lp48शाळेतली घंटा ऐकून बापयानं हातातला झाडू बाजूला ठेवला. समोर रांगेत उभी राहणारी मुलं पाहून त्यालाही त्यांचा हेवा वाटला, पण पोरटय़ा बापया केस पिकून पांढरे झाल्यामुळे आणि पाठीचा कणा वाकल्यामुळे माणूस झाला होता.

बापयाचा जन्म नक्की माहीत नाही, पण कदाचित तो सत्तरच्या घरातला असावा आणि नोंदणीतली तारीख म्हटली तर बापया कागदावरचं अक्षर वाचण्याइतपत मोठा झालाच नव्हता. अनाडी, अनपढ, पण तरी शहाणा बापया आपला एक हात खंगलेल्या गुडघ्यावर ठेवत दुसऱ्या हाताने धरणीमातेचा आधार घेत कण्हत उठून उभा राहिला. उठताना आता आपोआपच आईच्या नावाचा जयघोष होत होता, इतका खंगला होता तो बापया. रांगेत उभ्या राहिलेल्या स्वच्छ गणवेशातल्या मुलांनी एका सुरात ‘जन-गण-मन..’चा सूर आळवला. बापयाही शक्य तितका ताठ उभा राहिला. मंदिरात देवाच्या दर्शनाला आल्याप्रमाणे त्यानं आपली चप्पल बाजूला काढून ठेवली. राष्ट्रगीत म्हणताना बापयाच्या तोंडावरचं तेज आणि अंगात संचारणारा उत्साह यांची बेरीज केली तर देवही बापयाच्या म्हातारपणाबद्दल विचार करील एवढं होतं.
अंगानं खंगलेला, सुरकुत्यांच्या रेघा अंगातोंडावर पडलेला बापया राष्ट्रगीत म्हणताना एकदमच ताठ उभा राहायचा. कमरेला मातकट रंगाने मालिश केलेलं धोतर आणि अंगात पांढरा अंगरखा, कधी तरी लहर आली तरच डोक्यावर पांढरी गांधी टोपी एवढय़ानं सजलेला बापया गावातल्या दहावीपर्यंतच्या शाळेत झाडू मारायचं काम करायचा.
बापयाचं घर म्हणजे एक झोपडीवजा चार भिंतींनी बांधलेलं घरटं. शाळेपासून पाच-सात मिनिटांच्या अंतरावरच. बापया आपल्या छोटय़ा गावात ‘लै’ खूश होता. शाळेचे हेडमास्तर त्याची फार काळजीने विचारपूस करत आणि बापयाही अतिशय अदबीनं उत्तरं देत सुरकुत्यांमधून त्या हेडमास्तरला कृतज्ञतेचं स्मितहास्य करी. हेडमास्तरनं एकदा विचारपूस करताना त्याला त्याच्या शहरात राहणाऱ्या मुलाबद्दल विचारलं, ‘बापया, तुझा लेक काय म्हणतो बाबा..?’
‘मास्तर, लेकाचं खुशीत चालू आहे. कधीमधी त्याची चिठ्ठी आणि पैसे येतात, तेवढंच बरं वाटत’. हेडमास्तरनं खुर्चीवर बसून आनंदानं हसून मान डोलावली आणि चष्म्याखालून रजिस्टरमधली अंकनियमावली तो न्याहाळू लागला. दाराजवळ बसलेल्या बापयाने साहेब खूश झाल्याचं पाहून डोळे बारीक करीत स्वत:शीच स्मित केलं. दोन्ही हात विरुद्ध गुडघ्यांवर ठेवत बापयानं अतिशय मायेनं आपलं डोकं हळूच त्या दोन्ही हातांनी तयार झालेल्या प्रेमळ गादीवर ठेवलं आणि स्वत:शीच केलेल्या स्मितहास्याबरोबर गप्पा मारू लागला, एकदम जिवलग मित्रासारखा. त्या हातांनी तयार झालेल्या प्रेमळ गादीवर जेव्हा बापयानं डोकं ठेवलं तेव्हा तिनेही अगदी प्रेमाने बापयाच्या डोक्याला आधार दिला. आणि ती दोघे खूप दिवसांनी भेटलेल्या आई-मुलाप्रमाणे बोलू लागले. बापयाला अनेक वर्षांपासून ना डोकं ठेवायला जागा मिळाली होती न डोकं थोपटायला प्रेमळ हात. तोच त्याचा बाप, माय अन् लेकरू.
रोज सकाळी उठून बापया देवाकडे देशासाठी साकडं घालून शाळेसाठी बाहेर पडत असे. सकाळी सकाळी चांगलं नटूनथटून शाळेत आलेल्या पोरांकडे पाहिल्यावर बापया हळूच आपल्या गालावरच्या सुरकुत्यांना हसवत असे. बापया ना स्वातंत्र्यसैनिक होता, ना एखादा नेता, ना मास्तर, पण शाळेतल्या मुलांना सायंकाळी आपल्या खोपटाजवळ बसून जुन्या सैनिकांच्या, गोऱ्या लोकांच्या गोष्टी सांगण्याइतपत हुशार होता. गोष्टी सांगता-सांगता जेव्हा स्वातंत्र्यपूर्व काळापासून चालत आतापर्यंत आलं की पोरांच्या आयांच्या हाका ऐकू यायच्या. मग तेवढंच जुनं सोनं घेऊन पोरं परतायची आणि आजचं स्वत:मध्येच साठवून तो चुलीजवळ जाऊन बसायचा. रात्री शांत आकाशात लुकलुकणाऱ्या चांदण्याकडे पाहत बसणं, असं बापयाला खूप आवडायचं. कधी कधी निसर्ग खूपच बहरला की बापया झोपणंच विसरायचा आणि मग सकाळी देवाकडे साकडं घातल्यावर शेजारच्या नानीक्काला सांगायचा की, ‘नानीक्का, तुझं पोरगं नाव मोठं करणार आहे. हा तुझा माझा देशबी अजून खूप मोठा होणार आहे, कालच आकाशात सापडलेल्या देवाला मी साकडय़ात अडकवल.’ बापयाच्या आवाजाने बाहेर आलेल्या नानीक्कानं त्याच्या बोलण्यानं मान डोलावली की तिच्याकडून साखर घेऊन तोंड गोड करून म्हातारा बापया आपल्या वाटेला निघायचा.
नानीक्का बापयाला त्याच्या पोरीसारखीच. तिचा पोरगा गावातल्या शाळेत शिकायला होता. ‘जन्या’ म्हणजेच जनार्दन म्हणून बापयानं हाक मारली की नानीक्काचं तिसरीतलं पोरगं हरिणीला नुकतंच झालेल्या पाडसासारखं उगीचच मोठय़ानं उडय़ा मारत बापयाजवळ येऊन बसायचं. कधी कधी थकलेल्या बापयाला जन्या शाळेतून शाळा सुटल्यावर घरापर्यंत आणून सोडत असे.
कधी कधी सुरकुत्यांना हसवून बापया स्वत: रडवेला व्हायचा. आतलं उबगणारं वारं शांत करीत बापया परत आपल्या मायेच्या गादीवर डोकं ठेवून खूप खूप रडायचा, हवं तेवढं. असंच एकदा जन्यानं बापयाला रडताना पाहिलं होतं. बापया त्याच्याच विचारात गूढ होता. जन्यानं बापयाला विचारलं, ‘बापया, काय झालं..? रडतो का बरं..?’
तेव्हा बापयानं ओल्या डोळ्यांनी जन्याकडे पाहत उत्तर दिलं, ‘जन्या लेका, खूप शिकून लै मोठं हो, धनानं बी अन् मनानं बी.!’ बापया जन्याचा आधार घेऊन उठून उभा राहिला. जन्यानं बापयाला आत खोपटात सोडलं आणि जन्या नानीक्काच्या हाकेनं परत गेला. तसा बापया परत खूप खूप रडला; पण बापयाला सावरणारं तिथं खोपटात त्याच्याशिवाय दुसरं कुणी राहतच नव्हतं. त्यामुळे बापया मनसोक्त रडू शकत होता. त्याच्या रडणाऱ्या अश्रूंमध्ये या दुनियेचं सर्व दु:ख वाहून निघावं एवढय़ा मोठय़ानं.
सकाळी आकाशातल्या नारायणानं बापयाच्या खोपटाचं अलगद लोटलेलं दार वाजवल्यावर बापया जागा होत असे. अंगावर दोन तांबे ओतून, देवासमोर दोन हात जोडून, तोंडातल्या तोंडात थोडा वेळ काही तरी बोलून बापया शाळेला जाई. त्याच्या त्या सकाळच्या देवासमोर उभं राहून ओठांच्या अनामिक हालचालींनी बापया देवाला काही तरी सांगतो असं जन्याला नेहमीच वाटायचं; पण बापयानं त्याला संपूर्ण आयुष्यात इतिहासातल्या आदर्श गोष्टींशिवाय काहीच सांगितलं नाही. शाळेतलं काम उरकल्यावर बापया कधी-कधी जन्याबरोबर चालत, पोरांच्या घोळक्यानं घरी येई; पण कधी तरी बापया शाळा सुटण्याच्या अगोदरच शाळेतून निघून जाई आणि सायंकाळी गोष्टी सांगण्याच्या वेळेला खोपटाजवळ येऊन पोहोचे. त्या दिवशी दु:खी आणि कंटाळलेला वाटणारा बापया खूपच आनंदी दिसत असे. याचं रहस्य चुटकीभर साखर बापयाच्या हातावर ठेवणाऱ्या नानीक्कालाही समजलं नव्हतं. सायंकाळी परतणाऱ्या नारायणाला निरोप देऊन आपल्या अंधारलेल्या खोपटातल्या चुलीजवळ जाऊन स्वत:च्या दिमतीतलं जेवण बनवून खात असे आणि मग संपूर्ण रात्र मनातल्या अन् आकाशातल्या शांत गाठी सोडवण्यात घालवणारा बापया तसाच झोपी जाई, सगळ्या गाठी सोडवून थकल्यावर. असा दररोज जगणारा बापया प्रार्थना अन् राष्ट्रगीत म्हणताना हसणाऱ्या शाळेतल्या बाईंवर हमखास रागवायचा आणि शाळेतल्या चुकणाऱ्या मुलांना समजुतीनं प्रेमाच्या चार गोष्टी सांगून शाबासकीही द्यायचा.
एका सकाळी खोपटाला टेकून बसलेला बापया नानीक्काच्या जन्याशी बोलत बसला होता. अनेक वर्षांपासून आपल्या पोराचं आणि नातवाचं तोंडच न बघितलेल्या त्या म्हाताऱ्या बापयाचं आणि जन्याचं प्रेम आकाशातल्या नारायणालाही भावत होतं. तो आकाशातला सूर्यनारायण ती दोघं एकत्र बसलेली असताना पाहण्यासाठी नेहमीच धडपडत असे. मावळतीला जाताना आकाश उतरणारा तो ब्रह्मांडाचा वाटसरू, खोपटाच्या कपारीतून शिरून, खोपटाच्या दारात बसलेल्या बापया-जन्याच्या जोडीला येऊन बसत असे.
सकाळच्या प्रहराला बापयाला खोपटाबाहेरच पाहून सायकलवरून पोस्टमनने त्याला हाक मारली, ‘बापया, तुझ्या पोराची चिठ्ठी अन् मनिवार्डर आली आहे.’ बापयानं आपलं अंग सरळ बसवत पोस्टमनकडे पाहिलं. जन्यापण त्याच्याकडेच सोनं सापडल्या सारखाच पाहत होता. पोस्टमनने पैशाचं पाकीट बापयाकडे देत चिठ्ठी उघडत विचारलं, ‘बापया, करू का सुरू?’ बापयाने होकार दिला. पोस्टमन तोंडातली तंबाखू चघळत चिठ्ठी वाचू लागला. काळ्या शाईनं पांढरा स्वच्छ कागद काळा केलेली ती कागदाची चिठ्ठी बापयाला पोराचा मजकूर खूप प्रेमानं सांगायची; पण आज तोच कागद वेगळं काही तरी सांगत होता. समोर बसलेला पोस्टमन वाचताना चष्म्याच्या वरून बापयाकडे अधूनमधून पाहत होता. शेजारी बसलेल्या जन्याला त्या वाचनातलं काहीच कळत नव्हतं. बापया ते पत्र ऐकताना एकटक दारातल्या तुळशीकडेच पाहत होता. पोस्टमनने पत्र वाचून संपवलं आणि पोरानं केलेला नमस्कार बापयाला सांगत त्याच्या सुरकुतलेल्या हातावर ते पत्र ठेवून पोस्टमन दोन्ही तळवे गुडघ्यावर ठेवत उठला. उठणाऱ्या पोस्टमनला दोन्ही हात जोडून नमस्कार करून बापयानं त्याला निरोप दिला होता. सायकलवर पैडल मारून बसलेल्या खाकी गणवेशातल्या पोस्टमनला पाठमोरं पाहून बापयानं एक मोठा श्वास घेतला. आकाशातला सूर्यनारायण नुकताच परतला होता. पत्र ऐकून गप्प बसलेल्या खोपटासमोरच्या बापयाला पाहून तोही भेदरला. आपल्या लांबच लांब किरणांच्या हातांनी नारायणानं बापयाला जागं केलं. समोरच्या नारायणाला पाहून पाहून बापयाला शाळेत जाण्याची आठवण झाली. शाळा भरण्याची वेळ होत आली होती. तो जन्याच्या आधारानं उठून उभा राहिला. आता खोपटात जाऊन त्याने जन्याला शाळेत जाण्यासाठी पिटाळलं, तसा जन्या हळुवार पावलांनी बाहेर पडून शाळेचं दप्तर आणण्यासाठी घरी गेला. जन्या दप्तर घेऊन खोपटाच्या दारातूनच बापयाला हाक मारू लागला. बापयानं होकार देत त्याला आत बोलावलं, त्याच्याच आधारानं बाहेर येऊन त्यानं खोपटाचं दार बंद केलं आणि तो जन्याबरोबर शाळेची वाट चालू लागला.
दोन पावलं चालल्यानंतर, काही तरी आठवल्यासारखं करत बापयानं तोंड फिरवलं आणि तो नानीक्काला मोठय़ानं हाका मारू लागला. जन्याला हे नवीन नव्हतं म्हणून तो तिथेच बापयाच्या शेजारी हात हातात धरून उभा होता. बापयाच्या आवाजानं नानीक्का बाहेर आली,
‘बापया, काय झालं रं बाबा एवढय़ा जोरानं ओरडायला..?’
बापयाच्या हातात जन्याचा हात होता. त्याला घेऊन बापया नानीक्काच्या खोपटाकडे दोन पावलं चालत गेला.
‘नानीक्का, माह्य़ पोर इलायातेला चाललं..चिठ्ठी आली सकाळच्याला..’
नानीक्काला बापयाचे शब्द ऐकून आनंद झाला. तिच्या तरण्या डोळ्यातून आनंद गालापर्यंत लोंबकू लागला. ती गालात हसली आणि भर्रकन खोपटात गेली.
‘बापया, थांब..’
असं पुसटता आवाज बापयाच्या कानावर पडला. जन्यानं बापयाला आनंदी पाहून त्याला संपूर्ण शरीरभर न्याहाळलं. सकाळचा बापया आणि आता खूश असणारा बापया पाहून त्याला फार नवल वाटलं. त्याला कसला तरी आनंद झाला आहे एवढंच जन्याला कळत होतं. बापयाच्या कमरेएवढय़ा जन्याला बापयाच्या खोल जाणाऱ्या गालांना हसताना पाहून खूप आनंद झाला. जन्याने पण गालातल्या गालात स्मित केलं.
नानीक्का घरातून साखरेची वाटी घेऊन आली होती. तिने बापयाच्या हातावर साखर ठेवत वाटीतल्या साखरेचीच एक चुटकी जन्याच्या हातावर ठेवली आणि त्याच्या गालाचा हातानंच मुका घेत तिने बापयाला विचारलं, ‘पोर परत कधी येणार बापया..’
बापयाचा आनंदाची झलक आलेला चेहरा क्षणात ओसरला. हसणारे खोलगट गाल हसणं थांबल्यामुळे अजूनच खोल गेले. तो नानीक्काकडे पाहून बोलला. ‘पोस्टमननं सकाळी चिठ्ठीत लिहिल्यालं सांगितलं की पुढल्या चार-पाच वर्सासाठी पोरगं ईलायतेला चाललंय.’
नानीक्काचा अगोदरचा आनंदी चेहरापण पडला. ते हावभाव पाहून जन्या मात्र कावराबावरा झाला. नानीक्का बापयाला समजावत होती, ‘बापया, आठ-दहा र्वस तर काहीच नाही. पोरगं अजून मोठं व्हईल.’ ‘आक्का, ईलायतेची कामं करण्यापस्तूर ो आपला देश काय वाईट हाय. ह्य शिकल्या सवरल्या पोरोनबिना तुझा माझा देश मग मोठा कसा होणार..’ बापयाला अस्वस्थतेनं ग्रासलं होतं.
बापया खाली मान घालूनच शाळेला जाण्यासाठी उलट फिरला. जन्याचा हात बापयाच्या हातात घट्ट बसल्यामुळे जन्याही शाळेच्या रस्त्याला लागला.
जन्याने वळून नानीक्काकडे पाहिलं. ती वाकून चालणाऱ्या पाठमोऱ्या बापयाला पाहून रडवेली झाली होती.
शाळेच्या गोंधळलेल्या रस्त्यावर शाळेची पोरं बापयाला पाहून नेहमीच अदबीनं हाक मारत, ती आजही मारत होती; पण आज बापयाचं त्यांच्याकडे लक्षच नव्हतं. चालणाऱ्या बापयाच्या कानात पत्र वाचून उठणाऱ्या पोस्टमनचे शब्द घुमत होते, ‘बापया, पोरगा चार-पाच वर्सासाठी चालला ईलायतेला. लै शिरमंत होऊन येईल आता. मग तुझं हे खोपटं तू गोठय़ासाठी वापरशील. ऊठ बापया.. खूश होऊन पेढा वाट..’ बापया समाजातल्या परिस्थितीने आणि त्यामुळे तयार झालेल्या विचारांनी अस्वस्थ झाला होता.
थोडंच अंतर चालून दमलेल्या बापयाला मोठय़ानं धाप लागली. त्यानं जन्याचा हात घट्ट पकडला. शाळेच्या पटांगणाची हद्द नुकतीच सुरू झाली होती. तिथल्या एका झाडाखाली बसत बापयानं मोठय़ानं नि:श्वास टाकला.
आजपर्यंत देवाजवळ कसलीही तक्रार न केलेल्या बापयाला आकाशातल्या नारायणाचीच कीव येत होती. त्यानं एकदा आकाशाकडे नजर टाकली. त्याच नारायणाच्या प्रभावाने सगळंच जग प्रकाशमान झालं होतं. डोक्यावर आकाशात असणाऱ्या त्या प्रकाशमान तेजाकडे पाहण्यासाठी बापयानं मान वर केली तेव्हा त्याला त्याच झाडाने अडवलं ज्याच्या सावलीच्या आधाराला तो बसला होता. बापयानं मान खाली घेतली आणि परत एकदा खोटंच स्मित केलं. जन्या बापयाच्या शेजारीच बसला होता. गळ्यातल्या पुस्तकांच्या पिशवीचं ओझं त्याला आज जाणवत नव्हतं. समोर खेळणाऱ्या मुलांना पाहण्याचीही त्याची इच्छा नव्हती. तोही छोटय़ा शाळेकडे आणि वाऱ्यामुळे सळसळणाऱ्या हिरव्या झाडाकडे बघण्यात मग्न होता. बापयाचं जन्याकडे लक्षच नव्हतं.
शाळेच्या घंटेचा आवाज कानावर पडताच बापया आणि जन्या भानावर आले. जन्यानं हातवारे करत बापयाला उठण्याची खूण केली. बापया झाडाच्या आधाराने उठला. समोर मुलं रांगेत उभी राहत होती आणि मास्तर विश्राम-सावधानच्या सूचना देत होते. बापया आणि जन्या अध्र्या रस्त्यात पोहोचत नाही तोवर ‘राष्ट्रगीत’ सुरू झालं. आणि पाठीत वाकलेला म्हातारा बापया आणि जन्या आपली चप्पल काढून जागेवरच राष्ट्रगीतासाठी ताठ मानेने उभे ठाकले.
अमित बाविस्कर