‘आनंदी, आनंदी’ अशा स्पष्ट हाका ऐकू आल्या आणि आनंदीबाई जाग्या झाल्या. सर्वत्र शांतता होती. अंथरुणातून बाहेर येऊन त्यांनी घडय़ाळ पाहिलं. रात्रीचे साडेतीन वाजले होते. उजाडायला अजून तब्बल दोन तास होते. आता जाग आली होती म्हणजे बाथरूमला जाणं आलं, मग पाणी पिणं आलं. पाणी पिऊन त्या परत अंथरुणावर पडल्या. आता झोपेची आराधना करायला हवी. झोप आली नाही तरी पहाटेची वाट बघत अंथरुणावर शांतपणे पडून राहणं भाग होतं.

तसा आनंदीबाईंचा आणि अरुणरावांचा संसार व्यवस्थित चालला होता. मुलगा आणि मुलगी उच्चशिक्षाविभूषित होती. आपापल्या संसारात सुखी होती. फक्त दोघांचंही वास्तव्य परदेशात होतं. आनंदीबाई आणि अरुणरावांनी भरपूर पर्यटनही केलं होतं आणि असं सर्व व्यवस्थित चालू असतांनाच अरुणरावांना दुर्धर आजाराने ग्रासलं. आठ महिने त्यांची आजाराशी झुंज चालली होती. वडिलांच्या निधनानंतर मुलगा-मुलगी दोघेही भारतात येऊन गेले होते. आईला बरोबर घेऊन जायलाही तयार होते, पण त्याला आनंदीबाईच तयार नव्हत्या. एकटीने राहण्यापेक्षा चांगल्याशा वृद्धाश्रमात जाऊन राहण्याचाही प्रस्ताव आला. परदेशात तर वृद्धाश्रम हा राजमार्ग मानला जातो हेही सांगून झालं. शेवटी मुलांनी सुचवलं की, इथंच राहाचंय तर चोवीस तास राहणारी बाई ठेव असा हट्टच मुलांनी धरला. ‘‘मी लक्ष ठेवून राहते. कुणी चांगली विश्वासाची बाई मिळाली तर जरूर ठेवीन. माझ्या डोक्याला त्रास न होईल अशी मिळायला तर हवी ना?’’ असं म्हणून आईने मुलांना पटवलं. ‘‘तशा बाकीच्या कामाला बायका आहेतच. फक्त रात्रीचाच तर प्रश्न आहे. मी शोधात राहतेच चांगल्या बाईच्या. तुम्ही निवांत राहा.’’ आईच्या या आश्वासनानंतर मुले आपापल्या देशी गेली.
अरुणरावांना जाऊन सहा महिने झाले होते आणि तरीही त्यांनी आनंदीबाईंच्या नावाने मारलेल्या हाका त्यांना अजूनही कधीमधी ऐकू येत. अरुणरावांचं दुखणं काढता काढता त्या थकल्या होत्या. नाही म्हटलं तरी त्यांचंही वय झालं होतंच की! अरुणरावांपेक्षा त्या काही महिन्यांनीच लहान होत्या.
वयाचा विषय निघाला की अरुणराव म्हणत, ‘‘पूर्वी नवऱ्यापेक्षा बायको खूप लहान असायची, ९-१० वर्षांनी. ते बरंच होतं नाही का? नवऱ्याची, सासू-सासऱ्यांची सेवा करणं तिला सहज शक्य होई.’’
‘‘होय तर, आणि तिचं वय झालं की तिची सेवा करायला कोण?’’ आनंदीबाई म्हणत.
‘‘अगं, तिची सेवा तिची सून- मुलगा करणार ना.’’
‘‘पूर्वी ठीक होतं हो. मुलं, सुना, नातवंडं सगळी जवळ असायची. आता कुठं जवळ असतात. सेवा करायला?’’ त्या विचारत.
अर्थात हे संभाषण गमतीत चाले. पण खरोखर जेव्हा वेळ आली आणि अरुणराव आजारी पडले तेव्हापासून आनंदीबाईंची तारेवरची कसरत सुरू झाली. आठ महिन्यांच्या आजारात अरुणरावांचं तीन वेळा हॉस्पिटलायझेशन झालं होतं. कधी कधी त्यांची चिडचिड होई. कामाला बायका होत्या तरी त्यांच्यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी होती. त्या व्यवस्थित काम करताहेत ना, अरुणरावांना औषधं वेळेवर दिली जाताहेत ना, हे सर्व तर होतंच. शिवाय अरुणरावांना भेटायला येणाऱ्या माणसांशी बोलणं, त्यांचं चहापाणी, खाणं बघणं हेही होतंच.
भरीस भर म्हणून अरुणरावांच्या त्यांच्या नावाच्या हाका असत. ‘‘आनंदी, इथे बस माझ्याजवळ, खूप दमतेस ना म्हणून चिडचिड होते तुझी. बस बघू जरा माझ्याजवळ.’’ असं ते म्हणत खरे, पण जरा वेळाने म्हणत, ‘‘चव गेली गं तोंडाची. काही तरी कर ना. ताकातले घावन, गोडा शिरा, इडली, उकड, काही तरी चविष्ट कर.’’ आनंदीबाई त्यांच्यासाठी काही तरी करायला जात. त्या आत गेल्या की जरा वेळाने यांच्या ‘आनंदी, आनंदी’ हाका सुरू होत.
‘‘झाल्या यांच्या हाका सुरू. तुमच्यासाठी काही तरी कर म्हणालात ना? मग जरा धीर धरा.’’ आनंदीबाई वैतागून म्हणत. ‘‘माझ्या नावाने हाका मारण्यापेक्षा देवाच्या नावाने मारा.’’
आनंदीबाई देवपूजा करायला लागल्या की त्यांना हाका मारून म्हणायचे, ‘‘काय सांगशील देवाला, मला लवकर वरती न्यायला सांग.’’
‘‘हो, तेच सांगते.’’ त्या म्हणत.
कोणी भेटायला, विचारपूस करायला आलं आणि म्हणालं, ‘‘लवकर बरे व्हा हं.’’ की त्यांचं उत्तर असायचं, ‘‘आता बरं होणं नाही. आता मुक्काम पोस्ट देवघर.’’ आलेली माणसं आनंदीबाईंकडे पाहून म्हणत, ‘‘मग आनंदीला कोण? आणि ती एवढं करते आहे ते तुम्ही जावं म्हणून का?’’
‘‘खरं तर तीही कंटाळली आहे आता. माझं करताना थकून गेलेय. मला तर सुटायचंच आहे, पण तिलाही सोडवायचंय.’’
आलेल्या माणसांना कानकोंडं व्हायला होई. ‘‘काही तरी बोलतात ते. नका मनावर घेऊ.’’ आनंदीबाई म्हणत आणि अरुणरावांच्या मिटलेल्या डोळय़ांतून ओघळणारं पाणी टिपत.
आणि अखेर तो दिवस आला. आनंदीबाई रात्रीच्या झोपेत होत्या. ‘‘आनंदी, आनंदी’’ अशा हाका ऐकू आल्या. झोपेतून उठून त्या अरुणरावांच्या अंथरुणापाशी गेल्या. ते शांत झोपल्यासारखे दिसत होते. त्यांनी अरुणरावांचा हात हातात घेतला. थंडगार हाताचा चटका बसला. सर्व संपलं होतं. अरुणरावांच्या मनासारखं झालं होतं.
‘‘आता ‘आनंदी, आनंदी’ हाका परत कधीच ऐकू येणार नाहीत. वैतागून म्हणायचीस ना, ‘किती हाका मारता सारखे माझ्या नावाने, त्यापेक्षा देवाला हाका मारा. आता नाही कोणी तुला हाका मारणार.’’ आनंदीबाई मनाशी म्हणाल्या.
आणि आज आत्ता परत त्याच हाका कशा ऐकू आल्या आपल्याला? आनंदीबाई विचार करीत राहिल्या. पहाटे पहाटे कधी तरी त्यांचा डोळा लागला.
‘‘फिर पुकारो मुझे। फिर मेरा नाम लो..’’ कुठं तरी वाजत असलेल्या गाण्याचे सूर ऐकू आले. त्यांना जाग आली.
आनंदीबाईंचा कंठ दाटून आला. अरुणरावांच्या हसऱ्या फोटोपाशी जाऊन त्या उभ्या राहिल्या. डोळय़ात जमलेल्या पाण्याला वाट देत राहिल्या. गदगदलेल्या आवाजात म्हणाल्या,
‘‘आता नुसत्या हाका कसल्या मारताय मला, आता बोलवा ना मला तुमच्याजवळ बसायला. आणि खरंच सांगते, आता अगदी मोकळी आहे हो मी!’’
वीणा करंदीकर