्ञान उपलब्ध नसल्याने हे चित्रीकरण तब्बल दहा-बारा दिवस चालत असे! तालमीच्या दरम्यान नृत्यसंचरना केली जाते. अधिक अनुभवी कलाकार पुढे असतात, पण अधिक चांगले नृत्य करणाऱ्या नवोदित कलाकारांनाही कधीकधी पुढे राहण्याचा मान मिळतो. पाश्र्वनर्तकच कालांतराने साहाय्यक नृत्यदिग्दर्शक बनतात आणि मग पुढची पायरी म्हणजे प्रमुख नृत्यदिग्दर्शक! पण हा पल्ला गाठायला कठोर परिश्रम, जिद्द, सातत्य आणि कलागुण हेच कामी येतात. सध्या महेश पुजारी, वैभवी र्मचट, गीता कपूर, प्रभुदेवा, फराह खान, इ. आघाडीच्या नृत्यदिग्दर्शकांबरोबर साहाय्यक म्हणून काम करीत आहे. साहाय्यक नृत्यदिग्दर्शकालाच बहुतांश वेळा बॉलीवूडच्या ‘स्टार्स’ना नृत्य शिकवण्याची आणि त्यांच्याकडून सराव करवून घेण्याची जबाबदारी पार पाडावी लागते. बरेचदा सेलिब्रिटीच्या घरी जाऊन त्यांना नृत्य शिकवावे लागते. महेशने आत्तापर्यंत शाहरूख खान, सलमान खान, शाहीद कपूर, गोविंदा अशा अनेक बॉलीवूडच्या किंग्जबरोबर काम केले आहे आणि त्यांना नृत्य शिकवण्याचे काम केले आहे. या अनुभवाबद्दल तो आनंदाने सांगतो की, ‘सगळ्या बॉलीवूड सम्राटांबरोबर काम करायला खूप मजा येते. बरेच जण आता नावाने ओळखू लागले आहेत, याचा अभिमान वाटतो. मला तरी आत्तापर्यंत त्यांच्याकडून वाईट अनुभव आले नाहीयेत. सगळे अगदी आपुलकीने वागतात व अशा बडय़ा लोकांचा ‘इगो’ सहन करण्याची वेळ माझ्यावर कधी आली नाहीये.’’ हे सांगतच मोठय़ा प्रमाणावर समाजात असलेल्या गैरसमजुतीला त्याने खोडून काढले. बॅकअप नर्तकांना दुय्यम दर्जाची वागणूक मिळते, अशी गैरसमजूत आहे असे म्हणत, ‘आम्हालादेखील सेटवर समान वागणूक मिळते. विदेश दौऱ्यावरपण सेलिब्रिटी राहतात, त्याच पंचतारांकित हॉटेलमध्ये आम्ही राहतो,’ असे महेशने सांगितले.
नृत्यदिग्दर्शक, नर्तक यांना चेहरा मिळवून दिला आहे, तो विविध, ‘रिअ‍ॅलिटी शोज्’नी! महेश पुजारीनेदेखील विविध रिअ‍ॅलिटी शोज्साठी साहाय्यक नृत्यदिग्दर्शक म्हणून काम केले असले तरी प्रत्यक्षात तो स्पर्धक म्हणून सहभागी झाला नाहीये. बरेच वर्षे पाश्र्वनर्तिका म्हणून काम केलेली पल्लवी होळे-पाटील मात्र सध्या ‘डान्स इंडिया डान्स (डीआयडी) – सुपर मॉम्स’ सीझनमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाली आहे. ‘मैं प्रेम की दिवानी हूँ’ या चित्रपटातून २००० साली पल्लवीने या क्षेत्रात उडी घेतली व अनुभव आणि मेहनतीतूनच ती शिकत गेली. घरी पैशांची अडचण असताना तिने या क्षेत्रात एन्ट्री घेतली आणि पाश्र्वनर्तन करून घराला आर्थिक हातभार लावला. आज याच क्षेत्रातील पैशांच्या जोरावर पल्लवीने स्वत:चं घर, गाडी घेऊन घरच्यांना नक्कीच अभिमान वाटावा अशी झेप घेतली आहे. ३०-४० बॉलीवूड चित्रपट आणि असंख्य स्टेज शोजचा अनुभव असलेल्या पल्लवीच्या आयुष्यात ‘लग्न-मूलबाळ’ या सासांरिक जबाबदारीमुळे नृत्यात थोडा खंड पडला, पण ‘रिअ‍ॅलिटी शो’च्या माध्यमातून पुन्हा परफॉर्म करायची संधी मिळेल आणि आत्तापर्यंत कॅमेरासमोर डान्स करूनही आपला चेहरा लोकांसमोर आला नाही (‘रिअ‍ॅलिटी शो’च्या माध्यमातून लोकांसमोर पोहोचता येईल) या उद्देशाने ‘डीआयडी- सुपर मॉम्स’ सीझनमध्ये सहभागी होण्याचा पल्लवीने निर्णय घेतला आणि ‘टॉप १३’मध्ये तिची निवड झाली आहे.
या क्षेत्रामध्ये करिअर करायला समाजात जसे गैरसमज आहेत, तशा विरोधाला घराच्या पातळीवरसुद्धा कित्येकांना सामोरे जावे लागते. महेश आणि पल्लवी या दोघांच्याही घरातून सुरुवातीला विरोध होता. चांगल्या घरातल्या मुलींनी या क्षेत्रात जाऊ नये, असंपण पल्लवीला ऐकावं लागलं पण नृत्याची आवड आणि जिद्द याच्या बळावर त्यांनी या क्षेत्रातून माघार घेतली नाही. महेशच्या आईने मात्र आधीपासून पाठिंबा दिला. नियमित घरी येणारे पैसे, सेलिब्रिटीबरोबरचे फोटो, कधी कधी चित्रपटगीतात दिसलेले त्यांचे चेहरे या सगळ्या गोष्टींमुळे घरातल्यांचा विश्वास आणि पाठिंबा हळूहळू महेश आणि पल्लवीने मिळवला. आज घरातल्यांच्या सहकार्यानेच या क्षेत्रात ते इतकी वर्षे काम करू शकत आहेत, असे ते निर्मळपणे मान्य करतात.
मनोरंजन क्षेत्रात स्वत:ला ‘फिट’ ठेवणं अत्यावश्यक असतं. आपण चित्रपटगीतातपण बघतो की, सगळ्या पाश्र्वनर्तिका उंच, अत्यंत बारीक, त्यांची ‘फिगर’ जपलेल्या दिसतात. कामाच्या बरोबरीनेच स्वत:वर मेहनत घेणं तितकंच महत्त्वाचं ठरतं. चांगलं डाएट, जिनमध्ये वर्कआउट निरोगी राहण्यासाठी आरोग्याची काळजी या सर्वाना घ्यावी लागते. पल्लवी तर सांगते की, ‘मुलींसाठी या क्षेत्रात एका वयानंतर परफॉर्म करणं अवघड असतं. तरुण, उंच, बारीक, फिट मुलींनाच प्राधान्य दिलं जातं. गरोदरपणानंतर माझं वजन खूप वाढलं होतं. त्यामुळे नृत्याच्या करिअरमध्ये परत येण्यासाठी मला खूप डाएट, वर्कआउट करून माझं वजन कमी करायला लागलं.’ यातून हेच दिसून येतं की हे क्षेत्र बाहेरून सोपं दिसत असलं तरी मेहनत आणि कष्ट मात्र खूप घ्यावे लागतात या क्षेत्रात टिकाव लागण्यासाठी!
मनोरंजन क्षेत्रामध्ये दुसरा महत्त्वाचा प्रश्न असतो तो ‘आर्थिक स्थिरतेचा’ कारण इतर नोकरीप्रमाणे महिन्याला एक ठरावीक रक्कम मिळत नाही. मनोरंजन क्षेत्रात पैसे अधिक मिळत असले तरी स्थिरता मिळत नाही असे सर्वसामान्यांचे मत असते. महेश मात्र या बाबतीत माहिती देताना सांगतो, ‘‘आम्हाला मिळणारी रक्कम ‘निर्मिती संस्थेवर’ अवलंबून असली तरी साधारणपणे बॉलीवूड चित्रपटांसाठी एका दिवसाच्या शूटिंगचे आम्हाला तीन-चार हजार रुपये मिळतात तर साहाय्यक नृत्यदिग्दर्शकाला दहा हजार रुपयांपर्यंत प्रतिदिवशी मिळू शकतात. त्यामुळे जास्त पैसे कमवायचे असतील, जास्त दिवस मेहनत करणं क्रमप्राप्त आहे. एका महिन्यात २०-२५ दिवस-दिवसरात्र काम केलं तर आर्थिक अडचण अजिबात भासणार नाही, शिवाय चांगल्या निर्मिती संस्थेकडून पैशांचा विलंबही होत नाही.’’ कामाचं स्वरूप वेगळं असलं तरी स्वत:च्या कष्टांच्या हिमतीवर अर्थार्जन करता येऊ शकतं, हेच पाश्र्वनर्तकांचे अनुभवी बोल उमद्या कलाकारांना प्रोत्साहन देऊ शकतात!
आपण बऱ्याचदा बघतो की पाश्र्वनर्तक-नर्तिका काही वर्षांनी नायक-नायिकेच्या भूमिकेत दिसायला लागतात, शाहीद कपूरसुद्धा आधी पाश्र्वनर्तक म्हणून काम करीत असे! महेश पुजारीला मात्र अभिनयाच्या क्षेत्रात काम करण्याची इच्छा नाही, असं तो सांगतो. परंतु पाश्र्वनर्तिका म्हणून करिअर सुरुवात करून अचानक अभिनय क्षेत्राकडे वळलेली सेलिब्रिटी म्हणजे जसवीर कौर! १९९९ साली सुश्मिता सेन असलेल्या ‘हिंदुस्थान की कसम’ या चित्रपटातील गीतासाठी उंच नर्तिकांची गरज होती. तेव्हा राजू खान यांनी दिग्दर्शित केलेल्या गाण्यासाठी २०० मुलींमधून सहा-सात मुलींची निवड केली. जसवीरचा या क्षेत्रात प्रवेश झाला. त्यानंतर सहा वर्षे सरोज खान, फराह खान, गणेश आचार्य, गणेश हेगडे अशा अनेक दिग्गजांबरोबर काम करण्याची संधी जसवीरला मिळाली. ‘कृष्णा कॉटेज’ या चित्रपटाच्या गाण्यासाठी शूटिंग चालू असताना एकता कपूरने जसवीरला अभिनयासाठी विचारलं आणि जसवीर त्या उद्देशाने या क्षेत्रात आलेली नसल्याने तिने या मोठय़ा ऑफरला चक्क नकार दिला! दोन वर्षांनंतर पुन्हा अभिनयासाठी विचारणा झाली, तेव्हा मात्र अनेकांच्या सल्ल्यावरून जसवीरने मागणी मान्य केली. ‘क्या हादसा क्या हकीकत’ बालाजी निर्मित ‘के स्ट्रीट’ , ‘सी.आय.डी.’ इ. अनेक मालिका, चित्रपट, जाहिरातींमध्ये जसवीरने चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. पाश्र्वनर्तिका म्हणून काम करत असताना सेटवर ‘भय्या, पानी लाओ’ असं सांगायला लागायचं, पण आता सेलिब्रिटी म्हणून वावरताना सेटवर ‘मॅडम, पानी ले लो, मॅडम के लिए चेअर लाओ’ असा ट्रीटमेंटमधला फरकही जसवीर हसत हसत सांगते. काही जण आपण आधी पाश्र्वनर्तन करायचो हे मान्य करत नाहीत, मात्र जसवीर अभिमानाने हे मान्य करते आणि पाश्र्वनर्तनाने आपल्याला खूप काही शिकवले असे सांगते. ‘देवदास’ चित्रपटातील ‘मार डाला’ आणि ‘डोला रे’ ही दोन गाणी सरोज खानच्या मार्गदर्शनाखाली करायला मिळाली. ही आपल्यासाठी कौतुकाची पावती आहे, असंही जसवीर म्हणते! आज ती मुख्य नर्तिका म्हणून नृत्य करते तर तिच्यामागे अनेक कलाकार पाश्र्वनर्तन करतात याबद्दल सांगताना ती म्हणते, ‘ही माझ्यासाठी नक्कीच अभिमानाची गोष्ट आहे. माझ्याबरोबर पाश्र्वनर्तन करणाऱ्यांचा मी नेहमी आदरच करते.’’ आज आपण बघतो की पाश्र्वनर्तन करणाऱ्यांना बरेचदा खूप तोकडे कपडे घालावे लागतात. ‘बिकिनी’मध्ये नृत्य करण्याचा ‘ट्रेंड’ आला आहे, पण जसवीर मात्र म्हणते की, ‘या कपडय़ात मी कम्फर्टेबल नसते, त्यामुळे हा बदल व्हायच्या आधी मी या क्षेत्रातून बाहेर आले हे एका परीने चांगलेच झाले!’
सध्या आपण बघतो की, बॉलीवूड चित्रपटगीतात पाश्र्वनर्तनासाठी बरेचदा परदेशी नर्तिकांना घेतले जाते. पूर्वी हा ‘ट्रेंड’ अस्तित्वात नव्हता! महेश, पल्लवी या गोष्टीकडे बदलत्या काळाची आणि चित्रपटाची गरज म्हणून बघत असले तरी जसवीरच्या मते या बदलामुळे ‘भारतीय पाश्र्वनर्तकांवर अन्याय होता कामा नये’ हे महत्त्वाचे आहे! परदेशी नर्तकांमुळे भारतीय पाश्र्वनर्तकांना कमी काम मिळाले, तर तो भारतीय पाश्र्वनर्तकांवर अन्याय ठरेल, असे जसवीरचे म्हणणे आहे.
‘‘पाश्र्वनर्तन करणाऱ्या मुलीदेखील चांगल्याच घरातून आलेल्या असतात. त्यांची सुरक्षादेखील या क्षेत्रात पाहिली जाते आणि आपण चांगले वागलो तर लोकही आपल्याशी चांगले वागतात.’ असं म्हणत पल्लवी आणि जसवीर फिल्म इंडस्ट्रीवर असलेला गैरसमजुतीचा काळा डाग पुसायचा प्रयत्न करतात. पाश्र्वनर्तक हा चित्रपटाचा इतका महत्त्वाचा भाग असूनही अद्याप सर्व चित्रपटांच्या ‘क्रेडिट लिस्ट’मध्ये त्यांची नोंद झालेली दिसत नाही. त्यांच्याबद्दल प्रसिद्धी माध्यमांनी घेतलेली दखल दिसत नाही, ही खेदाची बाब आहे. ‘डान्सर असोसिएशन’ सदस्य झाल्यावर चित्रपटगीतांच्या निवड चाचणीसाठी बोलावले जाते आणि मग रंग, रूप, उंची, बांधा या गोष्टी बघितल्या जात असल्या तरी प्राधान्य ‘फाडू’ डान्स करणाऱ्यांना दिले जाते! विविध सेलिब्रिटींबरोबर काम करायला मिळतं, ओळखी होतात. परंतु हे काम आवडीने आणि जिद्दीने करावे लागते. ‘सेलिब्रिटीं’च्या मागे नाचताना, आपण दिसत नाही हा न्यूनगंड निर्माण झाला तर या क्षेत्रात मन रमणार नाही. ‘प्रत्येक क्षेत्राप्रमाणे स्ट्रगल या क्षेत्रातही आहे, पण प्रत्येक संधीचं सोनं करणं मात्र आपल्या हातात आहे’ असे महेश, पल्लवी आणि जसवीरच्या अनुभवातून दिसते. त्यांचे आशावादी अनुभव या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या कलाकारांना उमेद देतील, अशी आशा आहे. आज नर्तन क्षेत्रात विविध संधी उपलब्ध आहेत, पाश्र्वनर्तन, अवॉर्ड शोज्, म्युझिक व्हिडीओ, रिअ‍ॅरिली शो हे यातील पर्याय आर्थिकदृष्टय़ाही कलाकारांना बळकटी देतात.
तेव्हा तर पाश्र्वनर्तनाच्या क्षेत्रात यायची इच्छा असेल, तर समाजाच्या गैरसमजुतींमुळे ती इच्छा मारू नका. शेवटी स्वाभिमान, कष्ट, मेहनत, जिद्द, चांगलं काम या गोष्टीच आपल्याला मान मिळवून देतात. समाजाचा या क्षेत्राकडे बघणारा दृष्टिकोन अधिक बदलावा आणि पाश्र्वनर्तकांनाही एक चेहरा मिळावा, यासाठी हा छोटा प्रयत्न आहे! हे क्षेत्र निश्चितच वाईट नाही, हा विश्वास ठेवा-कीप डान्सिंग!
तेजाली कुंटे