‘रोहन ऐकलंस का.. घरी आहेस तर जरा बँके ची कामं उरकून घे रे! किती दिवस मी तुला आणि ह्य़ांना सांगतेय, पण कोणीही लक्ष देत नाही, बाप-लेक दोघं सारखे आहात. रोहन, मी तुझ्याशी बोलते, भिंतीशी नाही’, आई चहाचा कप रोहनसमोर ठेवून रोहनला सुनावत होती. रोहनने आईकडे खिन्नपणे बघितलं. 

‘रोहन तुला बरं वाटत नाही का? अरे बोल रे, काही तरी, हो-नाही.’
‘काही नाही झालं.’ रोहनने तुटकपणे उत्तर दिलं.
‘काही नाही झालं तर गेल्या काही दिवसांत असा अबोल का झाला आहेस, नेहमीप्रमाणे गप्पा का नाही मारत. ऑफिसमध्ये काही झालं का? आज तीन दिवस झाले ऑफिसला गेला नाहीस म्हणून विचारते.’ रोहन उत्तर न देताच ताडकन उठून निघून गेला.
आईने चहाचा कप उचलून बेसिनमध्ये ठेवला, तेवढय़ातच दाराची बेल वाजली.
‘अरे रोहन, दरवाजा तरी उघड! काही खरं नाही या मुलाचं. काय झालंय देव जाणे.’ म्हणत आईने हातातील कामे ठेवून दरवाजा उघडला.
‘काकी, रोहन घरी आहे?’ वैभवने दारातूनच रोहनच्या आईला विचारलं.
‘बरं झालं बाबा, देवासारखा आलास, बघ तुझ्या मित्राला काय झालंय.’
‘खरं तर मी तुम्हाला विचारायला आलो. आज तीन दिवस तो ऑफिसमध्ये आला नाही. तेसुद्धा आधी न कळवता आणि त्याचा मोबाइलसुद्धा बंद आहे.’ वैभवने हॉलमध्ये येत त्यांना सांगितलं.
‘आताच काही वेळापूर्वी त्याला विचारलं, ऑफिसमध्ये काही झालंय का? तर ताडकन उठून गेला, वैभव ऑफिसमध्ये काही झालं नाही ना?’
‘नाही काकी, काही नाही झालं. काकी, तुम्ही काळजी करू नका. मी बोलतो त्याच्याबरोबर. आहे कुठे तो?’
‘बघ त्याच्या रूममध्ये दरवाजा लावून बसलाय, तू बोल त्याच्याबरोबर.’
’’’’
‘रोहन वेड नाही लागलंय मला एकटा बडबड करायला, गेला पाऊण तास झाला मी तुला काही तरी विचारतो आहे. तुझ्यासारखा बोलघेवडा माणूस अचानक का गप्प? एरवी कमी बोल म्हणून सांगावं लागतं. सगळ्यात मोठं आश्चर्य मोबाइलवेडय़ा माणसाचा फोन बंद. तू जर असाच अबोलच राहणार तर मी निघतो.’ वैभव जवळजवळ रागानेच बोलून रूममधून बाहेर पडण्याच्या बेतात असताना त्याची नजर तिथे असलेल्या एका चिठ्ठीवर आणि सुकलेल्या गुलाबावर गेली. वैभव गर्रकन मागे फिरला आणि हसतच त्याला बोलला, ‘माझीसुद्धा टय़ूब जरा उशिराच पेटली. ही गोष्ट खूप आधी लक्षात यायला पाहिजे होती. हे प्रकरण असं आहे तर..’
‘वैभव, तू समजतोस तसं काही नाही.’ रोहन शांतपणे म्हणाला.
‘त्याशिवाय असा देवदास झालास का? तुझी पारो कोण आहे सांग तर.. आपल्या ऑफिसमधली नाही ना कोणी? शक्यता कमी आहे, तरीसुद्धा आपलं विचारलं.’
‘वैभव, तुझी फालतू बडबड बंद केलीस तर मी तुला सांगेन, पण इथे घरी नको, आपण बाहेर कॅफेमध्ये जाऊया रोहन घराबाहेर पडताना टेबलावरची चिठ्ठी विसरला नाही.
’’’’
कॉफीचा एक घोट घेत रोहनने सांगायला सुरुवात केली, ‘वैभव तुला आठवत असेल, काही महिन्यांपूर्वी ऑफिसच्या प्रोजेक्टनिमित्त जवळजवळ दर विकएन्ड पुणे- मुंबई- पुणे करीत होतो, त्यामुळे काही दिवसांनी ओळखीचे चेहरे झाले जे माझ्यासारखेच पुणे- मुंबई- पुणे करीत असत, त्यातील काही जण माझ्या अजून संपर्कामध्ये आहेत, त्यातलीच ती एक.’
‘त्यात तुझा स्वभाव असा, वेळ घालवण्यासाठी ओळख काढून मनमोकळ्या गप्पा मारतोस आणि मैत्री करतोस. ती मैत्री निभवण्यासाठी जीवाचं रान करतोस.’ रोहनला मध्येच थांबवत वैभव म्हणाला.
‘वैभव, त्या दिवशीसुद्धा नेहमीप्रमाणे सगळी काम करून संध्याकाळी दादर टीटीला आलो. माझ्यासमोरच ते दोघे उभे होते. तिच्याबरोबर असलेली वयस्कर व्यक्ती तिला बसायला सांगून तिकीट काढायला निघून गेली. बसमध्ये ती माझ्या खूप मागे बसलेली. पुढे पुणे स्टेशनला पोहोचलो, मी गाडीतून उतरून रिक्षा बघत होतो, ती मुलगी एका रिक्षाचालकाला डायरीतील पत्ता दाखवून निघून गेली.’
‘आणि अशा रीतीने माझ्या मित्राला देवदास करून ती निघून गेली. कसला वेडा आहेस रे तू! नुसतं बघून प्रेमात पडतात हे मान्य, तुझ्यासारखा मुलगा ज्याच्या मागे मुली फिरतात तो एका मुलीसाठी एवढा तडफडतोय.’ वैभव चेष्टा करण्याच्या मूडमध्ये होता.
‘तू अशीच मधून मधून फालतू बडबड करणार अशील तर मी निघून जातो.’ रोहने चिडूनच वैभवला सुनावलं.
‘बरं बाबा, सॉरी. बोल पुढे काय झालं.’ वैभव शांतपणे म्हणाला. ‘खरं तर मी तिला विसरूनही गेलो असतो, पण तरीसुद्धा ती माझ्या लक्षात राहिली, दिसायला चारचौघींसारखीच होती, पण तिचे डोळे मात्र खूप गहिरे होते, आपण बोलके डोळे म्हणतो ना, अगदी तसे. नंतरच्या एक-दोन ट्रीपमध्ये ती दिसली, पण कधी बोलण्याचा सबंध नाही आला. ज्या दिवशी माझी शेवटची व्हिजिट होती त्याच दिवशी ती बसमध्ये माझ्याकडेला बसलेली. याही वेळेला तिच्या बरोबरच्या व्यक्तीने तिचं तिकीट काढून दिलं. पूर्ण प्रवासात ती हेडफोन लावून पेपर वाचत होती. पुढे लोणावळ्याला गाडी थांबल्यावर ती गाडीतून उतरली नाही.’
‘संधी साधून तू ओळख काढली असशील?’ वैभवने उत्सुकतेने विचारलं.
‘संधी होती खरी, पण आमचं काही बोलणं नाही झालं. खरं तर माझी हिंमत नाही झाली. पुढे स्टेशनला बस थांबली तेव्हा वर असलेली माझी बॅग काढून निघण्याच्या तयारीत होतो. तीसुद्धा बॅग काढतच होती, पण काही केल्या ती बॅग तिच्याने निघत नव्हती, मी तिला विचारलं, ‘बॅग काढून देऊ का?’ ती नजरेनंच हो म्हणाली. मी बॅग काढून दिली आणि ती माझ्याकडे न बघताच निघून गेली.’
‘अरे, मग तुमची ओळख कशी झाली? तुझी ती तर शेवटची व्हिजिट होती ना.’ वैभवने पुन्हा आश्चर्याने विचारलं.
‘निशा सरनाईक’चे डोळे माझ्यासाठी खास होते. ते काही केल्या माझ्या नजरेसमोरून हटत नव्हते. तिला शोधणं माझ्यासाठी खूप गरजेचं होतं.’
‘एक मिनिट तुला तिचं नाव कसं समजलं?’ वैभवने पुन्हा आश्चर्याने विचारलं.
‘मी तिची बॅग काढून दिली तेव्हा त्यावर असलेलं नाव मी वाचलं होतं आणि फेसबुकच्या जमान्यात तिला शोधणं कठीण काम नाही.’ रोहनने खुलासा केला.
‘फेसबुकवर तिला शोधून काढून फ्रेण्ड रिक्वेस्ट पाठवली. त्याचबरोबर ओळख म्हणून मुंबई-पुणे प्रवासाचा उल्लेख केला. काही दिवसांनी तिने माझी फ्रेण्ड रिक्वेस्ट अ‍ॅक्सेप्ट केली. थोडं आश्चर्य वाटलं. जी मुलगी प्रत्यक्ष बोलायला तयार होईल ह्याबद्दल शंका होती, तिने माझी फ्रेण्ड रिक्वेस्ट अ‍ॅक्सेप्ट केली होती. मग आम्ही ऑनलाइन भेटू लागलो. नंतर अगदी ठरवून चॅटिंग करू लागलो; हळूहळू ती मला आवडायला लागली. ‘मला फार वेळ नाही चॅट करायला असं ती मला सुरुवातीला सांगून माझ्याबरोबर तासन् तास चॅटिंग करीत होती. मी पूर्णपणे तिच्या प्रेमात पडलो असं कधी माझ्या मनात येत असे. तिच्याबरोबर चॅटिंग करताना एक-दोन वेळा मी तिचा फोन नंबरसुद्धा मागितला, भेटण्याची इच्छा व्यक्त केली पण ती प्रत्येक वेळेला काही ना काही कारण सांगून टाळत होती.’
‘लग्न नव्हतं ना झालं तिचं?’ वैभवने शंका व्यक्त केली.
‘नाही रे; आता मला तिला प्रत्यक्ष भेटायचं होत. पण तिला ते मान्य नव्हतं. मी तिचा फक्त ऑनलाइन फ्रेण्ड म्हणून तिला मान्य होतो. काही दिवसाने मी भेटण्याचा आणि बोलण्याचा विषय सोडून तिच्याबरोबर चॅटिंग करू लागलो. एक दिवस अचानकच तिने भेटायची इच्छा व्यक्त केली, मी आनंदात होतो, पण हा आनंद फार काळ नाही टिकला.’
‘का? काय झालं?’
‘ज्या दिवशी भेटायचं ठरलं त्या दिवशी वेळेच्या आधी मी ह्याच कॅफेमध्ये तिची वाट बघत होतो. ती आली, लांबूनच मला बघितल्यावर हसली, माझ्या मनाची चलबिचल अधिक वाढली. काय गप्पागोष्टी करायच्या या विचारात होतो. ती माझ्या टेबलाजवळ आल्यावर मी तिला बसायला सांगितलं, पण ती डोळ्यानेच नाही म्हणाली. मला खूप आश्चर्य वाटलं. ती काही न बोलता तिच्या पर्समधली ही चिठ्ठी आणि गुलाब देऊन निघून गेली.’
‘अरे पण तू थांबवलं का नाहीस?’
‘अरे काय घडतंय हे समजायच्या आत ती निघून गेली.’
‘तिनेच तर तुला भेटायला बोलावलं होतं आणि ती अशी कशी निघून गेली, तेही काही न बोलता!’
‘मला ही तुझ्यासारखे हे प्रश्न पडले होते, सगळ्या प्रश्नांची उत्तरं या चिठ्ठीत आहेत.’ रोहनने हे सांगून त्याला ती चिठ्ठी वाचायला दिली.
वैभवने उत्सुकतेने चिठ्ठी उघडली आणि वाचायला सुरुवात केली.
प्रिय रोहन,
सगळ्यात आधी मी तुझी माफी मागते, मी तुला दुखावलं. मी तुला इथे भेटायला बोलावून न बोलता निघून का गेले, निघून जायचं होतं मग मी भेटायला का आले, असे असंख्य प्रश्न ह्य़ा क्षणाला तुझ्या मनात निर्माण झाले असतील. खरं समजल्यावर तुला धक्का बसेल ह्य़ाची कल्पना आहे, पण सत्य मी फार काळ लपवून ठेवू शकत नाही. चॅटिंग करत असताना तुझ्या काही प्रश्नांची उत्तरं द्यायला मी टाळत होते, मी माझं तिकीट स्वत: लाइनमध्ये राहून का काढत नाही, माझे आजोबा कंडक्टरकाकांना काय सांगून जातात? कंडक्टरकाकांनी मला कॉफी का आणून दिली? तू बॅग काढून दिल्यावर मी तुझ्याशी का बोलले नाही? ह्य़ा सगळ्या प्रश्नांचं उत्तर एकच आहे, ‘मी सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणे बोलू शकत नाही.’ तू विचार करशील बोलू शकत नाही तर मी ऐकू कसं शकते?
एमबीएच्या शेवटच्या वर्षांचा शेवटचा पेपर देऊन मी माझ्या टू व्हीलरने घरी येत होते. परीक्षा संपली म्हणून आनंदात होते. गाडी चालवताना गाणी ऐकत होते. मागून येणाऱ्या डम्परकडे माझं लक्ष नव्हतं. काही कळायच्या आत माझा अपघात झाला. थोडक्यात बचावले. पण आवाज कायमचा गेला.
जेव्हा तू फ्रेण्ड रिक्वेस्ट पाठवलीस तेव्हाच खरं तर मी अ‍ॅक्सेप्ट करणार नव्हते, पण ऑनलाइन चॅटिंग करायला काय हरकत आहे हा विचार करून मी तुझी फ्रेण्ड रिक्वेस्ट अ‍ॅक्सेप्ट केली. पण हळूहळू मी ठरवलेल्या वेळेपेक्षा नकळतपणे जास्त चॅटिंग करत होते. मलाही वाटत होतं मी तुझ्यात गुंतत चालले आहे. पण जेव्हा तू मला फोन नंबर विचारायचास आणि भेटायची इच्छा व्यक्त करत होतास तेव्हा वास्तवाची जाणीव मला व्हायची. मग वाटायचं ह्य़ा नाटय़ाचा शेवट काय असेल? तू मला असं स्वीकारशील का? तुझे मित्र तुला बोलघेवडा म्हणतात. अशा व्यक्तीला अबोल मुलगी चालेल का? कुठे तरी हे थांबवणं गरजेचं होतं. म्हणून मी भेटून चिठ्ठी दिली. अपेक्षा आहे तू मला माफ करशील.
तुझी अबोल मैत्रीण
– निशा
वैभवबरोबर मनमोकळेपणाने बोलल्यावर रोहनची मनाची बैचेनी जरा कमी झाली. निशाबद्दल सत्य समजल्यावर बसलेल्या धक्क्यातून तो आता सावरला आणि ह्य़ा नात्यावर घरी येऊन पुन्हा एकदा विचार करत बसला.
‘गेल्या काही महिन्यांत निशाबरोबर असलेल्या मैत्रीचं प्रेमात रूपांतर झालेलं मी बघत होतो. आजकाल ऑनलाइन प्रेम करून लग्न करणं ही फार मोठी गोष्ट नाही, पण माझ्याबाबतीत ही गोष्ट वेगळी का आहे? ती जर सर्वसामान्य मुलीसारखी असती तर मी तिला प्रपोजसुद्धा केलं असतं. तिच्यात काही तरी कमी आहे म्हणून माझ्या मनाची अशी घालमेल होतेय का? पण प्रत्येकाच्यात काही ना काही कमी असतं. निशामध्ये कधी भरून न येणारी एक बाजू आहे ती माझ्यासाठी इतकी त्रासदायक आहे का? आहे त्या परिस्थितीचा स्वीकार करून तिला कायमचं आपलसं करण्याची ताकद माझ्या प्रेमात आहे का? फक्त प्रेम करून जगणं सहज सोप्पं होईल का? ऑनलाइन प्रेम करून सत्य समोर आल्यावर माघार घेणारे, फसवणारे किती तरी असतात, त्यापैकी मी आहे का?
निशाने तिला बोलता येत नाही हे उशिरा सांगून आपली फसवणूक केली असं वैभवला आधी वाटलं, पण नंतर त्याच्या लक्षात आलं की खरं तर तिने मला फसवलं नाही. मैत्रीचा हात मी आधी पुढे केला होता, मैत्रीच्या पुढचं पाऊल पडतंय ह्य़ाची जाणीव तिला झाली तेव्हा तिने मला भेटून ही चिठ्ठी दिली, त्या वेळी तिने थांबायला हवं होतं असं मलाही वाटतं पण त्याबद्दल मी तिला दोष देणार नाही.
खरं सांगायचं तर तिच्याबरोबर लग्न करण्याची माझी तयारी आहे. एका व्यक्तीच्या सहवासात काही क्षण असणे आणि आयुष्यभरासाठी साथ देणे ह्य़ामध्ये फार फरक असतो ह्य़ाची मला पूर्ण जाणीव आहे. आयुष्य हे खाचखळग्यांनी भरलेलं असतं, कधी काय होईल हे कोणालाही सांगता येत नाही हेही खरं. चालता चालता खड्डय़ात पडणं आणि स्वत: जाऊन खड्डय़ात उडी मारणं ह्य़ात फार फरक आहे. माझ्यासाठी खड्डय़ात कसं पडलो हे महत्त्वाचं नाही तर त्यामधून सुखरूप बाहेर येणं जास्त महत्त्वाचं.
निशाने तिचा निर्णय सांगितला. आता मला माझा निर्णय तिला सांगायचा आहे. लग्नाबद्दलचा निर्णय ऐकून तिला आंनद होईल. मी असा निर्णय का घेतला हे तिला पटण्यापेक्षा माझ्यावर तिचा विश्वास असणं हे जास्त महत्त्वाचं. ती सर्वसामान्य मुलीप्रमाणे आहे आणि आमचं नातंसुद्धा सर्वसामान्य जोडीदारासारखंच असणार आहे हा विश्वास एकमेकांना देणं महत्त्वाचं.
आता मी निशाला माझा निर्णय लवकरात लवकर सांगणार आहे. अबोल असलं तरी प्रेम तर आहे…
दीप्ती वारंगे – response.lokprabha@expressindia.com

Ashish patil shared experience of those who perform lavni and dance in women's clothes sometimes being raped
स्त्री पात्र निभावणाऱ्या पुरुषांना वेगळ्या नजरेने पाहिलं जातं; ‘लावणीकिंग’ आशिष पाटीलने सांगितला अनुभव, म्हणाला, “काहीजणांवर बलात्कार…”
farmer suicide, documentry farmer suicide
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: अचंबित करणाऱ्या गोष्टी…
What do you do when someone is choking in front of you
तुमच्यासमोर श्वास गुदमरल्याने एखादी व्यक्ती तडफडत असेल तर तुम्ही काय कराल? डॉक्टरांनी सांगितले हे महत्वाचे उपाय
priya bapat says she will not do fairness cream endorsement
“मी लोकांना का म्हणू की तुम्ही गोरे व्हा,” फेअरनेस क्रीमबद्दल प्रिया बापटचं स्पष्ट मत; शरीरयष्टीबाबत म्हणाली….