‘‘च्याऽऽऽ हॉन्कऽ च्याऽऽ हॉन्कऽ च्याऽ हॉन्क.’’

महामंडळाची लाल बस करकचून ब्रेकली. बराकीतलं सामान उडय़ा मारत खाली आलं. ब्यागा लुडकून खाली बसलेल्या प्रवाशांच्या डोक्यावर येऊन बसल्या. कंडक्टरच्या मागच्या सीटवरील डुलक्या घेत असलेल्या जाडय़ा-भरडय़ाचं डोकं समोरच्या दांडय़ावर आदळलं. काही सेकंदात त्याच्या कपाळावर एक टेंगूळ उगवलं. ड्रायव्हरच्या मागच्या रांगेतील पाचव्या क्रमांकाच्या सीटवरील आजीच्या हातातल्या पिशवीतून बेसावध लाल मिरच्या खाली धबधबल्या, त्या थेट चार क्रमांकाच्या सीटवर कडेला ऐसपैस बसून घोरणाऱ्या पस्तिशीच्या चरणाशी जाऊन विसावल्या. त्यांचा ठसका तिच्या नाकपुडय़ांना सहन झाला नाही. जोरदार शिंकेची तुतारी वाजली. खिडकीला पेपर वाचत बसलेला पंचावन्न ते साठमधला चष्मा आधीच ढासळला होता, तो या शिंकेच्या निनादामुळे परत ढासळला. दरम्यान, दोहोंच्या मध्ये अंग चोरून बसलेली तिची आठ-नऊ वर्षांची बालिका सीटखाली घसरली. चष्म्याने तिला दोन्ही हातांनी धरून उठवून परत दोघांच्या मध्ये बसविली.
सर्वात मागच्या संपूर्ण लांबीच्या सीटवर बरोबर मध्यभागी अस्ताव्यस्त बसलेला, काळपट वर्णाचा लालभडक शर्ट ब्रेक लागताक्षणी, कुणी तरी उचलून ढकलल्यासारखा, पुढे वाकून, भराभरा चालत जाऊन ड्रायव्हरमागच्या पार्टिशनला धडकून खाली पडला. वळून पाय पसरून तिथेच टेकून बसला. सीटवर त्याच्या बाजूला बसला असलेला एक गुटख्याचा तोबरा समोरील सीटचा आधार मिळाल्याने वाचला, पण लाल शर्टची अवस्था पाहून तोंड इवलंसं उघडून मान वर करून ‘खर्र.खर्र’ असा आवाज काढून हसू लागला. लाल शर्टच्या उजव्या हाताचा शेजारी काळाठिक्कर गेंडा मात्र त्याच्याकडे लालबुंद नजरेनं बघू लागला. हे लक्षात आल्यावर तोबऱ्यानं गुळणी गिळली आणि विरुद्ध दिशेला खिडकीबाहेर पाहू लागला.
दरम्यान, लालभडकची सर्कस पाहून कंडक्टरमागच्या पाचव्या सीटवर अलीकडे बसलेल्या सुंदर जीन्स-टॉप बाविशीला खुदकनवालं हसू आवरता आलं नाही. लाल शर्टचं तिच्याकडं लक्ष जाताच हाताचा तोंडाशी चाळा करत तिनं ते हसू न लांबविण्याचा महत्प्रयास केला, पण लाल शर्टनं आता नजर रोखून धरली होती. तिच्या मागेच बसलेल्या तिच्या स्किनटाइट पंजाबी ड्रेसनं तिला खुणावलं आणि त्याच्याकडे दुर्लक्ष करण्याबद्दल सुचवणारे भाव दर्शविले. पण त्याची ती घुसणारी नजर तिला अस्वस्थ करू लागली. जणू त्या भयवर्धक नजरेतून आता शरीराची चाळण करणाऱ्या मशीनगनच्या गोळ्या बरसू लागल्या. लाल शर्ट उठला व तिच्या रोखानं चालू लागला. बसमध्ये एक तणावपूर्ण शांतता पसरली. पुढच्या वरच्या दांडय़ावर स्लोली पण स्ट्राँगली मूठ जमवत तोंडात धरलेली काडी कानात घालत त्यानं तोंडाचं शौचालय खुलं केलं.
‘‘० ** ०*..’’
‘‘लय हासू फुटायलयं! आजून हासवू का?’’
जीन्स खिडकीबाहेर पाहू लागली. बिडी, तंबाखूचा उग्र दर्प तिला जाणवला. कुणीच रिअ‍ॅक्ट करत नाही म्हणून त्याच्या आगाऊपणाला बळ मिळत होतं. या वेळी तिच्या चेहऱ्यापर्यंत त्यानं तोंड नेलेलं. हळू पण क्रूर आवाजात तो बोलला,

stealing liquor, liquor Kalyan,
कल्याण : महागड्या मद्याच्या बाटल्यांवर चोरट्यांचा डल्ला, माल चोरून ढाब्यांना विक्री
Concerned about the security of Indians in Iranian custody
जहाजावरील कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय चिंतेत; इराणच्या ताब्यातील भारतीयांच्या सुरक्षेची चिंता
Sensex Nifty gains higher as a result of mineral oil prices
तेलाच्या भडक्याने ‘सेन्सेक्स-निफ्टी’च्या दौडीला पाचर
istanbul fire
इस्तंबूलच्या नाईटक्लबमध्ये भीषण आग, २९ जणांचा होरपळून मृत्यू!

‘‘तुलाच बोलतो मी टवळे.’’
‘‘प्लीज, आप माफ कर दो मुझे. गलती हो गई. इस तरह से हसना नही चाहिये था मुझे.’’ ती अजीजीनं म्हणाली. विंडो सीटला बसलेल्या म्हाताऱ्या पटक्यानं तिच्या समर्थनार्थ सामंजस्याची भूमिका घेणारा चेहरा केला. सौम्य का असेना आपल्याविरोधात जनमत एकवटतंय हे त्याच्या लक्षात आलं. तत्काळ त्यानं सूर बदलला. ताडकन ताठ होत सर्व बसला उद्देशून दोन्हीकडे मान फिरवत तो भाष्य करू लागला.
‘‘परप्रांतीय! या बाहेरच्या पोरटय़ांनी इथं येऊन आपली पोरं बिघडावली.’’
आता हा अनपेक्षित मारा होता. काही तरी सामंजस्याची वाट वगैरे काढण्याचा प्रयत्न करू पाहणारे दोन-चार स्वयंभू समजूतदार पुन्हा आपापल्या कोशात गेले. बराच वेळ वळून पाहणारा चष्मा पुन्हा सरळ होऊन वर्तमानपत्रात रमला.

‘‘मामा, जरा चेपा तिकडं. जागा होवून्द्या जराशीक मला. म्याडमचं हासनं काडतो जरा. (आवाज वाढवीत) मराठी मानसावर हासनं म्हंजी काय ते दावतो.’’
तो तिला खेटून बसू लागला. ती जागेवरून उठली आणि वरच्या हँडलला धरून उभी राहिली. लाल शर्टनं आजूबाजूला पाहिलं. सगळेच भ्याड आहेत याची पुन्हा एकदा खात्री झाल्यावर तो उठला आणि तिच्याशी लगट करू लागला. तिनं त्रासदायक मुद्रा करून प्लीज म्हणून पाहिलं.
‘‘आता हास की! का! मजा यीना का!’’ लाल शर्टची हिंमत आता जास्तच वाढली. कंडक्टरच्या बाजूला बसलेला गोरागोमटा, सडपातळ तरुण त्याच्या कानाशी कुजबुजला,
‘‘आप प्लीज ड्रायवर से कहके गाडी को किसी नजदिकी पोलीस स्टेशन मी ले जाईये ना.’’
‘‘नाही भैया, इससे लफडा और बढ जाएगा. अगले स्टॉप पर इन सबको मै उतरणे को कहनेवाला हूं’’
‘‘ऐसे बीच रास्ते आप इनको उतारेंगे तो लडकी पर तो शामत आ जायेगी.’’ घाबरत त्यानं संभाव्य धोका वर्तविला.
‘‘भैया, एक बात मुझे डोके मे नै आई. तुम उसके साथ आये और धोका पत्करणे को मेरे को बोलते क्या?’’ कंडक्टरनं व्यवहारी शहाणपणा दाखवला.
एव्हाना लाल शर्टची जीन्सचा हात पिरगळण्यापर्यंत मजल गेली.
‘‘आतीश, कहाँ हो तुम? शी इज गेटिंग हटेड.’’ पंजाबी ड्रेस करवादून ओरडला.
मोठय़ा डोळ्यांचा गेंडा फिस्कारलेल्या नजरेने तिच्याकडे पाहू लागला. लाल शर्टनही तिच्याकडे मोहरा वळविला.
‘‘परप्रांतीयांची टोळीच हाय म्हणा की इथं!’’ अंदाज घेणारी नजर फिरवत तो म्हणाला.
‘‘मी मराठीच मुलगीय! माझी मैत्रीणय ती. प्लीज सोडा तिला.’’
भीतीयुक्त संतापात तिनं मदतीखातर अवतीभवती नजर फिरवली. सिनेमा पाहायला आलेल्या प्रेक्षकांच्या नजराच तिला आढळल्या.
‘‘बघा हेच्या नादानं आपल्या पोरीबी किती बिघडल्या! कापडं बघा हिचे. वरून काय झालं की तुमी आमालाच धरनार!’’ लाल शर्टनं लॉजिक दिलं.
धीर एकवटत आतीश त्यांच्याजवळ आला.
‘‘चलो नेहा, यही उतरते है.’’ लाल शर्टकडं चेहरा वळवून, ‘‘सॉरी सर, हमारी वजह से आपको तक..’’ अचानक आतीश ढकलला गेला.
‘‘हमारे दादा को सॉरी बोलताय! इंग्लिस झाड्ताय!’’ बारा-तेरा वर्षांचा बुटका फावडा पोरटा आता यात सामील झाला. गेंडय़ाने त्याला मोहिमेवर पाठवले असावे.
उंच आतीशकडे नव्वद अंशात मान पाठीकडे झुकवून फावडा त्याच्यावर दादागिरी करू लागला.
‘‘०, चार फटके दे साल्याला! त्याबिगर मस्ती नाही उतरत ०ची’’ इति गेंडा.
आता स्फुरण चढले होते. अडीच गुंड विरुद्ध त्यांच्या वीसपट तथाकथित सज्जन यांच्या लढाईत कसल्याही प्रतिकाराविना अल्पसंख्य गुंडांची सरशी होत होती. गॅगवेमधल्या उभ्या सपोर्ट रॉडला एका हाताने धरून उडय़ा मारत त्या अल्पवयीन गुंडाने आतीशच्या गालावर गेंडय़ाच्या आदेशाची मोहर उमटवायला सुरू केली.
आता बसमधले वातावरण असह्य़ तणावाने भारू लागले. पीडित आणि कंटक यांच्याशिवाय प्रत्येक जण कोशात गेला होता. काहींनी मनातल्या मनात त्या गुंडांशी दोन हात करून पोरींवरती इम्प्रेशन मारलं होतं. काहींनी आतीशला नेभळट ठरवून त्याच्या ब्रेकपचं भविष्यही वर्तवलं. तोबऱ्याला वाटलं, शासनानं प्रत्येक महिलेला बंदुकीचं लायसन्स द्यायला पाहिजेल. कंडक्टरला वाटलं, प्रत्येक गाडीला एक पोलीस दिला पायजे. किंवा पोलीसलाच कंडक्टरचा जॉब दिला पायजे. नको नको, कंडक्टरलाच पोलिसाची पावर दिली पायजे.
पेपरवाले काका पेपरमध्ये बलात्काराची बातमी शोधू लागले. त्यांच्या बाजूला बसलेल्या बालिकेला मात्र हा सर्व प्रकार पाहून रडायला येऊ लागले.
‘‘अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करावं बेटा..’’ काका तिला थापटत धीर (?) देऊ लागले.
डबडबलेल्या डोळ्यांनी पण सात्त्विक संतापानं तिनं त्यांच्याकडं पाहिलं आणि अर्धवट झोपेत असणाऱ्या आपल्या आईस रडतच हलवून उठवू लागली.
‘‘गप गं उगं! मागं बघू नको.’’ एवढं दटावून ती माता पुन्हा झोपेच्या अधीन झाली.

सिंगल बेल वाजली. जीन्सच्या बाजूचा पटकेवाला उठून गेला. एक म्हातारी अखंड बडबड करत वर चढली. तिच्यामागोमाग एक तिशीतली सावळी हातातली नायलॉनची पिशवी सावरत आली. बहुधा मायलेकी असाव्यात.
‘‘माय, ही पिशवी धर. मी तिकटं काडते.’’
म्हातारी पिशवी घेऊन मागं जागेच्या शोधात निघाली. एव्हाना तिशीदेखील ‘तिकटं’ घेऊन तिला सामील झाली.
‘‘हिथं हाय जागा, ये.’’
जीन्सला खेटून बसलेला लाल शर्ट त्याच्या मांडीकडं इशारा करत बोलला.
‘‘तुज्या माईला आन् तुज्या भनीला बशीव तिथं, घुबडा!’’
या अनपेक्षित धक्क्यानं लाल शर्टचे डोळे विस्फारले.
‘‘आँ! ऽऽऽ तिच्या ० ०**’’ तो अचकट-विचकट बोलू लागला. त्याच्या सीटच्या मागं जात असणाऱ्या तिशीचा त्यानं हात पकडला.
‘‘जाऊ दी रं दादा, तुला भनीवानी हाय ती.’’ अनुभवी म्हातारीनं प्रसंगाचं गांभीर्य ओळखलं.
‘‘तू गप बस म्हातारे! काय सौन्स्कार केल्यात पोरीवर.’’ दुसरा हात नाचवीत लाल शर्ट तत्त्वज्ञान सांगू लागला.
‘‘हात सोड कुत्र्या..’’ तिशी गरजली.
‘‘नाय तर.?’’ लाल शर्टचा रिप्लाय.
‘‘मह्य़ाइतकी वायट कोनच न्हाय.’’ तिशीची धमकी.
तो छद्मी हसला. विजेच्या वेगानं तिनं हाताला हिसका दिला.
‘‘माय ती पिशवी आन इकडं’’ तिशीचा आदेश.
तिनं पिशवीत हात घातला. प्रेशर कुकरच्या मुठीवर आपली मूठ दाबली. झाकण सैलावलं. गृहिणीच्या शिताफीनं तिनं झाकण बाहेर काढलं.
‘‘फनाक्.. खनाक्.. ढपाक्.. ठाण्..’’
स्तब्ध.. कॉन्सन्ट्रेट.
आधीच अर्धवट उभा असलेला लाल शर्ट कोलमडला. मान, डोकं, खांदा, जबडा.. नेम न धरता केलेली फायरिंग सर्व अवयवांचा ठाव घेऊन गेली होती. दोन्ही सीटच्या मध्ये पडलेला लाल शर्ट उठायची केविलवाणी धडपड करू लागला. मानेवर लाल रेष उमटली. त्यावरून लालबुंद ओघळ डोक्याकडून घरंगळला आणि शर्टच्या रंगाशी म्याचिंग करू लागला. तिशी दुर्गा, चंडी, काली.. तिघींचेही रोल निभावत होती.
‘‘खट्..’’
गुडघ्याच्या वाटीवर कुकरची शिट्टी रुतली. तीही प्रचंड वेगात. त्याच्या अंगातल्या सगळ्या भागातून शिट्टय़ा वाजू लागल्या. कानातून कुकरचा धूर बाहेर पडू लागला.
‘‘आऽऽऽऽयाऽऽऽयॉऽऽय..’’
मायनं तिचा हात धरला नाही तर दुसऱ्या वाटीचंही खोबरं झालं असतं.
‘‘तू सरक. इंचू ठेचल्यावानी ठेचीन ह्या भडव्याला!’’ तिच्या अंगात अंबाबाई संचारली होती. लाल शर्टला तिच्या हातात कुकरच्या झाकणाऐवजी त्रिशूळ दिसू लागलं.
अक्षरश: रांगत, दुडक्या चालीनं, लाल शर्ट दाराजवळ गेला. अधूनमधून मागचा सिनेमा पाहण्यासाठी ड्रायवर गाडी हळू हाकत होताच. ही संधी साधून दार उघडून चालत्या गाडीतून उतरून लाल्यानं पळ नव्हे लंगड काढला.
आता गेंडा उठला. पण तिशीचा आवेशच एवढा भयंकर होता की, हात जोडतच, सरकत सरकत त्यानंहीोालत्या गाडीतून उडी मारली. गडबडीत विरुद्ध दिशेला उतरल्यामुळे लांब धडपडत जाऊन त्याला माती खावी लागली.
‘‘ताई, तुला भीती नाही वाटली?’’ पंजाबी ड्रेसनं वातावरण निवळल्यावर पृच्छा केली.
‘‘भीती कुणाची? ह्य भुरटय़ांची? हट्! अगं एवडे भारी गुंडे असते तर पांढऱ्या गाडय़ा नि बंदुका घिवून फिरले असते. हां, पन आपन आसच गुमान रायलो तर हेच सडकछाप पुढं जाऊन गँगस्टार नायतर पुडारी होत्यात. आपनच गं त्ये, ह्य़ेन्ला बळ देतो.’’ तिशी पंचविशीला खरी दुनियादारी सांगत होती.
‘‘आता असला चेचलाय की सोताच्या बायकूकडं बघायला बी धा येळा इचार करल.’’
बारक्या फावडय़ाला मात्र पळता आलं नाही. तो तसाच थरथरत उभा होता. एकंदरीत तिशीच्या आवेशपूर्ण युद्धाने आणि वक्तव्याने वातावरणातला ताण निवळून चैतन्य निर्माण झालं होतं.
अचानक बालिका उठली आणि तिशीच्या जवळ आली.
‘‘ताई, मला ते झाकण दे ना.’’ तिच्या बोलण्यात आणि बॉडी लँग्वेजमध्ये दम होता. अभावितपणे तिशीनं तिच्या हाती ते शस्त्र सोपवलं. ती हळूहळू मनात ठासून भरलेला ज्वालामुखी चेहऱ्यावर उफाळत बारक्याच्या दिशेने जाऊ लागली. बारक्या लटालटा कापू लागला. दोन्ही हातांनी तोंड लपवून बसला. बालिका तिच्या आईच्या सीटजवळ आली आणि अनपेक्षितपणे वळली.
‘‘खाट्..’’
तिच्या चेहऱ्यावर कार्यपूर्तीचं समाधान दिसत होतं. तिच्या आईचा एवढा मोठा ‘आ’ वासलेला होता.
बाजूच्या काकाचा चष्मा फुटला होता. पेपर फाटला होता. खांदा चोळतच काका उठले. लगबगीनं दरवाजापाशी गेले. स्वत:च सिंगल बेल मारली, आणि दार उघडून पळून गेले.
अभिजीत भूमकर – response.lokprabha@expressindia.com