scorecardresearch

परत पायथ्याशी!

तो डोंगरमाथ्यावर पोहोचला, तेव्हा सूर्यदेव अस्तास चालले होते. मावळतीची सोनेरी आभा मागे रेंगाळत इथे तिथे पसरली होती. तो सोन्याचा तलम मुलामा अंगभर पांघरत तो स्वत:शीच म्हणाला कशाला आलोय मी…

परत पायथ्याशी!

तो डोंगरमाथ्यावर पोहोचला, तेव्हा सूर्यदेव अस्तास चालले होते. मावळतीची सोनेरी आभा मागे रेंगाळत इथे तिथे पसरली होती. तो सोन्याचा तलम मुलामा अंगभर पांघरत तो स्वत:शीच म्हणाला कशाला आलोय मी इथे! निसर्गाचे एक नवेच रूप तो अवतीभवती पाहात होता. खोल दऱ्यांत हिरव्या रंगावर तोच सोनेरी साज. खाली पहावतही नव्हते आणि पाहिल्याशिवाय राहावतही नव्हते. ‘हे रूप निरखून पहावे म्हणून आपण येथे आलोय का!’ त्याने स्वत:त डोकावून पाहिले. याच निबीड हिरवाईवर हा देह झोकून द्यावा म्हणून हे टोक गाठले ना! मग!!! स्वत:च्याच मनाचा पाड लागत नाही म्हणतात तो असा! हवा विलक्षण तरल होती. उभेपणाचा तोल सांभाळणं क्षणोक्षणी कठीण जात होतं. तो निकराने उभा होता. आता संध्याकाळ अधिकच गडद झाली होती. अंधाराच्या धुक्याचा पडदा अंगावर ओढत दऱ्यांतली हिरवाई डोलत होती. नि:शब्दतेत बोलणारा तो परिसर खूप गूढ होता. वाऱ्याची शीळ मुक्त लहरत होती. वरच्या निळाईत थोडी लुकलुक सुरू झाली होती. तो भानावर आला. इथे कुठे रमायचे नव्हते. सटकायचे होत. तरीही भवतालचे लावण्य या क्षणीही लुभावीत होते. पाखरांचे थवे चिर्र्र फिर्र्र करत आसऱ्याकडे फिरकत होते. एखाद्या चित्राकृतीसारखे ते विहंगम दृश्य मनाच्या कॅनव्हासवर उतरत होते, पण यातही गुंतून पडायचे नव्हते. खालच्या स्वर्गीय हिरव्या डोहांत फक्त एक झेप! क्षण सटकतायत. सगळे आवरते घ्यायला तर इथे आलो ना! फक्त एक झेप तेवढीच उरलीय. मग सरेल सगळे! मुख्य म्हणजे तिची आठवण विरेल. तिच्या अवतीभवती राहून विरकीचे सोवळे परिधान करणे शक्यच नव्हते म्हणून तर या निर्णयांशी आलो ना आपण! मनात एकच ठळक ठसा उमटलाय. तिने फसवले! नादी लावले.. मग अचानक फिरली.. हातातला हातच झरकन काढून घेतलान.. म्हणजे गुंतणं आणि मग त्यातून बाहेर पडणं हा का मर्जीचा, लहरीचा मामला असतो! ते पहिले रेशमी शब्द उसवत म्हणाली- खूप विचार केला रे, पण स्वप्न नाही रे जगता येत. जगायसाठी परखड व्यवहारच कामी येतो. तोच मला दुसरी दिशा दाखवतोय. विसर मला, मुक्त हो आणि मला मुक्त कर प्रेम प्रीतीच्या विळख्यातून! त्यात खरं काही नसतं. ते मृगजळ थोडा काळ भ्रमवतं. मी तू तू मीच्या रेषा पुसटतायत असा केवळ भास असतो. एकत्वाचा बार फुसका असतो. परस्परांतील भेद, आत्मसंघर्ष यावर मात नाही करता येत. शेवटी निर्णायक एकच खरं असतं. प्रेमाच्या या बिसतंतूची गुंतागुंत बाजूला सारून एकमेकांच्या पाशांतून मुक्त होत मी, मी व्हावे, तू-तू व्हावे! आपापला पंथ स्वीकारावा. आपण परस्परांना अनुरूप नाही हे वाढत्या जवळीकीमुळेच स्पष्ट, निढळ होताय.. एकदा मनाशी पक्कं जाणवल्यावर निरगाठीसुद्धा तोडाव्या लागतात. कवी कल्पना आहेत साऱ्या! कथेतल्या संहितेत ठीक असतं सारं! कथा दहा-बारा पानांत संपायची असते, पण वास्तवात अडथळय़ांची एक वाट अविरत चालायची असते. मिसफिट आहोत यावर एकदा मोहोर उठवली तर पुढचे आपले आयते जगणे शक्य होते. भ्रमांत बोलावे तसं किती म्हणजे किती अगम्य बोलावे तिने! तिचा तो तिरमिरलेला शब्द न शब्द या अंधारात भर दुपारच्या रणरण उन्हासारखा त्याला भाजत होता.. तिच्या अर्थहीन लाँग प्लेइंगमुळे, पाकळय़ा गळून गेलेल्या फुलासारखा मी का अर्थहीन झालोय. जीवनावर तुळशीपत्र ठेवण्याइतका मी का आगतिक झालोय!ो१ं्र’३८ ३ँ८ ल्लंेी ्र२ ६ेंल्ल म्हणतात ते इतकं खरं म्हणायचं का! वेळ स्तब्ध. काळोख वेढीत!

त्याने स्वत:ला सावरले. मनाशी म्हणाला- स्वत: स्वत:ला अखेरचा निरोप द्यायला आलोय. मग ही मागे मागे जाण्याची दुर्बुद्धी कशाला! तिचं बोलणं मनाच्या तळाशी या निकराच्या वेळी साठवावंच कशाला! आपल्याकडून काहीतरी ठाम, पक्का निश्चित निर्णय घेतल्याशिवाय फारकत घेणे शक्य होणार नाही म्हणून तर इथे आलो ना! आता फक्त एक अनावर क्षण- मग फक्त सुटका! भरकटणे नको- अडकणे नको. फसगत नको, आणाभाका नको, चर्चा नकोत, शरण जाणे नको, अनुनय तर त्याहून नको. हमखास सुटकेच्या टकमक टोकावर आलो ते म्हणूनच ना! तिचं कुसुमकोमल मन तिच्यापाशी! आणि माझं पुरुषी हृदय माझ्यापाशी!? मग मी का इतका भावाकुल झालोय! तिच्याशिवाय मी- हा विचार मला सोसवत नाही म्हणायचं कां!
त्याने कठोर निर्धाराने आतला कोलाहल थांबवला. आता फक्त एकदा पाय उचलायचे पुढचे सगळे सहज, विनासायस! त्याने आठवणपूर्वक खिशातली चिठी टरकावली. पाकोळय़ा उडाव्या तशागत कपटे इतस्तत: भिरभिरले. रात्र चढत होती. पूर्ण रजनीनाथ थेट त्याच्या माथ्यावर प्रकाशाची संथ शीतल किरणे पसरवीत होता. आता फक्त पापणी लवण्याचा अवकाश! तरी त्या थेंबभर क्षणात त्याला आठवले आपण तिला चंदा म्हणायचो मग ती विचारायची म्हणजे तू चकोर का! नको त्या विरक्त क्षणी एवढे भरमसाठ आठवते तरी कसे!.. हे श्वास फार लाघट असतात. ते बंद झाल्याशिवाय जगण्याच्या संहितेला पूर्णविराम नाही. त्याने त्या चंदाचकोराला झटक्यात खाली ढकलून दिले. आता फक्त नि:शब्द शांतता आतलीही आणि भवतालांतलीही! निसर्ग निसर्गासारखा वागत होता. स्वच्छंदी पाने सळसळत होती. हवा वाऱ्याबरोबर वाहत होती. काळोखामुळे त्याचे काहीच अडले नडले नव्हते. हा काळोखच अंतिम सखा असतो. त्याने एकदा स्वत:त सामावून घेतले की संपले सारे! त्याने स्वत:लाच तपासले. ठाम निर्णयानंतरही इतके का रेंगाळतोय आपण! तो स्वत:वरच रागावला. सावरला.. त्याने आपल्या आयुष्याला मनोभावे प्रणिपात केलान आणि हात उंच करून पाय उचललेन आणखीन काही करायचे शिल्लकच नव्हते.
आता फक्त इतिश्री.. आणि..
कुणीतरी त्याला गचकन कवेत घेतले. मागे एकदाही वळून न बघता इथवर आलो आणि आता या नेमक्या वेळी! कशाला!! कुठची शक्ती ही!! बिलवर किणकिणले.. मी तिच्याच कथेतला तिने रंगवलेला नायक झालो. निर्णयावर रेघोटय़ांची अंतिम फुली मारल्यावर हे नवे प्रयोजन कसले! आधी ताणताण ताणायचे मग मिठीत कशाला आणायचे! त्याची खूप चिडचिड झाली. अर्थ आणि संकेत कसलाच लागत नव्हता!
तोंडाची पटाईत नुसती! पण भित्री भागूबाईपण सोडून हे धाडस करत्ये! डोंगर चढणं म्हणजे काय मी अनुभवलं! पाठून सावलीसारखी ही येत राहिली! अजब आहे! अतक्र्य आहे. त्याचं मनच आतून त्याला धडका देत होतं. कशाला आधी एवढा तमाशा करायचा मॅच-मिसमॅच! भावना, व्यवहार, हिशोब, परखडपण! यात झोकून देणं बसतच नाही. ठरलं निर्वाणीचं, काडी मोडली तरी-तरी-तरी!! आयुष्यातली शेवटची ऊर्मी अशी अघोरीपणानं थोपवायची! अनर्थाच्या शेवटच्या क्षणी अर्थाचं निरूपण करायचं! सगळं म्हणजे टू मच. भंकस, खोटं, नाटकी- भावविश्वाच्या चिंधडय़ा करणारं!
म्हणे गाठी स्वर्गात बांधल्या जातात. अत्युत्कट असं काही नसतंच. सगळय़ांतून सावरून घेता येतं. पावलोपावली पर्याय तयार असतात. उगाच हीर-रांझाचा परिवेश का पांघरायचा! आदिपासून अंतापर्यंत सगळं बोलून घेतलंस ना तू! मग या क्षणाचा अर्थ काय- हेतू काय!! तू एक आहेस का तुझ्या आत कितीतरी एक दडल्येत! .. माझं उगाचंच फोलपट होताय!

मध्यरात्र! पूर्ण चंद्रबिंब माथ्यावर. डोंगर खूप आश्वासक भासत होता. मुक्त श्वास घेणारी झाडं, स्वत:त मश्गूल! पर्णरांजी झिम्म्यात दंग. मनात आलं यांची दिनचर्या ही कायमची अशीच असते का!.. आजवर कुठे हा विचार केला होता! आज त्यांच्या सान्निध्यात आलो आणि अंत:र्मुख होऊन अशा प्रश्नांच्या गुंत्यात सापडलो. त्याला आधी झिडकारणारे आणि आता मागे खेचणारे हात! अर्थ लावायचा कसा! सांधा जोडायचा कसा!! तिचे शब्द अनेक प्रतिध्वनी घेऊन कानात घुमत होते. डोंगरमाथ्यावरच्या गूढ नि:शब्दतेला चिरकत होते- ‘कसला रे घनचक्कर माणूस तू! मी काही तिरमिरीत बोलले, हो बालले, पण तिथं आयुष्य थांबतं का! मुद्दाम संपवू गेलं तर काही संपत नसतं. संपण्याची पण एक घटका असते. आलास आपला इथे तरतरत! असला कसला रे पुरुषोत्तम तू! ढेपाळणारा! मी जशी अद्वातद्वा बोलले तू बोलून टाकायचं होतंस ना तुझं अनावरपण! या क्षणाशी का पोचलास. म्हणजे सगळं खापर माझ्यावर, डोळे रोखले जाणार ते माझ्यावर! जग कमाल करणार ती माझी! वाळीत टाकणार ते मला हृदयशून्य समजून!’ बरी बुद्धी झाली मी मागून मागून चालत राहिले! फटक्यात काय होऊन बसलं असतं कळतंय ना तुला!’’ तिच्या बेफाम बोलण्याचे प्रतिध्वनी चक्कर गिरकीसारखे मला भ्रमवीत होते. माझ्याकडे बोलायसारखे काहीच नव्हते का!.. ती वेळ बोलण्याची नव्हतीच मुळी! पण तिला हे सांगणार कोण!.. थंड, नीरव शांततेवर तिचं बोलणं तडातडा निनादत होतं.. स्त्रिया धूर्त असतात म्हणतात. आज प्रत्यय आला. निरगाठी तोडाव्या लागतात म्हणाली होती मोठय़ा वीरश्रीने. मग या वेंधळय़ा क्षणी त्याचे काय झाले! – तेवढय़ात त्याला बिलगत म्हणाली- जरा टेकूया झाडाच्या बुंध्याशी- एकदा उजाडलं की आपण उजेडाचा भाग होऊ-
तो विलक्षण स्तब्ध, तिच्याकडे थेट पहाणंही त्याला शक्य नव्हतं. ओठ शिवलेले. या अवस्थेत, त्याचा कळसूत्री बाहुला झालेला!. कळ आणि सूत्र दोन्ही तिच्या स्वाधीन!
ती खुसूरपुसूर बोलत होती अगदी त्याला चिकटून! ‘मौनी महाराज- ऐका- हे सारं ना एका घडून गेलेल्या घटनेसारखं झालं.’ माझ्या विमनस्कतेत तिला बोलावेसे वाटत होते- कशाचं घडवलंय हिचं मन!.. शब्द पसरतायत..
‘खऱ्या आयुष्यात प्रेमभंग अनुभवलेला एक युवक असाच तुझ्यासारखा पर्वतावर चढतो. झोकून द्यायचं की बास!.. योगायोग असा की त्यांच्या आधी तिथे पोचलेल्या एका युवतीला तो त्याच पवित्र्यात पाहतो- न कळणाऱ्या एका ऊर्मीत तो तिच्या कमरेला दोन्ही हात वेढून मागे खेचतो. तिचं अनावर आक्रंदन- का, का वाचवताय मला. तुम्ही कोण! का विघ्न होऊन अडवताय मला. मला सोडून, तो तिच्याबरोबर नांदतोय. मला नाही जगायचे!.. अश्रूंचा पूर! तो म्हणतोय- ‘अहो, आयुष्यातला घटनाक्रम माहीत नसतो. मीही त्याच उद्देशाने इथे आलो. पण तुम्हाला अशी उडी घेताना मला नाही पाहवलं. मी तिथे पोहोचायच्या आधीच तुम्ही जर-जर! पण विधीसंकेत अगम्य असतात- वगैरे वगैरे..
– ‘ओ मुखस्तंभ- संपली रे गोष्ट-’
दोघं हातात हात घालून नव्या ऊर्मीने डोंगर उतरतात.
‘‘हास की रे राजा.. आपलं जरा उलट झालं- मी तुझा पडता क्षण पकडला.’’
– तिने त्याला उठवलं.. तो फक्त पावलं टाकीत होता- का की ती त्याला चालवीत होती!
डोंगर चालून चालून संपला होता. पहाट उजाडत होती. पक्षी घरटय़ांतून सुटले होते- नीरवता संपली होती..
तो पायथ्याशी तिच्या अगदी सान्निध्य! त्याला सगळेच स्वप्नवत, स्तिमित करणारे वाटत होते. ती मात्र तशीच नॉर्मल होती. म्हणजे स्त्रिया अशाही असतात म्हणायचे!
तो मंतरल्यासारखा नुसता चालत होता. सूत्रं तिच्या हातात सोपवल्यासारखा! कळले नाही नादात दोघांनाही.. कधी ते वस्तीशी पोहोचले.

मराठीतील सर्व गोष्ट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 10-04-2015 at 01:14 IST

संबंधित बातम्या