News Flash

कथा : तिचे मन… त्याचे मन

तो : आज सकाळपासून थोडय़ा थोडय़ा वेळाने मी घडय़ाळात बघतोय. खरं तर काल रात्री ठरवल्यापासूनच कधी एकदाची उद्याची संध्याकाळ होईल आणि मी तिला भेटेन असं

| March 6, 2015 01:16 am

तो : आज सकाळपासून थोडय़ा थोडय़ा वेळाने मी घडय़ाळात बघतोय. खरं तर काल रात्री ठरवल्यापासूनच कधी एकदाची उद्याची संध्याकाळ होईल आणि मी तिला भेटेन असं झालंय. खरं तर गेली तीन-साडेतीन र्वष आम्ही रोज सध्यांकाळी नेहमीच कॉफी शॉपमध्ये भेटतो. कॉलेजमध्ये एकत्र वेळ घालवूनसुद्धा इतरांच्या नकळत रोज काही ना काही निमित्त काढून पुन्हा भेटतो. काही महिन्याने कॉलेज पूर्ण होईल. बीईची शेवटची टर्म कॉलेज कॅम्पसच्या, करिअरच्या दृष्टीने महत्त्वाची आहे तशीच ती माझ्यासाठी जीवनसाथी म्हणून तितकीच महत्त्वाची. कॉलेजमध्ये माझी सहजरीत्या निवड होईल आणि एखाद्या मल्टिनॅशनल कंपनीत जॉब लागेल.
कॉलेजचा पहिला दिवस मला जसाच्या तसा आजही आठवतो. अगदी काल घडल्यासारखा. बघता क्षणी ती मला आवडली. आहेच ती तशी. सुंदर पाणीदार काळे डोळे, उभ्या बांध्याची, मध्यम उंची, खाद्यापर्यंत लांब असलेले काळेभोर मोकळे केस एका हाताने सावरणारी. कॉलेजच्या पहिल्या दिवशी झालेल्या ओळखीचं रूपांतर खास मैत्रीत झालं. मला आता ती जीवनसाथी म्हणून हवी आहे. सगळ्यांचा हेवा करावा अशी बायको असेल माझी. दिसायला सुंदर, अभ्यासात हुशार, इतर कलागुणांमध्येही तेवढीच हुशार. आज तिला मी प्रपोज करायचं ठरवलं आहे. ती मला हो म्हणेल हा विश्वास आहे.
* * *
ती : आज त्याने मला प्रपोज केलं. हा दिवस कधी ना कधी माझ्या आयुष्यात येईल असं तो भेटल्यापासून वाटतच होतं. तो भेटण्याच्या आधी प्रेम आणि लग्न, आयुष्याचा साथीदार या सगळ्या गोष्टींचा विचारसुद्धा मनाला स्पर्श करून गेला नव्हता. सुरुवातीला मीही त्याला फक्त एक चांगला मित्र म्हणून बघितलं, पण हळूहळू तो माझ्यासाठी खास झाला. स्वप्नातला राजकुमार म्हणतात तसाच तो मला वाटू लागला. चारचौघांत उठून दिसावं असं व्यक्तिमत्त्व ग्रुपमध्ये लीडर असल्यासारखा. अधिकार गाजवणारा आणि फक्त माझ्याबरोबर असताना हळुवारपणे बोलणारा. माझी काळजी करणारा त्याच्याबरोबर किती बिनधास्त असते मी.
कॉलेज पूर्ण होताच आई-बाबांना त्याच्याविषयी सगळं सांगायचं. सुरुवातीला त्यांना कदाचित वाईटही वाटेल, पण थोडा हट्ट केला तर तयार होतील, माझी पसंती त्यांना नक्की आवडेल. त्याच्यामध्ये न आवडण्यासारखं असं काही नाहीच आहे. काही दिवसांनी आम्ही दोघंही स्वत:च्या पायांवर उभे राहू. आणखी काय पाहिजे? खूप खूप चांगला आहे तो.
* * *
तो : तिने होकार दिल्यापासून माझ्यासाठी स्वर्ग दोन बोटांच्या अंतरावर आहे. सोन्याहून पिवळं म्हणजे आज एका मल्टिनॅशनल कंपनीत माझं सिलेक्शन झालंय. तिचंही सिलेक्शन व्हावं असं वाटतं.
* * *
ती : आज माझं एका मल्टिनॅशनल कंपनीत सिलेक्शन झालं. हीच गोष्ट त्याला समजली तेव्हा तोही खूप खूश होता. आज सेलिब्रेट करायचं म्हणून एका रेस्टॉरंटमध्ये गेलो. सगळं कसं स्वप्नात घडतंय असं वाटत होतं, पण जेव्हा मी त्याला माझ्या जॉब प्रोफाइलबद्दल संपूर्ण माहिती दिली तेव्हा थोडा बेचैन झाल्यासारखा वाटला. खरंच त्याच्या मनात काही खोट नसेल ना? का? माझ्या मनाचा खेळ आहे.
* * *
तो : खरं तर मला मनापासून वाटत होतं सिलेक्शन व्हावं, तिचं सिलेक्शन झालं तेव्हा मीही खूश होतो, पण तिच्या जॉब प्रोफाइलबद्दल माहिती ऐकल्यावर मन थोडं कटू का व्हावं. ती आहेच हुशार, तरी पण..
* * *
ती : कालचा दिवस माझ्या आयुष्यातला काळा दिवस होता. काल आमचा रिझल्ट लागला त्या क्षणापासून तो भेटला नाही ना फोन ना एसएमएसला उत्तर. जे घडलं ते आम्हा दोघांनाही अनपेक्षित होतं.
* * *
तो: माझ्या बाबतीत असं काही होईल असा मी विचारसुद्धा केला नव्हता. लोकांना बोलायला काय जातं. सहा महिन्यांनी सगळं ठीक होईल. रिझल्ट लागल्यापासून आयुष्य थांबल्यासारखं झालं आहे.
* * *
ती : सगळी स्वप्नं धुळीस मिळाली. आई- बाबांना सध्या तरी त्याच्याबद्दल न सांगण्याचा निर्णय घेतला आहे. काल रिझल्ट लागल्यानंतर पंधरा दिवसांनी प्रथम भेटलो. पहिल्यासारखा माझ्याबरोबर मनमोकळेपणाने बोलत नाही. विचारलेल्या प्रश्नांची फक्त उत्तर देतो. त्याच्या डोक्यात काय चालू आहे हे समजणं कठीण झालं आहे. कदाचित त्याच्या मनातील रिझल्टबद्दलची निराशा कमी झाली की सगळं व्यवस्थित होईल.
* * *
तो : रिझल्ट लागल्यापासून तिला भेटायची तिळमात्र इच्छा नव्हती. पण नाईलाज म्हणून तिला भेटावं लागलं. तिला टाळणं खूप कठीण जातंय. तीही इतरांप्रमाणे समजावत होती, सहा महिन्यांनंतर सगळं व्यवस्थित होईल. मला म्हणत होती, ‘‘आहे मी तुझ्याबरोबर, विश्वास ठेव.’’ पण ती खरंच माझ्याबरोबर आहे? माझ्यासाठी तरी ती केव्हाच पुढे निघून गेली आहे.
* * *
ती : आज माझा नोकरीचा पहिला दिवस होता, खूप दिवसांनंतर एक चांगला दिवस माझ्या आयुष्यात आला. स्वप्न होतं माझं एका मल्टिनॅशनल कंपनीत नोकरी करण्याचं. आज ते पूर्ण होताना खूप आनंद होतो. माझ्या या पहिल्या दिवसाबद्दल त्याला सांगायला मी खूप एक्सायटेड आहे.
* * *
तो : काल तिला मला भेटायची खूप इच्छा होती म्हणून भेटलो. तिच्या नोकरीचा पहिला दिवस तिचा बॉस, कलीग या सगळ्या गोष्टी मनाविरुद्ध ऐकाव्या लागल्या. का कुणास ठाऊक, आजकाल मी फक्त शरीराने तिच्याबरोबर असतो.
* * *
ती : रिझल्ट लागून दोन महिने झाले. तो स्वत:हून भेटण्यासाठी मला फोन किंवा रटर करत नाही. सुरुवातीला वाटलं रिझल्टमुळे असेल कदाचित. पण आता तर माझ्यावर कारण नसताना चिडचिड करतो.
* * *
तो : काल इच्छा नसताना पुन्हा एकदा भेटलो. तिच्या कामाचं पुराण ऐकावं लागलं, त्यात माझ्या अभ्यासावर नजर ठेऊनच आहे. या सगळ्या गोष्टी मला चिडवण्यासाठी, कमी लेखण्यासाठी सांगत असते असंच मला वाटतं.
* * *
ती : आजकाल आमच्या दोघांमध्ये खटकेच उडायला लागले. काल जवळ जवळ ओरडून माझ्याशी बोलला. म्हणे, ‘‘तुझं ऑफिस पुराण तुझ्याजवळ ठेव.’’ अरे हे काय बोलणं झालं. आतापर्यंत प्रत्येक गोष्ट आम्ही शेअर केली. अगदी सकाळी उठल्यावर चहाबरोबर कुठल्या कंपनीचं बिस्कीट खाल्लं इथपासून ते रात्री घरी झोपताना कुठल्या कंपनीचं गुड नाइट वापरतात इथपर्यंत. दोघांच्या करिअरसबंधी चर्चा त्याच्याबरोबर नाही करणार तर कोणाबरोबर करणार.
* * *
तो : काल ती चिडून, रागावून निघून गेली; गेली तर गेली. मला पण रागच आलेला तिचा. अभ्यास, नोकरी यावर न संपणारं पुराण चालूच असतं. अरे ती माझी गर्ल फ्रेंड आहे. कोणी टीचर नाही. मला माझ्या अभ्यासाची नोकरीची करिअरची काळजी आहे.
* * *
ती : आज पंधरा दिवस झाले आम्ही दोघं एकमेकांना भेटलो नाही. माझी भेटायची खूप इच्छा आहे. पण मी का फोन करू? त्याने करावा, चूक त्याची आहे.
* * *
तो : मी फोन करण्याचा प्रश्नच येत नाही. खरं काय ते तिला सांगितलं, रागाच्या भरात ओरडलो असेन, पण राग आल्यावर कोणीही चिडणार, ओरडणार. तिने फोन केला तर मी सॉरी म्हणेन, पण स्वत:हून फोन करणार नाही.
* * *
ती : महिन्याभरानंतर आम्ही भेटलो. न राहून मीच फोन केला आणि भेटलो. तो सॉरी बोलला. पण माझ्यालेखी त्याला काही अर्थ नाही. पुढच्या आठवडय़ात त्याचा बर्थडे आहे. मी त्याच्यासाठी खूप मस्त प्लान केलं आहे. आम्हा दोघांचाही मूड चांगला होण्यासाठी तर हे खूप गरजेचं आहे.
* * *
तो: वाढदिवसाचा सगळा मूड तिच्यामुळे गेला. आधीच माझा मूड नव्हता. त्यात तिने भर घातली. खरं तर गेल्याच वाढदिवसाला मी स्वप्न बघितलं होतं, येणाऱ्या पुढच्या वाढदिवसाला आपलं कॉलेज पूर्ण होऊन आपण नोकरी नक्की करत असू. वाढदिवस मस्त साजरा करायचा, लक्षात राहील असा, एखाद्या फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये कँडल लाइट डिनर. तेही तिच्याबरोबर. आताही लक्षात राहण्यासारखा झाला, पण खूप वेगळ्या दृष्टीतून. माझा हेतू तिला दुखावण्याचा नव्हता. पण न राहून बोलावं लागलं.
* * *
ती : वाढदिवस चांगलाच लक्षात राहिला. त्याच्याही आणि माझ्यासुद्धा; करायला गेले एक आणि झालं एक. तो असा का वागतोय हे समजणं कठीण आहे. त्याच्यासाठी फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये कँडल लाइट डिनर अ‍ॅरेंज केलं होतं. हे सांगितलं तेव्हाच त्याच्या कपाळावर आठय़ा आल्या पण मी हट्ट केला म्हणून माझ्या बरोबर आला. खूप दिवसांनंतर खूप वेळ घालवला. गप्पाही छान मारल्या. कॉलेजच्या दिवसाची आठवण झाली, पण शेवटी जे व्हायचं तेच झालं. बिल देण्याच्या वेळी चिडला माझ्यावर मी पार्टी दिली म्हणून. मी बिल दिलं तर बिघडलं कुठे? त्याच्या शेवटच्या वाक्याचा काय अर्थ काढयचा, ‘मी तुझ्यासाठी फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये कँडल लाइट डिनर अ‍ॅरेंज करू शकत नाही म्हणून तू माझ्यासाठी केलंस, माहीत आहे तू नोकरी करतेस दाखवायची गरज नाही.
* * *
तो : मी तिच्याबरोबर असं का वागतो आहे हे मला खरंच माहीत नाही. खरतर ती मला अजूनही आवडते. कॉलेजच्या दिवसात आवडायची तशीच, पण ज्या दिवशी तिचं पॅकेज माझ्यापेक्षा जास्त आहे हे समजलं तेव्हापासून माझंच काहीतरी बिनसलंय.
ाोो
ती : वाढदिवस प्रकरणानंतर त्याला भेटायची मला मुळीच इच्छा नाही. याआधी जेवढय़ांदा भेटलो तेव्हा बहुतेक वेळा त्याने बिल दिलं फार क्वचित मी बिल दिलं. पण या बिलावरून आधी कधी चिडलो नाही. ‘मी नोकरी करते म्हणून मी दिलं,’ हा त्याचा गैरसमज कसा दूर करू.
* * *
तो : माझं स्वप्न मी पूर्ण करावं, ते दुसरं कुणी पूर्ण केलं हे मी सहन करू शकत नाही. ती मला आवडते, पण तिची माझ्यापेक्षा पुढे असलेली प्रगती, तिचं यश मला आवडत नाही. मी सहन करू शकत नाही. तरीसुद्धा या वेळी मी स्वत: फोन करून भेटणार आहे.
* * *
ती : पुढच्या वीकेंडला ऑफिसमध्ये एक सेमिनार आणि त्यानंतर एक डिनर आहे. त्याला मला भेटायचं आहे. गेल्या चार महिन्यांत पहिल्यांदाच तो स्वत: फोन करून भेटू या म्हणाला. पण मला सेमिनारची तयारी करायची आहे. पण पुढच्या वीकेंडला भेटणार आहोत. मी खूश आहे त्याने स्वत:हून फोन केला.
* * *
तो : खरंच तिचा सेमिनार होता का? ती मला भेटण्याचं टाळत होती. मला भेटण्यासाठी वेळ नाही म्हणून सांगितलं मग दुसऱ्या कोणाबरोबर गाडीतून का बर फिरावं तेही रात्री. मी तिला बघितलं. सुरुवातीला विस्वासच नाही बसला पण तीच होती. माझी नजर कधी दगा देणार नाही.
* * *
ती : या वीकेंडला मी त्याला भेटले. माझ्या सेमिनारबद्दल त्याला सांगायला खूप एक्सायटेड होते. पण तिथे गेल्यावर जे काही घडलं त्यावर माझा विश्वासच नाही बसत. आतापर्यंत प्रत्येक चुकीकडे मी काणाडोळा केला. अनपेक्षितपणे त्याला आलेलं अपयश, त्यामळे आलेलं नैराश्य यामुळे तो असा वागत असेल असंच समजत होते. पण आता तर हद्द झाली, त्याने माझ्यावर अविश्वास दाखवावा. त्या दिवशी सेमिनार आणि नंतर डिनर या सगळ्याला उशीर झाला म्हणून माझ्या कलीगने मला घरी सोडलं. तर हा म्हणत होता ‘जर घरी सोडायचं होतं तर मला फोन करून बोलवायचं. मी आलो असतो.’ फक्त मला घरी सोडण्यासाठी त्याला बोलवण्यात काय अर्थ आहे? माझ्यावर अधिकार गाजवलेला मला आवडत नाही. त्याची परीक्षा होईपर्यंत मी नाही भेटणार. त्याने जरा शांत डोकं ठेवून विचार करावा. आजकाल आमचं नातं खूप विचित्र वळणावर गेलंय असंच वाटतं मला.
* * *
तो : माझ्या मनात जे येतं ते मी बोलतो. परीक्षा होईपर्यंत आम्ही भेटणार नाही असं तिने ठरवलं आहे. ती म्हणते, ‘डोकं शांत ठेवून विचार कर’ मला वाटतंय की तेच तर मी करतोय. ती माझ्यापेक्षा हुशार आहे. तिच्याकडे नोकरी आहे. दिसायलाही सुंदर आहे. ती माझ्यापेक्षा खूप पुढे निघून गेली आहे. मी तिच्या लेखी काहीच नाही. ती कधीही माझा हात सोडून जाऊ शकते.
ती : आज त्याची परीक्षा झाली म्हणून दीड महिन्यानंतर ठरल्याप्रमाणे भेटलो. तो माझ्याशी विचित्र वागूनसुद्धा त्याला भेटले. या वेळेलाही संशयाचं भूत त्याच्यातून डोकावून बघत होतं. महिनाभर काय काय केलं ह्याचे सगळे तपशील विचारले त्यानं. हे मी आता सहन करू शकत नाही. नोकरीबद्दल आता विचार करायला सांगितलं तरी चिडला माझ्यावर.
* * *
तो : नोकरीबद्दल विचार करायला सांगत होती म्हणून मला राग आला. माझ्याबद्दल काळजी वाटते का ‘नोकरी नसणाऱ्या मुलाबरोबर येण्यास लाज वाटते तुला’ असं विचारलं तर कुठे बिघडलं.
* * *
ती : आई आता माझ्या लग्नाचं बघतेय. काय सांगू मी तिला, माझं एका मुलावर प्रेम आहे. जर तिने विचारलं मुलगा काय करतो? किती शिकलाय? कुठे नोकरी करतो? या सगळ्याची उत्तरं माझ्याकडे नाहीयेत. गेल्या सहा महिन्यांत मी नोकरीबद्दल कधी त्याला विचारलं नाही, पण या वेळेला विचारलं कारण फक्त प्रेमावर अवलंबून कसं चालेल? नोकरी नसलेल्या मुलाच्या हातात माझे आई-बाबा माझा हात कसा देतील?
* * *
तो : आज पुन्हा एकदा काळाने माझ्यावर आघात केला. मी या वेळेलाही पास नाही झालो. आता ती मला भेटणं खूप अवघड आहे. ती मला खूप आवडते. खूप प्रेम करतो मी तिच्यावर. पण आमच्यामध्ये निर्माण झालेली दरी कमी होण्यापेक्षा वाढत चाललीये.
* * *
ती : आज खूप विचार करून मी त्याला नकार दिला, यापुढे आपल्यामध्ये कुठल्याही प्रकारचं नातं असू शकत नाही हे स्पष्टपणे सांगितलं. हे सांगताना मला खूप यातना होत होत्या. कॉलेजच्या चार वर्षांमधला तो आणि गेल्या साताठ महिन्यांतला तो यात खूप फरक पडलाय. खरंतर मी त्याला चार र्वष ओळखते, पण त्याला मी खरंच ओळखत होते. तर मग त्याच्यामध्ये एवढा बदल का जाणवतोय? का तेव्हाची परिस्थिती आणि आताची परिस्थिती यामध्ये फरक आहे? का परिस्थिती बदलली म्हणून तो बदलला? तो भविष्यात पास होईल, नोकरी करेल हे सगळं खरं असलं तरी त्याच्या डोक्यातलं संशयाचं भूत.. त्याच्यावर काय इलाज आहे? मी त्याच्यापेक्षा जास्त पगाराची नोकरी करते हेही त्याला सहन झालं नाही म्हणूनच तर तो पहिल्यांदा माझा पगार ऐकून बेचैन झाला. मुळातच असलेला स्वभाव बदलणं कठीण आहे. ज्या नात्यात विश्वास नाही ते टिकवणं खूप कठीण आहे.
दीप्ती वारंगे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 6, 2015 1:16 am

Web Title: story 5
टॅग : Story
Next Stories
1 दि. ६ ते १२ मार्च २०१५
2 आयटम डान्सचा मराठी तडका
3 आंतरराष्ट्रीय मराठी सिनेमा ‘परतू’
Just Now!
X