त्याच्या भटकण्याला पुरा आठवडा झाला होता, पण त्याला काहीही काम मिळाले नव्हते. जवळचे सर्व पैसे संपले होते. भिक्षा मागून काही ठिकाणी थोडी भाकरी मिळाली होती, तीच तेवढी भूकनिवारणासाठी त्याच्याकडे उरली होती.

कामाच्या शोधात सबंध तालुका पालथा घालून रांदेलला आता एक महिना होत आला होता. काम नसल्यामुळे ‘खाडी’ जिल्ह्य़ातले त्याचे ‘विल आवारी’ हे गाव सोडून तो जवळजवळ परागंदा झाल्यासारखा होता. नाकासमोर चालणारा व सरळ जीवन व्यतीत करणारा सत्तावीस वर्षांचा चांगल्यापैकी सुतार होता. पण गेले दोन महिने काही काम मिळत नसल्याने स्वत: घरातील मुख्य मिळवती व्यक्ती असूनही घरातल्या इतरांच्या उत्पन्नावर जगत होता. कामासाठी वणवण भटकणे हाच त्याचा एक उद्योग झाला होता. त्याच्या कुटुंबाला दिवसाला एक जेवण मिळण्याची भ्रांत पडली होती. तशा त्याच्या दोन्ही बहिणी धुणेभांडी करणाऱ्या मोलकरणींचे काम करीत होत्या म्हणा, पण त्यांचे उत्पन्न फारच कमी होते. आपण काहीही मिळवत नाही आणि बहिणींच्या उत्पन्नावर कुटुंबातले आपण सर्वजण कसेबसे जगत आहोत याची त्याला खूप शरम वाटत होती.
प्रथम तो तालुक्याच्या गावी ग्रामपंचायतीच्या कचेरीत गेला होता. तेथे अध्यक्षांच्या सेक्रेटरीने त्याला सांगितले होते की, ‘‘तू रोजगार केंद्रात जा, तेथे तुला काम मिळेल.’’ हे ऐकल्याबरोबर घरी जाऊन त्याने आपली प्रमाणपत्रे, दोन सदरे व एक तुमान एका थैलीत घेतली व तो तेथे जाण्यास निघाला होता. एक दिवस-रात्र न थांबता चालून जेथे काम मिळेल अशा ‘गूढ’ मुलखाच्या शोधात तो होता. आरंभी ‘केवळ सुताराचे काम’ मिळेल का? ही चौकशी तो करीत होता. पण प्रत्येक ठिकाणी सुतारांना नुकतेच कमी केल्याचे कळल्यामुळे त्याने कोणतेही काम करण्याची आपली तयारी आहे हे सांगण्यास सुरुवात केली. तो सांगायचा की, ‘मी सुतारकाम तर करतोच, पण घोडय़ांचा खरारा करणे, पत्थर फोडणे, सरपण तोडणे, झाडांच्या फांद्या छाटणे, खोदकाम करणे, गुरे राखणे, मेंढय़ा-बकऱ्या चरायला रानात नेणे अशी काहीही कामे अल्प वेतनात करण्यास मी तयार आहे.’ आणि त्याला यातली दोन-तीन कामे मिळालीही होती, पण काम देणाऱ्यांनी त्याच्या दयनीय स्थितीचा फायदा घेऊन अत्यंत कमी रकमेवर त्याची बोळवण केली होती.
आता त्याच्या भटकण्याला पुरा आठवडा झाला होता, पण त्याला काहीही काम मिळाले नव्हते. जवळचे सर्व पैसे संपले होते. भिक्षा मागून काही ठिकाणी थोडी भाकरी मिळाली होती, तीच तेवढी भूकनिवारणासाठी त्याच्याकडे उरली होती. हळूहळू काळोख पडत चालला होता आणि पोटात अन्नाचा कण नसलेला व मनाने खचलेला असा जॅक रांदेल जोडे हातात घेऊन लटपटणाऱ्या पायांनी अनवाणी चालत होता. जोडे अशासाठी त्याने हातात घेतले होते की, तेही फाटून गेले तर अनवाणी माणसाला काम मिळण्यास आणखी अडचण निर्माण होईल. पानगळीच्या मोसमातला तो एक शनिवार होता. पावसाची चिन्हे दिसू लागली होती. रविवारच्या आधीची सकाळ असल्याने रस्त्यावर चिटपाखरू नव्हते. बाजूच्या शेतांमध्ये कापणी झालेल्या पिकाचे ढीगच्या ढीग जमा झाले होते. मळणी व्हायची होती. खुद्द शेते मात्र उजाड दिसत होती.
एखाद्या भुकेल्या लांडग्यासारखी रांदेलची स्थिती झाली होती. दमलेला, डोळे लाल झालेले, कपाळाच्या शिरा धडधडत आहेत, तोंड सुके पडलेले आहे, अशा स्थितीतला रांदेल साऱ्या जगावर संतापला होता, इतका की, एखादा वाटसरू त्याला समोरून येताना दिसला असता तर हातातील काठी त्याच्या टाळक्यावर सडकल्याशिवाय तो राहिला नसता. बाजूच्या शेतांकडे त्याने नजर फेकली. त्याला बटाटय़ाची रोपे दिसली आणि शेकोटीवर बटाटे भाजून खाण्याची त्याला तीव्र इच्छा झाली. तथापि बटाटय़ाचा सीझन संपला होता आणि त्याला अगदी कच्चे कंद खावे लागले असते. असो.
गेले दोन दिवस तो स्वत:शीच बोलू लागला होता. ते बोलणे त्याच्या सुतारकामासंबंधित असायचे. पण आता थकवा, दीर्घ काळचा उपवास, काम मिळण्यात सतत आलेले अपयश, उघडय़ावर काढलेल्या रात्री आणि ठिकठिकाणी लोकांकडून झालेली अवहेलना व अपमान, ह्य़ांनी त्याच्या डोक्यात निराळे विचार येऊ लागले. घर सोडून बाहेर जाण्याचा निर्णय आपण घेतलाच कशाला, त्यापेक्षा घरीच का नाही राहिलो, असे त्याला वाटू लागले. घरच्या मंडळींची आठवण त्या स्थितीत आल्याने तो आणखीनच संतापला. मध्येच एका दगडाशी ठेच लागल्यानंतर तर त्याच्या तोंडून शिव्यांचे शब्द आले, ‘काय दुष्ट आहे हे साले जग! माझ्यासारखा उत्तम सुतार कामाविना तडफडून मरत आहे, त्याचे कोणालाच सोयरसूतक नाही. त्यात आला हा xxxचा पाऊस? आता संध्याकाळ झाली होती. आसपासच्या घराच्या धुरांडय़ातून धूर निघत होता आणि जेवणाची वेळ झाली होती. त्याला वाटले, सरळ कोणाच्या तरी घरात घुसावे, जेवत असणाऱ्या मालकाला बाजूला ढकलावे आणि आपणच त्याचे भोजन खाऊन टाकावे. तो स्वत:शी म्हणाला, ‘मला जगण्याचा हक्क आहे, इथे भुकेने मरायची वेळ माझ्यावर आली आहे आणि कारण काय तर काम मिळत नाही. हवा सर्वाची आहे म्हणून मी सुद्धा श्वास घेत आहे. त्याचप्रमाणे माझाही जगण्याचा हक्क आहे. मला कोणीही अन्नापासून वंचित करू शकत नाही.’

त्याला वाटले, सरळ कोणाच्या तरी घरात घुसावे, जेवत असणाऱ्या मालकाला बाजूला ढकलावे आणि आपणच त्याचे भोजन खाऊन टाकावे.

आता पावसाला सुरुवात झाली आणि त्याचबरोबर अति थंड वारा त्याच्या तोंडावर बर्फाळ पाण्याचा मारा करू लागला. त्याला घरची आठवण आली. ‘घरी पोचायला अजून एक महिना लागेल,’ तो विचार करू लागला, ‘परक्या मुलखात असे वणवण हिंडून लोकांच्या नुसत्या शिव्याच खायच्या, अपमान सहन करायचे आणि फिरून आपण चोर आहोत असा सर्वानाच संशय! त्यापेक्षा आपला गावच बरा, निदान तेथे आपल्याला सर्वजण ओळखतात आणि सुतारकाम नाही तर दुसरे काम आपल्याला तिथे मिळेल आणि भाकरीची तरतूद होईल.’ पावसाचे थंडगार पाणी मानेवरून घरंगळून आपल्या कपडय़ात घुसेल, म्हणून त्याने जवळचा रुमाल -रुमाल कसला, एक फडके-मानेला गुंडाळले पण पाणी सदऱ्याच्या आत घुसायचे थांबेना. त्याची बिचाऱ्याची अगदी दीनवाणी अशी स्थिती झाली. पावसाला कसे तोंड द्यावे त्याला समजेना. आता काळोख पडला, रात्र झाली, रस्त्यावरच्या एका दिव्याच्या प्रकाशात जवळच कुरणात पहुडलेली एक गाय त्याला दिसली. तो तिच्याजवळ गेला. त्याच्या मनात विचार आला, ‘माझ्याकडे एक तांब्या असता तर किती बरे झाले असते! या गाईचे दूध तरी मला पिता आले असते.’ ‘उठ ग बये’, म्हणत त्याने लाथ मारून त्या गाईला उठवले. तशी तिची लोंबणारी आचळे त्याला दिसली. गाईच्या खाली जमिनीवर उताणा पडून आचळे सरळ तोंडात घेऊन व ती हाताने दाबत तो दूध पिऊ लागला. शक्य तितके दूध पिऊन तो बाजूला झाला. आता पाऊस आणखी वाढला होता. काय करावे त्याला कळेना, कारण थंडी पण वाढली होती. गाय पुन्हा बसली होती. तसा तो तिला चिकटून बसला. तिचे आभार मानत तो तिच्या गळ्यावरून हात फिरवू लागला. तिचे अंग चांगलेच गरम होते, हे लक्षात येताच तिच्या पोटाला लगटून तो तेथेच पहुडला. थकल्यामुळे त्याला लगेच झोप आली, पण थंडीमुळे झोप सारखी मोडत होती. कुशी बदलून त्याने आपल्या शरीराचा थंड झालेला भाग गाईला टेकवून थंडी घालवण्याचा प्रयत्न केला. सबंध रात्रीत अनेक वेळा त्याने हा प्रकार केला. कूस बदलायची, थंड झालेला आपल्या शरीराचा भाग गाईला भिडवायचा आणि लगेच गाढ झोपायचे.
एका कोंबडय़ाच्या आरवण्याने सकाळ झाल्याचे भान त्याला आले. तो उठला. आकाश प्रकाशमान झाले होते, पाऊस थांबलेला होता, जमिनीवर डोके टेकून गाय झोपली होती. गाईच्या ओलसर पण गरम नाकपुडय़ांचे चुंबन घेत तो गाईला म्हणाला, ‘तुझे किती आभार मानू गं? आता मात्र तुझा निरोप घेतो,’ आणि जोडे घेऊन तो पुढे निघाला. रस्ता फुटेल तसा तो दोन तास चालला, पण नंतर थकल्यामुळे त्याने जमिनीवरच बैठक मारली. आतापर्यंत सूर्य चांगला वर आला होता, चर्चमधील घंटा वाजत होत्या आणि सणासुदीचे कपडे परिधान केलेले स्त्री-पुरुष लगबगीने चर्चकडे जात होते. काहीजण चालत तर काही घोडागाडीने. थोडय़ा वेळाने त्याला बें, बें करणाऱ्या मेंढय़ांचा एक कळप व ‘स्सऽऽ’ ‘स्सऽऽ’ म्हणत त्याला हाकणारा एक धनगर समोरून येताना दिसले. जवळ येताच रांदेलने धनगराला विचारले, ‘दादा, काही काम मिळेल का हो या भुकेल्याला? वाटेल ते काम करायला मी तयार आहे.’ ‘रस्त्यात भेटलेल्या उनाड माणसाला मी काम देत नसतो. तुझ्यासारखे उनाड मी खूप पाहिलेत.’ असे उत्तर, न थांबता देत धनगर मार्गस्थ झाला. हे ऐकताच रांदेल पुन्हा आपल्या जागेवर जाऊन बसला. ओव्हरकोट घातलेल्या एका स्थूल व दयाळू वाटणाऱ्या माणसाला त्याने निवडले व तो त्यास म्हणाला, ‘महाराज काही काम मिळेल का हो? काहीही काम करायला मी तयार आहे, पण अजून मला काहीच काम मिळालेले नाही. माझ्याजवळ एक दमडीही नाही. तुम्ही मला काही मदत करू शकाल का?’ त्यासरशी एकदम उसळून ते गृहस्थ बोलले, ‘साल्या, गावाच्या वेशीवर लावलेली पाटी तू वाचली नाहीस का? या गावात भीक मागण्यास मनाई आहे आणि लक्षात ठेव, मी इथला नगराध्यक्ष आहे. तू ताबडतोब इथून चालता झाला नाहीस तर मला तुला अटक करवावी लागेल.’ आतापर्यंत रांदेल बेभान झाला होता. आता त्याचा राग अनावर झाला व तो म्हणाला, ‘ठीक आहे, असे आहे तर तुम्ही मला अटक कराच. निदान भुकेने मी मरणार नाही.’ आणि तो तिथेच बसून राहिला. हे पाहून तो गृहस्थ त्याच्याकडे जळजळीत कटाक्ष टाकत निघून गेला.
थोडय़ाच वेळात तेथे गणवेशातले दोन पोलीस आले. त्यांच्या चामडय़ाच्या पट्टय़ांची पितळेची बकले चकाकत होती आणि पायातले बूट व हातातले दंडुके पॉलिश केलेले होते. आपल्याला हे पकडण्यास आलेले आहेत हे रांदेलच्या लक्षात आले, पण त्याच्या मनात आले की आपण यांना हिसका दाखवावा व तो ठिय्या देऊन तेथेच बसून राहिला. प्रथम त्यांचे लक्ष रांदेलकडे गेलेले नव्हते, पण जसे ते त्याच्या जवळून जाऊ लागले, तसे त्यांनी त्याला पाहिले व ते थांबले. त्यांच्यातला फौजदार त्याच्या जवळ आला व त्याने रांदेलला हटकले व म्हणाला, ‘काय रे भडव्या, काय करतोस इथे?’
‘स्वस्थ बसलोय,’ रांदेल उत्तरला.
‘कुठून आलास तू?’ फौजदार.
‘ते जर तुम्हाला सांगत बसलो, तर एक तास जाईल.’
‘बरे तू कुठे चालला आहेस?’
‘वील आवारीला.’
‘कुठे आहे रे ते?’
‘खाडीच्या जिल्ह्यत,’ रांदेल.
‘तू तिथलाच का?’
‘हो.’
‘मग गाव का सोडलास?’ फौजदार.
‘मी काम शोधतोय.’
या लांबण लागलेल्या संभाषणाने धीर सुटलेला फौजदार शिपायाकडे वळून म्हणाला, ‘हे साले सगळे लफंगे असेच सांगून चोऱ्या करतात. मी त्यांना चांगला ओळखतो.’ आणि रांदेलकडे वळून त्याने विचारले, ‘काय रे, तुझ्याकडे काही ओळखपत्रे आहेत का?’ त्याने ‘हो’ म्हणताच फौजदारानी ती मागितली. ओळखपत्रांचे कागद वारंवार हाताळण्यामुळे घडय़ा पडून जीर्ण झाले होते. अनेक वेळा ते उलटेपालटे करून मोठय़ा कष्टाने वाचल्यानंतर फौजदाराने पुन्हा प्रश्न केला, ‘तुझ्याकडे पैसे किती आहेत?’ आणि रांदेलने त्याच्याकडे एकही छदाम नसल्याचे उत्तर दिले. त्याच्या आणखी दोन-तीन वेळा याच प्रश्नाचे रांदेलकडून तेच उत्तर आले. शेवटी फौजदार म्हणाला, ‘अच्छा म्हणजे तू भीक मागतोस तर!’ रांदेल छाती पुढे काढून म्हणाला, ‘हो नाइलाजाने.’ त्यावर गंभीरपणे काही वेळ विचार करून फौजदार म्हणाला, ‘हे पाहा, तुला काही कामधंदा नाही आणि मी तुला हमरस्त्यावर भीक मागताना पकडला आहे त्यामुळे आम्हाला तुला चौकीवर न्यावे लागेल.’ त्यासरशी रांदेल उठला व म्हणाला, ‘मीच येतो तुम्ही सांगाल तिथे. मला तुम्ही कोठडीत बंद करा, माझे पावसापासून तरी रक्षण होईल.’ तसे ते तिघे, फौजदार व हवालदार कडेला व रांदेल त्यांच्यामध्ये, असे गावाकडे निघाले. अर्धा एक मैल चालल्यानंतर गावातल्या घरांची कौले दिसू लागली. ते जसे गावात शिरले तशी चर्चमधील प्रार्थना नुकतीच सुरू होत होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूचे पादचारी त्यांना पाहायला थबकत होते. त्यांच्या डोळ्यात तिरस्कार होता. बहुतेकांच्या मनात कैद्यावर दगड फेकावे अथवा त्याला चांगला झोडपून काढावा असे विचार येत होते. त्याने चोरी, दरोडेखोरी किंवा खून यांच्यापैकी काहीतरी केले असावे अशी त्यांची खात्री होती. सैन्यातून नुकताच निवृत्त झालेला खाटिक म्हणाला, ‘‘अरे, हा तर सैन्यातून पळालेला बदमाश! पेपरात परवा याचे चित्र आले होते.’’ त्यावर पानवाला म्हणाला, ‘नाही, नाही, आजच सकाळी शंभरची खोटी नोट देऊन याने माझ्याकडून बिडीबंडल नेले.’ त्यावर लोहारदादा म्हणाले, ‘हा तर विधवा मालेबाईंचा खुनी दिसतोय, सहा महिने फरार होता असे दिसते.’ फौजदार व हवालदार या दोघांनी रांदेलला सरळ नगराध्यक्षांच्या घरी नेऊन साहेबांपुढे उभे केले.
‘ओहो, आता पुन्हा माझ्यापुढे येतोस काय? सकाळीच तुला अटक करण्यास हवी होती. फौजदारसाहेब, याचा काय गुन्हा आहे?’ नगराध्यक्ष प्रश्न करते झाले.
‘महाराज, हा लफंगा रस्त्यावर भटकून भीक मागताना आढळला. पण त्याची ओळखपत्रे तपासून पाहिली, ती ठीक आहेत.’
‘आणा ती ओळखपत्रे.’ नगराध्यक्ष उद्गारले. पुन्हा ती वाचून नगराध्यक्ष गरजले, ‘याची झडती घ्या.’ त्याबरोबर हवालदाराने रांदेलची झडती घेतली, पण तिच्यात काही आक्षेपार्ह मिळाले नाही. तेव्हा नगराध्यक्ष बुचकळ्यात पडले आणि त्यांनी रांदेलला प्रश्न केला, ‘कार रे, सकाळच्या रामपारी रस्त्यावर काय करत होतास?’
‘काही काम मिळतं का याचा तपास करीत होतो.’
‘काम आणि रस्त्यावर? रस्त्यावर कधी काम मिळते का?’
‘साहेब, मग काम काय जंगलात फिरून मिळणार आहे?’
साहेब निरुत्तर झाले पण दात-ओठ चावत रांदेलकडे त्यांचे पाहाणे चालूच होते. शेवटी ते रांदेलला म्हणाले, ‘या खेपेस मी तुला सोडून देतो, पण पुन्हा तुझे थोबाड दिसले तर खबरदार.’ यावर रांदेल म्हणाला, ‘साहेब मला कोठडीत ठेवा. भटकून व उपासमारीने मी थकून गेलोय!’ त्यावर ‘हरामखोरा, गप्प बैस’ इतकेच बोलून नगराध्यक्षांनी फौजदाराला फर्मावले, ‘याला गावाबाहेर नेऊन गावापासून पाव मैलावर सोडा. तेथून तो पुढे कुठे का मरेना!’ यावर रांदेल म्हणाला, ‘साहेब, मी आपण होऊन जाईन पण मला पोटाला काहीतरी द्या.’ त्याबरोबर साहेब गर्जले, ‘‘हां, हां आता तुला खादीला द्यायचे. या हरामखोराच्या निर्लज्जपणाची कमाल आहे.’ पण रांदेल गप्प बसायला तयार नव्हता. तो म्हणाला, ‘साहेब, मला खायला काही न दिलेत तर माझ्या हातून गुन्हा होईल व तुमच्यापुढे आणखी कटकट निर्माण होईल.’ जागेवरून उठत नगराध्यक्ष गर्जले, ‘अरे, याला ताबडतोब घेऊन जा, नाहीतर माझे पित्त खवळेल.’ त्याबरोबर फौजदार व हवालदार या दोघांनी रांदेलचे दंड पकडले आणि ते त्याला नगराध्यक्षांच्या पुढून ओढत नेऊ लागले. याला रांदेलने मुळीच विरोध केला नाही. गावाबाहेर सुमारे पाव मैल गेल्यावर फौजदार म्हणाले, ‘चालता हो xxxxx, आणि पुन्हा आमच्या गावात पाऊल टाकू नकोस. तुला पुन्हा अटक करण्याची वेळ माझ्यावर आणलीस, तर तुला दाखवेन माझा इंगा!’

तो ज्या घरावरून चालत होता त्यातून शिजणाऱ्या मटणाचा घमघमाट त्याच्या नाकात शिरला. आधीच तो भुकेने वेडापिसा व अपमानाने हिंस्र पशूसारखा संतापला होता.

बिचारा रांदेल चालू लागला. कोठे जावे हे त्याला कळेना. शून्य मनाने तो चालत राहिला. इतक्यात तो ज्या घरावरून चालत होता त्यातून शिजणाऱ्या मटणाचा घमघमाट त्याच्या नाकात शिरला. आधीच तो भुकेने वेडापिसा व अपमानाने हिंस्र पशूसारखा संतापला होता. ‘देवाने खर केली’ असे स्वत:शी म्हणत तो अनाहूतपणे त्या घराकडे वळला आणि त्या घराचा दरवाजा जोरजोराने ठोठावू लागला. दरवाजा उघडायला आतून कोणी येत नाही हे पाहून त्याने मोठमोठय़ाने हाका मारण्यास सुरुवात केली. घरात कोणीही नव्हते. घरमालकिणीने स्वयंपाकघरात चुलीवर मटण शिजत ठेवले होते. घरातली सर्व मंडळी चर्चला गेली आहेत हे उघड होते. रांदेलने स्वयंपाकघराच्या खिडकीशी हात घातला तो ती एकदम उघडली. खिडकीला गज नव्हते. त्यामुळे एका उडीत रांदेल खिडकीतून आत गेला. पाहतो तो टेबलावर एक मोठा पाव ठेवलेला होता व त्याच्या बाजूला दारूच्या दोन बाटल्या ठेवलेल्या होत्या. त्याने प्रथम पावावर झडप घातली व तो बकाबका पाव खाऊ लागला. पण लगेच मटणाच्या वासाने तो शेगडीकडे वळला व त्याने शिजणाऱ्या मटणाचे मोठे तुकडे, त्यातील कांदे, बटाटे, बीट, कोबी यांचा रस्सा एका थाळीत ती भरेपर्यंत वाढून घेतला आणि खुर्चीवर बसून हे सर्व भराभर खाऊ लागला. दारूच्या बाटल्यांची बुचे त्याने आधी काढली होतीच, तेव्हा खाताना तो दारूचे घुटकेही घेऊ लागला. ती ब्रॅन्डी होती त्यामुळे थंडीने गारठलेल्या रांदेलला त्या दारूने चांगली ऊब आली. हे सगळे संपवल्याबरोबर त्याला एकदम बरे वाटू लागले. इतक्यात चर्चच्या घंटेचे टोले पडायला सुरुवात झाली. त्याचा अर्थ पाद्रय़ाची प्रार्थना व प्रवचन संपले होते. आता पसार झाले पाहिजे हे रांदेलच्या एकदम लक्षात आले व त्याने उरलेला पाव व दारूची बाटली खिशात घालून घराबाहेर धूम ठोकली. रस्त्याने पळण्याऐवजी शेतोडीतून जाण्याचा निर्णय त्याने घेतला. काहीशा झिंगलेल्या अवस्थेत तो बाजूच्या झाडीत शिरला व जंगलाच्या दिशेने चालू लागला. खाणे-पिणे झाल्यामुळे त्याला छान वाटत होते व तो मजेत गात चालला होता. पण नंतर थोडीशी शुद्ध येताच ‘आपण हे भलतेच करून बसलो’ या विचाराच्या भीतीने तो पळू लागला. तो इतका वेळ व इतका जलद धावला की, शेवटी त्याला उभे राहणेपण मुश्किल झाले. तो एका झाडाच्या बुंध्याशी बसला आणि काही मिनिटांतच त्याला तेथे गाढ झोप लागली.
तो जागा झाला तेव्हा त्याच्या लक्षात आले की, ते सकाळचेच दोन पोलीस आपल्याला दंडाला धरून उठवीत आहेत. ‘मला माहीतच होते की तुला पकडावे लागेल,’ फौजदार रागाने म्हणाला. त्या दोन दांडग्या पोलिसांपुढे रांदेलचे काय चालते? तो मुकाटय़ाने उठला व त्यांच्याबरोबर चालू लागला. आता संध्याकाळ व्हायला आली होती. आकाशात संधिप्रकाश दाटत होता. अध्र्या तासात ते गावात पोचले. रांदेलच्या दुष्कृत्याची बातमी तिकडे पसरली होतीच. प्रत्येक गावकऱ्याला वाटत होते की आपल्याच मालमत्तेची चोरी झाली, त्यामुळे रांदेलला चांगली कडक शिक्षा झाली पाहिजे असे प्रत्येकाला वाटत होते आणि त्या दृष्टीने सगळे त्याच्याकडे पाहात होते. पोलिसांनी त्याला सरळ नगराध्यक्षांकडे नेले. ते त्याची वाटच पाहात होते. त्याला पाहताक्षणी दोन्ही हात चोळत ते उठले व ओरडले, ‘‘हरामखोरा, बरा सापडलास! खरे म्हणजे पाहताक्षणी मी तुला ओळखला होता. आता तुला सहा महिने खडी फोडायला नाही पाठवला, तर माझे नाव बदलेन!’’