मुले आणि घरातील मंडळी यांच्यात रोजच्या रोज होणारा संवाद कोणत्या पातळीवरचा आहे, गुणात्मक आहे की उत्साहवर्धक आहे की मुलांचा आत्मविश्वास गमावणारा आहे, हे पाहणे खूप महत्त्वाचे आहे.
अजून तू लहान आहेस असे म्हणून पालक मुलाला हिडीसफिडीस करत असतात. याला हात लावू नको, कपाट उघडू नको, अभ्यास केलास का, टीव्ही बघू नको, जेवलास का. अशा त्याच त्याच प्रश्नांचा भडिमार केल्याने मुले त्याकडे दुर्लक्ष करतात. मुलांना त्यांच्या विश्वातील गप्पागोष्टी पालकांना सांगायला आवडतात. लहान मुले सर्वाचे बारकाईने निरीक्षण करत असतात. सगळे कुटुंब पिंटूला कसे हिडीसफिडीस करते ते पिंटूच्या गोष्टीतून लक्षात येते.
एकदा कंटाळलेला पिंटू दप्तर-पुस्तके बाजूला ठेवून बसलेल्या आईशी गप्पा माराव्यात म्हणून तिच्या पाठुंगळीवर बसला व शाळेतील घडलेला मजेशीर प्रसंग सांगत तिच्या पुढय़ातील कागद खसकन खेचून तिचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला. झालं. आई भडकली. पिंटूला बाजूला ढकलत म्हणाली, ‘‘अरे गधडय़ा, तुला कळत नाही? हे काय करतोस, हो बाजूला, तुला दिसत नाही, मी बालसंगोपनावर भाषण लिहीत आहे. उद्या भगिनी समाजात माझे भाषण आहे.’’
हिरमुसलेला पिंटू अंगणात आला. अंगणात बाबा नळीने झाडांना पाणी घालत होते. एकीकडे खाली बसून पालापाचोळा, घाण साफ करत होते. झाडांना खत घालत होते. तेवढय़ात पिंटू पटकन नळी उचलून फुलझाडांवर पाणी मारू लागला. पिंटूचे बाबा ताडकन उठून त्याच्यावर खेकसले, ‘‘अरे गाढवा! थांब! सगळीकडे चिखल करशील आणि फुलांवर जोरात पाणी नाही मारायचे. आत जा, अभ्यास कर. ही फुललेली फुले म्हणजे माझा प्राण आहे.’’
नाराज झालेला पिंटू खाली मान घालत घरात येत असताना बाहेर चाललेल्या आजोबांशी त्याची टक्कर झाली. त्यांच्या हातातील काठी ओढत तो म्हणाला, ‘‘चला ना आजोबा आपण पत्ते खेळू या! मी तुम्हाला शाळेत नवीन डाव शिकलो तो दाखवतो.’’ आजोबांनी त्याला झटकले व म्हणाले, ‘‘अरे पिंटय़ा, ही काय वेळ आहे पत्ते खेळायची! जा तू, अभ्यास कर. मी आज ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभेला जातोय. तिकडे मानसोपचारतज्ज्ञ डॉक्टर जोशी येणार आहेत, ते आम्ही आजी-आजोबांनी ‘लहान नातवंडांवर संस्कार कसे करायचे’ या महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहेत.’’
पिंटू वेडेवाकडे तोंड करत पाय आपटत घरात आला. काका लॅपटॉपवर काहीतरी काम करत होता. पिंटू त्याच्याजवळ गेला. लाडीगोडी लावत म्हणाला, ‘‘काका चल! आपण अंगणात क्रिकेट खेळू या. मी बॅटिंग करतो, तू मला आऊट करून दाखव. शेजारच्या आदूला पण बोलवू या!’’ पिंटूचे हात बाजूला सारत काका म्हणाला, ‘‘छे छे, आत्ता मला नाही वेळ! जा तू तुझा अभ्यास कर.’’
कपाळावर हात मारत पिंटू बाहेर येत असताना त्याला समोर आजी दिसली. आजीला घट्ट मिठ्ठी मारत, तिचा पदर ओढत पिंटू म्हणाला, ‘‘आजी अगं मला जाम बोअर झालंय! प्लीज मला एखादी मजेशीर गोष्ट सांग ना. चल आपण पायरीवर बसू या!’’ आजी एकदम अंगावर खेकसली, ‘‘दूर हो! मला पाडशील! तू आधी घरात जा, दूध पी आणि अभ्यासाला बस! करमत नसेल तर बाहेर खेळायला जा. मी देवळात चालले आहे कीर्तनाला, देवाजवळ तुझ्याकरता प्रार्थना करणार आहे की याला चांगली बुद्धी दे! आणि निरोगी, आनंदी ठेव.’’
तेवढय़ात आईचे लक्ष पिंटूकडे गेले. तिने रागात जोराने त्याला ‘पिंटय़ा, आधी इकडे ये!’ हाक मारली. पिंटू घाबरत धावत आईला बिलगला. म्हणाला,
अगं! आई गं,
तू मला नको गं मारू.
तूच सांग आता मला,
मी काय करू?
खेळ नाही, मजा नाही,
अभ्यास किती करू?
तूच सांग आता मला,
मी काय करू? आईऽऽऽ..
श्रीनिवास डोंगरे -response.lokprabha@expressindia.com