News Flash

कथा: पीएच.डी. पदवी’दान’

कुलगुरूंची टर्म संपायला काही महिन्यांचाच अवधी होता. साहजिकच राहिलेले प्रकल्प, कामे पूर्ण करण्यासाठी त्यांची धावपळ चाललेली. या शेवटच्या काळात तरी थोडीफार शांतता लाभावी ही अपेक्षा.

| January 30, 2015 01:13 am

कुलगुरूंची टर्म संपायला काही महिन्यांचाच अवधी होता. साहजिकच राहिलेले प्रकल्प, कामे पूर्ण करण्यासाठी त्यांची धावपळ चाललेली. या शेवटच्या काळात तरी थोडीफार शांतता लाभावी ही अपेक्षा. पण मोर्चे, निवेदन, घेराव नसले तर त्याला विद्यापीठ कसं म्हणायचं? अन् परीक्षा रद्द करण्याची मागणी, कॅरिऑनसाठी आंदोलन, प्रशासनाच्या विरोधात नारेबाजी हे केलं नाही तर त्यांना विद्यार्थी तरी कसं म्हणायचं?

प्रत्येकाची आपापली कार्यकक्षा ठरलेली. त्यानं त्या त्या पद्धतीनं वागायला हवं तसं घडलं नाही तरच चुकल्या चुकल्यासारखं वाटणार! दिवसभराची शांतता म्हणूनच कुलगुरूंना अस्वस्थ करीत होती! आमच्यावर अन्याय झालाय, असं म्हणणारं कुणीही आलं नव्हतं, आमरण उपोषणाचं एकही निवेदन टपालात नव्हतं. भ्रष्टाचाराचा आरोप करणारं एकही पत्र टेबलवर नव्हतं. मोर्चा, घेराव कसलीही सूचना सुरक्षा अधिकाऱ्याकडून आली नव्हती. सारं कसं शांत.
कुलगुरूंनी जाता-जाता काही तरी ‘क्रिएटिव्ह’ करायचं ठरवलं. समोर कोरे कागद घेतले. काही तरी इनोव्हेटिव्ह सुचावं म्हणून सवयीप्रमाणे त्यांनी पेन्सिलीचं मागचं टोक दातांनी चावलं तेवढय़ात चपराशानं चिठ्ठी आणली..
नव्या संकल्पनेचा तिथंच गर्भपात झाला! कुणातरी पीएच.डी. संशोधन विद्यार्थ्यांची चिठ्ठी होती. भेटायला परवानगी मागणारी. ‘किती जण आहेत?’ सवयीप्रमाणे त्यांनी चपराशाला विचारलं.
‘दोघे जण आहेत. एक मुलगा, एक विद्यार्थिनी.’ त्यानं उत्तर दिलं. काळजीचं काही कारण नव्हतं. ‘दे पाठवून दोघांनाही.’ त्यांनी चपराशाला फर्मावलं.
‘मे आय कम इन सर’
‘प्लीज कम इन’
कुलगुरूंनी दोन्ही विद्यार्थ्यांना बसायला सांगितलं. तरीही दोघे उभेच.
‘‘किती वेळ उभे राहणार असे? बसा. काय प्रॉब्लेम आहे- बोला.’’
दोघेही बसले. कुलगुरूंच्या दालनात पहिलीच वेळ. दोघेही एकमेकांकडे बघत राहिले. सुरुवात कुणी करायची त्यांचं त्यांनाच कळेना.
‘‘कमॉन.. बिनदिक्कत बोला. भीती हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू. मुद्दय़ावर या.’’
मुलांनी बरंच ऐकलं होतं कुलगुरूंबद्दल. इथं फक्त कामाशी काम. घोळात घोळ चालत नाही.
‘‘सर, आम्ही पेट पास झालोय. पण पीएच.डी.साठी विषय भेटत नाही.’’
‘‘पीएच.डी.चा विषय म्हणजे रस्त्यात भेटणारा मित्र नाही.’’
कुलगुरू हसले. आता कुलगुरूंना इकडची ‘भाषा’ समजायला लागली होती.
‘‘तुमची फॅकल्टी कोणती?’’
‘‘सोशल सायन्स-’’
‘‘मग प्रॉब्लेम काय आहे? आपल्या अवतीभवती किती तरी समस्या आहेत. इनोव्हेटिव्ह आयडियाजची काही कमी नाही अवतीभवती.’’
आपल्या टेबलवरील कोऱ्या कागदाकडे बघता कुलगुरू म्हणाले, तो कोरा कागद तसाही नावीन्याच्या शोधात पांढऱ्यावर काळे होण्याची वाट बघत होताच!
‘‘हे बघा, मी नेहमीच म्हणत आलोय तुम्ही प्रत्येकानं स्वत:चं काही तरी वेगळेपण सिद्ध केलं पाहिजे. एरवी तेच ते विषय निवडलेले प्रबंध ग्रंथालयाच्या कपाटात धूळ खात पडून राहतात. त्यांचा कुणालाही काहीही उपयोग होत नाही. संशोधनात नावीन्य हवं. ताजेपणा हवा. अगदी तुमच्या खेडय़ापाडय़ात रविवारच्या बाजारात भाजीचा कसा फ्रेश ताजेपणा असतो-तसा!’’
‘‘सर, पण हे असे नवीन ताजे विषय आणायचे कुठून? आम्ही ग्रंथालयात खूप सर्वे केला. पण..’’
मुलगी म्हणाली, कुलगुरू गालातल्या गालात हसले. ‘‘मी तुम्हा दोघांनाही महत्त्व सांगितलं. डोळे, कान उघडे ठेवा. आजूबाजूला बघा. अवतीभवती शोध घ्या. खूप विषय आहेत. तुम्ही गावाकडचे आहात ना? म्हणजे थोडीफार शेतीवाडी असेलच तुमची?’’
‘‘यस सर, गावाकडे आहे थोडी शेती. पण नावापुरतीच. दुष्काळामुळं..’’
‘‘मला कल्पना आहे. निसर्गापुढं कुणाचं काही चालत नाही, पण शेतीच्या अनुभवाचा चांगला फायदा होईल तुम्हाला झालाच तर.’’
‘‘शेतीचा संशोधनाशी काय संबंध आहे सर?’’ शेतकऱ्याच्या मुलाने भाबडेपणानं विचारलं.
‘‘फार जवळचा संबंध आहे.’’ कुलगुरू जिव्हाळय़ानं म्हणाले, ‘‘हे बघा. शेतकरी जमिनीची नीट तपासणी करतो. जमिनीचा कस जोपासतो. कोणत्या जमिनीत कोणतं पीक येईल याचा नीट अंदाज घेतो. मग जमिनीची मशागत करायची. अगदी शिस्तबद्ध पद्धतीनं बियांची पेरणी करायची. नीट खतपाणी द्यायचं. योग्य त्या प्रमाणात, योग्य त्या वेळी, योग्य तिथं हे प्रमाण फार महत्वाचं. यावरच बीजाचं अंकुरणं, बहरणं सारं काही अवलंबून असतं. पीक जोमदार, कसदार घ्यायचं तर मेहनतही तशीच करावी लागते. नांगरणी, फवारणी, कापणी प्रत्येक कामाची वेळ ठरलेली. कुठेही हयगय, कसूर चालणार नाही, खरंय ना?’’
दोघेही विद्यार्थी एकदमच उतरले- ‘‘खरंय सर. अगदी खरंय.’’
‘‘मग संशोधनाचं देखील तसंच आहे. ते तुम्ही रिसर्च मेथॉडॉलॉजी वगैरे जे शिकता ते मुळात हेच असतं. काही फरक नाही या दोन्ही गोष्टीत. पद्धत तीच साधनं वेगळी. साध्य वेगळं एवढंच.’’
‘‘पण मूळ विषय बाजूलाच राहिला. आम्हाला पीएच.डी.साठी विषय.’’
‘‘तुम्ही कालच्या बातम्या ऐकल्या टी.व्ही.वर. बनारस, हिंदू युनिव्हर्सिटीत एक प्राध्यापक केजरीवालला मारलेली थप्पड या विषयावर संशोधन करणार आहेत!’’
‘‘काय म्हणताय सर?’’
दोन्ही विद्यार्थ्यांनी आश्चर्य व्यक्त केलं.
‘‘मी खरं तेच सांगतोय. डोळे कान उघडे ठेवून आजूबाजूला बघा. केजरीवालला एका सामान्य आम आदमीनं मारलेली थप्पड हादेखील संशोधनाचा विषय होऊ शकतो. त्यामागची सामाजिक कारणं, मानसिक, वैचारिक विकृती.. बराच विचार करता येईल. अगदी आर्थिक बाबीसुद्धा..’’
‘‘इथं आर्थिक बाबींचा काय संबंध?’’
‘‘आहे. या थप्पडची किंमत ८५ लाख असल्याचीदेखील बातमी आहे. म्हणजे केजरीवालला थप्पड मारल्यानंतर त्या पार्टीला मिळणाऱ्या उत्स्फूर्त देणग्यांमध्ये चक्क ८५ लाख रुपयांची वाढ झाली आहे. त्याशिवाय बातमीमुळे वेगवेगळ्या चॅनल्सचं जे टीआरपी रेटिंग वाढलं त्याचा हिशेब वेगळा. एकूण काय हा इंटर डिसिप्लिनरी संशोधनाचा विषय आहे. सोशालॉजी, मानसशास्त्र, अर्थशास्त्र, पॉलिटिकल सायन्स सगळ्या विषयांचा एकत्र अभ्यास करावा लागेल. या विषयाच्या मुळाशी जायचं ठरविलं तर. आजकाल अशा इंटर डिसिप्लिनरी संशोधनाचीच गरज आहे. ते जुनेपुराणे, घिसेपिटे विषय खूप झालेत आता.’’
‘‘सर, तुम्हीच सुचवा ना एखादा विषय.. प्लीज.’’
विद्यार्थी काकुळतेने म्हणाला, आता कुलगुरूंनादेखील दया आली.
विद्यापीठातील पीएच.डी.चं संशोधन हा कुलगुरूंसाठीदेखील कळीचा मुद्दा ठरला होता. संशोधनाचा दर्जा, गुणवत्ता घसरत चालल्याची माध्यमांतून जोरदार चर्चा चालली होती. प्रवेश प्रक्रियेतील गोंधळ, कडक नियमांविरुद्ध उठाव, मार्गदर्शकाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह, प्रबंधातली उचलेगिरी, जर्नल्समधल्या पेपर्सची कॉपीपेस्ट प्रकरणं. असे बरेच गोंधळात गोंधळ होते.
पण विद्यार्थ्यांना मदत करणं हे कुलगुरूंचं आद्यकर्तव्यदेखील होतं. विद्यापीठाच्या कायद्यापेक्षा विद्यार्थ्यांच्या फायद्याला महत्त्व देणारे कुलगुरू समोरच्या विद्यार्थ्यांची दयनीय अवस्था बघून पाघळले, विरघळले.
ते विचार करू लागले. नव्या कल्पनेच्या शोधार्थ तोंडातलं पेन्सिलीचं मागचं टोक दातात जोरात चावू लागले. समोर बसलेल्या विद्यार्थ्यांची पर्वा न करता! त्यांना एक भन्नाट कल्पना सुचली.
‘‘मी तुम्हाला एकदम फ्रेश, ताजा विषय सुचवू शकतो.’’ कुलगुरू उत्साहानं म्हणाले-
‘‘अर्थात हा विषय तुमच्या विभाग प्रमुखांना पटेल, रुचेल की नाही कुणास ठाऊक. शिवाय मी काही या विषयातील तज्ज्ञ नाही हेही आधीच सांगून टाकतो. तुम्ही आलात म्हणून सल्ला देण्याचं माझं काम. त्या सल्ल्याचं शेवटी काय करायचं ते तुमचं तुम्हीच ठरवा. तुमच्यापैकी एक जण ‘घेराव’ या विषयावर संशोधन करू शकतो!’’
‘‘घेराव या विषयावर?’’ समोरची विद्यार्थिनी जरा मोठय़ानं ओरडलीच. काहीशा अविश्वासानं.
‘‘होय, घेराव या विषयावर मूलभूत संशोधन होऊ शकतं.’’ कुलगुरू शब्दांवर जोर देत म्हणाले.
‘‘मला नाही वाटत या विषयावर कुणी संशोधन केलं असेल. विचार करा. या आपल्या विद्यापीठाच्या इतिहासात, वेगवेगळ्या कुलगुरूंच्या काळात किती घेराव झाले असतील! वेगवेगळ्या कारणांनी घेराव. वेगवेगळ्या संघटनांचे घेराव. वेगवेगळ्या मंडळींना घेराव. या घेरावाचा इतिहास शोधा. तुम्हाला हे तरी माहिती आहे का? जगातला पहिला घेराव कुणी घातला? कुठे घातला? आपल्या देशात घेराव कधी सुरू झाला? भारतात पहिला घेराव कुणी कुणाला घातला? हा संशोधनाचा छान विषय आहे. या विषयाची व्याप्तीदेखील खूप मोठ्ठी आहे. घेराव हा फक्त विद्यापीठापुरताच मर्यादित नसतो. मंत्रालयात घेराव, जिल्हाधिकाऱ्यांना घेराव, हॉस्पिटलच्या डॉक्टरांचा घेराव, वकिलांचा घेराव. प्रत्येक घेरावामागची मानसिकता वेगळी. राजकीय खेळी वेगळी. त्यामागचं आर्थिक गणित वेगळं. म्हणजे घेराव या एकाच विषयाचा सामाजिक, राजकीय, आर्थिक, मनोवैज्ञानिक अशा कितीतरी अंगांनी विचार करता येईल.’’
कुलगुरू तन्मयतेने पीएच.डी.चा नवा विषय समजावीत होते. समोरचे दोघे विद्यार्थी अवाक्होऊन त्यांच्याकडे बघत होते. आपण इथे येऊन काही चूक तर केली नाही ना या आविर्भावानं!
‘‘पण सर या अशा विचित्र विषयाला रिसर्च कमिटीची मान्यता मिळेल?’’ विद्यार्थ्यांनं मूलभूत शंका बोलून दाखविली.
‘‘का मिळू नये? पीएच.डी.साठी मूलभूत गरज हीच असते. नावीन्य अन् उपयोगिता..’’
नावीन्य ठीकाय, पण उपयोगितेचं काय?’’ विद्यार्थिनीनं प्रश्न केला.
‘‘या संशोधनाचा अनेकांना फायदाच होईल. एक तर ज्यांना घेराव घातला जातो वारंवार, ते हा प्रबंध आवर्जून वाचतील. त्याचा अभ्यास करतील. घेरावामागची मानसिकता, कारणपरंपरा समजली की परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी काय उपाययोजना करता येतील याचा आधीपासून विचार करतील. शिवाय ज्यांना नव्याने घेराव घालायचा आहे त्यांनाही तुमच्या प्रबंधातून मार्गदर्शन मिळू शकेल. एक मात्र खरं इथं कॉपीपेस्टला वाव नाही. कारण आधी यावर कुणीही संशोधन केलेलं नाहीय.
तो पहिला मान तुम्हाला मिळू शकतो.’’
‘‘पण लिटरेचर सर्वे, संदर्भ हे सगळं कुठे कसं शोधायचं सर?’’ पुन्हा विद्यार्थ्यांची शंका.
‘‘त्यासाठी अर्थातच बऱ्यापैकी मेहनत घ्यावी लागेल. हे बघा, संशोधन म्हणजे परिश्रमाला पर्याय नाही. आपला प्रबंध दर्जेदार, एकमेवाद्वितीय व्हावा असं वाटत असेल तर रात्रीचा दिवस करावा लागेल. घेरावासंबंधीच्या वृत्तपत्रांतील बातम्यांचा खोलात जाऊन अभ्यास करावा लागेल. ज्यांना घेराव घातला जातो त्यांच्या, जे घेराव घालण्यात एक्सपर्ट आहेत त्यांच्या मुलाखती घ्याव्या लागतील. त्यासाठी मानसशास्त्रीय अंगानं प्रश्नावली तयार कराव्या लागतील.’’
आता विद्यार्थी थोडा रस घेऊन, एकाग्र चित्तानं ऐकू लागले. विद्यार्थ्यांचे चेहरे सहज वाचणाऱ्या कुलगुरूंनादेखील उत्साह वाटायला लागला. ते वेळेचं भान विसरून गेले.
‘‘पण सर, प्रबंधाचं शीर्षक नुसतं ‘घेराव’ असं कसं म्हणता येईल?’’
‘‘तुमचं हेच चुकतं. प्रत्येक गोष्टीची घाई. विषय महत्त्वाचा की शीर्षक? अभ्यास जास्त महत्त्वाचा. तुम्हाला तर प्रबंध सबमिट करण्याचीच घाई झालेली दिसते. मी आधीच सांगितलं संशोधन हे तुमच्या शेतीसारखंच आहे. पीक यायला वाट बघावी लागते की नाही? शीर्षकाची चिंता नको. ‘‘साठोत्तरी काळातील अमुक-तमुक विद्यापीठातील घेराव-एक चिकित्सक अभ्यास’’ असं काहीसं शीर्षक सहज देता येईल.
हे टिपिकल शीर्षक ऐकून विद्यार्थ्यांचा जीव भांडय़ात पडला. ‘‘पण सर साठोत्तरी असंच का?’’
‘‘ते मलाही माहिती नाही. पण तुमच्या आर्ट्स सोशल सायन्समध्ये तशी पद्धत आहे. लिटरेचरची मुलं एखाद्या लेखकाच्या किंवा विशिष्ट साहित्य प्रकाराचा साठोत्तरी काळाचाच अभ्यास करतात. गेल्या तीन-चार वर्षांत तुम्हा विद्यार्थ्यांच्या प्रबंधाचे रिपोर्ट्स वाचून मलाही बऱ्याच गोष्टी समजायला लागल्या आहेत.’’
‘‘सर, पण गाइडला हे शीर्षक चालेल?’’
‘‘का नाही चालणार? तुमचे गाइड हुशार असतील तर एकाच नव्हे अनेक विद्यार्थ्यांना याच विषयावर मार्गदर्शन करू शकतील.’’
‘‘ते कसं काय सर?’’
‘‘फक्त विद्यापीठाचं नाव बदलायचं.. की झाला नवा प्रबंध तयार, कारण प्रत्येक विद्यापीठाची भौगोलिक, ऐतिहासिक परंपरा वेगळी असते. त्यामुळे घेरावाची कारणं, घेरावांचे प्रकार, घेरावामागचं राजकारण यात वेगळेपण असू शकतं. आपल्याकडे शारीरिक शिक्षण विभागात उदाहरणार्थ- एकाच विषयावर अनेक प्रबंध तयार होतात. अमुक-तमुक जिल्ह्यतील कबड्डी खेळाडूंवर योगाभ्यासाचा होणारा परिणाम. एक चिकित्सक अभ्यास..’’ या शीर्षकात प्रत्येक वेळी जिल्हा बदलत जायचा. मग कबड्डीऐवजी खो-खो, हॉकी, फुटबॉल, क्रिकेट असे खेळ बदलत जायचे. तुम्हाला पम्र्युटेशन कॉम्बिनेशन म्हणजे काय माहिती नसेल. एरवी हे असे बदल केलेत की एकाच शीर्षकातील दोन शब्द बदलून किती प्रबंध तयार होतील याचे गणित तुम्ही सोडवू शकता.
‘‘म्हणजे सर .. या विद्यार्थ्यांने घेराव विषय घेतला तर मी ‘आमरण उपोषण’ हा विषय घेऊ शकते?’’ विद्यार्थिनी उसळून म्हणाली.
‘‘देअर यू आर.. यू ग्रॉट द पॉइंट.. एकदम बरोबर!’’ कुलगुरूंना मनापासून आनंद झाला. आपण एखादी गोष्ट समजावतो. पण ती विद्यार्थ्यांच्या गळी उतरेलच याची शाश्वती नसते. पण समोरच्या विद्यार्थिनीच्या चेहऱ्यावरचा न लपणारा आनंद बघून कुलगुरूंनादेखील आनंदाच्या उकळय़ा फुटल्या.
‘‘मी काय म्हणतोय, ते तुमच्या चांगलंच लक्षात आलेलं दिसतंय. घेरावाप्रमाणेच आमरण उपोषणाचं मूळ शोधावं लागेल. पहिलं उपोषण कुणी केलं. ते किती दिवस चाललं? सर्वात जास्त दिवसाचं ‘आमरण उपोषण’ कुणी केलं? उपोषणामुळे खरंच कुणाला मरण आलं का? आलं नसेल तर त्याला आमरण का म्हणायचं? शिवाय उपोषणाला लागणारा तंबू, बॅनर्सचा खर्च, प्रीपेड न्यूजसाठी करावा लागणारा खर्च या सर्व इकॉनॉमिक फ्रंटचा देखील अभ्यास करावा लागेल.’’
‘‘फक्त अभ्यास नाही सर, चिकित्सक अभ्यास!’’
विद्यार्थिनीने कुलगरूंची चूक सुधारली. कुलगुरूंना मनापासून धन्यता वाटली.
‘‘आणखी एक लक्षात घ्या. मी आधी सांगितल्याप्रमाणं हा विषय नवीन, ताजा तर आहेच.. पण याची व्याप्ती फार मोठी आहे. म्हणजे घेराव म्हणा, आमरण उपोषण म्हणा, हे फक्त विद्यापीठापुरतं, एखाद्या राज्यापुरतं मर्यादित नसतं. ही अखिल भारतीय समस्या आहे. म्हणजे ज्याला नॅशनल पस्र्पेक्टिव्ह म्हणतात, नॅशनल इश्यू ऑफ इम्पॉर्टन्स म्हणतात तसा सर्वव्यापी विषय आहे. राजधानी दिल्लीतले जंतरमंतर किंवा रामलीला मैदानावरील धरणं किंवा आमरण उपोषणं ही देशाचं नव्हे तर आंतरराष्ट्रीय मीडियाचं लक्ष वेधून घेतात. म्हणजे बघा.. तुम्ही पीएच.डी. तर करू शकालच या विषयावर.. पण, नंतर आणखी थोडी मेहनत घेतली तर तुम्हाला डी.एस.सी. पदवीदेखील मिळू शकते!’’
‘‘डी.एस.सी?’’ कुलगुरूंच्या समोरील दोन्ही विद्यार्थी आश्यर्यानं उद्गारले..
‘‘येस.. डॉक्टर ऑफ सायन्स.. किंवा डॉक्टर ऑफ् लिटरेचर.. विद्यापीठाची सर्वोच्च पदवी.. बघा. विचार करा. संकुचित विचाराच्या डबक्यातून बाहेर या.. समुद्रात उडी घ्या..’’ कुलगुरूंचा उत्साह धबधब्यासारखा वाहायला लागला.
तेवढय़ात चपराशी आला. त्यापाठोपाठ सेक्युरिटी ऑफिसर..
‘‘सर, पाच-सहा विद्यार्थ्यांचं डेलिगेशन आपल्याला भेटायचं म्हणतात..’’
‘‘काय विषय आहे?’’ कुलगुरूंनी चौकशी केली.
‘‘तुमच्याशीच चर्चा करायची म्हणतात. परवापासून आमरण उपोषणाला बसायचं म्हणतात.’’ सेक्युरिटी ऑफिसरनं ती माहिती दिली.
समोरचे विद्यार्थी उठून जायला लागले. कुलगुरूंनी त्यांना थांबविलं.
‘‘सर, आमचं काम झालं. थँक्यू व्हेरी मच.’’
‘‘तुमचं काम झालं नाही. तुमचं काम आता सुरू होतंय. इथे बाजूला बसा. विद्यार्थ्यांचं डेलिगेशन येत आहे. आनंदाची बातमी म्हणजे ते परवापासून आमरण उपोषणाला बसायचं म्हणताहेत. अशी संधी पनुहा येणार नाही. तुमच्या संशोधनाचा नारळ फुटण्यासाठी यासारखा चांगला मुहूर्त नाही. जस्ट वेट अ‍ॅण्ड वॉच..’’
कुलगुरूंनी सेक्युरिटी ऑफिसरला विद्यार्थ्यांना आत पाठविण्याची परवानगी दिली.
‘‘त्यांचं बोलणं, वागणं सगळं नीट बघा. नोट्स घ्या. तुमचं पीएच.डी.चं संशोधन आताच सुरू झालं असं समजा..’’
‘‘सर.. संशोधन नाही.. एक चिकित्सक अभ्यास..’’
विद्यार्थिनीनं चूक दुरुस्त केली. तशी कुलगुरूंनी मनमोकळेपणे हसून दाद दिली. पाच-सहाऐवजी पंधरा-वीस जणांचा घोळका कुलगुरूंच्या दालनात घुसला. पीएच.डी. करू इच्छिणारे दोघेही विद्यार्थी नोट्स घ्यायला सरसावले.
पण..
विद्यार्थ्यांच्या नेत्याशी कुलगुरू हळुवारपणे काय बोलले कोण जाणे.. तावातावाने बोलणाऱ्या विद्यार्थ्यांचा पीच एकदम खाली आला. अन् जोरजोरानं घोषणा देत आलेला विद्यार्थ्यांचा जमाव शांतपणे कुलगुरूंशी हस्तांदोलन करून निघून गेला.
पीएच.डी.चं संशोधन करू इच्छिणाऱ्या शेवटच्या दोन विद्यार्थ्यांना निरोप देताना कुलगुरू म्हणाले-
‘‘निराश होऊ नका. संशोधन करायचं तर हळवेपणा चालत नाही. भावनावश होता येत नाही. डोन्ट बी सेन्टी (मेंटल). तुम्ही बघितलं ते तुमच्या प्रबंधाचं परिशिष्ट होतं. त्याला इंग्रजीत अस्र्स्र्ील्ल्िर७ म्हणतात. ते प्रबंधाच्या शेवटी येतं. खरा प्रबंध तुमचा तुम्हालाच लिहायचा आहे हे विसरू नका.. बेस्ट लक् .’’
डॉ. विजय पांढरीपांडे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 30, 2015 1:13 am

Web Title: story 2
टॅग : Story
Next Stories
1 कशासाठी? पोटासाठी! : समतोल आहार
2 ‘ती’चं विश्व : खरंच असतो का ‘डॅडीज डे’?
3 दि. ३० जानेवारी ते ५ फेब्रुवारी २०१५
Just Now!
X