News Flash

कथा : वादळ

फ्रॅँकफर्ट विमानतळावर सविता ग्रुपची वाट पाहात उभी होती. हातात श्रीविद्या ट्रॅव्हल्सचं प्लॅकार्ड होतंच. दिल्लीहून फ्लाइट आल्याचं इंडिकेटर दाखवत होता, पण लगेज वगैरे घेऊन ‘अरायव्हल’मधून बाहेर

| April 17, 2015 01:11 am

lp57फ्रॅँकफर्ट विमानतळावर सविता ग्रुपची वाट पाहात उभी होती. हातात श्रीविद्या ट्रॅव्हल्सचं प्लॅकार्ड होतंच. दिल्लीहून फ्लाइट आल्याचं इंडिकेटर दाखवत होता, पण लगेज वगैरे घेऊन ‘अरायव्हल’मधून बाहेर यायला वेळ लागतोच. नेहमी राजा तिला असिस्टंट म्हणून असतो, पण या वेळी राजा भारतात गेला होता. त्यामुळे तिला स्वत:ला यावं लागलं. नाही तर राजा असतो तेव्हा ती बसून राहते बसमध्ये! राजा ग्रुपला घेऊन बसमध्ये येतो. 

पण कालच समीरसरांचा फोन आला होता. या वेळी राहुल म्हणून कोणी नवीन मुलगा टूर मॅनेजर म्हणून.. म्हणजे खरं तर असिस्टंट टूर मॅनेजर म्हणून येणार होता. समीरसर म्हणाले होते, ‘‘ही इज जस्ट ट्वेंटी टू. पण डॅशिंग आहे. राजा स्वत:च्याच लग्नात बिझी असल्यामुळे याला पाठवतोय. संभाळून घे.’’
सविता म्हणाली होती की, ती एकटीही संभाळू शकेल, पण समीरसरांना ते मान्य नव्हतं. ग्रुप चालत असताना सगळ्यात पुढे ट्रॅव्हल्सचा एक माणूस आणि सगळ्यात मागे एक माणूस कम्पल्सरी ठेवायचा यावर त्यांचा कटाक्ष असे. शिवाय इतर अनेक गोष्टी दोघं असले की चांगल्या शेअर होत असत.
सविताला सात-आठ वर्षांचा टूर मॅनेजमेंटचा अनुभव होता. तिला खरं तर पूर्वी ऑफिस जॉब होता, पण डिव्होर्स झाल्यावर तिनं समीरसरांना गळ घालून टूर मॅनेजरची पोस्ट मागून घेतली होती. आता सवितानं पस्तिशी नुकतीच पार केली होती. साधारण दहा-बारा दिवसांची युरोप टूर असे. दोन टूर्सच्या मध्ये कधी फ्रँकफर्टला तर कधी पॅरिसला तिला राहावं लागे. ट्रॅव्हल्सनं हॉटेलमध्ये तिला अ‍ॅकमोडेशन दिलं होतं. टूरमध्ये टुरिस्ट ज्या हॉटेलमध्ये उतरत त्याच हॉटेलमध्ये टूर मॅनेजर्सची सोय केलेली असेच. दोन्ही टूर मॅनेजर्सना दोन स्वतंत्र रूम्स देण्याचं सौजन्य समीरसरांकडे होतंच. वास्तविक दोन्ही टूर मॅनेजर्स पुरुष असते तर त्यांना एकच हॉटेलरूम शेअर करायला त्यांनी सांगितलं असतं, पण सविता स्त्री असल्यामुळे दोन स्वतंत्र रूम्स द्यायला लागत होत्या, पण सविताचं कामच एवढं व्यवस्थित असे की समीरसरांची त्याला तयारी होती.
ग्रुपची वाट पाहात असताना सविताला आपला भूतकाळ आठवत होता. नात्यातल्या एका लग्नात प्रणवनं तिला बघितली. लगेच मागणी घातली. सविताच्या घरचे एवढय़ा सहजासहजी जमलं म्हणून खूश होते. सविताला त्या वेळी श्रीविद्या ट्रॅव्हल्सच्या ऑफिसमध्ये नोकरी होती. प्रणव एमबीए होता आणि एका मल्टिनॅशनलमध्ये चांगल्या पोस्टवर होता. साहजिकच एवढं चांगलं स्थळ मिळालं म्हणून सवितानं आणि तिच्या घरच्यांनी पट्कन हो म्हटलं.
आणि सविताला लग्नानंतरची ती जीवघेणी पहिली रात्र आठवली. तिच्या स्वप्नातली रात्र खूप सुंदर होती. एखादी तरल कविता जशी शब्दाशब्दानं नाजूकपणे उलगडत जावी. फुलातल्या गंधासारखा त्यातला अर्थ हृदयातल्या कप्प्यात हळूच जाऊन बसावा तसं नातं जुळत जावं.
पण प्रत्यक्षातली ‘पहिली रात्र’ खूपच वेगळी होती. प्रणव त्या रात्री आला तोच मुळी भरपूर पिऊन आणि वागलाही हिंस्र.. तिला वाटलं, नंतर चांगला वागेल. तो डॉमिनेटिंगही खूपच होता. साधं त्याला हवं त्या पक्षाच्या उमेदवाराला मत दिलं नाही त्या रात्री केवढं मारलं होतं त्यानं तिला.
त्यानं तिच्यावर हात उगारला त्यानंतर मात्र तिनं त्याला सोडून द्यायचा निर्णय घेतला. ती माहेरी निघून आली. एक मात्र तिनं चांगलं केलं होतं. त्याचं आणि सासूचं न ऐकता तिनं आपली नोकरी चालू ठेवली होती. तिनं घटस्फोटाची रीतसर प्रक्रिया सुरू केली.
पण इकडे तिचं माहेरी असणंही भाऊ-भावजयीला आवडत नव्हतं. टू बीएचके घरात आणि भाऊ-भावजयीच्या मनात स्पेस मिळवणं तिला कठीण जात होतं. आपण आपल्या माहेरच्या माणसांना ओझंच वाटतोय हे सविताला कळून चुकलं. स्वतंत्र जागा घ्यायची तर तिची ऐपत नव्हती. मग हा टूर मॅनेजरचा जॉब बरा होता. जास्तीत जास्त घराबाहेर ..
तिच्या विचारांची साखळी तुटली ती ‘सॅऽऽऽवी’ अशा जोरदार हाकेनं.
राहुल हाका मारत होता. बावीस वर्षांचा. उमदा. गोरा.. तरतरीत
राहुल धावतच तिच्याकडे आला.
‘‘ओळखलंस पटकन्’’ ती कौतुकानं म्हणाली.
‘‘न ओळखायला काय झालं? समीरसर म्हणाले होते. एअरपोर्टला पोहोचलास की जी अत्यंत स्मार्ट भारतीय स्त्री तुला समोर दिसेल तिला तू सॅवी अशी हाक मार, ती आपली सविताच असेल. हातातलं श्रीविद्या ट्रॅव्हल्सचं प्लॅकार्ड वाचायची गरज पडणार नाही.’’
‘‘अडतीस जणांचा ग्रुप आहे. एकाचं कॅन्सलेशन झालंय.’’
‘‘अरे, सगळं कम्युनिकेट झालंय मला. सगळ्यांचे ईमेल अ‍ॅड्रेसेस, फोन नंबर्स, पत्ते.. सगळं आलंय. जस्ट टेक केअर ऑफ मि. बॅनर्जी. ही इज व्हेरी बिग.. तसे सगळेच बिगशॉट्स आहेत, पण ही इज द बिगेस्ट.’’ मग त्याच्या कानाशी तोंड नेऊन ती म्हणाली, ‘‘जरा त्रासदायक आहे तो.’’
‘‘मला समीरसरांनी सगळं ब्रीफिंग केलंय् सॅवी.’’
सविता आता पस्तिशीची होती, पण तिनं स्वत:ला व्यवस्थित मेन्टेन केलं होतं. ती पंचविशीची आहे असं कोणीही म्हटलं असतं. ट्रॅव्हल्समधला टॉप टू बॉटम स्टाफ तिला सॅवी असंच म्हणत असे. त्यामुळे राहुलनं तिला सॅवीच म्हटलं हे तिला आवडलं होतं.
राहुलनं सगळ्यांना गोळा केलं. पंधरा फॅमिलीज् होत्या. सवितानं त्यांना सगळ्यांना आपल्याला फॉलो करायला सांगितलं. ती त्यांना बसकडे घेऊन गेली. बसच्या ड्रायव्हरशी ओळख करून दिली.
सगळे बसमध्ये बसल्यावर, बसला तिथे कोच म्हणत, कोचमध्ये बसल्यावर कोचचा नंबर लक्षात ठेवा, पासपोर्ट जपा, बॅगा, व्हॅलेट्स संभाळा, इथेही पिकपॉकेटर्स असतात वगैरे सगळ्या सूचना तिनं दिल्या. तिचं इंग्रजी, मराठी, हिंदी या तिन्ही भाषांवरचं प्रभुत्व पाहून राहुल अवाक् झाला होता.
‘‘सॅवी, यू आर ऑसम..’’ राहुल म्हणाला
‘‘अरे वेडय़ा.. गेली आठ र्वष मी हा जॉब करतेय. आता तर मला कामचलाऊ डॉइश, स्पॅनिश, फ्रेंचही येतं.’’
मग ते एका भारतीय रेस्टॉरंटमध्ये सगळ्यांना जेवायला घेऊन गेले. डिनरनंतर सगळे एका हॉटेलमध्ये राहायला जाणार होते.
राहुलनं फ्लाइटमध्येच सगळ्यांशी जुजबी ओळख करून घेतली होती. ऑफिशिअल पिकअप फ्रॅँकफर्टला असलं तरी ट्रॅव्हल कंपनीनं सगळ्यांना आयडेंटिकल हँडबॅग्ज दिल्यामुळे राहुलला आपल्या ग्रुपची माणसं मुंबई एअरपोर्टलाच ओळखता आली होती. तो स्वत:हून सगळ्यांशी ओळख करून घेत होता. सविता स्मितहास्य करत एका टेबलाशी बसून राहिली. डिनर चालू असताना ती मध्येच उभी राहिली.
‘‘अटेन्शन प्लीऽऽऽज’’
सगळ्यांनी तिच्याकडे पाहिलं.
अस्खलित इंग्लिशमध्ये ती म्हणाली, ‘‘आज माझा असिस्टंट राहुल तुमच्या सगळ्यांशी ओळख करून घेतोय. उद्या सकाळी मी करून घेईन.. पण कशी? मी राहुलची टेस्ट घेणार आहे. बघू या तो किती जणांना लक्षात ठेवतोय्.’’
सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या.
‘‘मला तर तो नक्की लक्षात ठेवेल. माझ्याशी एकदा ओळख झालेला माणूस मला कधीच विसरत नाही.’’
मि. बॅनर्जीची वीस वर्षांची मुलगी शेफाली डोळे मिचकावत म्हणाली आणि सगळेच हसले. यावर राहुलचं कावरंबावरं होणं सविताच्या नजरेतून सुटलं नाही. डिनर पुढे चालू झालं. ग्रुपचं होत आलं की मग टूर मॅनेजर्स आपलं सुरू करतात. तोपर्यंत ते सगळ्यांना सगळं मिळतं की नाही ते पाहतात. सविता बसल्या जागेवरून आणि राहुल भिंगरीसारखा फिरत सगळ्यांची काळजी घेत होता. शेफाली त्याच्या अधूनमधून फिरक्या घेत होती, पण राहुल बऱ्यापैकी टोलवत होता.
सगळ्यांचं होत आलं तसा तो सविताच्या टेबलाशी येऊन बसला. आता तो सविताला हवं नको ते पाहू लागला.
‘‘सॅवी, मी नॉनव्हेज घेतलं तर चालेल?’’
‘‘अरे घे की.. मी व्हेज आहे म्हणून तू व्हेजच असलं पाहिजेस असं नाही.’’
मग त्यानं चिकन वगैरे मागवून छान डिनर केलं. रेस्टॉरंटचा मालक त्यांचा नेहमीचा असल्यामुळे तोही त्या दोघांची व्यवस्थित काळजी घेत होता.
मग ते सगळे हॉटेलवर आले. सवितानं प्रत्येक फॅमिलीचं नाव कॉल करून प्रत्येकाला हॉटेलरूमची चावी दिली.
सगळ्यात शेवटी राहुलला त्याच्या रूमची चावी देत ती म्हणाली, ‘‘राहुल, ही तुझी चावी. गुड नाइट.’’
पण चावी घेताना तिला तो खूप टेन्स वाटला. सगळे पटापट आपापल्या रूम्सवर निघून गेले. राहुल तिथेच घुटमळत राहिला.
‘‘येस राहुल, एनी प्रॉब्लेम?’’ शेवटी तिनं विचारलंच.
‘‘सॅवी, आपण एकाच रूममध्ये नाही राहू शकणार?’’
‘‘नाही.. अरे इट इज नॉट अलाउड ऑल्सो. आपल्याविषयी ग्रुपमध्ये काहीही गॉसिप होता कामा नये.. उगाचच कशाला?’’
राहुल आता तर खूप घाबरा झाला होता. अचानक तिच्या एक गोष्ट लक्षात आली. कमलेश शुक्ला नावाचा टुरिस्ट एकटाच होता. त्याला रूम पार्टनर मिळाला तर त्याचे चार्जेस् कमी होतील का, अशी विचारणा त्यानं केलीही होती. कमलेशशी बोलून सवितानं राहुलला कमलेशच्या रूमवर पाठवून दिलं. कमलेशचे चार्जेस् ती कमी करायला सांगणार होती. ते मॅनेज होण्यासारखं होतं.
पण सविताला एका गोष्टीचं खूप आश्चर्य वाटलं, राहुल एवढा टेन्स का झाला?
दुसऱ्या दिवशी राहुलची टेस्ट होती. त्याच्या नव्वद टक्के टुरिस्ट्सना त्यानं बरोबर ओळखलं. शेफालीच्या जवळ येऊन त्यानं मुद्दाम तिचं नाव विसरल्याचा अभिनय केला. यावर शेफाली त्याला मारायला धावली. तो पळाला. सगळे हसले. ग्रुपमध्ये वातावरण हसरंखेळतं ठेवण्यात तो यशस्वी होत होता.
सविताला मात्र त्याचा कालचा प्रश्न एकसारखा आठवत होता. का राहायचं होतं त्याला आपल्या रूममध्ये? त्यानं आणि तिनं एका रूममध्ये राहायचा अर्थ काय होतो हे न समजण्याएवढा लहान तर तो नक्कीच नव्हता.
कोचमध्ये ड्रायव्हरच्या (युरोपमध्ये त्याला कॅप्टन म्हणतात) तर कॅप्टनच्या मागची सीट टूर मॅनेजरची असा प्रघात होता. सविताच्या शेजारी साहजिकच राहुल होता. राहुलच्या पीळदार दंडाला सविताच्या स्लीव्हलेस दंडाचा स्पर्श अधूनमधून होत होता. कधीकधी जरा जास्तच. राहुल हे मुद्दाम तर करत नसेल? सवितानं अंग चोरून घेतलं, पण एकीकडे तिला तो स्पर्श आवडतही होता. मग ती कधी अंग चोरायची, तर कधी सैलावायची. सविता गोंधळून गेली होती.
ग्रुपमध्ये दोघंही अगदी नॉर्मल वागत असले तरी राहुलचा प्रश्न सविताला सतावत होता. प्रणवच्या त्या घाणेरडय़ा अनुभवानंतर तिचा सेक्समधला इंटरेस्ट तर साफ संपला होता. मग राहुलच्या प्रश्नाची आपल्याला भीती का वाटते? आपला स्वत:वरचा विश्वास तर डळमळीत होत नाहीए ना? आठ वर्षांचा संयम मोडणार तर नाही.
हे कुठलं अपरिचित वादळ आपल्या मनात घोंघावतंय?
हेडलबर्ग, बर्न वगैरे करून ते स्वित्र्झलडमध्ये रॅडिसन ब्ल्यूमध्ये उतरले. टूर व्यवस्थित चालली होती. माउंट टिटलीसला बर्फाच्छादित पर्वतशिखरावर पोहोचल्यावर एक अद्भुत आनंद मिळतो. कितीही वेळा इथे आलं तरी निसर्गाचं हे सौंदर्य आता बास झालं असं कधीही सविताला वाटत नाही. सवितानं तेवढय़ातल्या तेवढय़ात स्नोमध्ये लहान मुलासारखं बागडून घेतलं. राहुल होताच. पण तो जास्तीत जास्त वेळ शेफालीबरोबर राहायचा प्रयत्न करतोय हे सविताच्या नजरेतून सुटलं नाही.
शेवटी तिनं त्याला सांगितलंच.
‘‘राहुल, तुला शेफालीची कंपनी आवडते हे साहजिक आहे. आय कॅन अंडरस्टँड, पण इतर टुरिस्ट्सकडे दुर्लक्ष होऊ देऊ नकोस.’’
‘‘येस बॉस..’’ राहुल हसत म्हणाला.
‘‘बॉस म्हणून सांगत नाहीए मी.’’
‘‘ओके ओके.. दीदी म्हणून सांगतेस.. हो ना?’’ असं म्हणत राहुलनं तिला जवळजवळ मिठीच मारली.. ‘‘माझी लाडकी दीदी’’
सवितानं ‘‘अरे बास बास’’ म्हणत स्वत:ला सोडवलं.
‘‘हसण्यावारी नेऊ नकोस.. आय मीन इट’’
‘‘ओके, ओके’’
एवढय़ात लांबून शेफाली धावत आली. राहुल आणि सविताला तिनं विचारलं, ‘‘व्हॉट हॅपन्ड सॅवी?’’
‘‘सॅवी म्हणतेय् मी तुझ्याकडे जास्त लक्ष देतोय्’’
‘‘ऑब्व्हिअसली.. द्यायलाच हवं.’’ मग ती सविताला म्हणाली, ‘‘ए, डोन्ट बी जेलस हं.’’
‘‘व्हाय शुड आय?’’ सविता म्हणाली, ‘‘बट ही इज अ टूर मॅनेजर.. नॉट अ टुरिस्ट’’
‘‘चलता है यारररर.. ऑल आर ग्रोनअप’’ असं म्हणत ती राहुलला ओढत ओढत घेऊन गेली. सविताला शेफालीचा जरा रागच आला. ही वीस वर्षांची चिमुरडी. हिनं तरी मॅम म्हणायला हरकत नव्हती असंही सविताला वाटलं.
मग ऱ्हाइन फॉल, लायन मोन्युमेंट, चॅपल ब्रिज वगैरे स्पॉट्सना मात्र राहुल ग्रुप आणि शेफाली दोन्ही व्यवस्थित मॅनेज करत होता. अधूनमधून सविताकडेही येऊन जात होता.
कोच पॅरिसला आला. आता पॅरिसची रोड टूर, आयफेल टॉवर, लुर म्युझियम, डिस्नेलँड आणि टूर संपणार होती. मग त्या ग्रुपला मुंबई फ्लाइटमध्ये बसवून दिलं की झालं.
सगळे दिवस राहुलनं तिला सुंदर सहकार्य दिलं. टूर वेल मॅनेज झाली.
मध्येच तिनं विचारलं, ‘‘तुझा रूम पार्टनर कसा आहे?’’
‘‘धमाल आहे. आमची दोस्ती झालीए. जाम जोक्स सांगतो..’’
‘‘मग मला सांग ना.’’
‘‘तुला? सगळे नॉनव्हेज असतात. तू तर व्हेज आहेस ना?’’
‘‘शी.. मग नकोच.’’
डिस्नेलँडला तर सगळ्या राइड्स करायला राहुल शेफालीबरोबरच होता. सविता मोक्याच्या परतीच्या रस्त्यावर बसून होती. दरवेळी काय राइड्स करायच्या? ठरावीक वेळी सगळ्यांना एका स्पॉटवर यायला सांगितलं होतं. सगळे आले. आता पुन्हा बांधाबांध आणि बॅक टू मुंबाय.
ग्रुपमधले सगळे टुरिस्ट्स आता एकमेकांचे चांगलेच मित्र झाले होते. एकमेकांचे इमेल अ‍ॅड्रेसेस, फोन नंबर्स त्यांच्याकडे होतेच. सगळे कायम संबंध ठेवायच्या गोष्टी करत होते. खूपच भावुक झाले होते. मॅनेजिंग डायरेक्टर बॅनर्जी आणि त्यांच्या मिसेस तर सगळ्यांना ‘आम्ही तुम्हाला घरी बोलावून सगळ्यांचं गेट टुगेदर करू’ इथपर्यंत सांगत होते.
सविताला माहीत होतं की एकदा आपापल्या ठिकाणी गेले की हे सगळे एकमेकांना विसरून जाणार आहेत.. आपल्याला सुद्धा.
हॉलच्या एका कोपऱ्यात राहुल भावुक होऊन शेफालीचा निरोप घेत होता. त्याची पहिलीच टूर.
सविताला वाटलं, ‘याला बहुतेक नंतर समजवावं लागेल. वेडय़ा, प्रत्येक टूरमध्ये एक तरी शेफाली असतेच.’
सगळ्यांना बाय केल्यावर मागे फक्त सविता आणि राहुल राहिले. राहुल पुन्हा टेन्स.
‘‘आता आज आपण कुठे राहणार?’’
‘‘पॅरिसमध्येच. ब्ल्यू डायमंडमध्ये दोन रूम्स बुक्ड आहेत.’’
‘‘सॅवी, आपण एकाच रूममध्ये नाही राहू शकणार?’’
‘‘राहुल, मला ते चालायचं नाही. आय हॅव ऑलरेडी टोल्ड यू.’’
राहुल हिरमुसला. ते दोघं हॉटेलवर गेले. डिनर घेतलं.
‘‘ही तुझी चावी. ’’ सवितानं चावी दिली. चावी घेताना राहुलचा हात थरथरत होता.
हा एवढा टेन्स का होतो? सविताला कळेना.
सविता आपल्या रूममध्ये आली. दार लावून घेतलं. रात्रीचे अकरा वाजले होते. ती राहुलचा विचार करत होती. त्याला आपल्या रूममध्ये का यायचं होतं? पण तो तर आपल्याला दीदी म्हणाला होता. म्हणजे त्याच्या मनात भलतंसलतं काही नाहीए. आपण स्वत:लाच घाबरतोय. तो घाबरत नाहीए. आपल्याला तेरा वर्षांहून लहान असलेल्या त्या तरण्याबांड मुलाचं आकर्षण तर वाटत नाहीए? आपल्यावरचे संस्कार असे नाहीत. हे बरोबर नाही. त्याचा स्पर्श आपल्याला हवाहवासा का वाटत होता?
सविता वर आढय़ाकडे पाहात पडून राहिली.
ती दचकली ती दारावरच्या बेलनं. हो.. बाहेर राहुलच होता.
‘‘सॅवी.. दार उघड.’’ त्याचा आवाज घुसमटलेला होता.
तिनं शेवटी दार उघडलं. त्यानं आत येऊन पटकन् दार धाडकन लावलं.
‘‘लवकर बंद केलं ते बरं झालं.’’ तो घाबऱ्याघबऱ्या म्हणाला. ‘‘नाही तर ते आले असते.’’
‘‘कोण?’’
‘‘माझी आत्या.. दोन वर्षांपूर्वी वारलीय ती.’’
‘‘काय ?’’ सविता जवळजवळ ओरडलीच.
‘‘ हो’’ तो भयंकर घाबरला होता. घामाघूम झाला होता. ‘‘ती एकटीच नाही, आणखी एक म्हातारा आणि एक लहान मुलगाही येतो माझ्या रूममध्ये.. मी एकटा असतो ना तेव्हा.’’
तो रूममध्ये सगळीकडे पाहतो.
‘‘आपण पटकन् दार लावलं ते बरं झालं. ते आत आले नाहीत. कोणीतरी असलं ना रूममध्ये, की नाही येत ते.’’
सविताच्या लक्षात आलं. याला भास होत असणार.. हॅल्युसिनेशन्स
‘‘सॅवी, दीदी आहेस ना माझी? झोपू ना इथे.. प्लीज मला खूप भीती वाटते गं..’’
तो घामाघूम झाला होता. तिनं त्याला घट्ट जवळ घेतलं. त्याच्या केसांवरून मायेनं हात फिरवत ती म्हणाली,
‘‘राहुल, .. घाबरू नकोस.. मी आहे ना.. तुझी दीदी.. झोप इथेच.
आणि एखाद्या लहान मुलासारखं ती त्याला थोपटत राहिली.
वादळ आता शांत झालं होतं.
रवि भगवते

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 17, 2015 1:11 am

Web Title: story 7
टॅग : Story
Next Stories
1 डेनिमचा रंग?
2 आयुष्यपट
3 दखल : चंदेरी दुनियेची अनोखी मुशाफीरी
Just Now!
X