scorecardresearch

गोष्ट : प्रायश्चित्त

‘प्रत्येक माणूस सुखाच्या शोधात आयुष्यभर धावत असतो. पण मनाशी प्रश्न उद्भवतो की, आयुष्यात खरेच सुख गवसते का?’ या विचारात मग्न असताना सायंकाळी सहा वाजता भूपेंद्र ज्येष्ठांच्या नेहमीच्या मित्र…

‘प्रत्येक माणूस सुखाच्या शोधात आयुष्यभर धावत असतो. पण मनाशी प्रश्न उद्भवतो की, आयुष्यात खरेच सुख गवसते का?’ या विचारात मग्न असताना सायंकाळी सहा वाजता भूपेंद्र ज्येष्ठांच्या नेहमीच्या मित्र मंडळात वि.म.वि. मैदानावर पोहोचला. आज तो विचारांच्या गुंत्यात अडकल्याचे चेहऱ्यावरून दिसत होते. ‘भूपेंद्र आज काय बिनसले आहे? विचारात दिसतोस’ दिनकरराव म्हणाले. ‘मधील काळात तुम्ही काही दिवस बाहेरगावी गेल्यामुळे तुम्हाला माहीत नाही. भूपेंद्रची पत्नी सुखदा वहिनींची प्रकृती बिघडली त्यामुळे थोडे ताणतणावात आहेत.’ चांदुकरकरांनी माहिती दिली. 

‘अहो पण, त्यांच्या सुना आणि मुले पत्नी सुखदा आणि भूपेंद्रची वृद्धापकाळी चांगली काळजी घेतात हे त्यांनीच नाही का सांगितले,’ दिनकरराव उत्तरले.
भूपेंद्रचा मधला मुलगा व सून त्याच्या जवळ राहात होते. थोरला मुलगा व सून त्याच घरात माडीवर वेगळे बिऱ्हाड करून राहात होते. मधल्या मुलाची बेडरूम वरील मजल्यावर होती. दोन्ही सुना सकाळी फिरायला जात आणि त्यानंतर मधली सून खाली येऊन घरातील सर्व कामे आटोपून दुपारी वर जायची. सायंकाळी पाच वाजता खाली येऊन सर्व कामे आटोपून रात्री परत बेडरूममध्ये जायची. मधली सून उभयतांची चांगली काळजी घ्यायची म्हणून भूपेंद्र तिला सेकंड मदर म्हणत असे. ही गोष्ट भूपेंद्रने आपल्या मित्र मंडळीला अनेकदा मैदानावर सांगितली होती.
‘भूपेंद्र मधली तुमची सेकंड मदर माहेरी अथवा बाहेरगावी गेल्यास घरातील कामे कशी चालतात? चांदुरकरांनी विचारले. ‘सुखदाची बायपास, ब्रेस्ट कॅन्सरचे ऑपरेशन आणि केमोथेरपी झालेली असून सध्या पॅरलेसिसने ग्रस्त आहे. मधली सून माहेरी अथवा बाहेरगावी जाते तेव्हा थोरली सूनबाई घरातील सर्व कामे करते,’ भूपेंद्र म्हणाला, ‘मग तरीही आता चिंताग्रस्त का?’ दिनकररावांनी मूळ मुद्दय़ाला हात घातला. ‘आजपर्यंत सुखदा स्वत: बाथरूमकरिता कोणाचाही आधार घेतल्याशिवाय जात होती. परंतु आता तिचे स्वत:वरील नियंत्रण गेले आणि समस्यांना खरी सुरुवात झाली.’ भूपेंद्र उत्तरला.
‘सुना करतात असे म्हणता मग कसल्या समस्या? तज्ज्ञ डॉक्टरांना दाखविले नाही काय? लक्ष्मणराव तायडे म्हणाले.
‘डॉ. प्रफुल्ल कडूंचा औषधोपचार चालू आहे, पण अजून हवा तसा सुधार नाही, समस्या म्हणाल तर पावसाळ्याचे दिवस, घरात कोठेही होणारी घाण यामुळे घराचे आरोग्य धोक्यात आहे. दिवसा घाण झाल्यास मुले-सुना साफसफाई करतात पण दुपारी आणि रात्रभर सेवाशुश्रूषेचा ताण अस्मादिकांवर पडतो,’ भूपेंद्र म्हणाला. ‘सूनबाई रात्री थांबत नाहीत काय?’ केशवरावांनी विचारले. ‘प्रथम एक दोन दिवस दोन्ही सूनबाई थांबल्या. पण मीच त्यांना थांबू नका असे सांगितले. जोपर्यंत माझेकडून शुश्रूषा होईल तोपर्यंत करतो. ज्या दिवशी जमणार नाही, त्या दिवसापासून तुम्ही करा असे म्हटले. रोज रात्री दोन-तीनदा कपडे आणि बेडशीट बदलावे लागतात. हे कपडे वॉशिंग मशीनमध्ये टाकावे लागतात. त्यामुळे रात्रीची झोप नीट होत नाही. कधी कधी सुखदाच्या रूमची धुण्यासहित फिनाइल टाकून सफाई करावी लागते. त्यामुळे सकाळचे फिरणे आणि योगा सध्या बंद आहे,’ भूपेंद्र म्हणाला. ‘मुले रात्री खाली थांबत नाही काय?’ केशवरावांनी विचारले. ‘मधल्याने आईच्या जवळ रात्रीचे थांबायला एक वयस्क बाई बघितली आहे. पण मी त्याला सध्या घाई करू नकोस असे सांगितले,’ भूपेंद्र उत्तरला.
‘सकाळचे फिरणे व योगा बंद आहे तर तुमच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होणार नाही काय?’ दिनकररावांनी विचारले.
‘असे तर माझ्या सुना म्हणतात. लेक अपर्णाही म्हणते. शेवटी प्रारब्ध असतेच, माझ्याकडून आई- वडिलांची सेवा घडली नाही. कुटुंबासह महाराष्ट्रभर बदलीवर फिरलो. आईवडील खेडय़ात एकत्र कुटुंब पद्धतीत तीन लहान बंधू आणि सुनांसह राहायचे. त्या सासू-सासऱ्यांचे सर्व काही करायच्या. हा पूर्वकालीन कृषी संस्कृतीचा प्रभावकाळ होता. पण वृद्ध आई-वडिलांची सेवा माझ्याकडून घडली नाही, याचे शल्य मनाशी आहे. म्हणून पत्नीची सेवा या वयात करावी लागते, हे त्या भोगाचे प्रायश्चित्त समजतो,’ भूपेंद्र म्हणाला. ‘पत्नीची सेवा केवळ प्रायश्चित्त म्हणून करता की प्रेमभावही आहे?’ डॉ. वाघमारे म्हणाले. ‘हे भारतीय विवाह तथा कुटुंब व्यवस्थेचे यश आहे. पत्नी म्हणून हयातभर तिची साथ सुखाच्या क्षणात आपण उपभोगतो, मग दु:खांच्या क्षणातही एकमेकांना साथ द्यावयास पाहिजे याची जाणीव मनाला होते. म्हटलं तर प्रेम असतं, कर्तव्य असतं आणि प्रायश्चित्तही असतं,’ भूपेंद्र म्हणाला.
‘वृद्धांमध्ये पाप-पुण्यांची जाणीव जास्त प्रमाणात जागृत असते. कारण आयुष्य भोगून झालं असतं. अशा स्थितीत कर्मफल सिद्धांतानुसार सुखदा वहिनींच्या नशिबी एवढे भोग कां?’ अध्यात्माकडे कल असलेले दिनकरराव म्हणाले.
‘सुखदाचा माझ्याशी विवाह झाला तेव्हा ती १८ वर्षांची आणि मी २३ वर्षांचा होतो. लहान वयात मुले झाली. तिचे विश्व पती आणि मुले एवढेच मर्यादित होते. तिच्या आई-वडिलांचे विवाहानंतर दहा वर्षांनी झालेले ते लाडावलेले प्रथम अपत्य होते. राग सतत तिच्या नाकावर असायचा. विलासी दृष्टिकोन आणि हौशी स्वभाव त्यामुळे प्रत्येक चांगली आणि नवी गोष्ट संसारात हवी असायची. नोकरीतील माझे सीमित उत्पन्न आणि तिच्या आकांक्षा यांचा मेळ कधीही जमला नव्हता. त्यामुळे तणावग्रस्त राहायची. बहुसंख्य वेळा ताणतणाव रात्रीच्या गर्भात विरून जायचे. व्यायामाचा अभाव, तेलकट चमचमीत खाण्याची सवय व अकारण ताण घ्यायची वृत्ती या सर्वाचा एकत्रित परिणाम म्हणजे आरोग्य निरामय राहिले नाही. मी मोठय़ा कुटुंबातील होतो. आम्हा उभयतांकडून घडलेला प्रमाद म्हटला तर आई-वडील किंवा सासू-सासऱ्यांची सेवा घडू शकली नाही. आता त्याला पाप-पुण्यात परिभाषित करायचे असल्यास पाप असे म्हणता येईल,’’ भूपेंद्र म्हणाला.
‘फक्त एवढेच?’ दिनकररावांनी मिश्कीलपणे विचारले.
‘होय एवढेच. असे नसते तर एवढी सेवा करणारे निकटतम हात लाभले असते का?’
भूपेंद्र उत्तरला.
‘होय तेही खरे आहे.’ दिनकरराव म्हणाले.
‘पण अशी सेवा करताना युवा पिढीच्या मनात आदरभाव असतो काय?’ केशवराव म्हणाले, ‘नातू नाकं मुरडतात. पण त्यांची आई जेव्हा समजावून सांगते की, अरे म्हातारपणी आपल्यावर कशी वेळ येईल हे कोणाला तरी माहीत असते काय? त्यावरून सुनांचा स्वच्छ दृष्टिकोन दिसून येतो. आजच्या वृद्धांच्या हालअपेष्टा बघता, माझ्या उत्तरायुष्यातील सेकंड मदर्सचे कौतुक वाटते.’ भूपेंद्र उत्तरला.
‘पण तुमच्या मुलांचे काय? नुकताच फादर्स डे साजरा झाला.’ लक्ष्मणराव म्हणाले.
‘होय, मुलांच्या मनात फारसा आदर नसतो हे खरे आहे. बहुसंख्य वृद्ध केवळ शाब्दिक सन्मानाचे भुकेले असतात. पण सन्मान मिळत नाही, हे आजचे वास्तव आहे. चरित्र संपन्नतेपेक्षा आर्थिक बळाला अत्यंत महत्त्व आले आहे. म्हणून सन्मानविषयक दृष्टिकोनातून वृद्धांनी जास्त आग्रही राहायला नको. मानवाच्या उत्पत्तीपासून प्रत्यक्ष जन्मापर्यंतचे पूर्वकालीन ईश्वरी गुढ विज्ञानाने उलगडल्यामुळे जन्म दिला म्हणून सन्मान ही संकल्पना पार मोडीत निघाली आहे. या मानसिकतेला अनेक सामान्यांतील मी कसा अपवा्रद राहील,’ भूपेंद्र म्हणाला. ‘आजकाल विवाहापेक्षा उच्चशिक्षित आणि आर्थिक संपन्न गटात लिव्ह इन पार्टनरशिपचे फॅड बोकाळले आहे. दोन वर्षांपेक्षा अधिक काळ असे लिव्ह इन असल्यास चेन्नई उच्च न्यायालयाने विवाह समकक्ष मान्यता दिली आहे. हा विवाह संस्थेवर आघात ठरणार आहे,’ दिनकराव म्हणाले.
‘खरे आहे. एकंदरीत समाजजीवन विस्कळीत होत आहे. आणि मानवी समाज परत जंगल संस्कृतीकडे वेगाने वाटचाल करू लागला आहे,’ डॉ. वाघमारे म्हणाले.
‘अलीकडेच जिया खान नावाच्या अभिनेत्रीने आत्महत्या केली. ती लिव्ह इन पद्धतीने सूरज या युवकाबरोबर मागील काही काळापासून राहात होती. हीच कहाणी हरयाणाचे माजी मुख्यमंत्री चाँद आणि फिजा या उच्चशासकीय पदावर विभूषित सौंदर्यसंपन्न वकील युवतीची होती. तिचे प्रेत सडक्या अवस्थेत दोन ते तीन दिवस बंगल्यात पडून होते. अशी अनेक उदाहरणे आहेत. तरीही नवपिढीची पाऊले लिव्ह इनकडे वळत आहेत. कर्मफल सिद्धांतानुसार त्यांचा अनैसर्गिक मृत्यू हा त्याचेचे फळच आहे. म्हणूनच भूपेंद्रची कथा आजच्या परिस्थितीत मार्गदर्शक ठरू शकते.’ दिनकरराव म्हणाले.
‘‘एकंदरीत सामाजिक परिस्थितीचा विचार करता आणि काही अपवाद वगळता, कौटुंबिक हिंसाचार कायदा, वारसा हक्क आणि द्विभार्या प्रतिबंधक कायद्यामुळे विवाह संस्था पुरुषांपेक्षा स्त्रियांचे हित जपणारी आहे, म्हणूनच प्रदीर्घ कालावधीपासून टिकून आहे. नवशिक्षित, आर्थिक संपन्न युवा पिढीने ‘दिल मांगे मोअर’चा मार्ग सोडायला पाहिजे,’ भूपेंद्र म्हणाला.
अंधार गडद होऊ लागल्याने सर्व ज्येष्ठ आपआपल्या घराकडे निघाले. भूपेंद्र घरी पोहोचला. रात्रीचे जेवण आटोपले. साधारणत: नऊच्या सुमारास टेलिफोनची घंटी वाजली. भूपेंद्रने फोन उचलला आणि ‘हॅलो’ म्हटले.
‘मी दिनकर बोलतोय. आज आपली प्रदीर्घ चर्चा झाली. पण पाप, भोग आणि प्रायश्चित्तचा तिढा सुटला की नाही? म्हणून फोन केला.’ हसत मिश्कील स्वभावाचे दिनकरराव म्हणाले. ‘सध्या तरी आईवडिलांची सेवा घडली नसल्याने पाप, पाप घडल्याने नशिबी येणारे भोग आणि भोगातून मुक्ती म्हणून प्रत्यक्ष सेवा मार्गाद्वारे प्रायश्चित्त एवढेच कर्मफल सिद्धांतानुसार म्हणता येईल. म्हणून पापक्षालनाकरिता स्वेच्छा सेवा प्रायश्चित्त घेत आहे. अजून चित्रगुप्ताने माझे पान उघडायचे आहे, उघडल्यावर निश्चित सांगेल. अच्छा, शुभरात्री’ म्हणून भूपेंद्रने फोन बंद केला. त्याच्या कानात रामदासांच्या ‘जगी सर्व सुखी कोण आहे’ या बोधाचे स्वर गुंजन करीत होते.
भास्कर अरबट

मराठीतील सर्व लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-01-2015 at 01:16 IST

संबंधित बातम्या