lp44निहारिका कॉलेजला जाण्यासाठी बसची वाट बघत मैत्रिणींसोबत बस स्टॉपवर उभी होती. बसला यायला वेळ होता. तिच्या मैत्रिणींबरोबर गप्पा रंगात आल्या होत्या.
‘‘काय गं.. त्या वेडय़ा आशिकने.. गोटय़ाने तुझी पाठ सोडली की नाही!’’ तिच्या मैत्रिणी तिला चिडवत होत्या.
‘‘नाही गं.. एवढा नकार देऊनसुद्धा त्याने माझी पाठ सोडली नाही. वाटेत कुठे दिसला की अगदी अधाशासारखा माझ्याकडे बघत असतो.’’
‘‘तसा वाईट नाही तो.. किती प्रेम करतो तुझ्यावर! त्याच्या प्रेमाला होकार देऊन टाक ना.’’ त्यातलीच एक मैत्रीण तिला आणखीणच चिडवू लागली.
‘‘अगं.. तू वेडी आहेस का? त्या वेडय़ावर कोण प्रेम करेल? तूच कर.’’ तिच्या बोलण्यावरून वाटत होतं, तिला राग आला होता.
तेवढय़ातच एका मैत्रिणीला गोटय़ा येताना दिसला. ‘‘अगं ए.. निहारिका.. तो बघ तुझा हिरो येतोय.. इकडेच येतोय वाटतं!’’
‘‘तूच बघ त्याला आणि तूच त्याच्याबरोबर जा.’’
तिला वाटलं सर्व जण मस्करी करतात. म्हणून ती पटकन बोलून गेली. पण तो खरोखरच आला होता. कुठलीही लाज, भीती न बाळगता तो तिच्यासमोर येऊन उभा राहिला. तिच्याकडे बघतच राहिला. हा सर्व प्रकार बघून सर्व जण अवाकच झाले.
‘‘निहारिका तुझा फायनल निर्णय आहे.. तू मला पसंत नाही करत.. तू मला लाइन नाही देणार..’’ सर्वाच्या समोर येऊनच तो बिनधास्तपणे बोलला. निहारिकाच्या पायाखालची जमीनच जणू सरकली. कारण जे घडत होते ते अनपेक्षित तर होतेच, पण खूपच त्रासदायक होते. अशा परिस्थितीचा सामना करावा लागेल असे तिला कधीच वाटले नव्हते. ती कावरीबावरी झाली.
‘‘तू जा आधी इथून.. तुझं तोंडसुद्धा बघायची माझी इच्छा नाही.’’ थोडासा धीर करून तिने त्याला दम भरला. तिच्या मैत्रिणींनीसुद्धा नंतर तिला साथ दिली. तिच्या वागण्या-बोलण्यावरून गोटय़ाला समजलं की, ही आपल्या हाताला लागण्यासारखी नाही. तिचं उत्तर ऐकल्यावर क्षणाचाही विलंब न करता, आपल्या एका हातात पाठीमागे लपविलेल्या बाटलीतील अॅसिड तिच्या तोंडावर फेकले. त्याबरोबर सर्व मुलींनी व इतरांनी घोळका केला. ती त्या होणाऱ्या वेदनांनी विव्हळत होती. पण गोटय़ा मात्र काही झालेच नाही अशा आविर्भावात पटकन निघून गेला. आजुबाजूच्या लोकांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला, पण ते लोक त्याच्यापर्यंत पोहोचायच्या आत तो त्या इमारतीच्या मागे कुठे गायब झाला ते समजलेच नाही.
लगेचच तिच्या घरच्यांना फोन करून बोलावले आणि तिला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. डॉक्टरांनी उपचार लगेचच चालू केले. थोडय़ाच वेळात तिथे पोलीसही पोहोचले. डॉक्टरांशी बोलून झाल्यावर तिच्या मैत्रिणींकडे त्यांनी मोर्चा वळवला.
‘‘कोण कोण होते त्या मुलीसोबत घटनास्थळी?’’
‘‘आम्ही सर्व जण तिथे होतो.’’ असं एका स्वरात सर्व मैत्रिणी बोलल्या.
‘‘काय घडले तिथे? जरा व्यवस्थितपणे एकाने कोणी तरी सांगा.’’ एका मैत्रिणीकडे बोट दाखवून पोलिसांनी एकीला बोलते केले.
‘‘तू सांग काय घडले तिथे?’’
‘‘साहेब.. त्या मुलाचे नाव गोटय़ा आहे. तो आमच्या शेजारच्या एरियात राहतो. तो निहारिकावर एकतर्फी प्रेम करायचा.’’ एवढे बोलली आणि ती रडायलाच लागली. तिला आपल्या भावना आवरता आल्या नाहीत.
‘‘अगं बोल.. धीर सोडू नकोस.’’ पोलीस तिला धीर देऊ लागले.
तेव्हा त्यांच्यापैकीच एक दुसरी मुलगी धीर एकवटून म्हणाली, ‘‘साहेब.. त्या दिवशी बस स्टॉपवर उभे असताना तो अचानक आला आणि पुन्हा तिला त्रास देऊ लागला. नंतर तिने त्याला दम भरल्यावर व त्याच्या प्रेमाला नकार देताच, तिच्या चेहऱ्यावर त्याने लपवून आणलेले अॅसिड फेकले आणि पसार झाला.’’
त्यातल्याच दोन मुलींना पोलिसांनी सांगितले, ‘‘तुम्ही दोघी या हवालदारांसोबत जा आणि त्या मुलाचे घर त्यांना दाखवा.’’
थोडय़ाच वेळात हवालदार त्या दोन मुलींना घेऊन गोटय़ाच्या घरी पोहोचले. घरी चौकशी केली तर तो घरी नव्हता. त्याच्या घरी त्याची आई आणि भाऊ होता. त्यांना सर्व प्रकार सांगितला. घरच्यांना ते ऐकून धक्काच बसला. आई हंबरडा फोडून रडू लागली. तेव्हा एका हवालदाराने त्यांना दमच भरला, ‘‘तुम्ही रडून काय होणार आता.. तुमचा मुलगा कुठे आहे ते सांगा?’’
‘‘साहेब.. कुठे गेला ते आम्हाला काहीच माहीत नाही. तो सकाळी गेला, त्यानंतर घरी आलाच नाही.’’
‘‘आम्हाला आपल्या घराची झडती घ्यायची आहे.’’
‘‘पण साहेब.. तो सकाळपासून घरी आलाच नाही.’’
पण तेवढय़ात गोटय़ाचा भाऊ म्हणाला, ‘‘साहेब.. या.. घ्या घराची झडती.’’
हवालदारांनी घराची झडती घेतली. तो खरोखरच घरी नव्हता.
‘‘तो घरी आला किंवा फोन केला तर काय करायचे माहीत आहे ना! आमच्याशी लपंडाव खेळायचा नाही.’’ एका हवालदाराने गोटय़ाच्या आईला व भावाला दरडावून सांगितले.
‘‘हो साहेब.. त्याच्याशी काहीही संपर्क झाला किंवा तो घरी आला तर लगेचच आपल्याकडे त्याला घेऊन येतो.’’ गोटय़ाचा भाऊ आश्वासनवजा भाषेत बोलून गेला. एका हवालदाराने त्याच्या भावाच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले, ‘‘एक काम कर.. त्याच्या सर्व मित्रांचे मोबाइल नंबर मला दे.’’
‘‘साहेब.. सर्व मित्रांचे नाहीत पण काही जणांचे आहेत ते देतो.’’ त्याने तीन मित्रांचे नंबर हवालदारांना दिले.
हवालदार आणि त्या दोघी मैत्रिणी पुन्हा त्या हॉस्पिटलमध्ये पोहोचल्या. तिथे निहारिकाचे वडील हजर होते. ‘‘साहेब.. काही पत्ता लागला का?’’
‘‘अजून नाही.. पण लवकरच सापडेल!’’
हवालदारांनी सर्व माहिती इन्स्पेक्टरना दिली. इन्स्पेक्टरनी हवालदारांशी चर्चा करून दोन हवालदारांना कामाला लावले. निहारिकाच्या वडिलांनी तिच्या मैत्रिणींकडे चौकशी केली. तेव्हा त्या मुलाचे नाव आणि इतर माहिती सांगितली. ‘‘तुम्ही किंवा निहारिकाने मला अगोदर का सांगितले नाही?’’ असे नाराजीच्या स्वरात ते त्या मुलींना प्रश्न करू लागले. नाव सांगूनसुद्धा तिच्या वडिलांना त्या मुलाची ओळख पटत नव्हती. तेव्हा त्या मैत्रिणींनी त्याचे घर वगैरे कुठे आहे ती सर्व माहिती दिली.
निहारिकाला आय.सी.यू.मध्ये ठेवण्यात आले होते. डॉक्टर तिच्यावर उपचार करून बाहेर आले. ‘‘पेशंटबद्दल आताच काही सांगता येणार नाही. आमचा प्रयत्न आम्ही केला. तिने डोळय़ावर हात घेतल्यामुळे हात भाजले, पण डोळे वाचले.’’
अशी माहिती डॉक्टरांनी पोलिसांना आणि तिच्या वडिलांना दिली. पोलिसांनी लावलेल्या फिल्डिंगला यश आले. गोटय़ा त्याच्या मित्राच्या घरी सापडला. तो तिथे लपून बसला होता. तो मित्र आणखी चार-पाच जणांबरोबर राहायचा. त्याचे कुटुंबीय तिथे कोणीच नव्हते. त्यामुळे बिघडलेल्या मुलांचा जणू तो अड्डाच बनला होता. दुसऱ्या दिवशी पोलिसांनी तिच्या वडिलांना बोलवून घेतले.
‘‘याला ओळखता का..’’ पोलिसांनी तिच्या वडिलांना विचारले.
‘‘साहेब.. मी याला पूर्णपणे नाही पण याच्याशी माझी तोंडओळख आहे.’’
‘‘हाच तो गोटय़ा.. ज्याने तुमच्या मुलीवर अॅसिड फेकले.’’ हे ऐकल्याबरोबर त्यांच्या तळपायाची आग मस्तकालाच जाऊन भिडली. त्याला पकडणार एवढय़ात एका हवालदाराने त्यांना रोखले.
निहारिकाचे वडील भावुक होते. त्यांना आपले अश्रू आवरता आले नाहीत.
‘‘साहेब. याला अॅसिड मीच दिले होते.’’ असा धक्कादायक खुलासा त्यांनी केला. ते ऐकून पोलीसही अवाक झाले.
‘‘ते कसे काय?’’ पोलिसांनी प्रश्न केला.
पोलिसांना सर्व माहिती त्यांनी दिली. त्यांचे किराणा मालाचे दुकान होते. दोन दिवसांपूर्वी गोटय़ा त्यांच्याकडे अॅसिड घ्यायला आला होता. तेव्हा त्याच्या शेजारीच राहणाऱ्या एका गृहस्थाने, जो तेव्हा तिथे हजर होता, त्याने त्यांना सतर्क करण्याचा प्रयत्न केला.
‘‘अरे भाय.. त्याला अॅसिड देतोस, पण ते विक्रीला बंदी आहे माहीत आहे ना!’’
तेवढय़ात गोटय़ा पटकन म्हणाला, ‘‘अहो काका.. तुम्हाला मी दुप्पट पैसे देतो. मला बाथरूम साफ करायलाच पाहिजे आहे.’’
‘‘याला व्यवस्थित ओळखतो तरी का?’’ त्या गृहस्थाला राहावलं नाही म्हणून आणखी सतर्क करण्याचा प्रयत्न केला. ‘‘चालतं यार.. त्यात काय एवढे! येतो कधी कधी.. काही ना काही घ्यायला,’’ असं बेजबाबदारीचे उत्तर देऊन मोकळा झाला.
पोलिसांनी ही सर्व माहिती मिळाल्यावर पोलीसही त्यांना ओरडले.
‘‘तुम्ही त्या मुलाला व्यवस्थित ओळखत नव्हतात तरी त्याला तुम्ही का अॅसिड दिले? काय चाललेय सगळीकडे माहीत आहे ना! शिवाय तुम्ही थोडय़ाशा पैशाच्या लालचेने बंदी असूनही त्याला अॅसिड दिले.’’ आता मात्र त्यांना रडू आवरेनासे झाले. पण त्यांच्याबरोबर आलेल्या दोघांनी त्यांना सावरले.
‘‘घेतले ना आता तुमच्या चुकीचे फळ. आता यापुढे अॅसिड विकणार नाही ना! तुम्ही एवढी मोठी चूक केली नसती तर एवढय़ा मोठय़ा धक्कादायक घटनेपासून तुमच्याच मुलीला वाचवू शकला असता!’’ पोलिसांनी त्यांची कानउघाडणी केली. ते काय उत्तर देणार! त्यांच्याकडे उत्तरच नव्हते.

निहारिकाला आय.सी.यू.मध्ये ठेवण्यात आले होते. डॉक्टर तिच्यावर उपचार करून बाहेर आले. ‘‘पेशंटबद्दल आताच काही सांगता येणार नाही. आमचा प्रयत्न आम्ही केला. तिने डोळय़ावर हात घेतल्यामुळे हात भाजले, पण डोळे वाचले.’’
रवींद्र मोहन गुरव – response.lokprabha@expressindia.com