‘‘वैदेहीऽ आजच्या खरेदीची लिस्ट आधीच तयार करून घे. उगाच धांदल नको मार्केटला गेल्यावर, नाही तर ऐनवेळी गबाळेपणा करून काही ना काही विसरशील.’’ नवरेपणाच्या नेहमीच्याच सूचना करत अविनाश वैदेहीला म्हणाला.
‘‘होऽ केली. देण्याघेण्याची अहेराची यादी आहे.’’ लग्न झाल्यापासून अशा सूचनांची सवय झालेली वैदेही अविनाशला शांतपणे उत्तर देत बोलली.
‘‘अहो एक सांगायचंच राहिलं, आज संध्याकाळी ऑफिस आटोपून परस्परच संकेतसोबत येणारे अर्पिता,’’
‘‘काय ही आजची पिढी! लग्नानंतर सोबतच राहायचंय म्हणा संकेतला.. बरं, तू आटप लवकर. मला चारची मीटिंग आहे. तुला घरी सोडूनच निघेन मी आणि हं! विहीणबाईंना म्हणावं आमच्या स्टेटस्ला शोभेल असाच थाटामाटात विवाहसोहळा करा..!’’
‘‘होऽ हो, सांगते चला.’’
– मुलीची आई आहे ती! काहीच उणीव ठेवणार नाही. –
नुकताच कुठे मार्च सुरू झालाय आणि केवढा हा उकाडा! त्यात नेमकी संकेतच्या विवाहाची गडबड.. सर्वाच्या ऑफिसवेळा ध्यानात घेऊन आणि सरपोतदारांचं स्टेटस् सांभाळत खरेदी करणं म्हणजे माझी अगदी तारेवरची कसरतच.. हुश्श..! म्हणत वैदेही सोफ्यावर डोळे मिटून टेकली.
अर्पिताही कशी दुधात साखर विरघळावी तशी मिसळून गेलीय कुटुंबात. खूपच मोहक आणि लाघवी पोर आहे. तिचं सून म्हणून येणं वैदेहीला खूपच उल्हसित करत होतं. इतकी वर्षे मनातल्या ‘तिच्या’साठीचा तो रिकामा कोपरा आता भरणार होता. तिच्या पदरवानं आणि मधुर सहवासानं आजवर घरात नसलेला कन्यानाद वैदेहीच्या कानात आसुसून रेंगाळत होता. यानिमित्ताने का होईना मुलीची सारी हौस ती पूर्ण करू बघत होती.
अर्पिता सुनेच्या रूपानं आता माझ्या मुलीची जागा घेईल. नव्हे माझी स्वत:ची मुलगी म्हणूनच ती या वास्तूत वावरेल. ‘किती ही ओढ स्त्रीला स्त्रीत्वाची!’ पण मग स्वत:चा अंश असणाऱ्या तिला वारंवार का नाकारलं आपण? वैषम्याची एक थंड लहर वैदेहीला भूतकाळात घेऊन गेली.
तिच्या नजरेसमोर अठ्ठावीस वर्षांपूर्वीची नुकतंच अठरावं पूर्ण केलेली सोज्वळ सौंदर्याची कोवळी वैदेही उभी राहिली. मोठय़ांच्या प्रश्नाला खाली मान घालून उत्तरात हो म्हणणारी.. लग्न जमेपर्यंत कॉलेजात जायचं ही मध्यमवर्गीय पालकांची तिच्यासाठीची लक्ष्मणरेषा कायम मनात कोरलेली.
कॉलेजात, अवती-भवती स्वप्नांची सुरेख फुलपाखरं भविष्याच्या अनेक संधी घेऊन भिरभिरत होती. पण ती हाती येणार नाहीत म्हणून त्यांना फक्त इतरांच्या खांद्यावर बसताना ती दुरूनच न्याहाळी आणि उमलत्या तारुण्याच्या स्वप्नांना तिथेच आळा घाली.
त्याचवेळी वैदेहीसाठी ओळखीतून चालत आलेलं इंजिनीअर अविनाश सरपोतदारचं, स्वत:चा कारखाना आणि एकुलता एक असलेल्या वराचं स्थळ कुणालाच नाकारता आलं नाही. व्यवहाराच्या बोलण्याची जबाबदारी मोठय़ा माणसांनी अगदी चोखपणे बजावली इंजिनीअर जावई माहेरच्यांना आणि सौंदर्यवती सून सासरच्यांना गमवायची नव्हती..
एक दिवस कॉलेजातून घरी परतल्यावर चप्पल काढताना दारातूनच आईबाबांचा संवाद वैदेहीच्या कानावर पडला. ती थबकली. ‘‘अहो तुम्ही सालंकृत कन्यादान कबूल केलंत पण झेपेल नं आपल्याला? ती मोठी माणसं आहेत. कमी-जास्त झालं तर पोरीच्या जिवाला घोर व्हायचा’’
‘‘झेपेल गं! मुलगा चांगला आहे. शिवाय लोकही श्रीमंत सुशिक्षित आहेत आणि आपल्याला मुलगी. ते कर्तव्यच आहे आपलं. तिचंही आयुष्य उजळेल बघ. अन् आपणही मोठय़ा जबाबदारीतून सुखासुखी मुक्त होऊ. आपला यश अद्याप लहान आहे. तू काळजी करू नको. घरी थोडंफार सोनं आहे. मी पी.एफ.वर लोन घेईन. तू लाग लग्नाच्या तयारीला.’’
आईबाबांचा तो केविलवाणा सूर एकून वैदेहीला विनाकारण अपराधीपणाची बोच जाणवली. तिच्या मनात एकीकडे भविष्याचे सुखाश्रू सनई वाजवत होते, तर दुसरीकडे आपल्या सुखासाठी जन्मदात्यांची चाललेली होलपटही बघू देत नव्हते.
अशी कशी ही जनरीत, मायबापानं कर्जबाजारी होऊन हसऱ्या चेहऱ्यानं पोटच्या गोळय़ाचं कन्यादान करायचं. कुणाची तरी प्रतिष्ठा जपायची आणि मुलीनं एकदा का तो उंबरठा ओलांडला की सासर-माहेरच्या इभ्रतीसाठी स्वत:ला संयमाची शिवण घालायची. वैदेहीच्या डोक्यात विचारांनी थैमान घातलं होतं. तिचं कोवळं मन मात्र मनोमन प्रार्थना करत होतं, देवा सारं निर्विघ्न पार पडू दे, माझ्या माहेरची शान राहू दे..
‘‘काकूऽ वैदेही आहे का?’’
‘‘हो ऽ ये ना, ती तिकडे तांदूळ निवडत बसलीय बंगळीवर, ए वैदूऽ ही निशा आली बघ.’’
जिवाभावाची बालमैत्रीण निशा जरा धुसफुसूनच वैदेहीला म्हणाली ‘‘वैदू दोन-तीन दिवसांपासून का येत नाहीएस कॉलेजला? आणि काय गं! आजकाल स्वत:तच गुंग असतेस. त्या आता आलेल्या अविनाशनं एवढी भुरळ घातली का? की तू बालमैत्रिणीला विसरावं?’’ असं म्हणत निशा वैदेहीला चिडवू लागली. ‘‘तसं नाही गं निशू, आज अविनाश येणारे होते. त्यांनी ऑफ घेतला होता आणि लग्नाची तारीखही जवळ आलीय. आईला जरा मदत करत होते. अन् तसेही आता माझ्या अभ्यासाचं काय?’’ वैदू खिन्नतेनं बोलली ‘‘म्हणजे? अगं लग्न झाल्यावर शिकायचं नाही असं थोडंच आहे? सुशिक्षित लोकं आहेत ती, शिकवतीलच तुला.’’ तिला थांबवत वैदेही म्हणाली, ‘‘बरं ते जाऊ दे. रुखवताचं काय करायचं..’’ मग दोघींच्याही गप्पांना बंगळीचा झोका ताल देऊन हिंदकळू लागला. वैदेहीला मनोमन पटलं की स्वत:हून हे स्थळ चालून आल्यामुळे बाबांची पायपीट वाचली. त्यांच्या शिरावरचं ओझं कमी झालं. सरपोतदारांनी आपल्यासारख्या सामान्य मुलीला
स्वीकारणं म्हणजे नातेवाईक म्हणतात तसं पोरीनं नशीबच काढलं!..
रेशमी वस्त्रांच्या सुगंधी झिरमिळीत, हृदयातील गोड कंपनं वाढवणाऱ्या मंगलाष्टकांच्या स्वरातल्या बोहल्यावर, हिरव्याकंच शालूतल्या वैदेहीच्या सालंकृत लावण्याकडे अविनाश अनिमिष नेत्रानं बघत होता. तिलाही ते जाणवलं तिनं मोहरून एक कटाक्ष त्याच्याकडे टाकला आणि मग भटजींच्या ‘एकमेकांना हार घाला’ म्हणेपर्यंत नजर वर उचललीच नाही तिची. लग्न पार पडेपर्यंत वैदेहीचं सारखं, त्यांच्याकडे हे दिलं का? ते दिलं का? सासुबाईंना देण्याच्या वस्तू पॅक आहेत नं?.. नातेवाईक तर थट्टेनं तिला म्हणत, ‘‘अगं बाई आतापासूनच मिरवतेय बघा सरपोतदारीण! ती लाजत हसून दाद देई, पण मनात माहेरची शान..’’
नातेवाईकांच्या मानापानाच्या थोडय़ाफार कुरबुरी सोडल्या तर लग्न निर्विघ्नच पार पडलं होतं. उंबरठय़ावरचं माप ओलांडून वैदेही गाडी, बंगला, नोकर-चाकर यात लवकरच रमली. अविनाशच्या प्रेमानं वैदेहीला आभाळच ठेंगणं झालं. महाबळेश्वरला घालवलेल्या मधुचंद्राच्या दिवसांची पाखरं तिच्या मनात अजुनही रुंजी घालत होती..
लवकरच गोड बातमीची लक्षणं दिसताच सासुबाईंनी ओळखीच्या डॉक्टरांकडे वैदेहीला नेलं. प्राथमिक तपासणीचा रिझल्ट पॉझिटिव्हच होता. आपल्या प्रेमाचं बीज रुजलं या गोड स्वप्नात वैदेही हरवून गेली, ‘आईऽ आईऽ करत छुमछुमणारी पावलं तिच्या मनात नाचू लागली. तिला बाहेर बसवून सासुबाई डॉक्टरांशी आत काही तरी बोलत होत्या. थोडय़ा वेळानं बाहेर येऊन वैदेहीला म्हणाल्या, ‘‘चल, तिसऱ्या महिन्यात सोनोग्राफी करू म्हणाल्या मॅडम.’’ सासुबाईंचा स्वर का कोण जाणे तिला अस्वस्थ करून गेला. पण ही ‘गुडन्यूज’ कधी अविनाशला सांगते अन् त्या आनंदात कधी चिंब भिजते असं झालं तिला.
अविनाश आल्याबरोबर ती बेडरूममध्ये पळाली. पण तो हॉलमध्येच आईशी काही तरी गंभीरपणे बोलत होता. वैदेही दिसताच तो तिकडे वळला. रूममध्ये आपल्यावर त्याने तिला नुसतंच ‘‘काँग्रेट्स’’ म्हटलं. अविनाशचा हा कोरडेपणा तिला खटकला. ‘‘का? तुम्हाला आनंद नाही झाला का बाळाच्या आगमनाचा?’’ ‘‘झाला गं, पण हे बघ मला पहिला मुलगाच हवा.’’ ‘‘अहो पण ते आपल्या हातात आहे का?’’ ‘‘हो, आहेच आपल्या हातातच आहे सारं, कळलं? चल, डोन्ट टेक टेन्शन वैदही बी प्रॅक्टिकल!’’ अविनाश गंभीर होत म्हणाला.
बी प्रॅक्टिकल म्हणजे? आजचा हा अविनाश वैदेहीला कुणी वेगळाच भासला. सरपोतदारांच्या बंगल्यातला एकटेपणाचा भाव तळपायापासून मस्तकापर्यंत सर्रकन वीज चमकवून गेला. मी कोण आहे? सरपोतदार की फक्त वैदेही?
सोनोग्राफीत स्त्रीभ्रूण निघालं म्हणून आई आणि अविनाश दोघेही वैदेहीला अ‍ॅबॉर्शनसाठी तयार करत होते. ‘‘वैदू, आजवर मी तुझ्या माहेरी किंवा तुलासुद्धा काही मागितलंय का? पण आज मागतोय मला पहिला मुलगाच हवा! माझी एवढी इच्छा तुला पूर्ण करावीच लागेल..’’ वैदेहीचा एकाकी विरोध दुबळेपणाच्या कातडीखाली कायमचा ओठ मिटून गप्प झाला.
ती शुद्धीत आली तेव्हा तिच्याजवळ तिची आई बसली होती. नव्या रोपाला आलेली पहिलीच कळी अशी खुडली गेल्यानं वैदेही हमसून-हमसून रडत होती. ‘‘अगं, रडतेस कशाला, होईल परत. शांत हो. वाईट वाटून घेऊ नकोस, सगळी प्रेमच करतात हो तुझ्यावर! भरल्या घरातली सून तू, अशी तिन्ही सांजेला रडू नकोस बाळा. शांत हो..’’ आई वैदेहीला कुरवाळत पण मनातली हतबलता लपवत म्हणाली.
बंगल्यात परतल्यावर वैदेहीला अचानक सारंच परकं वाटू लागलं. शिस्तीनं आकारात वाढलेला बगीचा कितीतरी कुंडय़ा आणि त्यातले बोन्साय अगदी माझ्या सारखेच.. घरात अंथरलेला गालीचा, उंची फर्निचर, शोभेच्या महागडय़ा वस्तू तिच्याकडे पाहून जणू हसताहेत अन् आणखी एका शोभेच्या बाहुलीची भर पडल्याचा आनंदही व्यक्त करताहेत. असाच भास झाला, तिला..
यावेळी परत दिवस गेल्यावर तिनं मनावर दगड ठेवत त्याकडे अनाहुतासारखंच बघायचं ठरवलं. वेळ येताच बंगल्यातली लोकं सांगतील तशी ती दवाखान्यातून मोकळी होऊन आली आणि महिनाभराच्या विश्रांतीसाठी माहेरी गेली. वैदेहीचं जग किती झपाटय़ानं बदललं, वरवर समुद्रासारखं शांत पण लाटांची घुसळण तिच्या मनात होत राहिली.
स्वत:च्या शरीरावरही तिचा अधिकार असू नये? तथाकथित स्वप्नांच्या तर कधीच्याच चिंध्या झाल्या होत्या. आता तिच्याप्रति बंगल्याची भाषाही बदलली. सासूबाई तक्रार सुरात मैत्रिणींना म्हणत, ‘‘देण्याघेण्याचं सोडा हो, एक तरी कुलदीपक मिळतो की नाही कोण जाणे?’’ त्याही कुत्सितपणे वैदेहीकडे बघत. अविनाशही शरीरसुखापलीकडे वैदेहीकडे फारसं लक्ष देईनासा झाला. मायबापाच्या कर्जाच्या शृंखला तिच्यातला सोशिकपणा तेवढा वाढवत राहिल्या..
मध्यंतरी निशूचं लग्न झालं तेव्हा वैदेही दवाखान्यातच होती. आज माहेरी आलेली निशू तिला भेटायला आली. सवयीने दोघीही बंगळीवर बसल्या. शांतपणे एकमेकींच्या मनाशी संवाद साधत अश्रू दिसू नयेत याचा त्या अटोकाट प्रयत्न करीत हलकेच टिपत होत्या. दोघींच्याही दु:खाचं मूळ एकच होतं, फक्त पर्णसंभार वेगळा. कुठून सुरुवात करावी? आणि.. नजरानजर झालीच. मग घट्ट मिठीतल्या स्पर्शातून फक्त नि:शब्द दु:ख बोलत होतं. अश्रूंच्या माळा दोघींच्याही पाठीवर ओघळत होत्या. बंगळी आपली करकर थांबवून असहाय्यतेनं दोघींचेही हुंदके ऐकत होती.
वैदेहीला त्याही अवस्थेत आठवले की, माझ्या लग्नाच्या वेळी निशा किती आनंदून गेली होती. तिच्याही मनात सनई वाजत होती. माझ्या वाटेला आलेल्या सुखांना पाहून तिला क्षणक का होईना हेवा वाटला होताच, वैदेही किती सुखी आणि स्वच्छंद जीवन याचा. पण आज? तिच्या लग्नानंतरच्या भेटीने एकमेकींची समदु:खी मनं शब्दरूपी भावनांना दिलासा देण्यापलीकडे काहीच करू शकत नव्हती. वैदेहीच्या कितीतरी पटीने जास्त दु:ख निशाच्या वाटय़ाला आलं होतं. सासरी हुंडय़ासाठी निशाला वारंवार धारेवर धरणं चालू होतं. त्या दु:खाचे कढ फक्त गिळण्यापलीकडे तिच्या हाती काहीच नव्हतं. साऱ्या स्त्रियांच्या वाटय़ाला हेच असेल? या प्रश्नातच वैदेही सासरी परतली..
काही दिवसांतच निशूनं आत्महत्या केल्याच्या बातमीने तर वैदेहीच्या दु:खाला अंतच उरला नाही. एवढी बेधडक हिमतीची निशा या संकटापुढे हार पत्करू शकते यावर तिचा विश्वासच बसेना. कुणी म्हणे हुंडाबळी आहे, कुणी काही..
वैदेहीचं मन तार-तार झालं, ‘‘देवा द्यायचाच असेल तर मुलगाच दे यावेळी, नाही तर यापुढे काहीच नको. मुलींच्या वाटय़ाला जर असा भोगवटाच असेल तर.. एक स्त्रीच स्त्रीत्वाचं खच्चीकरण करतेय. माफ कर मला पण माझी एवढी प्रार्थना ऐक रे, नाही सहन होत आता ही शरीर मनाची कत्तल..’’ ती देवाजवळ काकुळतेनं प्रार्थना करत होती.
आज कधी नव्हे ते अविनाश फाटकातून ‘‘वैदेहीऽऽ वैदेहीऽ वैदूऽऽ अगं राणी कुठंयस तू? ती दिसता मोठय़ा खुशीतच आवेगाने तिला मिठीत घेऊन, अगं हे घे पेढे देवासमोर ठेव. मुलगा होणार आपल्याला.. माझं स्वप्न खरं केलंयस राणी तू! थॅक्यू व्हेरी मच.. वैदू, आजवर तुला काही बोललो असेन तर माफ कर. अगं आपलं राज्य वाढवणारा राजकुमार येतोय गळती लावणारी.. नाही. येसऽऽ आज मी खूप खूश आहे.. आईऽऽऽ’’ गर्भात मुलगा आहे हे कळताच सरडय़ाप्रमाणे रंग बदलणारा अविनाशचा नूर बघून वैदेहीला पुरुषपणाचीच घृणा आली.
एका दमात अविनाश सारं बोलून गेला. डाव कोणी जिंकला याला आता तिच्यालेखी तितकंसं महत्त्व उरलं नव्हतं. वैदेहीच्या शरीरातल्या या अंकुराचा रोपटय़ाच्या दिशेनं प्रवास सुरू झाला. ‘कालाय तस्मै नम:’ म्हणत वैदेहीनं भविष्य स्वीकारलं.. संकेतच्या बोबडय़ा बोलात तिला ब्रह्मांड दिसू लागलं. पण स्त्रीबीजानं आपली कूस एकदा तरी फुलावी या आशेतच..
‘‘आईऽऽ अहो आईऽऽ.’’ आतापर्यंत आपल्या पूर्वायुष्याचा दु:खवेचा डोळय़ात अश्रूच्या रूपात साठवून, आठवून शांतपणे सोफ्यात बसलेली वैदेही भानावर आली.
अर्पिता आणि संकेत आले होते. ‘‘अगं आई घामानं किती चिंब झालीस तू.’’ संकेत एसी ऑन करत वैदेहीला म्हणाला. फक्त ‘आई’ या लेकीच्या गोड शब्दाच्या अपेक्षेने जीवन झिजवणाऱ्या वैदेहीने बसल्या बसल्याच एक कटाक्ष ‘‘अहो आई’’ म्हणणाऱ्या अर्पिताकडे टाकत दीर्घ सुस्कारा सोडला..
वर्षां चोबे response.lokprabha@expressindia.com